शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

कंपल्सरी गिल्ट कशाला?

तुम्ही स्त्री आहात, मग त्या अशाच असतात. तुम्ही पुरुष आहात, मग ते असेच असतात. तुम्ही डॉक्टर आहात, व्यापारी आहात, शेतकरी आहात, मजूर आहात, शिक्षक आहात, राजकिय नेते आहात, सरकारी नोकर आहात, तुम्ही समाजातल्या कोणत्याही घटकाचे प्रतिनिधित्व करत असाल, कोणता न कोणता दोष तुमच्या माथ्यावर आणून टाकल्याच जाणार आहे, तुम्ही वैयक्तिक त्यात काही करत असा की नसा... पण तुम्ही अमुक-तमुक आहात म्हणजे अमुक-तमुक प्रकारे समाजाचे शोषण करतच आहात असे सांगितले जाते.

समाजातल्या प्रत्येक घटकाला बाय डिफॉल्ट दोषी ठरवून त्या समाजघटकातल्या प्रत्येक व्यक्तीच्या बोकांडी कंपल्सरी गिल्ट बसवण्याचा जो प्रकार बोकाळलाय ना, त्याने अंतिमतः प्रत्येक व्यक्तीच्या मनात इतर माणसांबद्दल असुरक्षितता, असहकार आणि संशयाची भावना उत्पन्न होत आहे.

उदा. गेल्या तीस वर्षांत एका मोठ्या लोकसंख्येने प्रचंड कष्ट करुन गरिबीतून मध्यमवर्गात प्रवेश केला आहे. काटक्यांची झोपडी असलेल्या, रस्त्यावर हगायला जाणार्‍या पिढीच्या नातवंडांना आता स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या आलिशान घरातल्या कमोडवर बसून हगता येत आहे. पण हे त्याचे यश नसून अपराध आहे. तो कमोडवर बसून हगतोय म्हणूनच कोणाला तरी रस्त्यावर हगायला भाग पडते आहे असे त्याला सांगितले जात आहे. तो प्रिविलेज्ड सोसायटीचा भाग आहे म्हणून तो बाय-डिफॉल्ट ओप्रेसर झालेला आहे... तुमची जीवनशैली सुधारली म्हणजे आता तुम्ही अपराधी आहात असा समज करून देण्याची एक मोठी मोहीम सुरु आहे.

ह्या अशा प्रकारानेच मला प्रश्न पडतो की गरिबांनी गरिबच राहावे, श्रीमंत होऊच नये अशी गरिबांच्या नावाने कोकलणार्‍यांची इच्छा असते का?

स्त्रीवाद-विरुद्ध-पुरुष, सवर्ण-विरुद्ध-दलित हा वाद, पुरोगामी-सनातनी, असे अनेक वाद सातत्याने चालू असतात. एखाद्या विचारधारेचे टिकाकार इतक्या खालच्या पातळीवर येऊन टिका करतात की जणू अमुक एका विचारधारेबद्दल सहानुभूती असणे हासुद्धा जघन्य अपराध असावा. याचा प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक मानसस्वास्थ्यावर परिणाम होत नसेल का?

एक उदाहरण प्राजक्ता गांधी ह्यांच्या कमेंटमधून: "सर्वसामान्य संसारी बायकांची वेश्यांशी तुलना केलेली बघितलीत कि नाही? काही तर म्हणाले, बायको हि वेश्याच असते. तिला मोबदला दिला जात नाही. काही म्हणाले, वेश्येला बायकोपेक्षा जास्त स्वातंत्र्य असतं. एकूणच संसार, नवरा, मुलं बाळं असण्याचा गिल्ट यावा इतपत टारगेट केलं जातं तिला. यावर कित्येक पुरुषही कडक, डार्क अशा प्रतिक्रिया देतात तेव्हा गंमत वाटते."

एकूण समाज हा एकमेकांना सांभाळून, समजून घेऊन सहभागाने जीवन जगण्याचा मार्ग आहे. पण दिसेल तिथे तुकडे पाडत पाडत प्रत्येक व्यक्तीला आयसोलेट करण्याची, एकटे पाडण्याची ही जी करामत चालली आहे त्याने प्रत्येकाचे मानसिक तणाव वाढणार आहेत. हे बायोलॉजिकल लेव्हल, सायकोलॉजिकल लेव्हल ला परिणाम घडवणारे म्हणून जास्त धोकादायक आहेत.

माणसाला माणसाची साथ लागतेच. त्यासाठी परस्परांवर विश्वास लागतो. एकमेकांचे गुणदोष सांभाळून घेण्याची तयारी लागते. अशा समाजाचा माणसाला आधार राहतो. माणसांचा माणसाला वाटणारा आधार हाच माणसाच्या जगण्यातला एक मोठा भाग आहे. हा आधार डळमळीत झाला तर आयुष्ये विस्कटणार आणि हाती फक्त धुपाटणे राहणार. गाठी उसवून धागा सरळ करायचा की कात्री घेऊन सगळा गुंता कापून टाकायचा हा ज्याच्या-त्याच्या शहाणपणाचा प्रश्न.

विचारांच्या लढाया माणूसपण संपवू लागल्या तर त्यांना विचारी तरी म्हणावे का?

मी काय सांगू त्या प्रकांड पंडित विद्वान बुद्धिवंत विचारवंत दिग्गजांना, सुज्ञ आहेत म्हणतात ते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा