शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

मुतखडा | किडनीस्टोन

किडनीस्टोनचा आणि हार्डवाटर म्हणजे क्षारयुक्त पाण्याचा फारसा संबंध नाही. क्षारयुक्त पाण्याने मुतखडा होतो ही वाटरफिल्टर कंपन्यांनी मार्केटींगसाठी सोडलेली अफवा आहे. मुतखड्यात क्षार असतात आणि पाण्यातही क्षार असतात म्हणून मुतखडा हा क्षारयुक्त पाण्यानेच होतो असा सहसंबंध (को-रिलेशन) जोडून दिला आहे. जे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नव्हे. अर्थात खूप क्षारयुक्त पाणी असेल तर मूतखडा होऊही शकतो पण तेवढे खारट पाणी सातत्याने पित राहणे शक्यही नाही. साधारण ५००-६०० टीडीएस (पाण्यात विरघळलेले क्षार) असलेले पाणी धोकादायक नसते. काही लोक ह्या अफवेला बळी पडून घरात आरो सिस्टीम लावून अगदी २० ते ३० टीडीएसचे पाणी प्यायला लागतात. एवढे कमी क्षार असलेले पाणी पिणे मात्र जास्त धोकादायक ठरु शकते. टीडीएसची सामान्य मात्रा १५० ते ६०० च्या दरम्यान चांगली असते.

मुतखडा तयार होतो मुख्यतः कॅल्शियम ऑक्सलेट आणि युरिक अ‍ॅसिड या दोघांपासून. ८० टक्के केसेसमध्ये कॅल्शियम ऑक्सलेटचा खडा असल्याचे आढळून येते. आणखी दोन प्रकार आहेत. पण ते दुर्मिळ आहेत.

हा खडा कसा तयार होतो? आपल्याला अन्नपदार्थांमधून कॅल्शियम मिळते. त्यासोबत अन्नपदार्थांतून ऑक्सलेट नावाचे एक संयुगही मिळते. कॅल्शियम आणि ऑक्सलेट पचनक्रियेदरम्यान एकमेकांना चिकटतात. पण जे ऑक्सलेट मोकळे राहतात त्यांचा शरीराला काही उपयोग नसल्याने ते रक्तातून वाहत किडनीत जातात आणि तिथून मुत्रातून शरीराबाहेर फेकले जातात.

ज्यावेळी मुत्रामध्ये पाणी कमी असते व मोकळ्या ऑक्सलेटची संख्या जास्त असते तेव्हा ते किडनीत जाऊन कॅल्शियमला चिकटतात, त्यांचे छोटे छोटे खडे एकत्र येऊन मोठे होऊ लागतात. आकार मोठा झाल्याने किडनीबाहेर पडू शकत नाहीत. मग कालांतराने किडनीच्या कामात अडथळे निर्माण करु लागतात. त्यामुळे लघवीला कमी होणे, सतत लघवीला जावेसे वाटत राहणे, ताप, लघवीतून रक्त पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. अनेकदा तर अशी कोणतीही त्रासदायक लक्षणे न दिसता ओटीपोटात अचानक प्रचंड कळा येऊ लागतात. तेव्हा निदान केल्यावर मुतखडा असल्याचे निष्पन्न होते. हा मोठा झालेला खडा अचानक मुत्रमार्गात आल्याने प्रचंड वेदना सुरु होतात.

ऑक्सलेट जास्त असणारे खाद्यपदार्थ कोणते? पोटॅटो चिप्स, शेंगदाणे, चॉकलेट, पालक, बीट. ह्याचा अर्थ असा नव्हे की हे सगळे पदार्थ एकदम टाळायला हवेत. पालक, शेंगदाणे, बीट वगळता इतर पदार्थ जसे की चिप्स आणि चॉकलेट खाण्याचे प्रमाण जास्त असू शकते. ते टाळले पाहिजे.

मुतखडा होऊ नये म्हणून कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थ नियमित खाणे आणि पाणी रोज भरपूर पिणे हे दोन उत्तम उपाय आहेत. कॅल्शियम जास्त घेतल्याने ऑक्सलेटशी त्यांची भेट पचनसंस्थेतच होऊन जाते. पाणी भरपूर प्यायल्याने लघवी घट्ट होत नाही,किडनीवर ताण येत नाही व सर्व विषारी द्रव्ये किडनीबाहेर टाकली जातात.

टीपः मला २०१६मध्ये किडनीस्टोनचा त्रास झालेला. अचानक ओटीपोटात कळा येऊ लागल्या आणि मी उभ्या-उभ्या कोसळलो होतो. त्याआधी काही वर्षे मला पावलांवर सूज येत होती. मी बसून काम करतो म्हणून ती सूज येतेय असे समजून दुर्लक्ष केले होते. माझे पाणी पिणे खूप कमी असायचे. पायावर येणारी सूज खडा निघून गेल्यावर परत कधीच आली नाही. अगदी सोळा तास सलग बसूनसुद्धा. त्यामुळे तुमच्यापैकी कोणाला अशी सूज वगैरे येत असेल तर टाळाटाळ न करता तपासणी करुन घ्या. किडनीस्टोनच्या वेदना भयंकर असतात. त्या भोगण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी.

1 टिप्पणी:

  1. I did have the stones in 1994. I was admitted to Hospital but the treatment was of no help. I then took aayurvedic tablets, Pathareena and Gokshuradee Guggul. That was of great help. According to my readings, eating tamarind regularly also helps. Tamil people generally do not have kidney stones. But Punjabis, with diet of Paneer, Palak, Tomatoes and no Tamarind, have many cases.

    उत्तर द्याहटवा