शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

टपरीवर चहा

वडीलांच्या टपरीवर चहा विकणे' हा उल्लेख जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा मी जाम हळवा होतो. काहीतरी गलबलतं मनात खोल. आमची टपरी अतिक्रमणात उचलून नेली होती नगरपालिका अधिकार्‍यांनी. मी तेव्हा ५-६ वर्षांचा असेन. ग्लास विसळून देणे व लोकांना चहा देणे अशी कामे केली, दोन तीन दिवस केली असतील. जास्तीत जास्त. फार आठवत नाही आता. वडिलांना जुन्या आठवणी विचारुन छळणे पसंतही नाही. तर ते अतिक्रमणात आपली रोजीरोटी उचलून नेल्या जाणे फार विचित्र असते. पाचसहा वर्षाच्या मुलाला रोजीरोटी, कामधंदा, पैसा कमवणे व त्यातून पोट भरता येणे हे कुठून माहित असणार? पण बापाची अगतिकता, अधिकार्‍यांचा अधिकार हे सगळं जाणवतं देहबोलीतून.

माझ्या मनात खोल रुतून राहिलेला एक क्षण आहे, आमच्या टपरीवर चहा घ्यायला येणारे लोक आमच्यापेक्षा चांगल्या कपड्यातले, सुशिक्षित, सरकारी नोकरीवाले. माझ्या त्यावेळेसच्या दृष्टीकोनातून 'साहेबलोक'. हे साहेबलोक खूप श्रीमंत, अधिकार, वजन आणि ओळखीवाले असतात अशी एक इमेज लहानग्या मनात होती. जेव्हा ही टपरी उचलून नेत होते तेव्हा 'हे साहेबलोक स्वतःहून वडिलांना मध्यस्थीस मदत करतील, आमची टपरी हटू देणार नाहीत. जे वाईट घडतंय ते घडू देणार नाहीत कारण आमच्या टपरीवर ते चहा प्यायचे ना? मग ऋणानुबंधाच्या निमित्ताने इतके तर ते सहज करु शकतील' असे मला वाटले. पण त्या साहेबलोकांनी काही मदत केली नाही. ती अपेक्षाभंगाची बोच राहीली. तीच आठवण नेहमी गलबलून आणत असते. अगतिकता, असहाय्यता, गरीबी, सन्मानाने पोट भरण्याची लढाई, बरंच काही आठवत राहतं.

खरंतर त्यात कोणाचीच चूक नव्हती, मदत करण्यासारखेही काही नव्हतं त्यात. बेकायदेशीर होतं तर होतं. विशेष म्हणजे एका सामान्य, कुठलाही राजकीय पाठबळ, गुंड-पुंडाचा हात नसलेल्या गरिबाचं बेकायदेशीर अस्तित्व होतं ते. तिथे दयामाया विचार नसतो. सरकारने तो करणे नियमात बसत नसते.

मोठं झाल्यावर बरंच काही उमगतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा