मराठी भाषेच्या आग्रहाचे दोन वेगवेगळे पैलू आहेत. ते समजून न घेतल्याने
नेहमीच गोंधळ होत आला आहे. आजच्या दिवशी जरा त्याबद्दल गोंधळ दूर करुन
घ्या.
पहिला गट हा भाषिक अस्मितेचा पुरस्कार करणारा आहे. लोक
भाषिक अस्मिता का कुरवाळतात ह्याचे कारण समजून घ्या. जगातल्या कोणत्याही
भाषेवर त्या भाषिक व्यक्तीचे प्रेम असते. त्याचे कारण तो लहानपणापासून ज्या
भाषिक समुहात राहत आलेला आहे ते त्याचे वर्तुळ असते. त्याला ते
वातावरण ओळखीचे असते. भाषा ही एका मोठ्या गटाच्या स्वतंत्र अस्तित्वाची एक
ओळख आहे. त्या गटातली भाषा एकमेकांशी जोडलेले असण्याची खूण आहे. आपल्या
भाषेची माणसे अवतीभवती असतांना एक वेगळ्याच प्रकारची सुरक्षा, आत्मियता
जाणवू लागते. तेच परक्या भाषेच्या वातावरणात जरा अवघडलेपण असुरक्षितता
जाणवते. हा मनुष्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्याचा मेंदू नेहमी सुरक्षित
आणि ओळखीच्या वातावरणाच्या शोधात असतो. भाषा त्याला असे एक वातावरण उपलब्ध
करुन देते. त्यामुळेच ज्या गोष्टीने सुरक्षित वाटते, तीच्याबद्दल आत्मियता
वाटणार. जिच्यामुळे ओळख मिळाली तिच्याविषयी अस्मिता दाटून येणार. त्याबद्दल
भावनिक होणे अगदी नैसर्गिक आहे. भाषिक अस्मिता बाळगणार्यांबद्दल किव
व्यक्त केली किंवा त्यांना तुच्छ लेखले म्हणजे आपण प्रगत विचारांचे आहोत
अशी बहुतेकांची मनोवॄत्ती असते. त्यांना खरेतर ही सगळी नैसर्गिक गरज वगैरे
भानगड माहित असेलच असे नसते किंवा त्यांचे नैसर्गिक परिघ फार वेगळे असू
शकतात. त्यामुळे 'अस्मिता बाळगणारे मूर्ख आहेत' किंवा 'अस्मिता
बाळगणार्यांना मूर्ख म्हणणारे अतिशहाणे आहेत' अशी टिका-टिप्पणी खरेतर
बिनबुडाची आहे.
दुसरा गट हा परिसरभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा
पुरस्कार करणारा आहे. लक्षात घ्या, ह्यातला प्रत्येक शब्द फार महत्त्वाचा
आहे. परिसरभाषा म्हणजे जन्म आणि सुरुवातीची वर्षे एखादे मूल ज्या भवतालात
काढते आहे तिथल्या परिसरातल्या लोकांची प्रमुख भाषा. ह्यात घरात आई त्या
मुलाशी ज्या भाषेत बोलते ती, बाहेरचे काका-मामा-शेजारी ज्या भाषेत बोलतात
ती, दुकानदार-विक्रेते ज्या भाषेत बोलतात ती अशा सर्व भाषा येतात. ह्या
सर्वांची मिळून सर्वसाधारणपणे एक परिसरभाषा होते. (काही लोक ह्याच्या
विरोधात मुद्दा मांडतात की आई मराठी, बाबा पंजाबी आणि कुटूंब बंगालात
स्थायिक असेल तर काय? अशा परिस्थिती मोठ्या लोकसंख्येच्या बाबतीत तुरळक
असतात. तरीही ह्या कुटूंबाने बंगाली शिकणे गरजेचेच आहे.) ह्या ओळखीच्या
परिसरभाषेत मुलांचे प्राथमिक शिक्षण व्हावे अशी मागणी आहे. प्राथमिक
शिक्षण म्हणजे खेळवाडी-बालवाडी-पहिली-दुसरी-तिसरी-चौथी इथपर्यंतचे
शिक्षण.(इंग्रजीतून : प्लेस्कूल-केजी-फस्ट-सेकंड-थर्ड-फोर्थ). ह्या पहिल्या
काही वर्षांत त्यांचे शिक्षण त्यांच्या परिसरभाषेच्या माध्यमातून झाले तर
त्यांचे आकलनात लवकर येते असा युनेस्कोचा रिपोर्ट आहे. अगदी सुरुवातीच्या
वर्षांमधल्या शिक्षणात ज्या संकल्पना असतात, जसे की लांबी, रुंदी, अंतर,
वस्तू ओळखणे, मोजणे, वर्गीकरण करणे, खेळ खेळणे, एकमेकांशी समन्वय साधून
काही कृती करणे, परिसरात आढळणार्या आणि अनुभवाला येणार्या गोष्टी समजून
घेणे, त्याबद्दल प्रश्न विचारणे, बोलणे हे सगळे येते. केजी-वन मध्ये रोज
दहा पाने भरुन इंग्रजी एबीसीडी घोटत बसणे ह्याला शिक्षण म्हणत नाहीत.
मुलांचे आपल्या भवतालाबाबतच्या जाणिवा विकसित करणे, त्यांना विचार करायला
शिकवणे हा पहिला टप्पा आहे. त्यासोबतच इंग्रजी ही भाषा म्हणून शिकवायला
सुरुवात करावी अशी भूमिका आहे. सर्व अभ्यासक्रम पूर्ण इंग्रजीतून असल्याने
मुलांना अनोळखी भाषेत असुरक्षित वाटते. त्यात अभ्यासक्रमही ढोरमेहनत करायला
लावणारा असेल तर एकूणच ममत्व वाटावे असे त्या शाळेत काही नसते. इथेच
मुलांचा रस शिक्षणातून संपतो आणि शाळा सोडण्याचे प्रमाण पुढे वाढते.
भारतीय लोकांचे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. आपण मुळातच भाषावैविध्याने
समॄद्ध देशात राहतो. आपल्याला किमान दोन भाषा बोलता येतात. प्रयत्न केल्यास
तीन किंवा चार भाषा बोलता येतात. नविन भाषा शिकण्याची आपली कुवत नाही
अशातला भाग नाहीच. पण ज्या प्रकारे इंग्रजीची सक्ती केली जाते ती
आक्षेपार्ह आहे. चांगले इंग्रजी शिकायला दोन ते चार वर्षे वेळ खूप आहे. ती
तमिळ, तेलगु, बंगाली, उडिया, पर्शियन, अरेबिक, उर्दु सारखीच शिकवा ना. गोरा
रंग जसा विनाकारण डोक्यावर घेऊन ठेवला आहे तशी इंग्रजी घेण्याची गरजच काय?
जगात नविन संधी मिळवायला इंग्रजी गरजेचे आहे हे मान्य पण त्यासाठी
जन्मापासून मुलांना इंग्रज बनवणे गरजेचे नाही. भाषा आहे, तिला भाषेसारखीच
वागवाल तर भारतीय मुले जास्त मोठ्या प्रमाणात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवतील.
मी आजवर जेव्हा जेव्हा इंग्रजीसमर्थकांसोबत चर्चा केली आहे. तेव्हा
त्यांनी वरील दोन्ही गटांचे मुद्दे सरमिसळ केले आहेत. दुसर्या गटाच्या
मांडणीकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. 'तुमचा बाणा तुम्हाला नोकरी देणार
नाही' अशी खिल्ली उडवली आहे. अशा लोकांचे सर्व लक्ष नोकरी कुठे आणि किती
पगाराची मिळेल ह्यावरच केंद्रीत असते. अगदी 'आयआयटीला जाणार म्हणजे तमुक
कोटीचे पॅकेज पक्के' इतकेच ह्यांचे विचारविश्व असते. नविन संशोधने, नव्या
संकल्पना, नवे शोध आपण लावू शकतो. नवे व्यवसाय आपल्याच मातीत आपण निर्माण
करु शकतो. किर्लोस्कर पंप्स कुठे नाही पोचलेत ते बघा. आपल्या मुलांना
चांगले शिक्षण दिले तर त्यांना त्यांच्या क्षमता नीट वापरता येतील.
आपल्याकडेही वैज्ञानिक, संशोधक तयार होतील. पण वैज्ञानिक, संशोधक व्हायचे
असेल तर इंग्रजीच शिकावे लागेल, अमेरिकेलाच जायला लागेल, आणि ते काही
तुमच्या मागच्या सात पिढ्यांत कोणी केलेले नाही त्यामुळे तुमची लायकीच नाही
असे दडपण लहानपणापासून मुलांवर टाकले गेले तर आमची बहुतांश मुले करपून
जातात. मग बिनकामाचे कोर्सेस करुन पोटापाण्यासाठी नोकर्या शोधत भटकत
राहतात. त्यांच्यावर आरोप होत राहतात ती ते कष्ट करत नाहीत, त्यांना अकलाच
नाहीत, त्यांना मेहनत करायची इच्छाच नाही.
शिक्षण हे वाघिणीचे
दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. वाघिणीची भीती घालून दूध प्राशन
करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न होत असेल तर तो हाणून पाडायला हवाच.
मराठी दिनाच्या शुभेच्छा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा