प्रकाश आपल्या आलिशान केबिनमध्ये डोक्याला
दोन्ही हात लावून बसला होता. त्याच्यासमोर काही पेपर्स अस्ताव्यस्त पडलेले
होते. नुकत्याच झालेल्या टोटल हेल्थ चेक-अप प्रोग्रामचे टेस्ट रिझल्ट्स आले
होते. त्यातल्या अगम्य आकड्यांकडे बघून प्रकाश आधी तर साशंक झाला. मग
बोल्ड केलेल्या काही आकड्यांना बघून जरा घाबरला. लगेच त्याने इंटरनेटवर
त्या आकड्यांचे अर्थ लावण्यासाठी सर्चवर सर्च सुरु केले. येणारे
रिझल्ट वाचून त्याला गार एसीमध्ये घाम फुटू लागला. तेवढ्यात टेबलावरचा फोन
खणखणला. सेक्रेटरी विचारत होती, पुढची मीटींग आहे पंधरा मिनिटांत. म्हणाला
"कॅन्सल कर. पोस्टपोन कर. आजच्या सर्व मिटींग कॅन्सल कर. आणि मला परत फोन
करु नकोस." सेक्रेटरीला आश्चर्य वाटले. असे तर कधीच झाले नव्हते.
सर्च रिझल्ट्समध्ये आलेल्या वेगवेगळ्या आर्टिकल्स, रीसर्च पेपर्स,
इमेजेसमधून गुंतागुंतीची आणि परस्परविरोधी माहिती त्याला मिळत होती. त्याने
तो पुरता गोंधळून गेला होता. त्याच्या टेस्टमधल्या त्या बोल्ड असलेल्या
नंबरने प्रकाशचे धाबे दणाणले होते. त्या आकड्यावरुन कोणता रोग आहे, काय
लक्षणे आहेत, लास्ट स्टेज काय असते, आपण कोणत्या स्टेजला आहोत, आपल्यात
गेल्या काही दिवसांत कोणती लक्षणे जाणवली होती ह्या सगळ्याचा विचार करता
करता त्याचे डोके गरगरु लागले. थोड्याच महिन्यांत आपला कारभार आटोपणार आहे
हे सत्य हातापायांच्या टोकांकडून, रक्तवाहिन्यांमधून जोरात वाहत, डोक्यात
टाचणीसारखे भस्सकन घुसत होते.
वय उणेपुरे पंचेचाळीस वर्षे. 'इथवर,
ह्या पोझिशनला पोचायला काय काय कष्ट घेतले. तेव्हा कुठे आज ह्या
मल्टीनॅशनल कंपनीचा एशीयन रिजनचा सीईओ म्हणून ह्या केबिनमध्ये बसलो आहे'.
हताश मनाने प्रकाश आपल्या खुर्चीतुन उठला. आपला चष्मा काढून त्याने हळूच
टेबलावर टेकवला. केबीनच्या दुसर्या कोपर्यातल्या कपाटाकडे गेला. त्यातून व्हिस्की काढली. एक मोठा ग्लास ओतून घेत तो बाहेरच्या रणरणत्या उन्हात, चमचमणार्या
काचांच्या, शेकडो हायराइज टॉवर्सकडे पाहू लागला. चाळीसाव्या मजल्यावरुन
उडी मारल्यास खालच्या पार्किंगमधल्या मोकळ्या ग्रॅनाईटवर आपटू की एखाद्या
मर्सिडीज, ऑडी, बीमरच्या स्कायरुफवर आदळू - असा पुसट विचार त्याच्या मनात
डोकावला. कदाचित तिथवर पोचण्याआधीच प्राण जाऊ शकेल. असा दिलासायुक्त विचार
आल्याने त्याला थोडेसे हायसे वाटले. उंचावरुन उडी मारल्यावर नक्की कसे मरण
येते ह्याबद्दल एखादा गुगल सर्च मारावा असेही त्याला वाटले. पण हातातली
व्हिस्की ह्या क्षणी मोठा आधार देत आहे असे त्याला जाणवले. तो तसाच थांबला.
लांब आकाशात, दर पाच मिनिटाला एक विमान उत्तर दिशेकडून पुर्वेकडे झेपावत
होते. त्या प्रत्येक पाच मिनिटाच्या ब्रेकमध्ये त्याला त्याच्या
बालपणापासून ते आताच्या घटनेपर्यंतचा एक एक टप्पा आठवत होता. अजिबात सोपे
नव्हते प्रकाशसाठी इथवर पोचणे. आणि आता इथून पुढे मात्र ह्या सार्या अचिव्हमेंटला काय अर्थ राहणार होता? व्हिस्कीच्या हरेक ग्लासागणिक हा प्रश्न त्याचा गळा चिरत चिरत अधिकाधिक मोठा होत होता.
टेक-ऑफ घेणार्या
विमानांचे आता फ्क्त दिवेच दिसू लागले होते. संध्याकाळ उलटूनही बराच वेळ
झाला होता. सेक्रेटरीने बराच वेळ वाट पाहून शेवटी आत प्रवेश केलाच. तेव्हा
सरांचा असा अवतार पाहून आल्यापावली परत जावे की कसे ह्या संभ्रमात तिथेच
घुटमळत उभी राहीली. सदैव चाणाक्ष, चपळ आणि धारदार दिसणार्या प्रकाशसरांच्या चेहर्यावर,
लाकडावरच्या सुंदर कलाकुसरीला कोणीतरी रंधा मारुन सपाट करुन टाकावे अशी
अवकळा दिसत होती. तीन-चार वेळा आवाज दिल्यानंतर प्रकाशला ती केबीनमध्ये
उपस्थित आहे ह्याची जाणीव झाली. तिच्यामागेच भिंतीवर लावलेला आपल्या दोन
गोंडस मुलांचा फोटो दिसला. काळजात धस्स झाले. इतकावेळ आपण केवळ स्वतःचाच
विचार करत होतो हे जाणवून त्याला फार वाईट वाटले. कालच, चाळीसाव्या
मजल्यावरच्या काचा कितीही धडका मारल्या तरी फुटत नाहीत अशी फुशारकी प्रकाश
आपल्या आईकडे मारत होता. आई उगाच मूर्खासारखी काळजी करते असे त्याला वाटत
होते. आता असे का होत नाही ह्याबद्दल त्याला मनस्वी संताप आला. ग्लास जरा
आपटूनच टेबलावर ठेवल्यावर, त्याने रुचाला घरी जायला सांगितले. जाण्यापूर्वी
शोफरला कार तयार ठेवायला सांग अशी सूचना केली.
रुचाने उद्याच्या
महत्त्वाच्या मिटींगची आठवण करुन दिली. कंपनीच्या एशीयन रिजनसाठी उद्याची
मिटींग 'करो या मरो' ह्या लेव्हलवर होती. एक महत्त्वाचा मल्टीबिल्यन
गवर्नमेंट प्रोजेक्ट उद्या फायनलाइज होणार होता. प्रकाशच्या डिसीजनमेकींग अॅबिलीटीवरच
उद्या त्या मिटींगचे आउटकम अवलंबून होते. ज्या कामासाठी कंपनीने त्याला
बढती दिली होती, तेच काम उद्या तो पार पाडणार होता. कंपनी ग्लोबल हेडची
पोझिशन बळकावण्याच्या स्पर्धेत मीपण उभा आहे असे सर्वांना पटवून देण्याची
ही एक चांगली संधी होती.
घरी जातांना आज जरा जास्तच ट्रॅफिक आहे
असे वाटत होते. नेमके आज सिग्नल लवकर ग्रीन होत नसावेत असे प्रकाशला वाटू
लागले. तीनवेळा सिग्नल मिळूनही त्याच्या कारने चौक पार केला नव्हता. शेवटी
झेब्राक्रॉसींगच्या अलिकडेच कार असतांना परत रेड सिग्नल लागला. प्रकाशने
भस्सकन लागलेल्या त्या लाल सिग्नलकडे बघितले आणि त्याची नजर सिग्नल
काउंटरकडे गेली. तो लालभडक रंगातला परिचित आकडा दिसताच प्रकाशच्या
डोक्यातले विचार जे व्हिस्कीच्या प्रभावाने जरा थांबले होते, ते सिग्नल
सुटल्यावर अचानक सुटलेल्या गाड्यांसारखे सुसाट सुटले. उजवीकडच्या गाड्यांना
सिग्नल मिळाला. सुसाट वेगाने जाणारे त्यांचे लाल-पिवळे लाइट्स नजरेसमोर
असंख्य रेषा तयार करत जाऊ लागले. आपल्या आयुष्यातले दिवसही असेच भराभर
संपून जाणार आहेत असे त्याला वाटले. प्रकाशने चटकन तिकडून नजर वळवली आणि
साईड कंपार्टमेंटचे बटन दाबले. दोन ग्लास आणि व्हिस्कीची बॉटल बाहेर आले.
घरी जाईपर्यंत प्रकाशच्या डोक्यातले सर्व विचारांचे दिवे हळूहळू विझले
होते.
-----------------
दुसर्या
दिवशी सकाळी प्रकाश ऑफिसात पोचला. मिटींगरुममध्ये सगळे जमायला लागले होते.
आजच्या मिटींगचे सगळे स्टेकहोल्डर हजर झाले आणि मिटींग नियोजित वेळेला
सुरु झाली. आळीपाळीने प्रत्येकजण बोलू लागला. प्रकाश सर्वांचे म्हणणे लक्ष
देऊन ऐकत होता. प्रोजेक्ट कसा आहे, किती मोठा आहे, किती महत्त्वाचा आहे
ह्याबद्दल बोलणी सुरु झाली. मोठ्या पडद्यावर प्रेझेंटेशन सुरु होते.
गवर्नमेंटला आपली ऑफर द्यायची आहे, त्यासाठी संबंधित केंद्रीय मंत्र्याला
काही फंड द्यावा लागणार आहे. हा फंड एकूण प्रोजेक्ट कॉस्टच्या किती
परसेंटेजमध्ये असावा ह्याची मंत्र्यामार्फत सूचना आलेली होती. मंत्र्याचा
एक प्रतिनिधी आज मिटींगमध्ये त्याचसाठी हजर होता. हा फंड म्हणजे कमिशन, ही
कंपनी मंजूर करते की नाही ह्याच प्रश्नाचे उत्तर त्याला हवे होते, अन्यथा
दुसर्या कंपन्या तर टपलेल्याच होत्या.
खरे तर आजची सर्व मिटींग केवळ त्या एका कारणासाठी होती. बाकीचा तर नुसता
कॉर्पोरेट फाफटपसारा आणि हायफाय डामाडौल. प्रकाशला आज त्या आकड्याचाच
निर्णय घ्यायचा होता. 'नेक्स्ट स्लाइड', 'नेक्स्ट स्लाइड' करत जेव्हा
स्क्रीनवर ह्या फंडशी संबंधित स्लाइड झळकली. त्यात किती फंड द्यावा लागेल
त्याचा आकडा होता. लाल रंगात बोल्ड केलेला. तो आकडा बघताच प्रकाशच्या
डोक्यात अचानक सणक गेली. ह्याच आकड्याने कालपासून त्याला अक्षरशः छळले
होते. त्याच्या मेडीकल रिपोर्टमध्ये हाच आकडा लालभडक रंगात बोल्ड केलेला
होता. त्याच्या जीवावर उठलेला हाच तो आकडा होता. मेंदूच्या प्रत्येक
वळीतल्या प्रत्येक दरीतून एकच इको ऐकू येऊ लागला. "ह्या सार्या अचिव्हमेंटला काय अर्थ आहे?" , "ह्या सार्या अचिव्हमेंटला काय अर्थ आहे?" , "ह्या सार्या अचिव्हमेंटला काय अर्थ आहे?".
भान सुटते की काय अशा अवस्थेत प्रकाश अचानक बरळू लागला. "ह्याला काय अर्थ
आहे?", "ह्याला काय अर्थ आहे?". सहकारी चमकून प्रकाशकडे बघू लागले. कोणीतरी
वयस्कर सिनियर ऑफिसरने त्याला विचारले, "प्रकाश, काय झाले? मागच्या
आठवड्यातच आपण ह्या आकड्यावर शिक्कामोर्तब केले आहे, हे साहेब आज फक्त आपले
कन्फर्मेशन घ्यायला आले आहेत. बाकी सगळे तर तसे फिक्सच आहे ना?". आपण
नक्की कशाबद्दल बोलतोय हे प्रकाशला कळतच नव्हते. तो भ्रमिष्ट झाला होता.
"काहीही फिक्स नाही, हा आकडा मला मान्य नाही, सगळे संपवून टाकेल हा आकडा,
मला मान्य नाही, हे अजिबात मान्य नाही, काय अर्थ आहे ह्याला? काय अर्थ आहे
ह्याला?"
अचानक झालेल्या ह्या प्रकाराने सगळे गांगरुन गेले.
प्रत्यक्ष बॉसच कन्फ्युज आहे आणि ऐनवेळी नाकारतो आहे म्हटल्यावर कोणालाही
ही परिस्थिती नक्की कशी हाताळावी हे समजत नव्हते. मंत्र्याचा माणूस तर थोडा
वेळ शांत बसला. नंतर तो मीटींगरुममधून शांतपणे बाहेर पडला. त्याने
मंत्र्याला फोन लावला. "साहेब, ते नाही म्हणत आहेत बहुतेक." "ओके" तिकडून
आवाज आला.
---------------------------
समोर बसलेल्या
व्यक्तीने दिलेला एक कागद मंत्रीमहोदय बघत होते. त्यातला लाल अक्षरात बोल्ड
केलेला आकडा बघून त्यांच्या रुंद, रुक्ष चेहर्यावर एक हलकीशी रेष हलली. "ठिक आहे, करुयात मग" असे म्हणून त्यांनी पीए कडे बघितले. ही मिटींग संपल्याची खूण होती.
----------------------------
प्रकाशच्या ऑफिसातल्या एचआर डिपार्टमेंटमध्ये, कंप्युटरशी खुडबुड करत,
बसलेल्या दिपिकाचा फोन वाजला. तिने मेसेज चेक केला. 'उद्या संध्याकाळी
ब्ल्यु रिट्रीटमध्ये, रुम नंबर ५०४".
----------------------------
रुम नंबर ५०४ च्या बेडवर दिपिका बसलेली होती. मध्यरात्र उलटलेली होती आणि
नोटा मोजायचं मशीन सुर्रर्र... सुर्रर्र आवाज करत होतं. सिंगलमाल्टच्या दोन
बॉटल संपल्या होत्या. नोटांची शेवटची बॅच संपल्यावर दिपिकाने त्या
सूटकेसमध्ये भरायला सुरुवात केली.
----------------------------
दुसर्या
दिवशी सकाळी अकरा वाजता क्रिनोसंस मेडलॅबच्या टेक्निकल हेडच्या फोनवर
त्याच्या बायकोचा कॉल आला. "ते लोक आताच येऊन गेलेत... कॅश मोजली, पूर्ण
आहे. म्हणजे तू कॅरीबियन टूरचे म्हणत होता ते खरेच आहे तर..... लव्ह यु सो
मच. आज लवकर घरी ये. मी पण सरप्राइज देणार आहे"
---------------------------
पंधरा दिवस आधी.
मॅफ्कोर कंपनीच्या रिजनल हेड ऑफिसमध्ये, म्हणजे प्रकाशच्या ऑफिसमध्ये.
कंपनी पॉलिसीनुसार दरवर्षी हेल्थ चेक-अप प्रोग्राम आयोजित केला जातो.
हायलेव्हल हेड्ससाठी स्पेशल प्लॅटीनम पॅकेजअंतर्गत कंप्लीट हेल्थ चेकअप
होता. सीईओ लेव्हलच्या सर्वांना तर ह्या टेस्ट्स करणे बंधनकारक होते. कंपनी
आपल्या महत्त्वाच्या शिलेदारांच्या आरोग्याबद्दल सजग असते. त्यांचे
शारीरिक, मानसिक आरोग्य सदैव उत्तम दर्जाचे असावे, कंपनीसाठी काम करतांना
निदान त्यांच्या आरोग्यसमस्यांमुळे काही अडचण येऊ नये असा उद्देश होता.
ह्या लेव्हलवर असलेले ऑफिसर्स येत्या काळात काही घातक आजारांना बळी पडतील
का ह्याची चाचपणी करायची असाही एक उद्देश असतो. जेणेकरुन कंपनीला
भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेऊन हायलेव्हल हेड्सच्या आरोग्याचा
कंपनीच्या टर्नओव्हर आणि रेप्युटेशनवर प्रभाव पडू नये असे नियोजन करता
येते.
प्रकाशचे ब्लड सँपल घेतले गेले. युरिन सँपल घेतले गेले.
इसीजी, बीपी, स्ट्रेसटेस्ट सर्व पार पडल्या. तास-दोन तास सर्व प्रकारे
तपासल्यावर क्रिनोसंस मेडलॅबच्या टेक्निशियन्सनी प्रकाशला "इट'स ओव्हर"
म्हणून जायला सांगितले.
प्रकाश बाहेर जाताच ब्लड सँपलवर मार्क करणार्या टेक्निशियनने लालभडक जाड मार्करपेन उचलला आणि प्रकाशच्या ब्लडसँपलवर एक आकडा लिहिला.
प्रकाशचे करीअर संपवणारा आकडा.
प्रकाशला संपवणारा आकडा.
"द रेड बोल्ड नंबर"
:-X-:-X-:-X-:-X-: :-X-:-X-:-X-:-X-:
कथा काल्पनिक असली तरी वास्तवाशी थोडी मिळतीजुळती आहे. आजकाल कंप्लिट
हेल्थ चेकअप पॅकेजेस चे पेव फुटले आहे. महागडे आणि अतिमहागडे पॅकेजेस तयार
करुन त्यात चित्रविचित्र टेस्ट्स केल्या जातात. त्यांचे रिपोर्ट्स बघून
एरवी हेल्दी असणारे लोक विनाकारण साशंक होतात. अनोळखी टेस्ट्समधल्या
नंबर्सचा आपल्या आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो हे कळण्याची प्रत्येकाची
समज नसते. ते डॉक्टर्सकडे जातात, परत सगळ्या टेस्ट्स करतात. कॉर्पोरेट
हॉस्पिटल्सच्या सापळ्यात अडकतात. कोणत्याही रोगाची कसली लक्षणे नसतांना असे
क्लायंट हॉस्पिटल्ससाठी आयते सावज तयार होऊन जाते. घाबरवून त्यांच्यावर
उगाचच उपचार केले जातात, किंवा शस्त्रक्रिया केल्या जातात.
अशा टेस्ट्स रिपोर्ट्समुळे ठणठणीत बरे असणार्या
व्यक्ती नखशिखांत हादरुन जातात. आपल्याला काहीही झालेले नाही हे मान्य
करायला त्यांना खूप वेळ लागतो. हे सर्व अचानक काय उद्भवले आणि आपले आता काय
होईल ह्याचा मानसिक ताण व्यक्तीवर येतो.
हेल्थ चेक-अप्स वाईट
असतात असे नव्हे. पण कोणत्या वयात, कोणत्या परिस्थितीत, कोणकोणत्या टेस्ट्स
करणे खरेच आवश्यक आहे ह्याचा विचार व्हायला हवा आहे. तसेच काही शंका
असल्यास दोन तीन खात्रीलायक डॉक्टरांकडून नीट तपासणी करून घ्यावी. फक्त
टेस्ट रिझल्टवर अवलंबून राहू नये. तुमचा किंवा तुमच्या प्रियजनांपैकी
कोणाचा प्रकाश होऊ देऊ नका.
काळजी घ्या, निरोगी राहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा