शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

मार्केटींग सेल्स हेच आता भविष्य आहे

आपल्याकडे नवतरुण नोकरी शोधणारे खालील तीन गोष्टींना घाबरतात
टार्गेट, मार्कटींग, सेलिंग...

सर्व जण नोकरीच्या अशा जाहिरातींना पटापट रिस्पॉन्स देतात ज्यात खालील तीन गोष्टी असतात.

नो टार्गेट, नो मार्कटींग, नो सेलिंग...

टार्गेट, मार्केटींग, सेलिंग चे इतकी भीती आहे मुलांमध्ये, आणि त्याचवेळी यशस्वी सेल्समनची अक्षरशः वानवा आहे आपल्याकडे. आम्हाला खुर्चीत बसून जॉब हवा. शांततेत खरडपट्टी करु, मेकॅनिकल, रोबोटीक कामे करु, पण मार्केटींग करणार नाही. गड्यांनो, अशाने संपणार आहात. ही सगळी डेटा-एन्ट्री-घरीबसूनकाम-ऑनलाइन-फॉर्म-भरा एकतर खोटेपणा आहे. त्यात तुमचे पैसे घालवण्याशिवाय काहीएक होत नाही. कुठल्याही संकटाला, जबाबदारीला, आव्हानाला तोंड न देता सर्वांनाच लाखो रुपयाच्या पगाराची अपेक्षा आहे. व्यवसाय करायचा तर शेठजी बनून फक्त गल्ल्यावर बसायचे आहे. तिथेही मार्केटींग, सेलिंग करावे लागते हे गावीच नाही यांच्या. म्हणे आम्हाला उद्योजक व्हायचे आहे.

काही तरुण, एम्बीए वगैरे नाइलाजाने चांगले काही मिळेपर्यंत, म्हणजे खुर्चीजॉब, बॉसगीरी करण्याचा जॉब मिळायची पात्रता ती म्हणजे चार पाच वर्षे फिल्डमध्ये ढकलगाडी खेळतात, सहा महिने वर्षभरात नोकर्‍या बदलतात, त्यांच्यामुळे कंपन्यांना एक रुपया फायदा झालेला नसतो, यांच्या पगाराएवढाही यांना बिझनेस आणता आलेला नसतो. अशा मुलांना नोकरीवर ठेवून पस्तावलेली अनेक उद्योजक मंडळी माझ्या ओळखीत आहेत. सहा सहा महिने पगार घेऊन शून्य बिझनेस करणारी ही मंडळी स्वतःच्या नावामागे एमबीए वगैरे बिरुदे चिटकवतात.

यांच्याकडे संवादकौशल्य नसते, कोणाशी कसे बोलावे याचे ज्ञान नसते, मुख्य म्हणजे व्यवसाय म्हणजे काय, मार्केटींग म्हणजे काय, नेटवर्कींग कसे करावे, हे तर दूरच. मार्केटींग, सेलिंग मधले मूलभूत तत्त्व ते म्हणजे 'प्रश्न विचारुन' ग्राहकाची नस ओळखा, हेही माहित नसते, माहित असले तरी वळणात नसते. केवळ जाऊन दारात उभे राहायचे. आपली माहिती रोबोटिकली सांगायची, कोणताही उत्साह नसतो, कारण मुळात हे कामच आवडत नसते. मग यांना कोण बिझनेस देणार, कोण ऑर्डर देणार? आणि त्यामुळे दिवसातून शंभर नकार घेऊन हे चिडचिडे होतात, सिगरेट दारु पितात, नकारात्मक राहतात. एका भयंकर चक्रात अडकतात. किंवा इतक्या वाईट पातळीवर जाण्याआधीच कुठेतरी नोकरीच सोडून दुसरीकडे काम सुरु करतात. पण मार्केटींग व सेल्समध्ये यशस्वी होत नाहीत.

सेल्स, मार्केटींग, टार्गेट अचिवमेंट, कोल्ड कॉलिंग, कोल्ड मीटींग्स याची खूप धास्ती, भीती, नावड आपल्या मुलांमध्ये आहे. त्याचे कारण त्यांच्या संगोपनात दिसते. आपल्या मित्र-नातेवाईकांच्या सुरक्षित कोंडाळ्याच्या बाहेर ही मुले कधी गेलेली नसतात. आईवडीलांनी एमबीए करायला लाखो घातलेले असतात पण मूल डिग्री घेऊन बाहेर पडेपर्यंत त्याला ज्या क्षेत्रात काम करायचे असते त्याचा अजिबात गंध नसतो. व्यापार-व्यवसाय हा लोकांशी संबंधित असतो. हेही त्यांना फक्त थेरॉटिकली माहित असते. धंदा कसा करतात, दुकान कसे चालते, विक्री कशी होते, ग्राहक कसे बोलतात, ह्याबद्दल ह्या मुलांना कधीही माहित झालेले नसते. काउंटरच्या पलिकडून दुनिया कशी असते हे माहितच नसेल तर अचानक २२ व्या वर्षी ग्राहकांना ही मुले सामोरे कशी जाणार?

आपण विदेशात बघतो की तिकडे मुले पंधराव्या सोळाव्या वर्षीच काहीबाही उचापती करुन थोडेफार पैसे कमवत असतात. त्यात त्यांना धंद्याच्या बेसिक्सचे संपूर्ण ज्ञान अगदी प्रॅक्टीकली प्राप्त होते. त्यामुळेच अमेरिकन-युरोपियन लोकं मार्केटींगमध्ये जगभर दबदबा घालून आहेत. ते त्यांच्या लहानपणापासूनच्या संस्कारात आहे. आपल्याकडे साधी कोथींबीर आणायला बारावीतल्या मुलाला पाठवत नाहीत, नको अभ्यास करु देत त्याला म्हणून टाळले जाते. मग मुलांना इन्टरपर्सनल स्किल्स, कम्युनिक्शन स्किल्स कशी डेवलप करता येणार? कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे फाड फाड इंग्रजी हा एक गैरसमज आपल्याकडे आहे. आपल्याला जे म्हणायचे आहे ते सोप्या शब्दात, सहजतेने कमीत कमी वाक्ये वापरुन समोरच्याला समजेल अशा पद्धतीने सांगणे हे संवादकौशल्य, यात भाषा महत्त्वाची नाही. संवाद महत्त्वाचा. यात दुसरा काय म्हणतोय तेही ऐकायला आले पाहिजे. त्यातून गरजा समजतात, त्यामुळे आपले प्रॉडक्ट सर्विस याचे मार्केटींग करायला मदत होते.

भारतात अनेक नवीन सर्विसेस सुरु होत आहेत, अनेक स्टार्टप्स आहेत. नवीन नवीन कल्पना बिझनेस स्वरुपात येत आहेत. अशा सर्वांना नीट बोलू शकणारी खुप सारी मार्केटींगची मुले लागणार आहेत. नवीन नोकरी शोधणार्यां ना, किंवा विनाकटकट काम शोधणार्‍यांना माझी सूचना आहे की बिनामेहनत काम असे काहीही नसते. अशी सगळी कामे आता रोबोट्स तुमच्या पगारापेक्षा स्वस्तात करणार आहेत. अनेक गोष्टींसाठी मनुष्यबळाची गरज उरली नाहीये, सॉफ्टवेअरच ते काम नीट करतं. पण खर्‍याखुर्‍या माणसांशी संवाद साधायची संधी कायम राहणार आहे. ही संधी अमर्याद यश व पैसा देणारी आहे. ह्या संधीचे सोने करता आले पाहिजे, हे शिकता येते. प्रत्येकाला जमू शकते. कष्ट करावेच लागतात. पण मार्केटींग, सेल्स हा प्रांत प्रत्येक अनुभवानंतर तुमची उत्पादकता आपोआप वाढवत नेणारा असा आहे. एका महिन्यात पाचशे नवीन ग्राहकांना भेटल्यावर तुमच्याकडे पाचशे अनुभव असतात. त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून तुम्हाला खूप गोष्टी कळतात. नेहमीचे कोणते प्रश्न आहेत ते कळतात, त्याची उत्तरे तुम्ही तयार करु शकता. तीच उत्तरे नवीन ग्राहकांवर टेस्ट करुन बघू शकता. असे करता करता तुम्हाला ग्राहकाने नकार द्यायच्या सर्व कारणांवर उपाय सापडलेले असतील व तुमचा कन्वर्जन रेशो महिन्यागणिक वाढत जाईल. यात मजा आहे, यात नशा आहे, झिंग आहे यशाची. आणि हे सर्व जीवंत आहे. अस्सल आहे. सेल्स आणि मार्केटींग कटकटीचे, परिक्षा पाहणारे, त्रासदायक काम आहे की आनंददायक आहे हे सर्व तुमच्या दृष्टीकोनावर ठरते. तुम्ही जर यशाचा फॉर्म्युला घेऊन यात उतरलात तर आनंद आहे, किरकिर करत उतराल तर मात्र दु:ख मिळेल.

आपल्याला हा फॉर्मुला माहित नसल्याने मुले टार्गेट्स ना घाबरतात. आपण नेमकी काय सर्विस वा प्रॉडक्ट ऑफर करतोय त्याने कस्टमरला कसा फायदा होईल हे स्वतः आपल्यालाच कन्विन्स झालेले नसेल तर तेच बोलता बोलता ग्राहकाच्या मनात आपोआप उतरुन जाते. मग सेल होत नाही, निराशा येते. याउलट प्रॅक्टीस करणारे रोज आपला सक्सेस रेट वाढवत नेतात. यशस्वी होतात. सेल्स मार्केटींग हे खुप आश्वासक क्षेत्र आहे व यात स्पर्धाही फार कमी आहे. जितके काम कराल तितका पैसाही आहे. मात्र झोकून देण्याची इच्छा पाहिजे, कष्ट करण्याची इच्छा पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. ज्ञान असलेच पाहिजे असे काहीही नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा