शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०
मी मुंबई का सोडली?
मुंबईत खरंच राहायचे असेल तर फक्त जुन्या मुंबईत राहावे. कुलाबा ते जास्तीत जास्त परळ या भागात. तेही स्वतःचे घर असेल तरच. तुम्हाला कोणत्याही निमित्ताने दादरच्या पलिकडे जायची आवश्यकता भासायलाच नको. आपली अजून औकात नाही तिकडे घर घ्यायची, म्हणून आपण मुंबई सोडली. आयुष्य कसे जगावे याबद्दल माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या माझ्यासारख्याच नसतात.
मी मुंबईत पूर्ण अकरा वर्षे राहीलो. फोर्टलाच कॉलेज, तीनही आमदार निवास, बांद्र्याचे होस्टेल, वाशीला मित्रांसोबत फ्लॅट, कळव्याला अगदी शंभर फुटाची खोली, नंतर लग्न झाल्यावर ठाण्यात मोठ्या चांगल्या कॉम्प्लेक्सेसमध्येही राहिलो. बीसीसीआय, आयपीएलसारख्या दिग्गज कंपन्यांत मोठ्या पदांवर कामेही केली. फ्री-लान्सर कामानिमित्त सगळी मुंबै कानाकोपर्यांत फिरलोय..... पण.....
मन उतरत गेलं प्रत्येकदा. प्रत्येक वर्षी, प्रत्येक अनुभवानंतर.
पहिला अनुभव. फोर्टभागात नोकरीला असतांना ताडदेवमध्ये एका कंपनीत दुप्पट पगाराची जबरदस्त ऑफर होती, काम कमी आणि पगार छान. लगेच स्विकारली. पण राहायला वाशीला आणि काम ताडदेव ला. वाशी पासून कुर्ला, नंतर कुर्ल्यातून दादर, दादरमधून मुंबई सेन्ट्रलला उतरायचं. तीन ट्रेन बदलायला लागायच्या. जातांना आणि येतांनाही. मोजून फक्त सहा दिवस मी हे दिव्य केलं. प्रचंड गर्दी. चढायलाच मिळायचं नाही. परत घरी पोचायला कधी दहा, कधी अकरा वाजायचे, सकाळी परत सगळं पहिल्यापासून. हे साल २००७. एवढा चांगला जॉब चक्क सोडून दिला. मला रोज रोज असे मरायचं नव्हतं किड्यामुंग्यांसारखं.
अनेकांनी म्हटलं, अरे काय होतं त्याला, कित्येक लोक असा प्रवास करतात. असू देत हो. त्यांची मजबूरी असेल. मला नाही जमणार. बघितलीत अशीही लोकं. वर्षानुवर्षे वसई-विरारवरुन तीन ट्रेन बदलून वाशीला कामाला जात असतात. पण बदलापूर, पनवेल ला घर शिफ्ट करत नाहीत. कल्याणातली घणसोली-कोपरखैरणेला मरत मरत जाणार पण तेच पनवेल-बदलापूर ला शिफ्ट होत नाहीत. अशी प्रचंड प्रचंड प्रवास रोजच्या रोज करणारी, लेकरांना झोपलेलं असतांनाच मोठी होतांना पाहणारी, गर्भवती असून लटकून, जीवावर खेळत प्रवास करणारी, अव्वाच्या सव्वा किंमतीने घराच्या छोट्याशी तुकड्यासाठी कर्ज काढून आयुष्य त्या कर्जाच्या वेठबिगारीत घालवणारी, भरमसाठ इएमआय भरत फक्त झोपायला त्या घरात जाणारी, मुंबईत अशी गर्दी खूप आहे. स्वप्नांची गर्दी म्हणतात याला. माझ्यासाठी ही मरणाची गर्दी आहे. म्हणजे कोळ्याने जाळ्यात पकडलेल्या माशांसारखी आहे. ती थोडावेळ पाण्यात असतात पण छोट्याशा जागेतच तडफडत असतात, फक्त श्वास घेण्याचे स्वातंत्र्य, तेही थोड्या वेळेसाठीच. कधी मरणार माहित नाही. ह्या अनिश्चिततेतच आयुष्य आणि पिढ्या निघून जातात. काहीतरी भन्नाट होईल ह्या आशेत, किंवा दूर गावा-खेड्यांत तर भाकरही मिळत नाही म्हणून इथेच, असंच राहायचं. एक एक माणूस इथे येत राहतो, आपल्या येण्याने व्यवस्थेवरचा भार वाढवत राहतो, त्रास वाढवत राहतो रोज, रोज, प्रत्येक क्षणाला.
दुसरा अनुभव. पवई हिरानंदानी ते कांजूरमार्ग रेल्वेस्टेशनला जायला बसमध्ये चढलो.... बाहेरून लटकत होतो. हे पूर्ण अंतर फक्त २ किलोमीटर आहे. २००८ साली इथे एवढ्या अंतराला फक्त दिड तास बसने लागत असे. अर्थातच पिक-अवरमध्ये. त्यादिवशी अर्धातास असाच लटकत एकाच ठिकाणी इंच इंच बस पुढे जातांना प्रत्येक क्षणाला मनात रागाचा ज्वालामुखी फुटलेला. ही इतकी लोकं अशी मुर्दाड कशी राहु शकतात, कोणीच कसं पेटून उठत नाही. अरे, पायी गेलो तर फक्त पंधरा मिनिटं लागतील. त्याला बसने, वाहनाने पैसे देऊनही दिड तास लागावा? तो शांतपणे तुम्ही सहन करावा? ह्यालाच मुंबईचे स्पिरिट का काय म्हणतात असे कळले. मी तडक उतरलो, चालायला लागलो. परत कधीच बसने जायचे नाही या निर्धारानेच.
तिसरा अनुभव, कळव्याला राहायला, ठाण्यात नोकरी. चार किमी चे अंतर. रिक्षा मिळायला पाऊण तास लागायचा. दहाच्या ऑफिससाठी, जे फक्त चार किमी आहे, तेवढ्यासाठी तासभर तिष्ठत राहायला लागायचे, रिक्षावाल्यांच्या रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ विनवण्या करुन करुन थकलो. शेवटी एक दिवस तिरिमिरीत कार घेऊन टाकली, कारण बायको गर्भवती होती. आणि रिक्षावाल्यांच्या भरवश्यावर राहून मला कोणतीही रिस्क नव्हती घ्यायची. मुंबईत पब्लिक ट्रान्सपोर्ट, रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे ना!
नंतर मी ठाण्यालाच राहायला आणि नोकरीला होतो. तो एक वर्षाचा काळ ठिक होता, घरापासून ऑफिसचे अंतर कारने सरळसोट ५ मिनिटे. तरी कापुरबावडीजवळ सकाळी पाऊणतास जायचाच इतकी ट्रॅफिक असायची. ते टाळायचे तर सायकल घेतली. सायकलने हाणीत जा-ये करु लागलो. पण त्याचे दुष्परिणाम वेगळेच. प्रचंड पोलुशन ने घसा खराब व्हायचा. खाकरुन थुंकलो की रुपयाच्या आकाराएवढी काळी घट्ट थुंकी पडायची. तेव्हा तेही सोडले.
नोकरी सोडून फ्री-लान्सिन्ग सुरु केले तेव्हा वाघबीळला, घोडबंदर रोडला राहायला होतो. तिथून कुठेही जायचे असेल तर किमान अडीच तास प्रवास. अडीच तास जाणे आणि परत येणे. कामाचा वेळ असा बिनकामाच्या प्रवासात घालवणे मला पटत नाही. बरं हा सर्व प्रवास सुखाचा तर नाहीच. प्रचंड गर्दी, अनिश्चितता, गोंधळ जणू पाचवीलाच पुजलेले. इतके रस्ते सुंदर आहेत,कार तर वापरुच शकत नाही मुंबईत.
शेवटी ठाणे सोडायचा निर्णय घेतला आणि मग पर्यायांची चाचपणी सुरु केली. आधी मी जवळची उपनगरं शोधली. डोंबिवली, कल्याण, बदलापूर, वाशी, पनवेल. पार अंबरनाथ पर्यंत. सगळाच तपास केला. प्रत्येक जागेचे आपले असे प्रॉब्लेम्स आहेत. मुंबईच्या मगरमिठीतून सुटका नाहीच असे लक्षात आले. पुण्याचा पर्याय अभ्यासला. पण तिथेही अनेक प्रश्न होतेच. मी तर अगदी माझ्या जन्मगावी, विदर्भातलं अकोला, तिकडे स्थायिक व्हायचं ठरवलं. पण मुंबईशी कनेक्टीवीटीची बोंबाबोंब आहे. तो अगदी हास्यास्पद पर्याय आहे.
शेवटी नाशिक फायनल केले. तीनच दिवसात निश्चित केले. २८ फेब्रुवारीला ठरवले नाशिक ला शिफ्ट व्हायचे. ३ मार्च २०१३ ला आम्ही ठाण्याहून सर्व सामान -बिर्हाड घेऊन इथे आलो. निर्णय अजून तरी चुकलेला नाही.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा