शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

आयब्रो आणि अर्थव्यवस्था

करोनामुळे लोकांना अतिआवश्यक गरजा कळल्या, त्यामुळे आता अनावश्यक खर्च कमी करुन साध्या राहणीकडे ओढा वाढेल-वाढला पाहिजे अशा काही चर्चा होत आहेत.

हे इतके सोपे नसते. एक साधे उदाहरण घेऊया. लॉकडाऊनमुळे स्त्रियांना साधे आयब्रो करायलासुद्धा मिळत नाहीये. ह्या माहितीवर आपण थोडे कुत्सित हसणार आणि काय नखरे बायकांचे असे बोलून खिल्ली उडवणार. पण ब्युटीपार्लर्सचे उत्पन्न बंद आहेत हे लक्षात येते आहे का?

समाजातल्या परावलंबी समजल्या जाणार्‍या एका मोठ्या घटकाला गेल्या काही वर्षांमध्ये स्वयंरोजगार करण्याची संधी प्राप्त झाली. त्यात किमान कौशल्यावर आधारित काही व्यवसाय पुढे आले. त्यात स्त्रियांच्या दृष्टीने सुरक्षित आणि चांगले पैसे देणारा ब्युटीपार्लर हा व्यवसाय लोकप्रिय झाला. घरगुती सेवेपासून लग्नाच्या मोठ्या ऑर्डरी घेण्यापर्यंत फोफावला. स्त्रिया सन्मानाने आपले स्वतःचे उत्पन्न मिळवू लागल्या. एक आयब्रो-शेपींगचे साधारण २०-२५ रुपये होतात. दिवसाला दहा आणि महिन्याला ३०० धरल्या तर किमान ७५०० रुपये उत्पन्न एखादी ब्युटीशियन निव्वळ ह्या एका अ‍ॅक्टीविटीतून मिळवू शकते. आयब्रो-शेपिंग हे खूपच बेसिक काम आहे, त्यासोबत इतर छोट्या-मोठ्या कामांचे, जसे फेशियल्स, वॅक्सिंग, ब्रायडल-मेक-अप इत्यादींचे पैसे मिळतातच.

महिन्याला पंधरा ते पन्नास हजार रुपये कमावणार्‍या महिलांनी आपले आयुष्य उभारले आहे, आपल्या कुटूंबाला आधार दिला आहे. कित्येकींना आपल्या मुलांना चांगले शिक्षण, संगोपन देण्यासाठी ह्या व्यवसायाने मदत केली आहे. कित्येकींसाठी जाचक नवर्‍यापासून घटस्फोट घेऊन स्वाभिमानाने स्वतंत्र आयुष्य जगण्याची तजवीज केली आहे.

अशी हजारो-लाखो स्त्रियांची आयुष्ये एका छोट्याशा काहीशा दुर्लक्षित व्यवसायाने बदलली गेली आहेत.

हे फक्त ब्युटीशियन स्त्रियांबद्दलचे छोटे उदाहरण आहे. ह्यासह कपडे, दागिने, टेलर्स, सौंदर्यप्रसाधने ह्यांचे बिलियन डॉलर मार्केट स्त्रियांच्या 'मला सुंदर दिसायचे आहे' ह्या एकमेव इच्छेवर चालत आहे.

मानवजातीच्या अशा खूप अनावश्यक गरजा आहेत ज्यावर आपली अर्थव्यवस्था चालत असते. त्या सर्व साखळीत कुठे न कुठे आपलेही उत्पन्न अवलंबून असते.

कोणत्या गोष्टींवर खर्च करावा, करु नये हे आपआपल्या प्राथमिकतांवर अवलंबून आहे. करोनामुळे काही दिव्यज्ञान प्राप्ती झाली असल्यास साधी राहणी स्विकारण्यास हरकत नाही. पण "साधी राहणी उच्च विचारसरणी" म्हणजे मन मारुन कृत्रिम आयुष्य जगणे नसते. विरक्त आयुष्य जगायला तशी मनोवस्था आपोआप तयार झाली पाहिजे. अन्यथा धोबी का कुत्ता, घर का न घाट का अशी अवस्था होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा