आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स या दोन संकल्पना अजून कुणाला
माहित नसतील तर आत्ताच माहित करुन घ्या. सिंगुलॅरिटीचाही धांडोळा घ्या.
कोणत्याही बिझनेसमध्ये मनुष्यबळ गरजेचं असतं. पण मनुष्यबळाच्या एकूणच
गुणदोषांमुळे बिझनेसच्या ऑपरेशन्स व प्रॉफिट्स वर परिणाम होतो. म्हणून एका
बिझनेस कंसेप्टमध्ये ज्या ज्या ठिकाणी मनुष्यबळावर अवलंबून राहण्याची गरज
आहे, त्या त्या ठिकाणी ऑटोमेशन, रोबोटिक्स, एआय चा वापर करता आला तर काय होऊ शकतं ह्याबद्दल थेरॉटिकली विचार करत असतांना दोन गोष्टी लक्षात आल्या.
एक म्हणजे अशी कुठलीही जागा, पद, पॉवर नाही जिथे बसलेल्या मनुष्याला एआय
रिप्लेस करु शकत नाही. दुसरी म्हणजे अशा प्रकारचे ऑटोमेशन डेवलप केलेली, व
त्यामुळेच कोणीही मनुष्य काम करत नसलेली एखादी कंपनी मालकाच्या अकाउंटमध्ये
आपोआप निरंतर पैसे भरु शकत राहू शकते. ह्यामुळे येत्या काळात दोन प्रचंड
अंतर असलेले स्पष्टपणे दिसणरे वर्ग तयार होऊ शकतात, नव्हे होतीलच. ज्यात
एका वर्गाकडे नोकर्याच नसतील, त्यामुळे पैसा नसेल, त्यामुळे द्रारिद्र्य
असेल व त्यायोगे येणारी सगळी अनवांछित परिस्थिती असेल. त्याच वेळी
दुसर्या बाजूला आपल्या बुद्धिमत्ता किंवा पैशाच्या जोरावर जगावर राज्य करु
शकणार्या मूठभर लोकांचा वर्ग असेल. यांच्यातला संघर्ष किती लवकर होईल कि
उशीरा होईल हे सांगू शकत नाही पण होईल हे मात्र निश्चित.
२००७-८
च्या सुमारास मी लायनब्रीज टेक्नॉलॉजी ह्या भाषीय स्थानिकीकरणासाठी जगात
अग्रगण्य मानल्या गेलेल्या कंपनीत कामाला होतो. ही कंपनी सुरु झाली तेव्हा
जगभरातून वेगवेगळ्या भाषांचे भाषांतरकार त्यांच्यासाठी काम करत होते.
मायक्रोसॉफ्ट, नोकिया, एचपी सारख्या जगाच्या कानाकोपर्यात पोचलेल्या
कंपन्यांना त्यांच्या प्रॉडक्ट्सच्या युजरमॅन्युअलचे स्थानिक भाषेत भाषांतर
करुन देण्यासाठीचे काम लायनब्रिज करायची. त्यावेळी जगाच्या
कानाकोपर्यातून सर्व भाषांच्या जाणकारांना लायनब्रिजकडून काम जायचे, बरेच
लोक नोकरीवर होते, बरेच घरुन काम करायचे. या भाषांतरकारांचे काम होते असे
की युजरमॅन्युअलचा इंग्रजीत असलेला भाग त्यांच्या स्थानिक भाषेत तयार करणे.
जसजसा इंटरनेटचा वापर वाढत गेला आणि डेटाबेस तयार होऊ लागला तेव्हा
Translation Management System (TMS) नावाची संकल्पना जन्माला आली. या
संकल्पनेचा मूळ हेतूच प्रोजेक्ट्सवर खर्च होणारा वेळ व त्यायोगे पैसा
वाचवणे होता. इतक्या वर्षात काम करता करता कंपनीला कळलेले की बरेचदा एकाच
स्वरुपाची भाषांतरे रिपिट होत आहेत. मग त्यासाठी मात्र प्रत्येकवेळी
भाषांतरकाराला प्रत्येक शब्दामागे किंमत मोजावी लागते. इथे आपण अगदी एका
शब्दाला दोन रुपये मोबदला म्हटला तरी प्रोजेक्ट्सचा आवाका बघता ते बिलिंग
कित्येक कोटी रुपयांत जात होते. ते वाचवण्यासाठी टीएमएस चा जन्म झाला.
टीएमएसमुळे लायनब्रिजची ट्रान्सलेटर्सची हळुहळू का होइना पण बर्यापैकी गरज
संपली. मी होतो त्यावेळी गुगल ट्रान्सलेटरचे भारतीय भाषांमध्ये चाललेले
टीएमएसचे काम बघितले होते. आपण आज जे गुगल इनपुट वापरतो, जिथे शब्द
लिहिल्यावर अचूक शब्दासाठी सुचवणी येते ती ह्या गुगल-ट्रान्सलेशनसाठी फीड
केलेल्या शब्दसंग्रहाचं काम. आज गुगल युजरबिहेवीयर व त्यायोगे तयार होणारे
युजेबल-युजरमेड-कंटेन्ट वापरत आहे.
तर अशा तर्हेने
भाषांतरकारांकडून पूर्ण ज्ञान संग्रहित करुन घेतल्यावर भाषांतरकारांची गरज
उरत नाही. ताजमहाल बनवून घेतल्यावर हात कापून टाकण्यासारखे. सर्व
प्रकारच्या भाषांमधल्या शब्दसंग्रहासकट मोठा डेटाबेस असतांना महागड्या
भाषांतरकारांकडे कोण कशाला जाईल? भाषांतरकार एका शब्दाला दोन रुपये घेईल तर
लायनब्रिज १ पैसा घेऊ शकते. भाषांतरकार या प्रकारच्या लढाईत जिंकू शकतच
नाहीत. त्याला पोट आहे, मशिनला पोट नसते.
लायनब्रिजचे उदाहरण हे प्रत्यक्ष बघितलेले उदाहरण आहे व त्यामुळे एका प्रकारच्या रोजगारावर होणारा परिणामही बघितला आहे.
अगदी वर जे थेरॉटिकल बिझनेस चे उदाहरण दिले आहे ते एका बर्यापैकी
प्रस्थापित इंडस्ट्रीचे आहे, ज्यात आज स्पेसिफिक डोमेनमध्ये किमान दोन ते
तीन लाख लोक भारतात २० हजार रुपये ते ५० हजार रुपये पगारावर नोकरी करतात.
एआयने त्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ह्या दोन-तीन लाख लोकांवर टांगती
तलवार आहे. व हा केवळ ह्या दोन तीन लाखंचा नाही तर को ण त्या ही क्षेत्रात
नोकर्या करत असलेल्या ९० टक्के जनतेचा आहे. शेतीसुद्धा यातून सुटत नाही.
एक लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट अशी नाहीये की जी
एआय्+रोबोटीक्स्+ऑटोमेशन्+इंटरनेट ऑफ थिंग्स ह्या चार गोष्टी एकत्र येऊन
करु शकत नाहीत. एखाद्या कंपनीत एकही मनुष्यबळ नसतांना ती जगभर कोट्यावधी
ग्राहकांना सेवा देत चालवली जाऊ शकते. अॅमेझोनच्या मालकांनी ठरवले तर त्या
कंपनीला एकाही जीवंत व्यक्तीची गरज राहणार नाही. अशा वेळेला त्यांच्या
लाखो कर्मचार्यांचे काय होईल...?
हे असे भयावह काहीही असले तरी
मी एक सकारात्मक विचार करणारा माणूस असल्याने याचीच दुसरी बाजूही सांगणे
महत्त्वाचे आहे. पृथ्वीतलावरच्या कोण्याही प्राण्याप्रमाणे अन्नग्रहण करुन
जगणे हा मनुष्याचा निसर्गधर्म आहे. मनुष्यानेच निर्माण केलेल्या
अर्थव्यवस्था नामक यंत्रणेत ग्राहक महत्त्वाचा आहे. ग्राहकच नसेल तर ती
सर्व व्यवस्था कोलमडून पडते. ग्राहक कसा नाहीसा होतो हे बघायचे असेल तर
२००८ चा अमेरिकन घरांचा कोसळलेला डोलारा बघावा. कोणताही ग्राहक तेव्हाच
ग्राहक होतो जेव्हा त्याच्याकडे विकत घ्यायला पैसा असतो. पैसा तेव्हाच असेल
जेव्हा तो नोकरीधंद्याला लागलेला असेल. नोकर्याच नसतील तर पैसा कुठून
येईल व पैसाच नसेल तर तमाम एआय होऊन बसलेल्या कंपन्यांना ग्राहक कुठून
मिळेल, आणि ग्राहकच नसेल तर त्या कंपनीचे काय होईल? हा एक मुलभूत प्रश्न
उभा राहिलेला आहे.
त्यावर युनिवर्सल बेसिक इन्कम ही संकल्पना
लढवण्यात आली आहे. पण माझे मत इन्कम किंवा मेहनताना हा मेहनतीचे चलनात
झालेले रुपांतर असते. असे चलन देऊन उपयोग होणार नाही असे वाटते. १००
लोकांपैकी २० जण बेरोजगार, कुठलेही काम न करणारे असतील तर चालून जाईल पण ८०
तसेच असले तर कसे चालेल?
या ठिकाणी आणखी एक आवर्जून नमूद करावे
वाटते की सर्व देशातली सरकारे दिवसेंदिवस अधिकाधिक कमकुवत होत जाणार आहेत.
कारण सरकारांची ताकद जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास असतो, तो नाहीसा
होत जाणार आहे. सरकार हा विश्वास जनतेला सुरक्षा, संधी व सुरळीतपणा देऊन
टिकवून ठेवत असते, मूळात शासनाचे तेच कार्य व अस्तित्वाचे कारण आहे. पण
सरकारमध्ये ताकद राहिली नाही तर त्यांना विचारणार कोण व कशाला...?
घाबरवत नाही पण जागतिक स्तरावर एका भयंकर मोठ्या संघर्षाला येत्या पाच वर्षात सुरुवात होणार आहे हे भाकीत करतो आणि आज इथेच थांबतो.
सावध ऐका पुढल्या हाका...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा