शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

संपत्तीवरुन चारित्र्य

आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की गरिब माणूस प्रामाणिक असतो. ज्याच्याकडे काहीच संपत्ती नाही तो निष्कलंक, निष्पाप, निरागस, जणू देवाचा अवतार. हरामी, पापी, भ्रष्टाचारी असल्याशिवाय संपत्ती गोळा करायची इच्छाच होत नाही अशी ही समजूत.

व्यक्तिगत संपत्तीवरुन चारित्र्य जोखणे हा जनतेचा आवडता खेळ आहे कारण अमूक इतकी संपत्ती आपल्याकडेही असती तर या रोमांटीसिजममध्ये ती जगत असते. ते प्रत्यक्षात शक्य नसल्याने मत्सर जन्म घेतो आणि दुसर्‍याची संपत्ती हराम की कमाई वाटू लागते.

राजकारणी तर अशा ठिकाणी असतो जिथे भ्रष्टाचार करुन अमाप संपत्ती गोळा करता येते. एखाद्या नेत्याची किती संपत्ती ह्यावरुन तो किती भ्रष्टाचारी असावा ह्याचा अंदाज लावला जातो. त्यामुळे केजरीवाल, माणिक सरकार, मोदींसारखे नेते आपल्या नावावर फारसा पैसा दाखवत नसले म्हणजे ते निष्कलंक, पवित्र, साधू आहेत असा समज लोकांचा करुन दिला जातो.

आता अशा संपत्ती असलेल्या, नसलेल्या नेत्यांना निष्कलंक मानायचे की नाही ह्यासाठी आधी दोन महत्त्वाचे मुद्दे पाहूया.

पहिला मुद्दा, संपत्तीसंचयः प्रत्यक्षात आजच्या जमान्यात संपत्ती लपवणे हा डाव्या हाताचा मळ आहे. कित्येक शेंबुड न पुसता येणारे लो-आयक्यु लोक आपले घर बायकोच्या नावावर दाखवतात, भाड्याचे उत्पन्न सायफन-ऑफ करुन आपला आयटीआर कोरा ठेवतात. हे तर किती बेसिक लेव्हलचे उदाहरण आहे. जेव्हा तगडे नेते असतात त्यांच्या दिमतीला तेव्हढेच तगडे वकिल आणि सीए असू शकतात. संपत्ती लपवण्याची कंसल्टन्सी हाच काहींचा मुख्य व्यवसाय असू शकतो. भ्रष्टाचाराचे मार्ग खूप हायटेक झाले असून सरकारकडून निघालेला पैसा कुठे जाऊन गडप होतो हे ब्रह्मदेवालाही सापडू शकणार नाही इतके भन्नाट प्लानिंग असते. अर्थात ज्या नेत्याला हा पैसा आपल्या प्रत्यक्ष हातात संग्रही असावा असे वाटते त्याचे हे मार्ग. ह्यात अदृश्य पित्ते असतात, मर्जीतली माणसे असतात, अदृश्य कंपन्या असतात, अदृश्य मालक्या असतात.

दुसरा मुद्दा, संपत्तीची गरजः संपत्ती कशासाठी हवी असते? सर्वोत्तम उपभोग घेण्यासाठी किंवा पुढच्या पिढीला सोपवण्यासाठी ही प्रमुख दोन कारणे आहेत. बाकी इतरही आहेत, ते नंतर कधी. तर ह्या दोन्ही गोष्टी करायला संपत्ती असावी लागते हे सामान्य माणसाला कळते म्हणून तो संपत्ती मिळवण्याच्या मागे लागतो. त्या उरस्फोडीत उपभोग ह्या मुख्य ध्येयाला विसरुन जातो. पण ही सर्व उरस्फोड करायची गरजच नसेल तर? समजा तुमच्या प्रत्यक्ष नावावर एकही पैसा नसेल पण तुमच्या सर्व इच्छा तंतोतंत पुरे करायला देशातले सर्वात श्रीमंत शंभर जण केव्हाही तयार असतील तर? गरज काय आहे छाटछुट दोन कोटी, शंभर कोटी संपत्ती नावावर असण्याची जेव्हा लाखो कोटीचे मालक तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करु शकत असतील तर?

सगळ्यात हुशार तोच माणूस असतो जो असे काम करतो की धनवान त्याची इच्छा पूर्ण करायला वाकून हजर असतात. स्वतःच्या नावावर संपत्ती गोळा करण्याचे कष्ट करत बसणारा तर मूर्ख असतो.

सार्वभौम सत्ता मर्यादित संपत्तीपेक्षा जास्त लाभदायक असते. अर्थात सत्ता सर्वकाळ हातात राहणार नसते. पण ज्याला संचयापेक्षा उपभोगामध्ये रस असतो त्याला गरज तरी काय?

त्यामुळे एखादा राजकारणी संपत्तीहीन आहे, किंवा एखादा कोट्याधिश आहे ह्यावरुन त्याच्या वर्तनाचा, चारित्र्याचा अंदाज घेऊ नये.

मला संधी मिळाली तर मी 'निष्कांचन सर्वसत्ताधारी' होण्याचा मार्ग पत्करेल. उसमें कुछ अलगही मजा है, सबके समझमें नही आ सकता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा