शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

Availability heuristic'

आपण रोज तसे निर्धास्त झोपत असतो. दरवाजाची कडी नीट लागली आहे इतकी खात्री पुरेशी असते. पण ज्या दिवशी आपल्याला कळते की काल रात्री आपल्या कॉम्प्लेक्समध्ये चोरी झाली, त्या रात्री आपण थोडे साशंक होऊन कडी लावतो. पण नीट झोपतो. दुसर्‍या दिवशी आपल्याला कळते की आपल्याच बिल्डींगमध्ये चोरी झाली. तेव्हा त्या रात्री आपण जरा सगळ्याच खिडक्या, दरवाजे आणि इतर ओपनिंग्स चेक करुन झोपतो. झोप साशंकच असते थोडीशी... असेच आठ दिवस जातात. मग साशंकपणा कमी होतो. झोप नीट लागू लागते. खिडक्या दरवाजे तपासणे कमी होते. अचानक दुसर्‍या दिवशी कळते की आपल्या वरच्याच फ्लॅटमध्ये दरोडा पडला, त्या कुटूंबापैकी दोघांचा चोरांनी खून केला आणि आणखी दोन घरांचे दरवाजे उचकटण्याचा प्रयत्न झाला. पण त्यात तुमचा फ्लॅट नव्हता. तुम्हाला त्या रात्री कोणताही त्रास झाला नव्हता. तुम्हाला तर कळलेही नव्हते. तुम्ही शांत झोपेत होता....

त्या दिवशी मात्र तुम्हाला शांत झोप येतच नाही. कॉम्प्लेक्समध्ये खूप पोलिस बंदोबस्ताला आलेले असतात. सोसायटीचे लोकही गस्त घालू लागतात. लोक आळीपाळीने जागरण करुन वॉच ठेवू लागतात. पण तुम्ही रात्रभर जागे असता. एक सेकंद झोप नसते. दर तासाला उठून दरवाजा खिडक्या नीट लागल्या आहेत ना ह्याची तपासणी करता... अशी अवस्था आणखी दोन दिवस राहते. त्यानंतर हळूहळू पोलिस जातात. लोकांचे पहारे कमी होतात. नॉर्मल लाइफ परत येते. तुम्ही रोज दरवाजाची कडी नीट लावणेही विसरुन डाराडूर झोपू लागता....

जगात रोज हजारोंनी घरफोड्या होता, चोर्‍या होतात, खून होतात. पण तुम्ही रोज रात्री झोप हरवून घाबरुन बसलेले नसता.

मानसशास्त्रात ह्या वैचारिक अवस्थेला 'Availability heuristic' असे नाव आहे. जाहिरातदार, न्यूजमिडिया आणि राजकिय नेते ह्या मनोवस्थेचा फायदा खूप चांगल्या प्रकारे वेळोवेळी घेत आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा