इंग्रजीचे जागतिक महत्त्व कुणीही नाकारू शकत नाही. शालेय शिक्षणात इंग्रजी अजिबातच नसावी असं कुणीही म्हटलेलं नाहीये. उलट अव्वल दर्जाची इंग्रजी भाषा बोलायला लिहायला शिकवणारे अव्वल दर्जाचे शिक्षक प्रत्येक शाळेत असलेच पाहिजेत असं माझं मत आहे. मुद्दा जर फक्त इंग्रजीवरच्या प्रभुत्वाचा आहे तर ते प्रभुत्व मिळवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातल्या सगळ्याच विषयांवर इंग्रजीची सक्तीची गरज नाही. आज मेट्रोशहरे सोडली तर निम-शहरी व ग्रामीण भागात इंग्रजीची दहशतवजा भीती आहे. मुले आपल्याला इंग्रजी जमणारच नाही कारण ती हुशार, श्रीमंत लोकांची भाषा आहे म्हणून दडपून जातात. त्यांना शिकवणारे शिक्षकही यथातथा याच अवस्थेतून शिकलेले. अशा परिस्थितीत लेवल-प्लेईंग फिल्ड होत नाही याला माझा आक्षेप आहे. माझ्या मते सहजतेने शिकवली तर जगातली कुठलीच भाषा अवघड नाही. जगात इंग्रजी संपर्कभाषा असेल. पण भारतात हुशारी, श्रीमंती, सुशिक्षीतपणाचे, उच्चभ्रूपणाचे मानक म्हणून इंग्रजीकडे पाहिले जाते. मधुराताईंनी दिलेल्या जर्मन कंपनीच्या उदाहरणात आपल्या इंग्रजी येत नाही हे जर्मनांना कमीपणाचे निश्चितच वाटत नसेल. जे इथे कित्येक भारतीयांना कायम वाटत असते आणि इंग्रजी येणारे त्याची त्यांना जाणीव करून देत असतात. जर्मनांसाठी ते व्यवसायवृद्धीसाठी लागणार्या दहा वस्तूंपैकी एक असेल, तर भारतीयांना ते नसेल तर आपल्यात काहीच क्षमता नाही इतकं भयंकर वाटायला लावणारं असतं. इंग्रजीकडे पाहण्याचा हा जगाचा आणि भारतीयांचा मूलभूत फरक मी अनुभवलाय. देशोदेशी प्रत्यक्ष वावरणार्यांनी सुद्धा अनुभवला असेल.
एक जुना विनोद ही परिस्थिती कशी विशद करतो बघा: संता आपल्या भावाकडे लंडनमधे काही दिवस राहून परत येतो. बंता त्याला विचारतो, क्या खास है बे उधर? तर संता म्हणतो, अबे पूछ मत, उधर तो छोटासा बच्चा भी फर्राटेसे अंग्रेजी बोलता है.
हे इंग्रजीचं वेड आलं तरी कुठून..?
माझ्या निरिक्षणात आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणूनच त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल असा भाबडा विश्वास बाळगणारे पालक आहेत, आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणून आपण पुढारलेले, उच्च्भ्रू आहोत असे मिरवणारे पालक आहेत. इंग्रजी शाळेत जाणार्या मुलांना व पालकांना तो मान/स्टेट्स्/प्रतिष्ठा हवी आहे. मातृभाषेचा आग्रह धरणार्यांवर बाण्याचे बिनबुडाचे आरोप करणारे इंग्रजी-वेड्या पालकांच्या वेगळ्याच प्रकारच्या बाण्याचा अवलंब करणार्या मानसिकतेकडे अगदी सोयिस्कर दुर्लक्ष करत आहेत.
आजचे पालक शिक्षणाच्या (परम-आवश्यक अशा) दर्जापेक्षा फक्त (तुलनेने कमी महत्त्वाच्या) भाषा माध्यमावरच जोर देतायत. हे माझे निरिक्षण आहे. ते असं करण्यामागे मागच्या १५-२० वर्षात घडलेले आर्थिक-सामाजिक बदल आहेतच. इंग्रजी बोलणार्यांना चांगल्या संधी मिळतात हे त्यांनी बघितले म्हणून त्यांचा असा ग्रह झाला आहे की इंग्रजीतून शिक्षण घेतल्याने चांगल्या आर्थिक संधी मिळतात. प्रत्यक्षात त्या काळातल्या मोजक्याच असलेल्या इंग्रजी शाळांचा दर्जा इतर सरकारी व मराठी शाळांच्या मानाने फार चांगला होता. शक्यतो ह्या शाळा मिशनरीज संचालित व भरपूर फीया घेणार्या होत्या. त्यात शिकणारे श्रीमंत, उच्चपदस्थ यांची मुले होती. या वर्गात सुबत्तेमुळे आलेला एक आत्मविश्वास जन्मत:च असतो. वरच्या वर्तुळात असलेल्याने उत्तम संधींची जास्त माहितीही असते. त्यायोगे कुठले शिक्षण घ्यावे याचीही तयारी चांगली असते. त्यातून चांगले शिक्षक, चांगल्या शैक्षणिक दर्जाचा होणारा संस्कार. हे सर्व दिमतीस असलेली मुले यशस्वी होतांना पाहून सामान्य पालकांच्या महत्त्वाकांक्षेला मात्र एकच कारण दिसले ते हे की 'इंग्रजी शाळेत शिकले की यश मिळते'. कारण फक्त 'इंग्रजी माध्यमच' त्यांच्या आवाक्यात होते. याला थोडी फुंकर घालून इंग्रजी शाळावाल्यांनी आपले मार्केटींग केले. त्याला आजचे पालक आंधळेपणाने भुलतायत.
याचं छोटेखानी उदाहरण मी अकरावी सायन्सला असतांना बघितलंय. माझ्या वर्गात महाराष्ट्रातून प्रथम आलेला मुलगा होता. अकोला जिल्ह्यातले सगळे मेरिटचे विद्यार्थी याच कॉलेजला असतात. माझ्या वर्गातली निम्मी जनता मेरीटवाली होती. ह्या मेरिटवाल्यांमधे बहुसंख्य मुलं कॉन्व्हेंटवाली होती. हे सगळं सांगण्याचं कारण वर्गात अॅवरेज मुलं अजिबात नव्हती. पण एक फरक होता. कॉन्वेंटवाल्या मुलांचा आत्मविश्वास, स्वत:ला प्रेझेंट करण्याची, छाप पाडण्याची हातोटी विलक्षण होती. सेमी-इंग्लीश, साध्या शाळेतून आलेली मुले त्यांच्या पुढ्यात दडपून जायची. आणि याचे कारण या मुलांना दुर्दैवाने त्यांचे फाडफाड इंग्लीश वाटत असे.
आज ५ ते १० वयोगटातली मुले जेव्हा शिकल्यावर बाहेर पडतील तेव्हा आपल्यासारखीच योग्यता असलेली लाखो मुले बघतील. तेव्हा जी स्थिती १०-१५ वर्षाआधी लाखो मराठी मुलांची होती तीच या इंग्रजी शिकलेल्या मुलांची असेल. कारण हजारोंकडे जेव्हा एकसारखं स्किल असतं तेव्हा त्या स्किलला तेवढं आर्थिक महत्त्व राहत नाही. लक्षात घ्या हा सगळा काथ्याकूट मी आता पद्व्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलांबाबत घातलेला नाहिये. त्यांच्याबद्दल आता काही बोलून उपयोगच नाही. खरा प्रश्न येणार्या पिढीचा आहे. ती फाड फाड इंग्रजी बोलू शकणारी पण इतर काही स्किल्स नसलेली मुले मॉलच्या फरशाच पुसतील. रिक्षा चालवतील, धुणीभांडी करतील. तेव्हा हा भ्रमाचा भोपळा फुटेल.
हेच होत आलंय. पन्नास-साठ वर्षांपुर्वी बी ए पास माणसाला हमखास नोकरी लागत असे. त्यानंतर इंजिनीअर-डॉक्टर्सचे प्रस्थ वाढले. त्यानंतर नुसत्या बी ए/बी एससी/बी कॉमचे पीक आले. पदवीचे अवमुल्यन झाले. आज इंजिनीअर-डॉक्टर्सचे अवमुल्यन झाले आहे. आज इतके इंजिनीअर झालेत की काही विशेष स्किल्स असल्याशिवाय तुमच्या नुसत्या इंजिनीअरींगला कुत्रं विचारत नाही. आज नुसतं एमबीबीएस करून पुर्वीच्या एमबीबीएस डॉक्टरांसारखे वैभव कमावता येत नाही. आयटीची सुद्धा वेगळी परिस्थिती आहे असं नाही. बी.एससी वैगेरे करून चपराशाची नोकरी करणारे मागच्या पिढीत बरेच पाहिलेत. सॅचुरेशन, गर्दी होण्याआधी जे हजर असतात तेच यशस्वी होतात. दुर्दैवाने सामान्य लोकांच्या डोक्यात हे कधीच शिरणार नाही. ते नेहमी दुसरे काय करून यशस्वी झाले त्याची कॉपी करण्याचा सोपा पण अयशस्वी मार्ग पत्करतात.
आजचे श्रीमंत, उच्चपदस्थ उद्या परत तेच चक्र पुन्हा फिरवतील. वरच्या जागांवर त्यांचीच मुले परत असतील. परत सामान्य लोक उच्चवर्गाने काय केले हे बघून आपल्या जे जमते तेवढ्याचे फॅड घेऊन धावत राहतील.
काही लोकांनी म्हटलंय की ठीक आहे ना, फॅड असले म्हणून काय झाले. पैसा व सन्मान मिळतोय ना? पण खरंच किती लोकांना हा फायदा मिळतोय? आज भारतात सुशिक्षित तरुणांपैकी फक्त ३४% तरुण नोकरी करण्यायोग्य आहेत. नोकरी देणार्या कंपन्यांना या नोकरीयोग्य नसलेल्या मुलांवर प्रशिक्षणाचा प्रचंड खर्च करावा लागतो ज्याचा या मुलांच्या किमान ३ वर्षाच्या पगाराच्या आकड्यावर परिणाम होतो.
कंपन्यांना आज किंवा उद्याही लागणार असलेले काही स्किल्स असे आहेत.
१. विशिष्ट उद्योगक्षेत्रात लागणारे मूलभूत व्यावसायिक कौशल्य
२. तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान.
३. संवाद कौशल्य
४. निवडलेल्या क्षेत्रासाठी उपजत कल
आजची शिक्षणपद्धती फक्त नोकरदार तयार करणारी आहे. सांगितलेले काम सांगितलेल्या पद्धतीत करायचे. त्यात काही अडचण आल्यास मार्ग शोधण्यासाठी डोके चालवणार्यास प्रमोशन, भत्ते, बक्षीसं मिळतात. या शिक्षणाने व प्रवृत्तीने घातलेला दुसरा घोळ म्हणजे पारंपरिक रोजगार, व्यवसाय यात काही फायदा नाही असा चुकीचा केलेला प्रचार. कारण या व्यवसाय्/क्षेत्रांबद्दल प्रेम वाटावं असं या पद्धतीत काहीच नाही. किंवा हे शिकून पारंपारिक व्यवसायात पडायची मुलांना लाज वाटते. इतकं शिकून का गल्ल्यावर बसाचं का? किंवा इतकं शिकलो ते का नांगर हाकलायला का? असे वाक्य कानी पडू लागली. म्हणजेच दुकानदारी करणे, शेती करणे हे नोकरी करण्यापेक्षा हलक्या दर्जाची कामे आहेत हे बिंबवण्याचे भयंकर पाप या व्यवस्थेने केले. ज्यांना हे घोकंपट्टी शिक्षण जमतं ते फार हुशार आणि इतर लोक ढं असं काहीसं समिकरण मांडल्या गेलं. याचं कारण इंग्रज साहेब. तो आपला कायम कचेरीत बसून हुकूम चालवणार. त्याला कुणी कधी नांगर धरलेला पाहिला नाही का गल्ल्यावर बसलेला पाहिला नाही. मग त्यालाच आपला रोल मॉडेल बनवायला सामान्य लोकांनी सुरुवात केली. ती आजतागायत सुरू आहे.
माझा विरोध आहे तो आपल्या समाजाबद्दल, राहणीमानाबद्दल, उद्योगधंद्यांबद्दल अलिप्तता निर्माण केल्यामुळे झालेल्या नुकसानाला आहे. आज आपण मुलांना मिळणार्या पॅकेजच्या बातम्या पहिल्या पानावर पाहतो. त्या मुलाला वर्षभर कष्ट करून जेवढे लाख मिळतील तेवढे लाख त्याच्यापेक्षा एक चतुर्थांश काम करून मिळवणारे हजारो शेतकरी आज महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या बातम्या येत नाहीत. येतात त्या आत्महत्या करणार्या शेतकर्यांच्या. कारण बातम्या देणारेही याच व्यवस्थेतून शिकलेत. यशस्वी शेतकर्यांच्या बातम्या तुम्हाला फक्त अॅग्रोवन मध्येच दिसतील.
माझ्या ओळखीत एक गृहस्थ आहेत. गुलाबाच्या फुलांची शेती करतात, वर्षाचे ३५६ दिवस. रोजचे उत्पन्न एक लाख रुपये. निव्वळ. आणि असे बरेच आहेत.
येणार्या काळात असेच वेगवेगळे व्यवसाय करणार्यांचीच चलती असेल. त्याची चाहूल आजच लागते आहे. आजचे श्रीमंत, उच्चपदस्थ त्यासाठी मुलांना तयार करतायत. आणि आजचा सामान्य पालक ओसरुन जाणार्या लाटेसाठी मुलांना तयार करतोय.
आजपासून १५ वर्षांनी आपल्या मुलांसाठी काय वाढून ठेवलेलं असेल? त्याला तेव्हा तोंड देण्याची तयारी करण्याचा वेळ व यशस्वी होण्याची मानसिकता त्याच्याकडे असेल काय? जसं आज काही लोक इंग्रजीशी कसे झगडावे लागले, त्यात कसा वेळ गेला असं सांगतायत, तेव्हा असं वेळ घालवणारं काही असेल काय? किंवा भविष्यातल्या कोणत्याही परिस्थितीत मुलांना तोंड देता यावे म्हणून काही विशेष तयारी आजपासूनच करता येईल काय याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. की फक्त इंग्रजी आलं की झालं म्हणून ते यशस्वी होतील काय? याचा सगळा विचार आताच करणे आवश्यक आहे.
त्यामुळे इंग्रजी माध्यमाऐवजी शालेय शिक्षणाच्या दर्जाला महत्त्व दिले तर बरे होईल. त्यातून ते मातृभाषेत असेल तर जास्तीत जास्त मुले मुख्य प्रवाहात येऊन कसल्याही न्यूनगंडाशिवाय स्वत:च्या, देशाच्या प्रगतीत हातभार लावतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा