बुधवार, ५ ऑगस्ट, २०२०

सायबेरियन हस्की


'सायबेरियन हस्की' ही कुत्र्याची जात कुत्राप्रेमी लोकांमध्ये एकूणच फार प्रसिद्ध आहे. 'सायबेरियन हस्की' म्हणजे बहुतांश लोकांना स्टेटस सिंबल वाटत असला तरी ते स्टेटस मिळवण्यासाठी गेल्या सात-आठ हजार वर्षांपासून ह्या प्रकारच्या कुत्र्यांनी माणसांसाठी केलेली कठोर मेहनत व त्यामुळे त्यांच्या जातीचे झालेले नाव जास्त कारणीभूत आहे.

पाळीव कुत्र्यांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे शोभिवंत/सोबतीचे कुत्रे आणि दुसरे म्हणजे कामकरी कुत्रे. शोभिवंत कुत्र्यांमध्ये पॉमरेनिअन हे नाव बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे. गंमत म्हणजे भारतात पॉमरेनिअन म्हणून बहुतांश लोक इंडियन स्पिट्झ जातीचा कुत्रा पाळत असतात. शोभेची कुत्री ही छंद म्हणून उपयोगी असतात. कामकरी कुत्री मात्र प्रत्यक्ष अंगमेहनतीची कामे करण्यासाठी वापरली जातात. कामकरी कुत्र्यांमध्ये अनेक प्रकार आहेत. जसे की शोधकार्यात, बचावकार्यात मदत करणारे कुत्रे, अंध-अपंग व्यक्तींना रोजच्या कामात मदत करणारे कुत्रे, शेळ्यामेंढ्यांच्या कळपाची राखण करणारे कुत्रे, मालमत्तेची राखणदारी करणारे कुत्रे, युद्धकार्यात मदत करणारे कुत्रे, मानसोपचारात मदत करणारे कुत्रे आणि ओझ्याच्या गाड्या ओढून नेणारे कुत्रे.

उत्तर ध्रुवाजवळच्या थंडप्रदेशात (म्हणजे कॅनडा, रशियाच्या सायबेरिया, अमेरिकेच्या अलास्का आणि डेनमार्कच्या ग्रीनलँड भागात) वर्षातील बहुतांश काळ बर्फ पडत असतो. ह्या भागात एस्किमो जमातींची वस्ती आहे. ह्या खडतर प्रांतात राहतांना शिकार व वाहतूकीच्या कामांसाठी एस्किमोंनी कुत्र्यांच्या जाती विकसित केल्या. ह्या प्रदेशातल्या कुत्र्यांच्या काही प्रमुख जातींमध्ये अलास्कन म्यलाम्युट, अलास्कन हस्की, चिनूक, समयेड, ग्रीनलँड डॉग, सायबेरियन हस्की ह्यांचा समावेश होतो. हस्की हे नाव एस्किमो ह्या शब्दावरुन आलेले आहे. एस्किमोचे कुत्रे म्हणजे हस्की. सायबेरिया प्रांतातल्या 'चूकची जमातीच्या' लोकांनी 'सायबेरियन हस्की' विकसित केला. सायबेरियन हस्कीला म्यलाम्युट व अलास्कन हस्कीप्रमाणेच लांडग्यांच्या वंशावळीचा इतिहास आहे. सायबेरीयन हस्की ही बर्फाळ प्रदेशात वाहतूकीसाठी स्लेड गाड्या ओढून नेण्यासाठी खास विकसीत केलेली कामकरी जात आहे.

सायबेरियन हस्कीची शरीररचना बघितली तर ह्यांच्या त्वचेवर डबलकोट असतो. डबलकोट म्हणजे आखूड आणि लांब अशा दोन प्रकारच्या केसांचा थर. ह्यामुळे त्यांना उणे पन्नास डिग्री तापमानातही तग धरुन राहता येते. तर उन्हाळ्यात केसगळती होऊन उष्ण वातावरणापासून बचाव होतो. हस्की भरपूर चपळ असतात, जमीन उकरणे, उंच कुंपणांवरुन उड्या मारणे, तोडफोड करणे ह्यात विशेष प्राविण्य असते. सर्वायवल इन्स्टीन्क्ट खच्चून भरलेलं असतं ह्या कुत्र्यांमध्ये. ह्यांच्यात प्रचंड उर्जा असते. हे तासंतास, शेकडो किलोमिटर न थकता धावत राहू शकतात. तेही वजनाच्या गाड्या ओढत. भयंकर अशा विपरित वातावरणात, बर्फाची वादळे घोंगावत असतांना, सर्वत्र पांढरा अंधार असतांना, रात्रीच्या मिट्ट काळोखातही अचूक वाट काढत पुढे जात राहण्यात तरबेज असतात. सातत्याने धावत लांबच लांब अंतर पार करण्यात ह्यांच्या स्टॅमिनाशी स्पर्धा करायला दूरदूरपर्यंत कोणताही प्राणी आढळत नाही. ह्याचे कारण त्यांच्या शरीररचनेत आणि विशिष्ट मेटाबॉलिझम मध्ये आहे. दिवसाला १२ हजार कॅलरीज सहज फस्त करुन वापरुन टाकण्याची धमक ह्यांच्यात असते. सर्वसाधारण एखादा धष्टपुष्ट पहिलवान किंवा बॉडीबिल्डर दिवसाला अडीच ते तीन हजार कॅलरीज पचवू शकतो. ह्यावरुन फक्त सोळा ते तीस किलो वजन असलेल्या कुत्र्यांच्या प्रचंड शक्तीची कल्पना यावी. ह्याच चिवट गुणांचा वापर करुन विसाव्या शतकाच्या पूर्वाधापर्यंत, म्हणजे वाहतूकीची साधने स्वयंचलित होईपर्यंतच्या काळापर्यंत सायबेरिया ते अलास्का भागात बहुतांश वाहतूकीचा भर ह्या स्लेड डॉग्सवर होता.



१९२५ साली अलास्का प्रांतातल्या नोम शहरात जीवघेण्या साथीचा आजार पसरला. आजारावरचा उपाय असलेली औषधी लस त्या शहरापासून अकराशे किलोमिटर अंतरावर असलेल्या 'नेनाना' शहरातून आणायची होती. तेव्हा बर्फाचा काळ असल्याने सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली होती.




हा अकराशे किलोमिटरचा रस्ता म्हणजे खरेतर आपल्या नेहमीच्या व्याख्येतला रस्ता नव्हताच. अनेक बर्फाच्छादित पर्वतरांगा, ग्लेशियर्स, बर्फाचे मोठाले तुकडे वाहून नेणार्‍या नद्या, सतत बदलणारे वातावरण, आंधळं करुन टाकणारी बर्फाची भयंकर घोंगावणारी वादळे, कोणतीही संपर्कसाधने नाहीत, अशा खडतर भागातून जाणारी ती एक साधी वाट होती. त्यावेळी नेनाना ते नोम अशी अकराशे किलोमीटर डॉगस्लेडने धाव मारुन ती औषधी लस नोम शहरात पोचवायची असा प्लान आखला गेला. ह्यासाठी २० मुशर्स (म्हणजे कुत्र्यांची गाडी हाकणारे व्यक्ती) आणि १५० कुत्र्यांची निवड करण्यात आली. रिले पद्धतीने, म्हणजे ठराविक अंतरासाठी प्रत्येक टीमने (एक टीम म्हणजे एक मुशर आणि त्याचे ८ ते १२ कुत्रे) धावून सामान पुढच्याकडे सोपवायचे असे ठरले. रस्ता कठीण तर होताच पण त्यासोबत वेळेची मर्यादा होती. ती औषधी लस सहा दिवसांच्या आत नोम शहरात पोचणे गरजेचे होते.

अशक्यप्राय वाटणारी ही कामगिरी अलास्कन, सायबेरियन हस्की कुत्र्यांच्या असामान्य कर्तृत्वाच्या सोबतीने यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. साडेपाच दिवसात लस नोम शहरात पोचली आणि हजारो मुलांचे प्राण वाचले. हा सर्व प्रवास अंगावर रोमांच आणणारा आणि त्याचवेळी थक्क करुन सोडणारा आहे. अनेक कुत्र्यांचे प्राण गेले, अनेक मुशर्सना हिमदंश होऊन कायमचे अपंगत्व आले. ह्या प्रवासातला सर्वात खडतर आणि सर्वात जास्त लांब प्रवास केलेल्या लेनर्ड सेपला आणि त्याच्या 'टोगो' नावाच्या सायबेरियन हस्की लिड-डॉगची कहाणी डिस्नेतर्फे 'टोगो' चित्रपटातून नुकतीच सादर करण्यात आली आहे.

लेनर्ड सेपला आणि त्याची हस्की टीम

दुर्दैवाने त्यावेळी टोगोला योग्य ती प्रसिद्धी न मिळता ज्या टीमने नोम शहरात औषध घेऊन प्रवेश केला त्याच्या 'बाल्टो' नावाच्या कुत्र्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. इतकी की त्याचा पुतळा न्युयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये उभारण्यात आला. बर्‍याच काळानंतर जनतेला 'टोगो'ची महती कळली, त्यानंतर सेंट्रलपार्कातल्या बाल्टोच्या पुतळ्याला ह्या '१९२५ सिरम रन'मध्ये सहभागी झालेल्या सर्वच कुत्र्यांप्रति कृतज्ञता व सन्मान म्हणून ओळख देण्यात आली. १९७५ मध्ये ह्या माणुसकीच्या प्रवासाला पन्नास वर्षे झाल्याच्या निमित्ताने पुनर्भेट म्हणून हा प्रवास आयोजित करण्यात आला होता. पण ह्यावेळी ह्या प्रवासाला तब्बल साडेअकरा दिवस लागले. ह्यावरुन मूळ प्रवासातल्या मुशर्सने दाखवलेली जबाबदारीची जाणीव आणि त्यांची इच्छाशक्ती किती जबर होती ते लक्षात येईल.


नोम शहर 1925

लेनर्ड सेपला आणि त्याची हस्की टीम

अशी प्रचंड कष्टाची व पराक्रमांची देदिप्यमान परंपरा असलेले, कैच्याकै शारीरिक क्षमता असलेले सायबेरियन हस्की भारतातल्या उष्णकटीबंधीय वातावरणात एखाद्या शहरातल्या सो कॉल्ड 'प्राणीप्रेमी'च्या बंद फ्लॅटमध्ये किंवा छोट्याशा बंगल्यामध्ये खेळणी म्हणून वापरल्या जाणार्‍या शोभिवंत कुत्र्यांगत केविलवाणी घुटमळत असतील तेव्हा त्यांना आपल्या ऐतिहासिक वंशाची ओळख साद घालत असेलच. हजारो किलोमिटर दूरच्या सायबेरिया-अलास्काच्या बर्फाच्छादित पर्वतांवरुन त्यांच्या भाऊबंदांच्या बेदरकार आरोळ्या त्यांच्या कानापर्यंत येत असतीलही. आपल्या शारीरिक क्षमता पूर्णपणे वापरता येत नसल्याने ते एकप्रकारे छळवादाचे शिकारच झालेले असतात. निव्वळ कोणाच्या तरी हौसेसाठी केवळ श्वास घेत, पुढ्यात टाकलेलं अन्न खात आयुष्य काढत काहीही महत्त्वाचे, आवश्यक न करता मरुन जाणे ह्यापेक्षा दुर्दैवी जीवन काय असावे? भारतात स्टेटस म्हणून किंवा हौस म्हणून 'सायबेरीयन हस्की' पाळतांना आपण त्या कुत्र्यांवर दिखावटी प्रेमापोटी अत्याचार तर करत नाहीयेना ह्याचा विचार शक्यतो त्यांच्या मालकांच्या मनात येत नसावा. बर्‍याचदा मी प्राणीमित्र-प्राणीप्रेमी लोकांना दिखावटी म्हणतो, कारण त्यांचे प्रेम प्राण्यांवर नसून स्वतःवर असते. खरोखर तशीच काही महत्त्वाची गरज नसेल तर फक्त स्वतःचा अहं कुरवाळून घेण्यासाठी प्राणी पाळले जातात. त्यात कुत्र्यांपासून लव्हबर्ड्सपर्यंत सर्वच प्रकारचे प्राणीपक्षी येतात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा