टाइमकॅप्सूल
वर्ष ३५१९
"डॉक्टर, त्याची शुद्ध परत आलीये..."
हे वाक्य कानी पडताच डॉक्टर आणि टीम धावत त्या रूमकडे गेली...
टाइम कॅप्सूलमध्ये सापडलेला तो सावरत होता.
टीमला अजून त्याच्या टाइमकॅप्सूलचा टाइमस्टँप कळलेला नव्हता. कॅप्सूल फारच
डॅमेज झालेली होती. नशिब बलवत्तर म्हणून जीवनरक्षक प्रणाली तेवढी सुरु
राहिल्याने तो वाचला होता. पण त्या टाइमकॅप्सूलचा कसलाच आगापिच्छा कळत
नव्हता. शेवटचा प्रयत्न म्हणून आता त्या टाइमकॅप्सूलमधल्या व्यक्तीच्या
जबानीवरच काय ते कळणार होते.
डॉक्टरांनी त्याला विचारले, की तो कोणत्या काळातला आहे.
पण दुर्दैवाने काहीही आठवत नव्हते. त्याच्या स्मृतीवर परिणाम झालेला होता हे दिसत होते. स्वतःचे नाव ही आठवायला त्याला जमत नव्हते.
शेवटी तो नक्की कोणत्या वर्षातून आला आहे हे समजायला त्याला कॅप्सूलमध्ये
टाकण्याच्या वेळी काय काय घडत होते त्याबद्दल विचारल्या जाऊ लागले.... तो
नक्की कोणत्या काळातून आला हे कळल्यास त्याला जगायला कोणती विटामिन्स व
औषधे लागतील हे समजणार होते. त्याशिवाय तो फार काळ जीवंत राहू शकणार
नव्हता.
त्याला खरंच काहीच आठवत नव्हते.... पण अचानक त्याला
काहीतरी आठवले. त्याची नजर चमकली. तशा डॉक्टर आणि टीमच्या आशा पल्लवित
झाल्या. महत्त्वाचा धागा दोरा हाती लागतो असे वाटू लागले....
तो बोलला, "मी कॅप्सूलात जात होतो तेव्हा एकच गोष्ट होत असतांना आठवत आहे, कदाचित त्यावरुन माझ्या काळाचा तुम्हाला अंदाज येईल"
पंचप्राण कानात आणून आता डॉक्टर आणि टीमच काय तर त्या रुमच्या सगळ्या भिंतीही तो काय म्हणतोय ते ऐकायला आतुर झाल्या....
तो म्हणाला,
.
.
.
.
.
.
.
.
.
"तेव्हा सेटमॅक्सवर सूर्यवंशम चालू होता"
.
.
.
.
.
टीमने शांतपणे त्याला परत कॅप्सूलात कोंबला....
त्याचा काळ माहित होण्याची शेवटची आशाही धुळीस मिळाली....
सेटमॅक्सवर सूर्यवंशम गेले दिड हजार वर्ष सुरुच आहे....
कॉपीराईट्@संदीपडांगे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा