शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

पुस्तकदिन आहे.

अंड्यातून बाहेर आल्यावर अळी सतत फक्त पाने कुरतडत असते. तसा मी वाचायला शिकलो तेव्हापासून अधाशासारखे वाचले. फिक्शन फारसे वाचले नाही. माहितीपर जे काही मिळेल ते खूप वाचायचो. कागदाचा चिटोरा मिळाला तरी वाचून काढ, घरी खूप पुस्तके असणार्‍या मित्रांशी मैत्री करुन त्यांच्या घरी जाऊन तासंतास वाचत बस हे उद्योग दहावी-बारावी पर्यंत सतत करत होतो. व्यसनी होतो अगदी. बी.ए. करत असतांना वेगवेगळ्या विषयांवरची खुप पुस्तके वाचली. जे माझे विषय नसायचे अशी पुस्तकेसुद्धा वाचत होतो. पण आज मला एकही पुस्तक अगदी नाव घ्यायलासुद्धा पटकन आठवत नाही.

त्यानंतर पुस्तकवाचन मागे पडले. इतर उद्योग सुरु झाले. काम-धंदे सुरु झाले. सोशल मिडियावर लिहायला लागलो. चर्चांमध्ये भाग घ्यायला लागलो. आपण खूप खूप वाचले आहे ह्याचा अहंकार होता. आता मी नक्की काय वाचले हे काही आठवत नसते. पण कोणी विचारले की अमुक पुस्तक वाचले का, तमुक वाचले का, तर १०० पैकी ९९ वेळा ते पुस्तक मी वाचलेले नसते. अगदी गाजलेल्या कादंबर्‍यांची नावेसुद्धा मला माहिती नाहीत. मग विचार पडतो की नक्की वाचले काय मग इतकी वर्षे? पण खरे सांगायचे तर जे काय वाचले ते बरोबर लेखनातून सुप्तपणे झिरपत असते.

हातात पुस्तके घेऊन वाचणे आवडते. फिक्शन वाचतो कधीमधी, पण एकाच बैठकीत पुस्तके संपवायची खोड असल्याने सलग इतका वेळ काढणे, इतर व्यवधाने असल्याने जमत नाही. गेल्या दहा वर्षात फार कमी पुस्तके वाचली. आठवणीतली पुस्तके म्हणजे उपरा, एक होता कार्व्हर (हे मी जस्ट दोन महिन्यापूर्वी वाचले).

माझ्या मुलांना पुस्तके वाचायचे माझ्यासारखेच व्यसन आहे, ते व्यसन पुरवण्यासाठी मला लहानपणी जे मिळू शकले नाही ते सर्व मी त्यांना पुरवू शकतो ह्यातच खूप मोठा आनंद आहे.

फेसबुकवर तेच टिकून असतात जे पुस्तके वाचतात. त्यांना पुस्तके वाचायची सवय असल्याने असे मेगाबायटी निबंध ते सहज वाचून टाकू शकतात. इथे इतके वाचायला मिळते की फेसबुक हेच एक मोठे पुस्तक झाले आहे असे मला वाटते.

फेसबुकवर पुस्तकदिन साजरा करण्यात कसली विसंगती वाटत नाही ती ह्यामुळेच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा