विचारवंत होणे कोणाची मक्तेदारी नाही. थिंकिंग
शिकायचं असेल तर आधी लिहायला शिका. रोज कोणत्याही विषयावरची किमान वीस
वाक्ये लिहायला सुरुवात करा. ही वीस वाक्ये तुमचे स्वतःचे विचार असले
पाहिजेत. दुसर्या कोणाचे रेडीमेड विचार वेगळ्या शब्दात लिहून काढणे म्हणजे
विचार करणे नव्हे. स्वतःचे विचार मांडतांना मेंदूला ताण द्यावा लागतो.
योग्य शब्दांची निवड करावी लागते. कमीत कमी शब्दात अचूकपणे आपले म्हणणे मांडणे संवाद साधण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची कृती असते.
बरे हे का करायचे? तर आपली विचार करण्याची पद्धत विकसित झाली पाहिजे. विचार स्पष्ट आणि धारदार झाले तर मांडणीत आत्मविश्वास येतो. मांडणीत आत्मविश्वास आला की इतरांना आपली मते पटवून देण्यात यश येऊ लागते. हे असे सगळे करता येऊ लागणे हीच एक मोठी उपलब्धी (अॅसेट) आहे. ह्या अॅसेटच्या माध्यमातून आपण पैसे उभे करु शकता, माणसे उभी करु शकता, सपोर्टसिस्टीम उभी करु शकता. आपल्या आणि इतर लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकता.
आपल्यापैकी सगळ्यांकडेच वेगवेगळ्या अनुभवाचे भांडार असते. प्रत्येकाच्या आयुष्याचे काहीतरी एक तत्त्वज्ञान असते. परंतु कधी शांतपणे बसून त्यावर विचार केलेला नसल्याने आयुष्य गढूळ पाण्यासारखे होऊन राहते. लिहिण्याच्या कृतीतून हा गढूळपणा काढता येईल. आपलेच आयुष्य आपल्याला आणखी क्लिअर होईल. आपले ध्येय, आकांक्षा आणि शक्तिस्थळांची माहिती होईल. आपल्याला लिहिता येत नाही, दोन वाक्याच्या वर सुचत नाही, नीट मांडता येत नाही. ह्या समस्या असतीलच. परंतु सुरुवात केल्यावर हळूहळू ह्यावर मात करता येते. सरावानेच सिद्धी प्राप्त होते.
रोज वीस वाक्यांचा एक निबंध लिहायचा. हा प्रयोग किमान ९० दिवस सलग करायचा. विषयाचे कोणतेही बंधन नाही. एखादा विषय घेऊन वाट्टेल तेवढे वाचा, बघा, इतरांशी चर्चा करा. परंतु लिहितांना आपल्याला काय समजले, काय जाणवले, कसे वाटले, आणखी काय असू शकते ह्या संदर्भात विचार करा. आणि लिहून काढा. रोज वेगळा विषय असू शकतो किंवा एकच विषय घेऊन जितके जमेल तितके लिहू शकता. लिहितांना कोणतेही दडपण असायची गरज नाही. कोण चांगले म्हणेल, वाईट म्हणेल, चूक म्हणेल, बरोबर म्हणेल, कौतुक/टिका, कसलाही विचार करायचा नाही. जे लिहिले ते रोज पोस्ट करायचे.
तुम्हाला हे चॅलेंज घ्यायचे असल्यास कमीटमेंट हा महत्त्वाचा भाग आहे हे लक्षात ठेवा. ९० दिवस सलग एकही दिवस न चुकता हे करायचे आहे. एक प्रयोग म्हणून करुन बघा.
लिहिते व्हा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा