शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

ये क्या हो रहा है दुर्योधन? - भाग १

औद्योगिक क्रांतीने बौद्धिक कर्तबगारीला शारीरिक कर्तबगारीपेक्षा अधिक वाव मिळण्याचे युग आणले. बौद्धिक कर्तबगारीची पिढीजात परंपरा असणारे अनुकूल परिस्थिती मिळाल्याने प्रचंड वेगाने पुढे गेले. पिढ्यानिपिढ्या शारीरिक कर्तबगारीत गेलेल्यांना मात्र ह्या अचानक उद्भवलेल्या नव्या परिस्थितीचा नक्की कसा सामना करावा ते कधीच कळले नाही. उत्सवांमध्ये वाढत चाललेला उन्माद हा अनेक अंगाने जटील प्रश्न बनत चालला आहे तो ह्याचमुळे. आपण इथवर अचानक कुठून कसे काय आलो ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा एक प्रयत्न.

संपूर्ण जगात भारतातली संस्कृती सर्वात जुन्या सिव्हिलायझेशनपैकी एक आहे. सभ्यता, सिव्हिलायझेशन, संस्कृती हा विचित्र गुंतागुंतीची रचना आहे. किमान पाच हजार वर्षांपूर्वीही भारतात गाव, नगर अशी प्रगत व्यवस्था होती. वनजीवनावर आधारित आदिवासी सभ्यता आणि कृषीआधारित नागरसंस्कृतीत मोठा फरक असतो. शक्यतो आदिवासी लोक आपल्या दैनंदिन जीवनातली सगळी कामे स्वतःची स्वतःच करतात. तर नागरसंस्कृतीत वेगवेगळ्या कौशल्याची विशिष्ट माणसे एकमेकांना मदत करत जीवन जगत असतात.

आदिवासी लोक अजूनही हंटर-गॅदरर म्हणजे शिकार करणे आणि फळे-कंदमुळे गोळा करणे ह्या आदिम (प्रिमिटीव्ह) अवस्थेत आहेत. ह्या कामासाठी त्यांना इतर कोणाची मदत लागत नाही. शिकारीसाठी लागणारी साधने स्वतःच तयार करतात, त्याचे नियोजन स्वतःच करतात, प्रत्यक्ष शिकारही स्वतःच करतात, त्याची वाटणीही स्वतःच करतात. आदिवासी एक मोठे कुटूंब असल्यासारखे असते ज्यात सर्वजण एकत्र काम करतात.

कृषकसमाजाच्या गरजा अवाढव्य असतात. मोठमोठ्या जमीनींवर शेती करुन गरजेपेक्षा मोठ्या प्रमाणात धान्य पिकवणे. ते मोठ्या काळासाठी साठवून ठेवणे ही कृषक समाजाची ठळक ओळख. बी पेरण्यापासून धान्यसाठा करेपर्यंतच्या सर्व प्रक्रियेत अनेक भाग असतात. त्यासाठी वेगवेगळी कौशल्ये लागतात. ती सर्व कौशल्ये एकाच व्यक्तीकडे असणे शक्य नसते. शेती ही सामुहिक कौशल्यांचा आविष्कार आहे तर शिकार ही वैयक्तिक कौशल्याचा. शेतीसंबंधीत सर्व प्रक्रिया, कौशल्ये आणि उत्पादन ह्यांचे संरक्षण करणे हा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग ठरला. जसजशी शेतीआधारीत वस्ती वाढत गेली, तशा शेतीउत्पादनाच्या गरजा वाढत गेल्या. जशा गरजा वाढत गेल्या तशी कामे वाढली. मग काही माणसे शेतीसाठी लागणारी काही विशिष्ट कामेच करु लागली. त्यातून त्यांचे त्याबाबतीतले कौशल्य विकसित होऊ लागले. मग हळूहळू त्यांना त्यांच्या कामानुसार नावे मिळाली. अशा तर्‍हेने मुख्य उत्पादन, त्याच्याशी संबंधित सेवा, संरक्षण, व्यवस्थापन असे चार भाग पडले. ह्या चार भागांचे आणखी बारीक-सारिक कामांच्या प्रमाणे शेकडो भाग झाले. अशा शेकडो लोकांनी मिळून नागरसंस्कृती विकसित झाली. मग नागरसंस्कृतीच्या विशेष गरजा निर्माण झाल्या आणि त्या पुरवणार्‍या विशेष कौशल्य असणार्‍या माणसांचे गट तयार झाले. आता हे ढोबळ चित्र आहे कामावर आधारित गटव्यवस्थेचे. ह्या गटव्यवस्थेत फार सुरुवातीला उच्चनिच अशी वर्गवारी नसावी. गटव्यवस्थेतल्या प्रत्येकाचे काम महत्त्वाचे होते. सर्व लोक एकमेकांवर अवलंबून असल्याने सर्वांना समान दर्जा असावा.

ही सर्व कामे सुमारे दहा हजार वर्षांपर्यंत मुख्यत्वेकरुन शारीरिक श्रमावर आधारित होती. बुद्धीकौशल्य जेवढ्यास तेवढे असेच आवश्यक होते. प्रत्येक गटाला आपल्या कामाचे महत्त्व लक्षात आल्याने आपल्या मुलांसाठी वारसा म्हणून ही कामे, कौशल्ये आणि अधिकार हस्तांतरित करण्याची सवय लागली. आपल्या कामाची कौशल्ये इतर कोणी शिकू नये, आपल्या अधिकारावर पर्यायाने उपजिविकेच्या साधनांवर इतर कोणी आक्रमण करु नये म्हणून कुटूंबाबाहेर हे ज्ञान कुणाला दिले जात नसे. आजही अनेक परंपरागत व्यवसायांत असे आढळून येते. त्यामुळे कुटूंबातूनच कौशल्ये हस्तांतरित होत राहीली व त्यातून जन्माला आल्या त्या जाती. जातीच्या लोकांशी जास्त माया असण्याचे महत्त्वाचे कारण अधिकार आणि कौशल्ये असावीत. त्यातून अस्मिता निर्माण झाल्या असाव्यात. हजारो वर्षांच्या काळात हजारो पिढ्यांमधून ही कौशल्ये पुढच्या पिढीला जबरदस्तीने शिकवली गेली. नविन वाटा धुंडाळायच्या नाहीत कारण ती कौशल्ये एक तर कोणी शिकवत नाही. (एकलव्याची कथा इथे प्रातिनिधिक आहे.) स्वतःची स्वतः शिकायची म्हटले तर ती शिकून पारंगत होण्यास वीसेक वर्षे जाऊ शकतात, तोपर्यंत पोटापाण्याचे काय ही महत्त्वाची अडचण होती. बहुतेक व्यवहार बार्टर सिस्टीम म्हणजे वस्तुविनिमयावर आधारित व जातीआधारित असल्याने तशी ही सर्व नागरसंस्कृती हार्ड टू ब्रेक अशी कठिण झालेली होती.

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा