शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

भारतीय मनातली देव ही संकल्पना काय आहे?

पहिला भाग : वेद-उपनिषदांमध्ये ब्रह्म काय आहे ह्याचा शोध उत्तम घेतला आहे. भारतीय अनुभवावर आधारित तत्त्वज्ञानीय व वैज्ञानिक दृष्टीकोनातून देव-इश्वर-परमेश्वर म्हणजे नक्की काय ह्याची संकल्पना पुरेशी स्पष्ट आहे. हा भाग अध्यात्माची साधना केल्याशिवाय लक्षात येत नाही. वेद-उपनिषदांचे पठण ब्राहमणेतरांनी करु नये ह्या आदेशामागे एक स्पष्ट उद्देश होता की ते ज्ञान प्रत्येकाला प्राप्त झाले तर कोणी मानसिक गुलाम राहणारच नाही. सगळे स्वतंत्र बुद्धीने विचार करु लागतील. कोणीही देव मानणार नाही. प्रत्येक जण ब्राह्मण (ब्रह्म जाणणारा किंवा त्या दिशेने साधना करणारा) होऊन जाईल. देव काय आहे याचे प्रत्यक्ष ज्ञान आल्यावर कोण मधल्या दलालांना भीक घालेल?

दुसरा भाग आहे, निसर्गात जगतांना प्रत्येक जीवाशी जोडलेले असण्याची भावना भारतीय जीवनात पहायला मिळते. झाडे, पशु पक्षी, हवा, माती, पाणी, डोंगर अशा अनेक सजीव-निर्जीव गोष्टींना देव मानले जाते कारण त्यांच्या असण्यानेच आपले जीवन शक्य होते हे स्पष्ट कळते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता भाव ठेवणे, तेही सजीव असून त्यांनाही आपल्यासारख्याच भावभावना असू शकतात अशी संकल्पना लोकांच्या जगण्यात दिसून येते.

तिसरा भाग, राजे-महाराजे हे देवाचा अंश असल्याची अफवा खुद्द राजेमहाराजांनी पसरवली आहे. आपल्या सत्तेला जनतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी ही बदमाशी केली आहे. आपला राजा देव आहे, त्याला आपल्यापेक्षा जास्त शक्ती प्राप्त आहेत, तो आपल्यापेक्षा वेगळा आणि महान आहे हे जनतेच्या मनात ब्रँडींग केले की जनता राजाच्या प्रत्येक निर्णयाला योग्यच मानू लागते, आपल्यावर होणार्‍या अत्याचाराला स्वतःचे नशिब समजू लागते. आजच्याच काळातले उदाहरण म्हणजे मोदीभक्तांकडेच पाहू शकता. पुराणकथांमध्ये रामकॄष्ण वगैरे सगळे राजे व देवाचे वंश असल्याचे सांगितले जाते. तोच धागा पकडून भारतीय राजांनी जनतेला मूर्ख बनवत ठेवले. रामकथेला राजाश्रय मिळाल्यानेच ती इतकी प्रसिद्ध झाली. रामकथा ब्रेनवॉशिंगचे एक उत्तम साधन आहे.

चौथा भाग, परदेशी धार्मिक विचारधारांचा प्रभाव. पाप-पुण्य, दान-धर्म, स्वर्ग-नरक, स्वर्गात देवाचा दरबार आणि देवाचा न्याय, हे सगळे अब्राह्मिक धर्मांतून भारतात आलेले विचार आहेत. गरुडपुराणात बायबल-कुराणातल्या सारखे वर्णन आहे. गरुडपुराणाची निर्मिती भारतीयांचा पाश्चिमात्य जगाशी संपर्क येऊ लागल्यानंतरचीच आहे हे विशेष. गरुडपुराणाचा फायदा धर्मगुरु, पुजारी म्हणजेच ब्राह्मणवर्गाला इतर जनतेवर मानसिक राज्य करण्यासाठी होत आलेला आहे.

भारतीय जीवनात देव म्हटले की वरील चारही प्रमुख भागांची खूप सरमिसळ आहे. गौतम बुद्धांनी ह्या सर्व जळमटांना काढून, धर्माचे विशुद्ध रुप स्वतः संशोधन-प्रयोग करुन शोधून काढले. त्यामुळे वेद-उपनिषद आणि बुद्धाची शिकवणी ह्यात फरक दिसत नाही. त्यांच्यातच कशाला, जगातल्या कोणत्याही खर्‍या संताच्या अनुभवात एकात्मता दिसून येते त्याचे कारण हाच तो विशुद्ध धर्म. काळाच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या एकमेकांशी संबंधित नसलेल्या हजारो लोकांनी सत्य काय आहे ते स्वतःचे स्वतः शोधले आहे. त्यांचे अनुभव एकसारखेच आहेत ह्यातूनच कळते की तेच शाश्वत सत्य आहे. विज्ञान ह्यापेक्षा वेगळे काही नसते.

बाकी सगळ्या कहान्या फक्त राजकीय वर्चस्वाच्या लढाया आहेत. उसमें भगवान नहीं है!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा