शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

सेंट बर्नाडची गोष्ट.

आल्प्स बर्फाच्छादित पर्वतांमध्ये, समुद्रसपाटीपासून सुमारे आठ हजार फूट उंचीवर इटलीला स्विझ्झरलंडशी जोडणारा एक घाटरस्ता आहे. ह्याचा वापर तसे म्हटले तर ताम्रयुगापासून सुरु आहे असे म्हणतात. ह्या घाटरस्त्यावर वाटसरुंची ये-जा हजारो वर्षे चालू आहे असे समजा. तुफान थंडी आणि हिमवर्षावातही इथली वाहतूक काही बंद होत नसायची. प्रवास करण्याची प्रचंड गरज असणारे वाटसरु इथल्या जीवघेण्या हवामानात अडकून पडायचे. त्यांचे हाल पाहून सेंट बर्नाड ह्यांनी अकराव्या शतकात इथे धर्मशाळा सुरु केली. बर्फात अडकलेल्या, वाट चुकलेल्या, उपाशी-थकलेल्या वाटसरुंना ही धर्मशाळा म्हणजे जगण्याची अनमोल आशाच.

साधारण पंधराव्या शतकाच्या सुमारास ह्या मदतकार्याचा भाग उचलायला इथल्या धर्मसेवकांच्या जोडीला कुत्रे पाळण्यात येऊ लागले. त्यांना ह्या कामासाठी खास तयार करण्यात आले. बर्फातून वास घेत माणसे हुडकणे, त्यांना आपल्या शरिराची उब देऊन शुद्धीवर आणणे, खेचत घेऊन धर्मशाळेत आणणे, धर्मसेवकांना कुठे माणसे सापडली तिकडे घेऊन जाणे अशी कामे ही कुत्री करु लागली. पुढे ह्या कुत्र्यांना कोणतेही रितसर ट्रेनिंग द्यायाची गरज उरली नाही. इतर मोठ्या कुत्र्यांकडून शिकत बचावकार्याचे काम नविन कुत्री करु लागली. बचावकार्याच्या बाबतीत ही कुत्री अगदी प्रो-अ‍ॅक्टीव, म्हणजे 'जा रे, शोध रे, पळ रे, आण रे' वगैरे सांगायची काही गरज नाही. अंधार पडू लागला की निघायचे आपले जमीनीला, अर्थात बर्फाला नाक लावून हुंगत हुंगत..सोबत गळ्यात एक छोटासा बॅरल, ज्यामधून वाटसरुंना ऊब मिळावी म्हणून ब्रँडी उपलब्ध असते. कुठे माणसाचा वास आला की काढ त्याला बर्फाच्या ढिगार्‍याखालून बाहेर, असे सगळे...

ह्यात 'बॅरी' नावाचा कुत्रा फारच प्रसिद्ध झाला. ह्याने एकट्याने शंभरच्या वर वाटसरुंचे प्राण वाचवल्याच्या शूर कहाण्या आल्पसच्या दर्‍याखोर्‍यांतून थंड वार्‍यांवर फिरत असतात.

सेंट बर्नाड धर्मशाळेवरुनच ह्या कुत्र्यांना नाव दिले गेले सेंट बर्नाड. तेच ते गोंडस गोजिरे दिसणारे धिप्पाड उंच कुत्रे.

सेंट बर्नाड जातीच्या कुत्र्यांची ही कुळकथा....



भारतात ह्यांची किंमत तीस ते चाळीस हजार रुपयांच्या आसपास आहे. विकत घेणारे पैसे देऊन सेंट बर्नाड घेऊ शकतात. पण त्याच्यासाठी लागणारे आल्प्सच्या बर्फाच्छादित पर्वतराजींमधले वातावरण विकत घेऊ शकत नाही. मग आपल्या हौसेपोटी ह्या दिलदार जीवावर मनमर्जी अत्याचार होतात.

शून्याच्या कितीतरी खाली राहण्यासाठीच जन्म झालेल्या ह्या धिप्पाड कुत्र्यांची भारतात काय अवस्था होत असेल ह्याचा विचार ह्या कुत्र्यांचे मालक करत नाहीत. भारताच्या वातावरणात सेंट बर्नाड पूर्ण आयुष्य जगू शकत नाहीत. त्यांना विविध आजार होतात, उत्तरोत्तर ते खंगत जातात. त्यांचा मेंटेनन्स खूप नाजूक आहे, किती मालक सुरुवातीचा उत्साह टिकवून ठेवू शकतात हा प्रश्नच आहे.

चार पैसे कमवल्याची प्रसिद्धी करण्यासाठी आणि भुक्कड हायसोसायटी स्टेटससाठी माणूस त्याच कुत्र्याचा जीव धोक्यात घालतो, ज्या कुत्र्यांनी माणसाचा जीव वाचावा म्हणून आपले प्राण पणाला लावले.....

 


मूर्तिमंत स्वातंत्र्य

 

आपण 'लिबरेशन' म्हणजे 'मुक्ती' कशाला म्हणतो हे बर्‍याचदा आपल्या दृष्टीकोनावरच अवलंबून असते. अनेकदा तर इतर लोक काय म्हणतात, काय लिहितात, कशावर चर्चा होतात ह्यावर मुक्तीचा अर्थ आपण ठरवतो.

स्त्रीमुक्ती म्हटले तर बहुतांशवेळा आपल्यासमोर लैंगिक भेदभाव, जाचक प्रथापरंपरा आणि सामाजिक बंधने येतात. थोडा वेगळा विचार करायचा तर स्त्रीमुक्तीच्या संदर्भाने गर्भनिरोधक गोळ्या, गर्भपाताची सुरक्षित साधने, मासिक पाळीसाठी वापरायचे पॅड्स, टॅम्पुन्स, कप्स, इत्यादी वस्तूंनी खूप मोठी क्रांती केलेली आहे. 'कायम मुलांनी वेढलेली गर्भवती स्त्री' ह्या अवस्थेतून सुटका करुन खर्‍या मुक्तीचे आयुष्य प्रत्यक्ष मिळवून देणार्‍या वरील वस्तू स्त्रियांसाठी खूप महत्त्वाच्या ठरल्या. समाजसुधारकांच्या चळवळींसोबतच, ह्या वस्तूंनी स्त्रीला खरेखुरे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी परिस्थिती उपलब्ध करुन दिली. पण ह्याकडे आपले फारसे लक्ष नसते.

भारतात आणखी एका वस्तूने स्त्रीला मदत केली आहे. ती म्हणजे स्कूटी. पूर्वीपासून गिअरवाल्या मोटरबाईकला एक पुरुषी प्रतिमा चिकटली गेली होती. त्याचे कारण म्हणजे राजदूत, बुलेट, यझदी, जावा सारख्या हेवीवेट बाइक्स चालवणे तांत्रिक कौशल्य आणि ताकदीचे, मुख्य म्हणजे फार कटकटीचे काम असे. त्यामुळे अत्यंत इच्छा असून, चालवता येत असून आपल्याला जमेल का, लोक काय म्हणतील, बरं दिसते का ते इत्यादी प्रश्नांमुळे स्त्रिया घराबाहेर स्वतंत्रपणे फिरत नसत. अगदी बजाजच्या स्कूटर असल्या तरी त्या नोकरीदार पुरुषांसाठीच असतात असा समज. म्हणजे बाहेर कुठे जायचे तर घरातल्या पुरुषांवर अवलंबुन राहावे लागे. किंवा बसेस, शेअररिक्षां इत्यादी सार्वजनिक प्रवाससाधनांमधून अनोळखी पुरुषांचे सहेतुक घाणेरडे स्पर्श सहन करत जावे लागे. बहुतांश शहरात तर ह्या सुविधा केवळ मुख्यरस्त्यांपुरत्याच मर्यादित असतात. अशा सर्व परिस्थितींमुळे स्त्री घरात कोंडली गेलेली होती. भले ती कितीही मॉडर्न विचारांची असू द्या, घरात कितीही मोकळे वातावरण असू द्या, तिला नोकरी असू द्या. पण प्रवास मात्र सतत दुसर्‍या कोणावर तरी अवलंबून असलेला. ९०च्या दशकापर्यंत आपण बाईक किंवा स्कूटरवर नवरा-बायको किंवा सगळे बच्चाकंपनी, लटांबर घेऊन निघालेले दांपत्य पाहत आलो आहोत. एकटीदुकटी स्त्री कोण्या बाईकवर स्कूटरवर जातांना दिसणे हीच एक न्यूज असायची. स्वतःच्या मनाने पाहिजे तेव्हा, पाहिजे तिकडे, पाहिजे तितका प्रवास करायचा हे भारतीय स्त्रियांसाठी दिवास्वप्नच होते.

ह्या शतकानुशतकाच्या घट्ट परावलंबीत्वाला मुळासकट गदागदा हलवून उखडण्याचे काम केले स्कुटी नावाच्या एका क्षुद्र भासणार्‍या एका छोट्याशा स्कूटरेटने. अस्सल भारतीय कंपनी असलेल्या टीव्हीएसने १९९४ साली पहिल्यांदा स्कूटी लाँच केली. त्याआधी बजाजची सनी नावाची छोटी मोपेड होती, लुनाही होती. पण त्यांना स्त्रीयांमध्ये तेवढा उठाव नव्हता. नोकरीवर जाणार्‍या स्त्रियाच फारतर लुना वापरत असत. लुना-सनी ह्यांची फार क्षमताही नव्हती. पण स्कूटीने मात्र मोठे मार्केट खुले केले. लुना-सनीपेक्षा जास्त क्षमता, सामान ठेवायची जागा, चालवण्यातला सोपेपणा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिसण्यातला वेगळेपणा ह्या सर्व गुणांमुळे महिलावर्गात स्कूटी अतिशय लोकप्रिय झाली. लाँच केल्यानंतरच्या दोन वर्षांतच टीव्हीएसकंपनीला हे लक्षात आले आणि त्यांनी मग स्कूटीला खास महिलावर्गासाठीच प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. त्यामुळे खास महिलांसाठीच्या स्कूटर्सचे एक पर्व सुरु झाले. नंतर अ‍ॅक्टीवाने मोठा धमाका केला. महिलांच्या गाड्या ही एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

या गाड्यांनी शहरी, नीमशहरी, तालुकास्तरातल्या करोडो भारतीय स्त्रियांचे जीवन आमुलाग्र बदलले. अधिकाधिक मुली स्वतःच्या स्वतः ट्युशन्सला जाऊ लागल्या, कॉलेजात जाऊ लागल्या, ऑफिसात नोकर्‍या करु लागल्या. छोटेमोठे उद्योग करु लागल्या. दूरच्या बाजारात खरेदी करायला, एकमेकांना भेटायला, सणासमारंभाला, अशा अनेक कारणांसाठी त्या घराबाहेर पडू लागल्या. आता त्यांना लोक काय म्हणतील ह्याची पर्वा नव्हती.

खरे स्वातंत्र्य, खरी मुक्ती तीच जी प्रत्यक्ष अनुभवता येते. जिच्यामुळे आयुष्यात स्पष्टपणे बदल दिसून येतो. स्कूटरेट्स आणि मोपेड्स ने महिलावर्गाला मोबिलायझेशनची सुविधा दिली ती ह्या खर्‍या मुक्तीच्या अनेको उदाहरणांतली एक आहे.

मला तरी स्त्रियांच्या हातात असलेल्या स्कूटरेट्सच्या रुपात मूर्तिमंत स्वातंत्र्य दिसून येते. समाज बदलेल न बदलेल, पण सध्यातरी समाजमनाच्या छाताडावरुन ह्या करोडो भगिनी आपल्या गाड्या घेऊन 'स्त्रियांनी घराबाहेर पडू नये' अशा धारणांना तुडवत जात आहेत असे समाधानकारक चित्र आहे.

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

डिस्काउंट प्राइसटॅग : अँकरिंग बायस चा संसार

 

राहुल आपल्या बाबांबरोबर धावण्याचे शूज विकत घ्यायला बाजारात गेला. बडया शोरूममध्ये जाऊनच खरेदी करायची असा हट्ट धरून बसला. तेव्हा वडिलांना दुसरा पर्याय उरला नाही, त्याच्या हट्टाखातर दोघे एका बड्या ब्रँडच्या फॅक्टरीआउट्लेटमध्ये शिरले. तिथे गेल्यावर एक एक शूज ची चाचपणी सुरु झाली. तिथल्या किमती बघून आधीच बाबाच्या कपाळावर रेषा उमटू लागल्या होत्या. राहुलला मात्र एक शूज चांगला पायाला बसला आणि त्याला तो आवडला देखील. त्याच्या कोणत्याच मित्राकडे तसे शूज नव्हते. किंमत मात्र जरा तगडी होती. दहा हजार रुपये! बाबांनी मान्य करण्याचा विषयच नाही हे राहूलला देखील माहित होते. तो थोडा हिरमुसला झाला होताच. त्याचा उतरलेला चेहरा पाहून जवळच असलेला सेल्समन पुढे आला आणि म्हणाला की "ह्या शूजवर स्पेशल डिस्काउंट सुरु आहे ६० टक्के! म्हणजे हे शूज आपल्याला फक्त चार हजारात मिळतील." ते ऐकून राहूल प्रचंड आनंदला. बाबांना म्हणाला, "बाबा, बघा आपले पूर्ण सहा हजार रुपये वाचत आहेत. आपण हेच शूज घेऊयात." सहा हजाराची घसघशीत सेव्हिंग होऊन आपल्या दहा हजाराचे शूज फक्त चार हजारात मिळत आहेत ह्या विचारांनी राहूलला फारच आनंद झाला होता. त्याच्या दृष्टीने तो दहा हजाराचे शूज घालू शकणार होता, आणि तेही फक्त चार हजार रुपये देऊन! अजून काय पाहिजे.

परंतु राहूलच्या बाबांच्या मनात वेगळीच गणिते सुरु होती. त्यांनी त्यांच्या तारुण्यात, म्हणजे ते राहुलएवढे होते तेव्हा, कधीही पाचशे ते सहाशे रुपयांच्या पेक्षा जास्त पैसे अशा रनिंग शूजवर खर्च केले नव्हते. आता हे चार हजार रुपयांचे शूज म्हणजे त्यांना प्रचंड महाग वाटत होते. कुठे पाचशे आणि कुठे चार हजार! चार हजाराचे कुठे शूज असतात का? शूज साठी इतके पैसे कसे खर्च करायचे - राहुलच्या बाबांच्या डोक्यात हे विचार सुरु होते.

दोन व्यक्तींवर एकाच घटनेचे हे दोन परिणाम कशाचे चिन्ह आहे? तर हे आहे अ‍ॅन्करिंग बायसचे उदाहरण.

अ‍ॅन्करिंग बायस म्हणजे सर्वात आधी ऐकलेला आकडा किंवा घटना ही आधारभूत मानणे व पुढचे व्यवहार त्यावर आधारित ठेवणे. इथे वरच्या प्रकरणात राहूलने दहा हजार ही शूजची किंमत अँकरिंग किंमत मानली. तर त्याच्या वडिलांसाठी पाचशे रुपये ही शूजची किंमत अँकरिंग किंमत होती. दोघेही आपआपल्या अँकरिंग किंमतीनुसार निर्णय घेत होते. त्या शूजची खरी किंमत त्या दोन्हीपैकी कोणतीही नव्हती. ती चारच हजार रुपये होती. परंतु राहुलला आपण सहा हजार वाचवतोय असे वाटत होते तर बाबांना आपण साडेतीन हजार जास्त देतोय असे वाटत होते.

प्राइस निगोशिएशन करतांना केव्हाही जो पहिली किंमत सांगतो त्याचेच पूर्ण संवादावर नियंत्रण राहते. कारण पहिली किंमत हीच आधारभूत किंमत ठरते. समजा तुम्ही एखादी जुनी गाडी विकत घ्यायला गेलात आणि त्या गाडीच्या तत्सम मॉडेलचा सेकंड मार्केटमध्ये नक्की काय भाव आहे हे माहित नसेल (म्हणजेच कोणतीही अँकरिंग प्राइस तुमच्याकडे नसेल) तर गाडीमालक जी काही किंमत सांगेन त्यानुसार घासाघिस होते. जर गाडीमालक हुशार असेल आणि त्याने आधीच ठरवले असेल की मला ही कार चार लाखालाच विकायची आहे तर घासाघिस होणार हे आधीच समजून घेऊन तो गाडीची किंमत सहा लाख सांगतो. आता कितीही पट्टीचा घासाघिसवाला असेल तरी तो चार लाखाच्या खाली आपली बोली लावू शकत नाही. भले पाच सांगेल. पण त्याला कधीही कळणार नाही की गाडीमालकाला ही गाडी चारला विकली तरी चालणार आहे. परंतु तिथेच तुम्ही तीन लाखाचा फिक्स बजेट घेऊन गेलात किंवा तशाच प्रकारच्या गाड्यांना मार्केटम्ध्ये काय किंमत मिळते हे तुम्ही आधीच चौकशी करुन गेलात तर तुमच्याकडे तुमची स्वतःची एक अँकरिंग प्राइस राहते जी घासाघीस करतांना उपयोगी पडते. 

बाजारात खरेदी करतांना अमूक टक्के डिस्काउंट तमूक वस्तू फ्री, चार साबणाच्या किंमतीत पाच साबण अशा ऑफर्स जेव्हा आपण बघतो तेव्हा विक्रेत्याचा हाच अँकरिंग प्राइसचा माइंडगेम सुरु असतो. १०० रुपयांची वस्तू ८० ला ७० ला मिळत असेल तर ग्राहकाला ते वीस तीस रुपये वाचल्यासारखे वाटतात आणि १०० रुपयांची वस्तू आपल्याला ७० मध्ये मिळाली ह्याचा आनंद होतो. परंतु मुळात ती वस्तू विक्रेत्याला ७० लाच विकायची अस्ते, त्याची खरी विक्रीकिंमत सत्तरच असते. आता ग्राहकांना ही चालूगिरी समजत नाही का असे तुम्हाला वाटेल. ते कसे काय फसतात असे ही तुम्हाला वाटेल. आपण स्वतःच कितीवेळा असे गंडलो गेलोय हेही आठवले असेल. परंतु ह्याच फसल्या गेल्यासारखे काही नाही. आपला मेंदूच आपल्याला अशा गोष्टी करायला भाग पाडतो. ग्राहकांनाच हे सगळे आवडते. हे नसेल तर ग्राहकांना खरेदी करण्यात काही मजा येत नाही. ते स्वतःहून फसायला तयार होतात! नाही पटत?

एक प्रत्यक्ष उदाहरणच देतो. जेसीपेनी JC Penney हा अमेरिकेतला प्रख्यात आणि प्रचंड मोठा डिपार्टमेंट स्टोअरचा ब्रँड आहे, आता आहे म्हणण्यापेक्षा होता असे म्हणावे लागणार आहे. कारण उत्साहाच्या भरात बेसिक्स विसरल्यामुळे त्यांच्या सीइओने कंपनीची कायमस्वरुपी वाट लावून ठेवली.

झाले असे की, जेसीपेनी नेहमीप्रमाणे प्रचंड डिस्काउंट, वेगवेगळ्या ऑफर्स, सणासुदीच्या डील्स ह्याद्वारे ग्राहकांना आकर्षित करत होते. सर्व सुशेगात चालले होते. तशात सीइओ रॉन जॉन्सनला असे वाटले की आपण हे ग्राहकांना उल्लू बनवतोय हे काही योग्य नाही. अ‍ॅपलसारख्या बड्या ब्रँड्सच्या कुठे ऑफर्स आणि डिस्काउंट असतात, चला आपण पण तसेच करुया. एकच फिक्स प्राईस आणि कोणतेही कुपन, डिस्काउंट ऑफर वगैरे काही नाही. जे काही आहे ते प्रामाणिक आणि पारदर्शी. त्याला वाटले की ह्या प्रामाणिकपणाला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळेल. 

परंतु झाले उलटेच. जेसीपेनीचे नेहमीचे ग्राहक ह्या नव्या पारदर्शी आणि प्रामाणिक किंमतींना भुलले नाहीत तर चक्क टाळू लागले. अचानक स्टोअर्सचा सेल घटला आणि कित्येक स्टोअर्स बंद करावे लागले. हे का होते आहे व त्यावर उपाय काय हे शोधेपर्यंत कंपनी पार बुडाला लागली. तोवर अ‍ॅमेझॉन आणि इतर ऑनलाईन कंपन्यांनी वारेमाप डिस्काउंट देऊन ग्राहक आपल्याकडे वळवणे सुरु केलेही होते. ह्याचा दुहेरी फटका बसून जेसीपेनी जी खचली ती कित्येक क्लृप्त्या वापरुन जाहिरातबाजी करुनही आपल्या पूर्वीच्या वैभवास काही पोचू शकलेली नाही.

हे असे का झाले? तर जेव्हा ऑफर किंवा डिस्काउंट प्राइसटॅग वर ग्राहक बघतो तेव्हा त्याला विक्रेत्याची विकण्याची गरज आहे असे वाटते, म्हणजे विक्रेता याचकाच्या भूमिकेत दिसतो. त्याला परवडत नसूनही तो कमी किंमतीला द्यायला आपल्यासाठी तयार झाला हे पाहून मनाला बरे वाटते. तसेच अमूक वस्तू मुळात इतक्या किंमतीची असूनही आपल्या अमूक इतक्या टक्क्यांनी स्वस्त मिळते आहे म्हणजे आपण किती हुशार आहोत, नशिबवान आहोत, चाणाक्ष आणि चतुर आहोत असा भास मनाला होतो. आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन एक चांगली डिल जिंकली आहे असे ग्राहकाला वाटत असते. % ह्या चिन्हाच्या आड ग्राहकाच्या मनात इतके सारे काही घडत असते. ग्राहकाला सातत्याने आपणच जिंकले पाहिजे असे वाटत असते. खरेदी-घासाघीस ह्या सर्वात एक प्रकारची नशा असते, ती ग्राहकाला मिळू दिली तर विक्रेत्याचाच अंतिम फायदा असतो. हे विक्रेत्यांनी ओळखलेले असते. म्हणून कित्येक वर्षे झाली तरी आणि मूळ किंमत काय आहे हे माहित असले तरी अजूनही डिस्काउंट आणि ऑफर्स ह्या शब्दाला ग्राहक भुलतात.

त्तर मानवी मनाला वेगळ्याच प्रकारे विचार करायला लावुन वस्तू विकत घ्यायला भाग पाडणारा असा सगळा अँकरिंग बायस चा संसार आहे. ह्या बायसपासुन ग्राहक म्हणून सुरक्षित राहायचे असेल तर काही गोष्टी कराव्यात. सर्वात प्रथम, भरपूर चौकशी करणे, माहिती काढणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी किंमती आणि दर्जा शोधणे. त्यासोबतच आपण आपला बजेट आणि खरेदीची यादी बाजारात जाण्याआधी घरीच संपूर्ण विचारांती तयार करुन ठेवणे व त्याबरहुकूमच खरेदी करणे. समोरासमोर घासाघिस चालू असतांना विक्रेत्याचा डोळ्यात डोळे घालून त्याची खरी 'इच्छित' किंमत काय असावी ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे. अर्थात हे सरावाचे काम आहे व विक्रेतेही काही कच्च्या गुरुचे चेले नसल्याने जरा सुरुवातीला अवघड जाऊ शकते. अशा तर्‍हेने चांगल्या डिल्स खरोखर पदरात पडू शकतात व अनावश्यक ठिकाणी केवळ डिस्कांऊट आहे म्हणून खरेदी करुन पैसा उगाच घालवला जात नाही. अनेकदा तर केवळ ५०% सूट आहे म्हणून आपण काही वस्तू विकत घेऊन येतो आणि आयुष्यात कधीच त्याचा वापर करत नाही. जरा सजग राहिले तर अशा निर्णयांपासून आपण स्वतःला दूर ठेवून पैसा वाचवू शकतो.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि हो आपल्या मित्रपरिवारात हे पेज नक्की शेअर करा.

Copyright@
Sandeep Dange,
Brand and Marketing Consultant.
Whatsapp: 7447844478

(This article is property of Mr. Sandeep Dange, Nashik. Copying and Distributing this article without author's name is serious legal offense and punishable under Indian Copyright Act)

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

राइटब्रेन-लेफ्टब्रेन

 

काही प्रथितयश आणि आपल्या कामात सर्वोत्तम असलेले डॉक्टर्स आणि इंजिनियर्स चित्रकला, नाट्यकला, गायन-अभिनय-नृत्य-लेखन इत्यादी कलांमध्येही कसे काय निपुण असतात हा मला बर्‍याच वर्षांपासून पडलेला प्रश्न होता. त्याला कारण म्हणजे एक तर हे की विज्ञान-गणित ह्या क्षेत्रांमध्ये काम करणारे प्रचंड हुशार वगैरे असतात आणि कला क्षेत्रातले तेवढे काही हुशार नसतात, अभ्यासात ढ असतात असा समज सर्वसाधारणपणे गेल्या कैक वर्षांपासून जनसामान्यांत पसरलेला आहे. त्यानंतर मागच्या काही वर्षांत पुढे आले की माणसाचा उजवा मेंदू हा सृजनात्मक आणि कलेशी संबंधित कामांमध्ये चांगला असतो आणि डावा मेंदू हा विश्लेषणात्मक, गणिती कामांत उत्तम असतो. त्यामुळे जी माणसे कलाकार असतात त्यांचा उजवा मेंदू जास्त प्रभावशाली असतो आणि गणितज्ञ-अभियंता-वैद्यक यांचा डावा मेंदू प्रभावशाली असतो. त्यामुळे व्यक्तीवर डाव्या किंवा उजव्या मेंदूचे प्रभुत्व असते व त्यानुसार त्यांची विचारशैली, आकलन आणि इतर क्षमता विकसित झालेल्या असतात. कलाकार व्यक्ती ही अभियंत्यापेक्षा वेगळ्या मेंदूची असते आणि गणितज्ञ हा कलेच्या बाबतीत ढ असतो असे काहीसे अति करणारे समज समाजात आहेत. ह्यानुसार शाळांमधून, शैक्षणिक संस्थांमधून आणि समुपदेशकांमधूनही ह्याच समजाच्या आधारावर विद्यार्थ्यांचे आकलन व मार्गदर्शन केले जात आहे.

पण गेल्या काही वर्षांत माझ्या वाचनात काही तुटक तुटक संदर्भ येऊ लागले. तेव्हा समजू लागले की कला आणि गणित हे साधारण एकाच स्वरुपाचे शास्त्र आहे. गणितज्ञाचा मेंदू ज्या प्रकारे एखाद्या समस्येचे आकलन करुन गणित सोडवतो त्याच प्रकारे कलाकाराचा मेंदू एखादी कलाकृती साकार करत असतो. गणित हा एक कलेतलाच भाग आहे हेही समोर येऊ लागले. अनेक गणितज्ञांनी कलेच्या प्रांतात काम केले आहे ही माहितीसुद्धा मिळाली. त्यापैकी लिओनार्दो दा विंची हा गणितज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक आणि कलाकार असामी एक गाजलेले नाव आहे. अनेक शास्त्रज्ञ, अभियंते आणि डॉक्टर्स कलेच्या प्रांतात नुसती मुशाफिरी करत नाहीत तर नाव गाजवून आहेत हेही आपल्याला माहिती आहे.

अशावेळी मला प्रश्न पडला होताच की हे मेंदूचं डावे-उजवेपण प्रकार काही योग्य वाटत नाहीये. आता हा लेख लिहिण्याला कारण असे की परवाच एक लेक्चर ऐकत असतांना कळले की डावा मेंदू विरुद्ध उजवा मेंदू आणि कला विरुद्ध सांख्यिकी-विश्लेषण अशी विभागणी करणारा समज एका विस्तृत संशोधनाच्या आधारे मोडीत काढण्यात आला आहे. मग मात्र माझ्या अंदाजाला ठाम पुष्टी मिळाली. जेअर्ड निल्सन आणि त्यांच्या चमूने ७ वर्षे ते २९ वर्षे वयोगटातल्या सुमारे एक हजार व्यक्तिंच्या मेंदूंच्या वेगवेगळ्या भागांवर प्रयोग करुन हा निष्कर्ष काढला की लेफ्ट-ब्रेन-डॉमिनंट किंवा राइट-ब्रेन-डॉमिनंट असे काहीही नसते. आपला मेंदू तसा बराच गुंतागुंतीवाला मामला आहे.

डावा मेंदू हा समस्यानिवारण, भाषा आणि संवादाच्या दृष्टीने काम करतो तर उजवा मेंदू दृश्यात्मक बाबतीत काम करतो. ह्या दोहोंच्या मध्ये एक संदेशवहनाच्या पुलाचे काम करणारी एक मज्जातंतूंची वाहिनी असते जिच्या आधारे दोन्ही मेंदूंच्या संयुक्त विद्यमाने आपले रोजचे काम चालू राहत असते. ह्यासंदर्भात नोबेल विजेते रॉजर स्पॅरी यांनी १९५० मध्ये एक वेगळाच प्रयोग केला होता. अपस्मार म्हणजे फेफर्‍यांच्या रुग्णांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करुन त्यांच्या दोन्ही मेंदूंना जोडणारी मज्जातंतूंची वाहिनी काढून टाकली जात असे. ह्याने त्या रुग्णांना आपले जीवन सामान्यपणे जगण्यास मदत होत असे. अशा रुग्णांच्या दोन्ही मेंदूंमध्ये कोणताही संपर्क नसला तरी त्यांना फारसा काही त्रास होत नसे.
 
 
 
ह्या अवस्थेचा उपयोग करावा असा ठरवून रॉजर स्पॅरी यांनी केवळ उजव्या मेंदूलाच किंवा डाव्या मेंदूलाच वेगवेगळी सूचना जाईल अशा पद्धती शोधून काढल्या. त्यानंतर त्याचा वापर करुन काही प्रयोग करण्यात आले. ह्यात रुग्णाला दोन वेगवेगळी चित्रे दाखवण्यात येत असत आणि त्या चित्राशी संबंधित उजव्या हाताला व डाव्या हाताला ठेवलेल्या प्रत्येकी चार चार कार्डमधून एक कार्ड निवडायला लागत असे.  दोन्ही मेंदू सर्व कार्ड्स बघू शकत असत. केलेल्या निवडीवर एखादा प्रश्न विचारुन त्यावर आलेल्या उत्तरानुसार निष्कर्ष काढण्यात येत असत. एका रुग्णाला डाव्या बाजूने बर्फवृष्टीचे चित्र दाखवले तर उजव्या बाजूने कोंबडीच्या पायाचे चित्र दाखवले. त्यानुसार उजव्या मेंदूने (जो शरिराचा डावा भाग नियंत्रित करतो) बर्फ हटवण्याचे फावडे निवडले तर डाव्या मेंदूने कोंबडीचे चित्र निवडले. त्यानंतर त्याला विचारण्यात आले की अशी निवड का केली तर तो म्हणाला की फावड्याने तो कोंबड्यांचे खुराडे साफ करणार आहे. आता ही भाषा वापरुन उत्तर देण्याची क्षमता डाव्या मेंदूकडेच असल्याने उजव्या मेंदूने ते फावडे का उचलले असावे ह्याचा डाव्या मेंदूला काही पत्ताच नव्हता. त्यामुळे डाव्या मेंदूला जे कोंबडीचे चित्र दिसत होते त्यानुसार त्याने उत्तर दिले कोंबडीचे खुराडे फावड्याने साफ करणार आहे. हे जरा समजायला किचकट वाटत असले तर कमेंटमध्ये दिलेल्या लिंक्स बघाव्यात.

ह्यावरुन असे लक्षात येते की आपण जे काही करतो, बोलतो त्यात दोन्ही मेंदूच्या क्षमतांचा वापर केला जात असतो. ह्यासंदर्भात ओशोंच्या 'अध्यात्म उपनिषदा'वर असलेल्या एका प्रवचनात वेगळाच उलगडा होतो. ओशो सांगतात की कोणत्याही वस्तूविषयासंदर्भात जगभरात सामान्यपणे सत्य आणि असत्य दोन बाजू असतात असे समजले जाते. पण आपले थोर भारतीय तत्त्वज्ञ इतके हुशार आहेत की त्यांनी एक तिसरी बाजू शोधून काढली ती म्हणजे 'मिथ्या'. मिथ्या म्हणजे जी पूर्णपणे असत्यही नाही आणि पूर्णपणे सत्यही नाही. ह्या दोहोंच्या अध्येमध्ये कुठेतरी आहे. ह्याचे उदाहरण देतांना त्यांनी सांगितले की समजा तुम्ही अंधार्‍या बोळीतून जात आहात आणि अचानक तुम्हाला एक भला मोठा साप रस्त्यात पसरलेला दिसतो. तुम्ही घाबरुन बाहेर धूम ठोकता. इतर लोक तुम्हाला विचारतात काय झाले? तेव्हा ते तुमच्या सांगण्यावरुन सापाला मारायला म्हणून लाठ्याकाठ्या, कंदिल घेऊन येतात. येऊन बघतात तो काय, तो काही सापबिप नाही, एक निर्जिव दोरखंड पडलेला आहे. लोक तुम्हाला वेड्यात काढतात. 'काय दोर बघून घाबरला?'. आता तुम्ही साप पाहिला हे तुमच्यासाठी सत्य असते, पण लोकांसाठी मात्र दोरखंड सत्य असतो. तुमचा साप त्यांच्यासाठी असत्य असतो पण दोरखंड तुमच्यासाठी असत्य असतो. आता हे झाले कसे काय? ह्याच डोळ्यांनी तर तुम्ही साप बघून धूम ठोकली होतीत. मग तो साप कसा काय खोटा असेल? तुमच्या डोळ्यांना साप दिसला होताच, तो खोटा नव्हता. भले तिथे दोरखंड असेल पण तुम्ही मात्र साप बघितला. तुमचा अनुभव खोटा नाही. तो साप 'मिथ्या' आहे. भास आहे. आता रॉजर स्पॅरी यांच्या प्रयोगातल्या निष्कर्षानुसार ओशो निर्देशित करत असलेला 'भास' कुठून उत्पन्न झाला ह्याचा आपण अंदाज लावू शकतो.

ओशोंनी सांगितलेले उदाहरण आणि दुभंगित-मेंदू रुग्णांचा अनुभव बघता आपण अशा निष्कर्षावर येऊ शकतो की मेंदूच्या दोन्ही भागांची काम करण्याची वेगवेगळी क्षमता ही आपल्या विचारप्रणाली आणि आकलनावर प्रभाव टाकत असते. त्यामुळेच जे दिसते ते का दिसते व जे वाटते ते का वाटते ह्याचे शंभर टक्के स्पष्टीकरण देणे शक्य होत नसते.

सरतेशेवटी जिथून हा लेख सुरु केला तिथेच येतो. पाब्लो पिकासोने म्हटल्याप्रमाणे प्रत्येक लहान मुलात एक कलाकार दडलेला असतो, पण मोठा होईपर्यंत तो टिकवून ठेवणे बहुतेकांना शक्य होत नाही. मलाही असेच वाटते की प्रत्येक व्यक्तीत एक कलाकार असतोच असतो. त्याला मुक्तपणे व्यक्त होऊ देणे जास्त महत्त्वाचे असते. शिक्षण संस्था, समुपदेशक आणि पालक यांनी मुलांच्या शिक्षण किंवा करिअरचा विचार करतांना राइटब्रेन-लेफ्टब्रेन असे सुलभीकरण करु नये किंवा कला आणि विज्ञान ह्या क्षेत्रांत सरसकट भेदभाव करु नये. दोन्ही क्षेत्रांत काम मिळवतांना बुद्धीचा-श्रमांचा कस लागत असतोच. दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांच्या बुद्धीत किंवा हुशारीत उजवे-डावे काही नसते.

लेख थोडा विस्कळीत वाटत असल्यास क्षमस्व, 
 
(Related links below)

- Sandeep Daange


https://archive.org/details/OADTM001ADHYATMUPNISHAD01HgKvalitet/OADTM008ADHYATM+UPNISHAD+-+08.amr


https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371%2Fjournal.pone.0071275&fbclid=IwAR1U3JmP_EbWBqTevrnqb4xUTvYt_AeS9cW78ZV68gwsITXTp7m0MV0FmXE

https://physics.weber.edu/carroll/honors/split_brain.htm?fbclid=IwAR3XQSsqcvys8RlSBtVD6fH-qPNQm3w2YaPpog0wbvBv7YHM8tvvRXPGKqc

https://www.creativitypost.com/article/no_youre_not_left_brained_or_right_brained?fbclid=IwAR0yQqvMGHySr5fKx7qEK_-LKI_BcIU6YTnjjCdubowvhQ8SFM2L-FHU9F0

https://www.psychologytoday.com/us/blog/brain-myths/201206/why-the-left-brain-right-brain-myth-will-probably-never-die?fbclid=IwAR2xQENozVWUaSA2R0R1NUlm8mtSZd8ntuCZDWSF72ml9LKrVYrBf32SSVg

http://thebrain.mcgill.ca/flash/capsules/experience_bleu06.html?fbclid=IwAR3xvVN1EILfycD1ns13muFWHOgCMlHCRn6gQuS1w0Fta6pkHpUAkoUZFK8

नवीन उद्योगाची कल्पना

सध्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या यशस्वी लोकांबद्दल माहिती गोळा करत आहे. प्रोजेक्ट यशस्वी महाराष्ट्रीयन माणसांबद्दल आहे. तर विषय तो नाही.

विषय असा आहे की यशस्वी उद्योजकांच्या कथा गेल्या काही काळापासून सातत्याने येत आहेत, योरस्टोरी, केनफोलियोज, आन्त्रप्रनरडॉटकॉम सारख्या वेबसाइट्स नव्याजुन्या उद्योजकांच्या कथा मांडत आहेत. अनेक सेमिनार्स होत आहेत त्यात उद्योजक होऊ इच्छिणार्‍या तरुणांना मार्गदर्शन केले जात आहे. (मी असा एकही सेमिनार प्रत्यक्ष बघितलेला नसल्याने अशा सेमिनार्समध्ये नेमके काय मार्गदर्शन होते हे माहित नाही) या सर्व माहितीच्या प्रदानात एक गोष्ट जाणवली, कदाचित सेमिनार्समध्येही तेच होत असावे. ती अशी की नवउद्योजकांना (ज्यांची कंपनी, फर्म अजून उभी राहायची आहे) यशस्वी लोकांच्या कथा केवळ सांगितल्या जातात. ते कसे कचर्‍यात होते आज कसे राजमहालात आहेत, कशी छोटी कामे करायचे, आज कसे हजारो कोटीचा व्यवसाय करत आहेत. ऑनलाइन कंपन्यांनी कसे एक वर्षात, दोन वर्षात अमुक इतक्या कोटींचे वॅल्युएशन मिळवले इत्यादी, इत्यादी.

हे जर मार्गदर्शन असेल तर या लोकांच्या मार्गदर्शनाच्या व्याख्येत गडबड आहे असे मला वाटते. आजवर जे यशस्वी झालेत, झुकरबर्ग, गेट्स, जॉब्स, मित्तल, जॅक मा, म्हणजे आज टॉप १०० श्रीमंत माणसे ज्यातली खरंच रॅग्स टु रिचेस झाली आहेत अशा उद्योजकांनी खरेच या प्रकारे मार्गदर्शन घेतले असेल काय? या लोकांनी कोणाच्या कथांमधून स्फूर्ती घेतली असेल? असे प्रश्न मला पडतात. अशा सेमिनार्समधून किती लोक यशस्वी उद्योजक झालेत? नेमका काय फरक पडलाय ही सेमिनार अटेन्ड करणार्‍यांमध्ये?

यशस्वींच्या कथा सांगणारे केवळ कल्पनेवर सर्व फोकस करतात, ती आयडिया कशी भारी आहे, कशी लोकांचे प्रश्न सोडवते, वगैरे वगैरे. हे वरवरचे आहे. खरेतर जर ह्या कथा इतकंच सांगणार असतील तर त्या फक्त त्यांच्या बिझनेसची पेड जाहिरात आहेत असे समजावे. अशा जाहिरातींचे दोन मुख्य उद्दिष्टं असतात, एक तर टेकसॅव्ही यंगर जनरेशनपर्यंत सहज पोचता येते, दुसरा अर्थातच इन्वेस्टर्सच्या नजरेत येण्याचे चान्सेस वाढतात. असे असेल तर या कथांना मनोरंजनाशिवाय काहीही किंमत नाही. उदाहरणार्थ, ओला किंवा उबेर यांच्या कंपनीवॅल्युएशनबद्दल दर तिसर्‍या दिवशी आकडेवारी आपण बघतो, कशी एकही कॅब मालकीची नसतांना जगातली सर्वात मोठी पब्लिक ट्रान्सपोर्ट कंपनी उभी राहीली याबद्दल कौतुक ऐकतो. नव उद्योजकाला यातून काय मार्गदर्शन, इन्स्पिरेशन मिळतं? दिवास्वप्नांचे शेखचिल्लीपण मिळू शकतं फारतर...

अशा कथांनी खरे तर हे सांगितले पाहिजे की आयडिया ते एक्झीक्युशन ते सक्सेस यापर्यंतचा प्रवास, त्यातले धोके, अडचणी, त्यावर कशी मात केल्या गेली, कॅशफ्लोचा प्रश्न कसा सोडवला, सॉफ्टवेअर्स कशी तयार केलीत, नोकरी करायला माणसे कशी मिळवली, त्यांच्यासाठी पगार कुठून जमवला, आपली कल्पना ग्राहकांना, वेन्डर्सना कशी पीच केली, कोणत्या क्यू पॉइन्ट्स वर वेन्डर्स किंवा स्टेकहोल्डर्स सहभागी व्हायला तयार झाले, फायनान्शियल्स कसे सांभाळले, जाहिराती कशा केल्या, इन्वेस्टर्सला कसे भेटलात, काय डिस्कशन्स झालीत, होतात. एक ना अनेक, असंख्य प्रश्न असतात एक उद्योग उभारायचा म्हटला तर. दिसायला (खरेतर दाखवायला) एक कंप्युटर आणि इन्टरनेट कनेक्शन एवढ्याच भांडवलावर कंपन्या उभ्या राहतात असे दिसते. पण हे खरे आहे का? ओयो हॉटेल्स इतक्या शहरांमध्ये प्रत्येक हॉटेल पर्यंत कसं पोचले असेल?

हे प्रश्न पडायचे कारण असे की मी बघतोय अनेक तरुण कल्पना शोधण्यात वेळ घालवत आहेत, पैसे घालवत आहेत. यशस्वी लोकांपासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एक्झिक्युशन ची वेळ आली की स्वप्नांच्या ठिकर्‍या उडतात. तिथे कोणतेही मार्गदर्शन उपलब्ध नसते. ज्याचे त्यालाच निभावून न्यायला लागते. उद्योगाच जग म्हणजे जंगलचा कायदा असतो. तिथे स्वप्नाळू लोकांचे काहीच काम नाही. मी पैसे टाकणार, किंवा आयडिया काढणार आणि उद्योग आपोआप उभा राहील असे समजणारे खूप नग रोज भेटतात. बायस तोडावे लागतात, आउट ऑफ बॉक्स विचार करावा लागतोच.

नवीन उद्योगाची कल्पना, तिचे महत्त्व फारतर १ टक्का असावे. ९९ टक्के महत्त्व हे यशस्वी अंमलबजावणीचेच असते. कारण दिवसाला माझ्या डोक्यात शंभर युनिक कल्पना येत असतात. पण त्यातली एक कल्पना जरी राबवायची म्हटली तर शंभर महिने लागू शकतील ती प्रत्यक्षात यायला. किंवा इतके महिने खपून ती येईलच असेही नाही.

डिलिव्हरी

काही लोक असे जबरदस्त असतात ना कि बस!

तीन महिन्या आधी आम्ही शिफ्ट केले आणि आल्या आल्या तीन दिवसात सिलिंडर संपला, डिस्त्रीबुटर बदलला नव्हता त्यामुळे पत्ता बदल करायला आधीच्या ठिकाणी जायला लागलं, तिथून धावपळ करून डॉक्युमेंट घेतलं, ते डिस्ट्रीबुटर अगदी बोगस, थंड.

आत्ताच्या डिस्ट्री कडे सकाळी 9 ला बोलवलं तर 9ला हजर राहिलो कागद करताना विचारलं सिलिंडर कधी मिळेल, तर म्हणे आज संध्याकाळ पर्यन्त सिस्टीम तुमचा अड्डरेस अपडेट करेल मग रात्री तुम्ही फोनवरून बुकिंग करा, दुसऱ्या दिवशी येईल... दुसरा दिवस नेमका रविवार, सुट्टीचा, आता पंचाईत, आमच्याकडे दुसरं सिलिंडर नाही, दोन तीन दिवस कसे काढणार, त्यांना अडचण सांगितली... पण ते ऑफीसातले कर्मचारी हतबल दिसत होते, आधीच्या अनुभवारून तर मी गृहीत धरलं होते की हेही असेच असणार, मग मी बाहेर पडलो, रिक्षा मागवली, पाऊस तुफान होता त्या दिवशी, मी रिक्षेत बसत असताना तिथल्या डिलिव्हरी वाल्याने हाक मारून बोलवले, ते लोक म्हणाले की आम्ही करतो व्यवस्था, दुसऱ्याचा सिलिंडर तुम्हाला ऍडजस्ट करून देतो, त्याला सोमवारी देऊ त्याच्याकडे दोन आहेत, तुम्ही फक्त आज संध्याकाळी 7 नन्तर बुकिंग नक्की करा, म्हणजे रिसीट जनरेट होईल... आम्ही अडचणीत येणार नाही... मला तर गदगदून आले एकदम...

आनंदात घरी पोचलो, बायकोला काही सांगितलं नाही, माझ्या मागेच दहाव्या मिनिटाला सिलिंडर हजर झाले, (आपलं भयताड सुपरम्यान आहे की काय असं तिला वाटलं असावं 😊)

तोच डिलिव्हरी पर्सन होता, म्हणाला हा एरिया माझ्याकडेच आहे, काळजी करू नका, आज हा एकच राहिला होता सिलिंडर, पण तो अगदी जुना जीर्ण झालेला आहे, काही वास बिस आला, लिकेज ची अडचण झाली तर मला या पर्सनल नंबर वर कॉल करा, कधीही अगदी रात्री केला तरी चालेल,

एक रुपयासुद्धा त्याने बक्षीस मागितली नाही, मीही त्याच्या चांगुलपणाचा अपमान केला नाही.

परवा ते सिलिंडर सम्पले, रात्री 11 वाजता बुक केलं, दुसऱ्याच सकाळी अगदी नवं कोरे करकरीत सिलिंडर घेऊन तो मनुष्य आला आणि म्हणाला की मागे तुम्हाला जुनेपुराने दिलं, म्हणून या वेळेस निवडून नवं कोरं घेऊन आलो....

फील्स कैच्या कै 😊😊

एक उठाव करायला काय लागतं?

एक उठाव करायला काय लागतं?

एक उठाव करायला
किती माणसं लागतात?
एक हजार, दहा हजार
पंचवीस की एक लाख?
पंधरा-वीस किंवा दोन चार माणसंही
उठाव करु शकतात ना?

एक उठाव करायला
किती बंदुका लागतील..?
आणि काडतुसं किती पुरतील?
दारुगोळा कसा मोजायचा, पण
हिशोब ठेवायचा का उठावाचा?

धमन्यांतले रक्त किती घट्ट लागेल,
एक उठाव करायला किती वक्त लागेल?
चिडून पेटून करायचा की
शांतपणे तंबाखू मळत करायचा...?
एक उठाव करायचा असेल तर कसा करायचा?

माणसं नव्हे, अंगार पाहिजे
त्यांच्या मेंदूत झंकार पाहिजे
काडतुसं संपली, बंदुकी मोडल्या तरी
ध्येयाकडे नजर कशी धारदार पाहिजे

एक उठाव करायला....
वक्त कशाला पाहिजे....?

मनात चीड पाहिजे
श्वासात हुंकार पाहिजे

-संदीप डांगे

नाशिकबद्दलचे माझे अनुभव व निरिक्षण.

१. इथे सर्वांग सुंदर रस्ते आहेत. ९९% रस्त्यांवर अजिबात खड्डे नाहीत. पडले तरी ताबडतोब, तिसर्‍या दिवशी दुरुस्ती होते.

२. टाउनप्लानिंग, रस्त्यांची रचना आणि रुंदी चांगली असल्याने ट्रॅफिकची समस्या नाही. शहरातल्या कोणत्याही टोकापासून दुसर्‍या टोकाला जायचे असेल तर असंख्य मार्ग उपलब्ध आहेत. कुठूनही कुठे पोचायचे असेल तर केवळ पंधरा मिनिटे पुरेशी. अगदी गल्लीबोळातले रस्तेही तीन गाड्या जातील इतके रुंद आहेत.

३. कनेक्टीवीटी. नाशिकवरुन मुंबईला लवकरात लवकर पोचू शकणे ही सुरुवातीला माझी गरज होती. रेल्वेने ठाणे अडीच तास, दादर तीन तास. रस्त्यानेही जेमतेम तेवढेच. आता तर अजून वेगवान होईल. मी स्वतः असा खुप प्रवास २०१३ ते २०१५ ह्या दोन वर्षात केला. आरामात जाणे-येणे होते. एसी चेअर कारचे बुकींग केले तर टेबलवर व्यवस्थित लॅपटॉप ठेवून जाता येतांनाचा सगळा वेळ शांतपणे काम करत घालवता येतो. हे पाच तास काम करुन वसूल केले आहेत. कारनेही बरेचदा जाणे-येणे झाले. मला माझ्या वेळेनुसार मुंबईत पोचणे शक्य होते. आता पुणे-नाशिक हायवे झाल्याने तोही वेळ साडेतीन चार तासावर येईल.

४. नाशिकमध्ये अतिशय उत्तम प्रतिचा ताजा आणि चांगला भाजीपाला, अन्नधान्य मुंबईपेक्षा कमी किंमतीत मिळत. मुंबईत दारावर आलेल्या/सोसायटीच्या आसपास विकणार्‍यांकडे आलेल्या व तोवर निकृष्ट झालेल्या भाज्यांशिवाय पर्याय नाही. आम्ही दोन्हीकडे अनुभव घेतलाय तेव्हा फरक सोन्या-पितळ्याइतका आहे. तसेच धान्य. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ हे उत्तम व दर्जेदार होलसेल मार्केटमधून घेता येत असल्याने सोयीचे. मुंबइत मिळणार्‍या धान्यांत भेसळ असते व किंमत खूप जास्त. जेव्हा मी इथे आलो तेव्हा आंबेमोहोर तांदूळ मुंबईपेक्षा वीस रुपयांनी स्वस्त व दर्जेदार मिळायचा. (आता आम्ही इंद्रायणी घेतो, the best and regional crop)

५. कॉस्ट ऑफ लिविंग तर कैच्या कै कमी आहे. चार जणांचे कुटूंब (स्वतःचे घर) असेल तर वीस हजार रुपयांत सर्व गरजा पुरवून उत्तमोत्तम आयुष्य जगू शकते. बाकी जसा ज्याला खर्च करायचा असेल तो. मी ठाण्यात ५४० फुटाच्या १बीएचके फ्लॅटचे १० हजार देत होतो. इथे अवघ्या सहा हजारात फोरव्हिलर पार्किंग्+छोटीशी बाग, दोन टेरेस, दोन बेडरुम, मोठा हॉल, मोठी किचन वगैरे असलेलं इन्डिपेन्डन्ट रो हाउस भाड्याने मिळालं, तेही पाहिजे तितके वर्ष राहा, मुंबईसारखं दर अकरा महिन्याने बदला घर असे नाही.

६. सार्वजनिक स्वच्छता. घंटागाड्यांचे तंत्र नाशिकमध्ये नीट राबवले जाते. कचरा आणि अस्वच्छता मला तरी दिसली नाही. आमच्या भागात काही कारणामुळे झालेला कचरा असेल तर थेट नगरसेवकाला फोन लावून तो घेऊन जाण्याची सूचना करु शकतो. ते ताबडतोब २४ तासांत कारवाई करतात. भटकी कुत्र्यांची तक्रार केल्यास दोन दिवसात गाडी येऊन मिळतील तेवढी कुत्री घेऊन जातात.

७. इथे उत्तम इंटरनेट कनेक्टीवीटी आहे. बर्‍याच आयटी कंपन्या असल्याने विदेशात त्यांचा व्यापार चालतोच. पण मीही इथे नाशिकमध्ये बसून दुबईतल्या रिअलइस्टेट प्रदर्शनांचे जाहिरातींचे काम सांभाळले आहे. मुंबई, दुबई, इंग्लंड इत्यादी ठिकाणी असलेल्या माझ्या क्लायंटशी स्काइपवरुन आरामात संवाद साधता येतो.

८. सगळ्यात बेस्ट. वातावरण. जगण्यास उत्साहवर्धक वाटेल असे अतिशय सुंदर वातावरण. तीनही ऋतू व्यवस्थित वेगवेगळे अनुभवता येतात. उन्हे फार तापत नाही. पाऊस फार होत नाही. थंडीही सहन होईल इतकी. पोटाला दोन घास जातात आणि अंगाला लागतातही. मुंबैतला चिकट घामाचा त्रास समूळ संपला. प्रत्येक कॉलनीत मुलांना खेळायला मोठ्या बागा आहेत, मैदाने खेळणी आहेत, जॉगिंग ट्रॅक आहेत, व्यायामाची साधने आहेत (तीच जी आदुठाकरे मरिनड्राइववर लावायची लय बोंबाबोंब करत होते, ती इथे त्यांच्याही आधी लावून तयार आहेत.)

९. खरेदी. सर्व प्रकारच्या वस्तू नाशिकमध्ये मिळतात. मुंबईत जे मिळू शकतं ते इथेही मिळतं. सगळे प्रसिद्ध ब्रॅण्डचे शोरुम नाशकात आहेत. सर्व प्रकारच्या मनोरंजनाची साधनेही आहेत.

१०. पर्यटन. निसर्गाच्या सानिध्यात असल्याने सगळीकडे कायम हिरवळ, झाडे दिसत राहतात.बाहेर जायचे असले तरी नाशिकच्या पन्नास किमी परिसरातच खुप पर्यटनस्थळे आहेत. चहूबाजुने चार प्रकारचे हवामान, भौगोलिक परिस्थिती अनुभवता येते.

मी मुंबई का सोडली?



मुंबईत खरंच राहायचे असेल तर फक्त जुन्या मुंबईत राहावे. कुलाबा ते जास्तीत जास्त परळ या भागात. तेही स्वतःचे घर असेल तरच. तुम्हाला कोणत्याही निमित्ताने दादरच्या पलिकडे जायची आवश्यकता भासायलाच नको. आपली अजून औकात नाही तिकडे घर घ्यायची, म्हणून आपण मुंबई सोडली. आयुष्य कसे जगावे याबद्दल माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या माझ्यासारख्याच नसतात.

मी मुंबईत पूर्ण अकरा वर्षे राहीलो. फोर्टलाच कॉलेज, तीनही आमदार निवास, बांद्र्याचे होस्टेल, वाशीला मित्रांसोबत फ्लॅट, कळव्याला अगदी शंभर फुटाची खोली, नंतर लग्न झाल्यावर ठाण्यात मोठ्या चांगल्या कॉम्प्लेक्सेसमध्येही राहिलो. बीसीसीआय, आयपीएलसारख्या दिग्गज कंपन्यांत मोठ्या पदांवर कामेही केली. फ्री-लान्सर कामानिमित्त सगळी मुंबै कानाकोपर्‍यांत फिरलोय..... पण.....

मन उतरत गेलं प्रत्येकदा. प्रत्येक वर्षी, प्रत्येक अनुभवानंतर.

पहिला अनुभव. फोर्टभागात नोकरीला असतांना ताडदेवमध्ये एका कंपनीत दुप्पट पगाराची जबरदस्त ऑफर होती, काम कमी आणि पगार छान. लगेच स्विकारली. पण राहायला वाशीला आणि काम ताडदेव ला. वाशी पासून कुर्ला, नंतर कुर्ल्यातून दादर, दादरमधून मुंबई सेन्ट्रलला उतरायचं. तीन ट्रेन बदलायला लागायच्या. जातांना आणि येतांनाही. मोजून फक्त सहा दिवस मी हे दिव्य केलं. प्रचंड गर्दी. चढायलाच मिळायचं नाही. परत घरी पोचायला कधी दहा, कधी अकरा वाजायचे, सकाळी परत सगळं पहिल्यापासून. हे साल २००७. एवढा चांगला जॉब चक्क सोडून दिला. मला रोज रोज असे मरायचं नव्हतं किड्यामुंग्यांसारखं.

अनेकांनी म्हटलं, अरे काय होतं त्याला, कित्येक लोक असा प्रवास करतात. असू देत हो. त्यांची मजबूरी असेल. मला नाही जमणार. बघितलीत अशीही लोकं. वर्षानुवर्षे वसई-विरारवरुन तीन ट्रेन बदलून वाशीला कामाला जात असतात. पण बदलापूर, पनवेल ला घर शिफ्ट करत नाहीत. कल्याणातली घणसोली-कोपरखैरणेला मरत मरत जाणार पण तेच पनवेल-बदलापूर ला शिफ्ट होत नाहीत. अशी प्रचंड प्रचंड प्रवास रोजच्या रोज करणारी, लेकरांना झोपलेलं असतांनाच मोठी होतांना पाहणारी, गर्भवती असून लटकून, जीवावर खेळत प्रवास करणारी, अव्वाच्या सव्वा किंमतीने घराच्या छोट्याशी तुकड्यासाठी कर्ज काढून आयुष्य त्या कर्जाच्या वेठबिगारीत घालवणारी, भरमसाठ इएमआय भरत फक्त झोपायला त्या घरात जाणारी, मुंबईत अशी गर्दी खूप आहे. स्वप्नांची गर्दी म्हणतात याला. माझ्यासाठी ही मरणाची गर्दी आहे. म्हणजे कोळ्याने जाळ्यात पकडलेल्या माशांसारखी आहे. ती थोडावेळ पाण्यात असतात पण छोट्याशा जागेतच तडफडत असतात, फक्त श्वास घेण्याचे स्वातंत्र्य, तेही थोड्या वेळेसाठीच. कधी मरणार माहित नाही. ह्या अनिश्चिततेतच आयुष्य आणि पिढ्या निघून जातात. काहीतरी भन्नाट होईल ह्या आशेत, किंवा दूर गावा-खेड्यांत तर भाकरही मिळत नाही म्हणून इथेच, असंच राहायचं. एक एक माणूस इथे येत राहतो, आपल्या येण्याने व्यवस्थेवरचा भार वाढवत राहतो, त्रास वाढवत राहतो रोज, रोज, प्रत्येक क्षणाला.

दुसरा अनुभव. पवई हिरानंदानी ते कांजूरमार्ग रेल्वेस्टेशनला जायला बसमध्ये चढलो.... बाहेरून लटकत होतो. हे पूर्ण अंतर फक्त २ किलोमीटर आहे. २००८ साली इथे एवढ्या अंतराला फक्त दिड तास बसने लागत असे. अर्थातच पिक-अवरमध्ये. त्यादिवशी अर्धातास असाच लटकत एकाच ठिकाणी इंच इंच बस पुढे जातांना प्रत्येक क्षणाला मनात रागाचा ज्वालामुखी फुटलेला. ही इतकी लोकं अशी मुर्दाड कशी राहु शकतात, कोणीच कसं पेटून उठत नाही. अरे, पायी गेलो तर फक्त पंधरा मिनिटं लागतील. त्याला बसने, वाहनाने पैसे देऊनही दिड तास लागावा? तो शांतपणे तुम्ही सहन करावा? ह्यालाच मुंबईचे स्पिरिट का काय म्हणतात असे कळले. मी तडक उतरलो, चालायला लागलो. परत कधीच बसने जायचे नाही या निर्धारानेच.

तिसरा अनुभव, कळव्याला राहायला, ठाण्यात नोकरी. चार किमी चे अंतर. रिक्षा मिळायला पाऊण तास लागायचा. दहाच्या ऑफिससाठी, जे फक्त चार किमी आहे, तेवढ्यासाठी तासभर तिष्ठत राहायला लागायचे, रिक्षावाल्यांच्या रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ विनवण्या करुन करुन थकलो. शेवटी एक दिवस तिरिमिरीत कार घेऊन टाकली, कारण बायको गर्भवती होती. आणि रिक्षावाल्यांच्या भरवश्यावर राहून मला कोणतीही रिस्क नव्हती घ्यायची. मुंबईत पब्लिक ट्रान्सपोर्ट, रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे ना!

नंतर मी ठाण्यालाच राहायला आणि नोकरीला होतो. तो एक वर्षाचा काळ ठिक होता, घरापासून ऑफिसचे अंतर कारने सरळसोट ५ मिनिटे. तरी कापुरबावडीजवळ सकाळी पाऊणतास जायचाच इतकी ट्रॅफिक असायची. ते टाळायचे तर सायकल घेतली. सायकलने हाणीत जा-ये करु लागलो. पण त्याचे दुष्परिणाम वेगळेच. प्रचंड पोलुशन ने घसा खराब व्हायचा. खाकरुन थुंकलो की रुपयाच्या आकाराएवढी काळी घट्ट थुंकी पडायची. तेव्हा तेही सोडले.

नोकरी सोडून फ्री-लान्सिन्ग सुरु केले तेव्हा वाघबीळला, घोडबंदर रोडला राहायला होतो. तिथून कुठेही जायचे असेल तर किमान अडीच तास प्रवास. अडीच तास जाणे आणि परत येणे. कामाचा वेळ असा बिनकामाच्या प्रवासात घालवणे मला पटत नाही. बरं हा सर्व प्रवास सुखाचा तर नाहीच. प्रचंड गर्दी, अनिश्चितता, गोंधळ जणू पाचवीलाच पुजलेले. इतके रस्ते सुंदर आहेत,कार तर वापरुच शकत नाही मुंबईत.

शेवटी ठाणे सोडायचा निर्णय घेतला आणि मग पर्यायांची चाचपणी सुरु केली. आधी मी जवळची उपनगरं शोधली. डोंबिवली, कल्याण, बदलापूर, वाशी, पनवेल. पार अंबरनाथ पर्यंत. सगळाच तपास केला. प्रत्येक जागेचे आपले असे प्रॉब्लेम्स आहेत. मुंबईच्या मगरमिठीतून सुटका नाहीच असे लक्षात आले. पुण्याचा पर्याय अभ्यासला. पण तिथेही अनेक प्रश्न होतेच. मी तर अगदी माझ्या जन्मगावी, विदर्भातलं अकोला, तिकडे स्थायिक व्हायचं ठरवलं. पण मुंबईशी कनेक्टीवीटीची बोंबाबोंब आहे. तो अगदी हास्यास्पद पर्याय आहे.

शेवटी नाशिक फायनल केले. तीनच दिवसात निश्चित केले. २८ फेब्रुवारीला ठरवले नाशिक ला शिफ्ट व्हायचे. ३ मार्च २०१३ ला आम्ही ठाण्याहून सर्व सामान -बिर्‍हाड घेऊन इथे आलो. निर्णय अजून तरी चुकलेला नाही.

कोजागिरीचे जागरण

कलाकारीचे काही जीन्स असतात का काय माहित?

माझ्या आईकडच्या अनेक नातेवाईकांत चित्रकलेचे गुण आहेत. म्हणजे माझी आई धरुन चार भावंडं आहेत. दोन बहिणी आणि दोन भाऊ. चारही भावंडांची मुले चित्रकलेत हुशार आहेत. माझ्या मोठ्या मामाच्या मोठ्या मुलीचे चित्र लहानपणी कुठेतरी परदेशात वगैरे गेले होते. छोट्या मामाचा मुलगा दहा-बारा वर्षांचा असतांनाच दिवाळीचे मोठे आणि सुंदर किल्ले बनवण्यात जिल्ह्यात प्रसिद्ध होता, थर्माकॉलपासून डिझाइन्स, गणपती बनवणे मी त्याच्याकडून शिकलो होतो. मोठ्या मावशीचा मुलगा सेट्स डिझाइनिंग, मखर सजावट वगैरे बनवण्यात खूप इनोवेटीव, अजूनही करतो. तो संशोधक आहेच, शेतकर्‍यांसाठी लागणारी वेगवेगळी साधने शोधत आहे. मोठ्या मावशीला चार मुली आणि हा एक मुलगा. तर चारही मुली बर्‍यापैकी ड्राईंग स्केचिंग करायच्या. आता ह्यातल्या एका मावसबहिणीची मुलगीही सुंदर स्केचिंग करते आहे. माझा मोठा मुलगाही चित्रकलेचा वेडा आहे.

संगीताचं अंग मात्र मला वडिलांकडून मिळालंय. अख्खंच्या अख्खं डांगे कुटूंब गायन वादनात रंगलेलं असतं. माझे सगळे काका लोक वेगवेगळे लोकगीतांचे प्रकार सादर करतात, वाद्य वाजवतात, आत्या स्वतःहून कवनं रचून गाणी तयार करते, तिचा स्वतःचा वाद्यवृंद आहे. असे सगळे आहे. पण हे गाण्याबजावण्याचे वेड दुसर्‍या पिढीत मात्र फारसे आलेलेच नाही. मी सोडलो तर आमच्या सर्व चुलतभावंडांत कोणी गाणं-बजावण्यात इन्टरेस्टेड नाही.

आज आमच्याकडे कोजागिरीचे जागरण असणार, महालक्ष्मी बसतात आमच्याकडे या तीन दिवसात. आज त्यांचे महाभोजन असते. त्यानंतर रात्र असते ती भजनांची, पारंपरिक वाद्ये, टाळ, पेटी तबला, खंजेरी रंगणार. उत्तरोत्तर रात्र चढत जाणार. आत्याच्या पोतडीतून आज नवी भजनगीते ऐकायला मिळणार.

आणि काही अपरिहार्य कारणामुळे आज पहिल्यांदाच मी नसणार.

(टीपः आमच्याकडे हे सगळे घरगुती असते त्यामुळे कोणतीही कोकलणारी साउंड सिस्टीम नसते, डिजे सारखा त्रास नाही होत बरं का इतरांना.)

टपरीवर चहा

वडीलांच्या टपरीवर चहा विकणे' हा उल्लेख जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा मी जाम हळवा होतो. काहीतरी गलबलतं मनात खोल. आमची टपरी अतिक्रमणात उचलून नेली होती नगरपालिका अधिकार्‍यांनी. मी तेव्हा ५-६ वर्षांचा असेन. ग्लास विसळून देणे व लोकांना चहा देणे अशी कामे केली, दोन तीन दिवस केली असतील. जास्तीत जास्त. फार आठवत नाही आता. वडिलांना जुन्या आठवणी विचारुन छळणे पसंतही नाही. तर ते अतिक्रमणात आपली रोजीरोटी उचलून नेल्या जाणे फार विचित्र असते. पाचसहा वर्षाच्या मुलाला रोजीरोटी, कामधंदा, पैसा कमवणे व त्यातून पोट भरता येणे हे कुठून माहित असणार? पण बापाची अगतिकता, अधिकार्‍यांचा अधिकार हे सगळं जाणवतं देहबोलीतून.

माझ्या मनात खोल रुतून राहिलेला एक क्षण आहे, आमच्या टपरीवर चहा घ्यायला येणारे लोक आमच्यापेक्षा चांगल्या कपड्यातले, सुशिक्षित, सरकारी नोकरीवाले. माझ्या त्यावेळेसच्या दृष्टीकोनातून 'साहेबलोक'. हे साहेबलोक खूप श्रीमंत, अधिकार, वजन आणि ओळखीवाले असतात अशी एक इमेज लहानग्या मनात होती. जेव्हा ही टपरी उचलून नेत होते तेव्हा 'हे साहेबलोक स्वतःहून वडिलांना मध्यस्थीस मदत करतील, आमची टपरी हटू देणार नाहीत. जे वाईट घडतंय ते घडू देणार नाहीत कारण आमच्या टपरीवर ते चहा प्यायचे ना? मग ऋणानुबंधाच्या निमित्ताने इतके तर ते सहज करु शकतील' असे मला वाटले. पण त्या साहेबलोकांनी काही मदत केली नाही. ती अपेक्षाभंगाची बोच राहीली. तीच आठवण नेहमी गलबलून आणत असते. अगतिकता, असहाय्यता, गरीबी, सन्मानाने पोट भरण्याची लढाई, बरंच काही आठवत राहतं.

खरंतर त्यात कोणाचीच चूक नव्हती, मदत करण्यासारखेही काही नव्हतं त्यात. बेकायदेशीर होतं तर होतं. विशेष म्हणजे एका सामान्य, कुठलाही राजकीय पाठबळ, गुंड-पुंडाचा हात नसलेल्या गरिबाचं बेकायदेशीर अस्तित्व होतं ते. तिथे दयामाया विचार नसतो. सरकारने तो करणे नियमात बसत नसते.

मोठं झाल्यावर बरंच काही उमगतं.

इंग्रजी ज्ञानभाषा वगैरे

इंग्रजी ज्ञानभाषा वगैरे ठाम समज करुन घेतलेल्या आणि मराठीला ते शक्यच नाही असे समजणार्‍यांसाठी माझा एक अनुभव.

डिजाइन थिंकिंग ह्या विषयावर मी मराठीतून लिहिले आहे. डिजाइन थिंकिंग ही मूळ संकल्पना आणि त्यावरचे काम हे मुख्यत्वे परदेशात इंग्रजी भाषेत झालेले आहे. उपयोजित कला सोडल्या तर इतर क्षेत्रांमधून ह्या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु व्हायला फार नाही चार पाच वर्षेच झाली आहेत. भारतातही ही संकल्पना तशी नवीच आहे. त्यामुळे त्याबद्दलचे सगळे संदर्भ हे इंग्रजीतून उपलब्ध आहेत. म्हणजेच हे ज्ञान इंग्रजीतूनच उपलब्ध आहे.

आता बघा, गेल्या पंधरा दिवसात मी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ह्या संकल्पनेवर आधारित तीन कार्यशाळा घेतल्यात. ह्या संपूर्ण मराठीतून होत्या. मुळात ही संकल्पना माहितच नाही, त्यात ती इंग्रजीतून सांगितली तरी समजणार नाही. मग आपल्या नेहमीच्या भाषेत हे ज्ञान वाटले. समजून घेतांना कोणालाही काही अडचण आलेली नाही. तेव्हा संकल्पना आणि ज्ञान-माहिती हे कोण्या भाषेचे मांडलिक नसतात. समजून घेता येत नसेल किंवा समजावून सांगता येत नसेल तर त्याचे कारण वेगळे असते.

इतर भाषांतले ज्ञान आपल्या भाषेत आणून ते वाटायची तळमळ हवी असते. आणि आपल्या भाषेत आणणे म्हणजे शब्दार्थ, अनुवाद करणे नव्हे. मॅग्नेटिक ला चुंबकिय, अ‍ॅटम ला अणू म्हणायचं का असे खिल्लीबाजी करणारे लोक असतील तर त्यांना ज्ञान म्हणजे काय हे तरी कितपत कळते ह्याची शंका आहे.

गोलसेटींग


बिझनेसमध्ये, आयुष्यामध्ये गोलसेटींगची, आपले ध्येय ठरवण्याची पद्धत.

मी बर्याच मोटीवेशनल सेमिनारमध्ये ऐकलंय, आन्त्रप्रोन्यरशिप डेवलपमेंट सेमिनारमध्ये ऐकलंय, बिझनेस कॉन्फरंसेसमध्ये मोठमोठ्या स्पिकर्सना ऐकलंय. ते बसलेल्या तमाम लोकांना विचारत असतात. गोल सेटींग हा एक महत्त्वाचा टॉपिक असतोच असतो. ते विचारतात, "तुमच्या आयुष्यातले गोल काय आहे? ध्येय काय आहे? तुम्हाला काय मिळवायचे आहे आयुष्यात?" ऐंशी टक्के लोकांनी खरेच असे काही ध्येय वगैरे ठेवलेले नसते. आपले भारतीय मानस ठेविले अनंते तैसेचि राहावे च्या संस्कारातले, त्यांचीही काही चूक नाही. अनेकांचे बिझनेस साईकृपेने, समर्थकृपेने वगैरे वगैरे वाढत असतात. चालत असतात. काही मिळवायचे ध्येय ठरवून घेतले तर त्यामागे आणखी धावपळ कोण करत बसेल, आताच नाकातोंडातून धूर निघतोय तो कमी आहे का?

मग स्पिकर जबरदस्ती लोकांना आपले गोल त्यांच्याकडच्या वहीत, कागदावर लिहायला लावतो. आत्ताच्या आत्ता लिहा, काय हवंय आयुष्याकडून तुम्हाला.... लोक लिहितात. काही स्पिकर एक एकाला उठवून विचारतात, तुमचे काय स्वप्न आहे, काय ध्येय आहे?

लोकही लिहितात, उत्तरेही देतात. कोणी म्हणतं मला १०० कोटी रुपये कमवायचेत, कोणी म्हणतं ५०० कोटी रुपये , कोणी हजार कोटी म्हणतं, कोणी आडदांडपणे दहा हजार कोटी रुपये बोलून मोकळं होतं. कोणाला मर्सिडिज घ्यायची असते, कोणाला बंगले-फार्महाउस हवं असतं. सर्वसाधारणपणे सगळ्यांना श्रीमंत व्हायचं असतं. श्रीमंत झालं की सगळ्या सुखसोयी उपभोगता येतील, निश्चिंतपणे. म्हणजे खरा गोल असतो तो निश्चिंतपणे जगण्याचाच. त्याला लागणारे पैसे मात्र प्रत्येकजण आपआपल्या बौद्धिक, सामाजिक, आजुबाजूच्या वातावरण, संस्काराच्या, शिक्षणाच्या वकुबानुसार ठरवत असतो. प्रत्येकाची स्वप्नं त्या 'निश्चिंतपणे आयुष्यसुख मनमुराद लुटण्या'भोवती गुंफलेली असतात. सर्व सुखसोयी हव्या असतात, सर्व भौतिक सुखं हवी असतात. त्याला पैशाची कमतरता भासायला नको.

भारतीयांच्या स्वभावातच हे गुंफलेलं आहे. गोल, ध्येय म्हटलं की केवळ पैसाच दिसतो. पैशाभोवती आयुष्य फिरतं. केवळ पैसाच ध्येय असतो. हेच कारण आहे की आपल्याकडे क्रिएटीवीटीचे प्रमाण कमी आहे. एवढ्यातच अॅपल कंम्प्युटर्सचा सहसंस्थापक स्टीव वॉजनियाकने अगदी हेच म्हटलं आहे. आपल्याकडे मुले मोठमोठ्या शिक्षणसंस्थांत शिकतात, कशासाठी तर मोठ्या हुद्द्यावर नोकरी मिळेल, बुडाखाली मर्सिडिज येईल, चांगली बायको मिळेल. बस! जीवनाचे ध्येय इतकेच. एवढे केले की समाजात मान सन्मान मिळतो. आयुष्यात अजून काय हवं.

त्याचमुळे आपल्याकडे फेसबुक, अॅकपल, गुगलसारख्या कंपन्या तयार होत नाहीत, एलन मस्क, स्टीव जॉब्स सारखे लोक तयार होत नाहीत.

याचे कारण आपली ध्येये चुकीच्या गोष्टींवर आधारलेली आहेत.

मी जेव्हा जेव्हा असे सेमिनार केले, मला या प्रश्नाचे कधीच उत्तर देता आले नाही, शंभर कोटी, हजार कोटी का मिळवायचे, काय गरज आहे. बरं हेच कोटीचे आकडे ध्येयाच्या कॉलममध्ये लिहून मिळणार काय हा संभ्रम होता.

खरोखर ध्येयं ठरवायची असतील तर ती पैशाला केंद्रीत करुन नव्हे तर जगातल्या कोणत्यातरी समस्येला दूर करण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. जगातल्या हजारो, लाखो लोकांचे जीवन आपण बदलू शकतो काय याचे ध्येय ठेवले पाहिजे. उत्तम संगणक बनवीन, उत्तम कार बनवीन, उत्तमोत्तम सर्विस देईन, उत्तमोत्तम उपचार करेन, उपचाराच्या नव्या व स्वस्त पद्धती शोधून काढेन. आजच्या जगात जे जे काही लोक करत आहेत ते ते अधिक सोपे, स्वस्त व वेगवान कसे होऊ शकते ह्याबद्दल विचार करुन त्यातले एखादे काम ठरवून घेऊन त्यात जगातले सर्वोत्तम सोल्युशन निर्माण करणे हे ध्येय हवे असते. कालपेक्षा आज अधिक लोक माझी सर्विस वापरतात का? कालपेक्षा आज अधिक लोक माझी कार वापरतात का? कालपेक्षा आज अधिक लोक माझी उत्पादने वापरत आहेत का? नसतील तर त्याची कारणे शोधून त्यावर प्रगती करत जाणे हे ध्येय हवे.....

अशी ध्येये असतील तर पैसा धो धो येतो. पैसा हे बायप्रॉडक्ट आहे. आपले उत्पादन सेवा विकल्या गेल्या तर पैसा मिळतोच. पण आपले उत्पादन-सेवा जर सर्वोत्तम नसतील, काही कामाच्या नसतील तर निव्वळ शंभर कोटी, हजार कोटींचे मनातल्या मनात इमले बांधून कोणती ध्येये सिद्ध होणार आहेत? निश्चिंतपणे जगणे हे उद्योजकाचे ध्येय नसावे, त्याच्या ग्राहकांनी निश्चिंतपणे जगावे हे त्याचे ध्येय असले पाहिजे. मग त्याचे ग्राहकच तो उद्योजक निश्चिंतपणे जगेल याची काळजी घेतात.

सोच बदलो.... ध्येय को परखो. पैसा छोडो. दुनिया बदलो.

मार्केटींग सेल्स हेच आता भविष्य आहे

आपल्याकडे नवतरुण नोकरी शोधणारे खालील तीन गोष्टींना घाबरतात
टार्गेट, मार्कटींग, सेलिंग...

सर्व जण नोकरीच्या अशा जाहिरातींना पटापट रिस्पॉन्स देतात ज्यात खालील तीन गोष्टी असतात.

नो टार्गेट, नो मार्कटींग, नो सेलिंग...

टार्गेट, मार्केटींग, सेलिंग चे इतकी भीती आहे मुलांमध्ये, आणि त्याचवेळी यशस्वी सेल्समनची अक्षरशः वानवा आहे आपल्याकडे. आम्हाला खुर्चीत बसून जॉब हवा. शांततेत खरडपट्टी करु, मेकॅनिकल, रोबोटीक कामे करु, पण मार्केटींग करणार नाही. गड्यांनो, अशाने संपणार आहात. ही सगळी डेटा-एन्ट्री-घरीबसूनकाम-ऑनलाइन-फॉर्म-भरा एकतर खोटेपणा आहे. त्यात तुमचे पैसे घालवण्याशिवाय काहीएक होत नाही. कुठल्याही संकटाला, जबाबदारीला, आव्हानाला तोंड न देता सर्वांनाच लाखो रुपयाच्या पगाराची अपेक्षा आहे. व्यवसाय करायचा तर शेठजी बनून फक्त गल्ल्यावर बसायचे आहे. तिथेही मार्केटींग, सेलिंग करावे लागते हे गावीच नाही यांच्या. म्हणे आम्हाला उद्योजक व्हायचे आहे.

काही तरुण, एम्बीए वगैरे नाइलाजाने चांगले काही मिळेपर्यंत, म्हणजे खुर्चीजॉब, बॉसगीरी करण्याचा जॉब मिळायची पात्रता ती म्हणजे चार पाच वर्षे फिल्डमध्ये ढकलगाडी खेळतात, सहा महिने वर्षभरात नोकर्‍या बदलतात, त्यांच्यामुळे कंपन्यांना एक रुपया फायदा झालेला नसतो, यांच्या पगाराएवढाही यांना बिझनेस आणता आलेला नसतो. अशा मुलांना नोकरीवर ठेवून पस्तावलेली अनेक उद्योजक मंडळी माझ्या ओळखीत आहेत. सहा सहा महिने पगार घेऊन शून्य बिझनेस करणारी ही मंडळी स्वतःच्या नावामागे एमबीए वगैरे बिरुदे चिटकवतात.

यांच्याकडे संवादकौशल्य नसते, कोणाशी कसे बोलावे याचे ज्ञान नसते, मुख्य म्हणजे व्यवसाय म्हणजे काय, मार्केटींग म्हणजे काय, नेटवर्कींग कसे करावे, हे तर दूरच. मार्केटींग, सेलिंग मधले मूलभूत तत्त्व ते म्हणजे 'प्रश्न विचारुन' ग्राहकाची नस ओळखा, हेही माहित नसते, माहित असले तरी वळणात नसते. केवळ जाऊन दारात उभे राहायचे. आपली माहिती रोबोटिकली सांगायची, कोणताही उत्साह नसतो, कारण मुळात हे कामच आवडत नसते. मग यांना कोण बिझनेस देणार, कोण ऑर्डर देणार? आणि त्यामुळे दिवसातून शंभर नकार घेऊन हे चिडचिडे होतात, सिगरेट दारु पितात, नकारात्मक राहतात. एका भयंकर चक्रात अडकतात. किंवा इतक्या वाईट पातळीवर जाण्याआधीच कुठेतरी नोकरीच सोडून दुसरीकडे काम सुरु करतात. पण मार्केटींग व सेल्समध्ये यशस्वी होत नाहीत.

सेल्स, मार्केटींग, टार्गेट अचिवमेंट, कोल्ड कॉलिंग, कोल्ड मीटींग्स याची खूप धास्ती, भीती, नावड आपल्या मुलांमध्ये आहे. त्याचे कारण त्यांच्या संगोपनात दिसते. आपल्या मित्र-नातेवाईकांच्या सुरक्षित कोंडाळ्याच्या बाहेर ही मुले कधी गेलेली नसतात. आईवडीलांनी एमबीए करायला लाखो घातलेले असतात पण मूल डिग्री घेऊन बाहेर पडेपर्यंत त्याला ज्या क्षेत्रात काम करायचे असते त्याचा अजिबात गंध नसतो. व्यापार-व्यवसाय हा लोकांशी संबंधित असतो. हेही त्यांना फक्त थेरॉटिकली माहित असते. धंदा कसा करतात, दुकान कसे चालते, विक्री कशी होते, ग्राहक कसे बोलतात, ह्याबद्दल ह्या मुलांना कधीही माहित झालेले नसते. काउंटरच्या पलिकडून दुनिया कशी असते हे माहितच नसेल तर अचानक २२ व्या वर्षी ग्राहकांना ही मुले सामोरे कशी जाणार?

आपण विदेशात बघतो की तिकडे मुले पंधराव्या सोळाव्या वर्षीच काहीबाही उचापती करुन थोडेफार पैसे कमवत असतात. त्यात त्यांना धंद्याच्या बेसिक्सचे संपूर्ण ज्ञान अगदी प्रॅक्टीकली प्राप्त होते. त्यामुळेच अमेरिकन-युरोपियन लोकं मार्केटींगमध्ये जगभर दबदबा घालून आहेत. ते त्यांच्या लहानपणापासूनच्या संस्कारात आहे. आपल्याकडे साधी कोथींबीर आणायला बारावीतल्या मुलाला पाठवत नाहीत, नको अभ्यास करु देत त्याला म्हणून टाळले जाते. मग मुलांना इन्टरपर्सनल स्किल्स, कम्युनिक्शन स्किल्स कशी डेवलप करता येणार? कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे फाड फाड इंग्रजी हा एक गैरसमज आपल्याकडे आहे. आपल्याला जे म्हणायचे आहे ते सोप्या शब्दात, सहजतेने कमीत कमी वाक्ये वापरुन समोरच्याला समजेल अशा पद्धतीने सांगणे हे संवादकौशल्य, यात भाषा महत्त्वाची नाही. संवाद महत्त्वाचा. यात दुसरा काय म्हणतोय तेही ऐकायला आले पाहिजे. त्यातून गरजा समजतात, त्यामुळे आपले प्रॉडक्ट सर्विस याचे मार्केटींग करायला मदत होते.

भारतात अनेक नवीन सर्विसेस सुरु होत आहेत, अनेक स्टार्टप्स आहेत. नवीन नवीन कल्पना बिझनेस स्वरुपात येत आहेत. अशा सर्वांना नीट बोलू शकणारी खुप सारी मार्केटींगची मुले लागणार आहेत. नवीन नोकरी शोधणार्यां ना, किंवा विनाकटकट काम शोधणार्‍यांना माझी सूचना आहे की बिनामेहनत काम असे काहीही नसते. अशी सगळी कामे आता रोबोट्स तुमच्या पगारापेक्षा स्वस्तात करणार आहेत. अनेक गोष्टींसाठी मनुष्यबळाची गरज उरली नाहीये, सॉफ्टवेअरच ते काम नीट करतं. पण खर्‍याखुर्‍या माणसांशी संवाद साधायची संधी कायम राहणार आहे. ही संधी अमर्याद यश व पैसा देणारी आहे. ह्या संधीचे सोने करता आले पाहिजे, हे शिकता येते. प्रत्येकाला जमू शकते. कष्ट करावेच लागतात. पण मार्केटींग, सेल्स हा प्रांत प्रत्येक अनुभवानंतर तुमची उत्पादकता आपोआप वाढवत नेणारा असा आहे. एका महिन्यात पाचशे नवीन ग्राहकांना भेटल्यावर तुमच्याकडे पाचशे अनुभव असतात. त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून तुम्हाला खूप गोष्टी कळतात. नेहमीचे कोणते प्रश्न आहेत ते कळतात, त्याची उत्तरे तुम्ही तयार करु शकता. तीच उत्तरे नवीन ग्राहकांवर टेस्ट करुन बघू शकता. असे करता करता तुम्हाला ग्राहकाने नकार द्यायच्या सर्व कारणांवर उपाय सापडलेले असतील व तुमचा कन्वर्जन रेशो महिन्यागणिक वाढत जाईल. यात मजा आहे, यात नशा आहे, झिंग आहे यशाची. आणि हे सर्व जीवंत आहे. अस्सल आहे. सेल्स आणि मार्केटींग कटकटीचे, परिक्षा पाहणारे, त्रासदायक काम आहे की आनंददायक आहे हे सर्व तुमच्या दृष्टीकोनावर ठरते. तुम्ही जर यशाचा फॉर्म्युला घेऊन यात उतरलात तर आनंद आहे, किरकिर करत उतराल तर मात्र दु:ख मिळेल.

आपल्याला हा फॉर्मुला माहित नसल्याने मुले टार्गेट्स ना घाबरतात. आपण नेमकी काय सर्विस वा प्रॉडक्ट ऑफर करतोय त्याने कस्टमरला कसा फायदा होईल हे स्वतः आपल्यालाच कन्विन्स झालेले नसेल तर तेच बोलता बोलता ग्राहकाच्या मनात आपोआप उतरुन जाते. मग सेल होत नाही, निराशा येते. याउलट प्रॅक्टीस करणारे रोज आपला सक्सेस रेट वाढवत नेतात. यशस्वी होतात. सेल्स मार्केटींग हे खुप आश्वासक क्षेत्र आहे व यात स्पर्धाही फार कमी आहे. जितके काम कराल तितका पैसाही आहे. मात्र झोकून देण्याची इच्छा पाहिजे, कष्ट करण्याची इच्छा पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. ज्ञान असलेच पाहिजे असे काहीही नाही.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स या दोन संकल्पना अजून कुणाला माहित नसतील तर आत्ताच माहित करुन घ्या. सिंगुलॅरिटीचाही धांडोळा घ्या.

कोणत्याही बिझनेसमध्ये मनुष्यबळ गरजेचं असतं. पण मनुष्यबळाच्या एकूणच गुणदोषांमुळे बिझनेसच्या ऑपरेशन्स व प्रॉफिट्स वर परिणाम होतो. म्हणून एका बिझनेस कंसेप्टमध्ये ज्या ज्या ठिकाणी मनुष्यबळावर अवलंबून राहण्याची गरज आहे, त्या त्या ठिकाणी ऑटोमेशन, रोबोटिक्स, एआय चा वापर करता आला तर काय होऊ शकतं ह्याबद्दल थेरॉटिकली विचार करत असतांना दोन गोष्टी लक्षात आल्या.

एक म्हणजे अशी कुठलीही जागा, पद, पॉवर नाही जिथे बसलेल्या मनुष्याला एआय रिप्लेस करु शकत नाही. दुसरी म्हणजे अशा प्रकारचे ऑटोमेशन डेवलप केलेली, व त्यामुळेच कोणीही मनुष्य काम करत नसलेली एखादी कंपनी मालकाच्या अकाउंटमध्ये आपोआप निरंतर पैसे भरु शकत राहू शकते. ह्यामुळे येत्या काळात दोन प्रचंड अंतर असलेले स्पष्टपणे दिसणरे वर्ग तयार होऊ शकतात, नव्हे होतीलच. ज्यात एका वर्गाकडे नोकर्‍याच नसतील, त्यामुळे पैसा नसेल, त्यामुळे द्रारिद्र्य असेल व त्यायोगे येणारी सगळी अनवांछित परिस्थिती असेल. त्याच वेळी दुसर्‍या बाजूला आपल्या बुद्धिमत्ता किंवा पैशाच्या जोरावर जगावर राज्य करु शकणार्‍या मूठभर लोकांचा वर्ग असेल. यांच्यातला संघर्ष किती लवकर होईल कि उशीरा होईल हे सांगू शकत नाही पण होईल हे मात्र निश्चित.

२००७-८ च्या सुमारास मी लायनब्रीज टेक्नॉलॉजी ह्या भाषीय स्थानिकीकरणासाठी जगात अग्रगण्य मानल्या गेलेल्या कंपनीत कामाला होतो. ही कंपनी सुरु झाली तेव्हा जगभरातून वेगवेगळ्या भाषांचे भाषांतरकार त्यांच्यासाठी काम करत होते. मायक्रोसॉफ्ट, नोकिया, एचपी सारख्या जगाच्या कानाकोपर्‍यात पोचलेल्या कंपन्यांना त्यांच्या प्रॉडक्ट्सच्या युजरमॅन्युअलचे स्थानिक भाषेत भाषांतर करुन देण्यासाठीचे काम लायनब्रिज करायची. त्यावेळी जगाच्या कानाकोपर्‍यातून सर्व भाषांच्या जाणकारांना लायनब्रिजकडून काम जायचे, बरेच लोक नोकरीवर होते, बरेच घरुन काम करायचे. या भाषांतरकारांचे काम होते असे की युजरमॅन्युअलचा इंग्रजीत असलेला भाग त्यांच्या स्थानिक भाषेत तयार करणे. जसजसा इंटरनेटचा वापर वाढत गेला आणि डेटाबेस तयार होऊ लागला तेव्हा Translation Management System (TMS) नावाची संकल्पना जन्माला आली. या संकल्पनेचा मूळ हेतूच प्रोजेक्ट्सवर खर्च होणारा वेळ व त्यायोगे पैसा वाचवणे होता. इतक्या वर्षात काम करता करता कंपनीला कळलेले की बरेचदा एकाच स्वरुपाची भाषांतरे रिपिट होत आहेत. मग त्यासाठी मात्र प्रत्येकवेळी भाषांतरकाराला प्रत्येक शब्दामागे किंमत मोजावी लागते. इथे आपण अगदी एका शब्दाला दोन रुपये मोबदला म्हटला तरी प्रोजेक्ट्सचा आवाका बघता ते बिलिंग कित्येक कोटी रुपयांत जात होते. ते वाचवण्यासाठी टीएमएस चा जन्म झाला. टीएमएसमुळे लायनब्रिजची ट्रान्सलेटर्सची हळुहळू का होइना पण बर्‍यापैकी गरज संपली. मी होतो त्यावेळी गुगल ट्रान्सलेटरचे भारतीय भाषांमध्ये चाललेले टीएमएसचे काम बघितले होते. आपण आज जे गुगल इनपुट वापरतो, जिथे शब्द लिहिल्यावर अचूक शब्दासाठी सुचवणी येते ती ह्या गुगल-ट्रान्सलेशनसाठी फीड केलेल्या शब्दसंग्रहाचं काम. आज गुगल युजरबिहेवीयर व त्यायोगे तयार होणारे युजेबल-युजरमेड-कंटेन्ट वापरत आहे.

तर अशा तर्‍हेने भाषांतरकारांकडून पूर्ण ज्ञान संग्रहित करुन घेतल्यावर भाषांतरकारांची गरज उरत नाही. ताजमहाल बनवून घेतल्यावर हात कापून टाकण्यासारखे. सर्व प्रकारच्या भाषांमधल्या शब्दसंग्रहासकट मोठा डेटाबेस असतांना महागड्या भाषांतरकारांकडे कोण कशाला जाईल? भाषांतरकार एका शब्दाला दोन रुपये घेईल तर लायनब्रिज १ पैसा घेऊ शकते. भाषांतरकार या प्रकारच्या लढाईत जिंकू शकतच नाहीत. त्याला पोट आहे, मशिनला पोट नसते.

लायनब्रिजचे उदाहरण हे प्रत्यक्ष बघितलेले उदाहरण आहे व त्यामुळे एका प्रकारच्या रोजगारावर होणारा परिणामही बघितला आहे.

अगदी वर जे थेरॉटिकल बिझनेस चे उदाहरण दिले आहे ते एका बर्‍यापैकी प्रस्थापित इंडस्ट्रीचे आहे, ज्यात आज स्पेसिफिक डोमेनमध्ये किमान दोन ते तीन लाख लोक भारतात २० हजार रुपये ते ५० हजार रुपये पगारावर नोकरी करतात. एआयने त्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ह्या दोन-तीन लाख लोकांवर टांगती तलवार आहे. व हा केवळ ह्या दोन तीन लाखंचा नाही तर को ण त्या ही क्षेत्रात नोकर्‍या करत असलेल्या ९० टक्के जनतेचा आहे. शेतीसुद्धा यातून सुटत नाही.

एक लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट अशी नाहीये की जी एआय्+रोबोटीक्स्+ऑटोमेशन्+इंटरनेट ऑफ थिंग्स ह्या चार गोष्टी एकत्र येऊन करु शकत नाहीत. एखाद्या कंपनीत एकही मनुष्यबळ नसतांना ती जगभर कोट्यावधी ग्राहकांना सेवा देत चालवली जाऊ शकते. अ‍ॅमेझोनच्या मालकांनी ठरवले तर त्या कंपनीला एकाही जीवंत व्यक्तीची गरज राहणार नाही. अशा वेळेला त्यांच्या लाखो कर्मचार्‍यांचे काय होईल...?

हे असे भयावह काहीही असले तरी मी एक सकारात्मक विचार करणारा माणूस असल्याने याचीच दुसरी बाजूही सांगणे महत्त्वाचे आहे. पृथ्वीतलावरच्या कोण्याही प्राण्याप्रमाणे अन्नग्रहण करुन जगणे हा मनुष्याचा निसर्गधर्म आहे. मनुष्यानेच निर्माण केलेल्या अर्थव्यवस्था नामक यंत्रणेत ग्राहक महत्त्वाचा आहे. ग्राहकच नसेल तर ती सर्व व्यवस्था कोलमडून पडते. ग्राहक कसा नाहीसा होतो हे बघायचे असेल तर २००८ चा अमेरिकन घरांचा कोसळलेला डोलारा बघावा. कोणताही ग्राहक तेव्हाच ग्राहक होतो जेव्हा त्याच्याकडे विकत घ्यायला पैसा असतो. पैसा तेव्हाच असेल जेव्हा तो नोकरीधंद्याला लागलेला असेल. नोकर्‍याच नसतील तर पैसा कुठून येईल व पैसाच नसेल तर तमाम एआय होऊन बसलेल्या कंपन्यांना ग्राहक कुठून मिळेल, आणि ग्राहकच नसेल तर त्या कंपनीचे काय होईल? हा एक मुलभूत प्रश्न उभा राहिलेला आहे.

त्यावर युनिवर्सल बेसिक इन्कम ही संकल्पना लढवण्यात आली आहे. पण माझे मत इन्कम किंवा मेहनताना हा मेहनतीचे चलनात झालेले रुपांतर असते. असे चलन देऊन उपयोग होणार नाही असे वाटते. १०० लोकांपैकी २० जण बेरोजगार, कुठलेही काम न करणारे असतील तर चालून जाईल पण ८० तसेच असले तर कसे चालेल?

या ठिकाणी आणखी एक आवर्जून नमूद करावे वाटते की सर्व देशातली सरकारे दिवसेंदिवस अधिकाधिक कमकुवत होत जाणार आहेत. कारण सरकारांची ताकद जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास असतो, तो नाहीसा होत जाणार आहे. सरकार हा विश्वास जनतेला सुरक्षा, संधी व सुरळीतपणा देऊन टिकवून ठेवत असते, मूळात शासनाचे तेच कार्य व अस्तित्वाचे कारण आहे. पण सरकारमध्ये ताकद राहिली नाही तर त्यांना विचारणार कोण व कशाला...?

घाबरवत नाही पण जागतिक स्तरावर एका भयंकर मोठ्या संघर्षाला येत्या पाच वर्षात सुरुवात होणार आहे हे भाकीत करतो आणि आज इथेच थांबतो.

सावध ऐका पुढल्या हाका...

जीवंत सोडणार नाही मी पण

आज तू वाटेल ते नारे लगाव रे..
पायजे त्या घोषणा दे.. जाळ आणि धूर काढ संगटच.

तलवारी काढ, काठ्या घे, बंदुक घे, पेट्रोलबॉम्ब टाक
मनातली सगळी घाण, गटारापेक्षा दुर्गंधी, वाहूंदे निर्बंधी...

रक्त गरम आहे तुझं, धमन्यातून वाहतो क्रुड ऑइलचा बॅरल...
धीर धरत नाहीस तू, दोन ओळींपेक्षा जास्त वाचत नाहीस तू..

तुला पेटवायचंय ह्यांना, त्यांना.. सगळ्यांना दाबून ठेवायचंय तुझ्या हाताखाली.
हक्क मागतो तू. पण फक्त अधिकार गाजवायचाय तुला, हेच केवळ सत्य आहे रे...

ह्याचा जय, त्याचा जय, हा मुर्दाबाद, तो मुर्दाबाद... पाठव तू कोणकोणाला पाकिस्तानातही.
विसरु नको गड्या पर एक सांगतो जीवापासून तळमळीने....

तू पेटवलेल्या संसारावर भाजतो पोळी दुसरा कोणीतरी....
तुझ्याही संसाराला आग लावली तू तुझ्याच हाताने त्यासाठीच रे....

सर्व जळून खाक व्हैल एक न एक दिवस.....
जीव मुठीत घेऊन तू बी फिरत असशील भग्न शहरातल्या वाटांवरुन....

आई बाप बायको पोरं, तुझी रे सगळी...कापलेली असतील तुकड्यांमध्ये
तलवारीला त्या नाव नसेल, धर्मपण कोणता ओळखू शकणार नाहीस तू...

तेव्हा तुला जगण्याचं महत्त्व कळेल.. प्रेमाचं महत्त्व कळेल....
महत्त्व कळेल तुला संविधानाचं....

सगळे ग्रंथ, गीता, कुराण, बायबल, फेकून देशील त्याच आगीच्या ज्वाळांमध्ये
मग घेऊन फिरशील भारतीय संविधानाची मिळतील ती पाने गोळा करत....

सांगू पाहशील तुला भोसकणार्‍या प्रत्येक चाकू आणि गोळीला की
"आम्ही भारताचे लोक....आम्ही भारताचे लोक

भारतास एक संपूर्ण प्रभुत्व-संपन्न समाजवादी धर्मनिरपेक्ष
लोकतंत्रात्मक गणराज्य बनविण्यास, तसेच त्याच्या समस्त नागरिकांना:

सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म
आणि उपासनाची स्वतंत्रता, प्रतिष्ठा आणि संधिची समता प्राप्त करण्यासाठी

तसेच त्यासर्वांमध्ये व्यक्ति ची गरिमा आणि राष्ट्राची एकता व अखंडता
सुनिश्चित करणारी बंधुता वाढविण्यासाठी..."

तुझे तेव्हा कोणीही काहीही ऐकणार नाही रे...
आज जी तू आग लावतो आहेस ती तुलाच धरणार आहे एक दिवस निश्चित

तुला फक्त संविधानच वाचवू शकेल, पण आज तू ...
त्याच संविधानाला आग लावायला सरसावला आहेस हे लक्षात असू दे...

हे ही लक्षात असू दे, संविधानाला आग लावणार्‍याला
जीवंत सोडणार नाही मी पण. कोणालाच सोडणार नाही.

टाइमकॅप्सूल

टाइमकॅप्सूल

वर्ष ३५१९
"डॉक्टर, त्याची शुद्ध परत आलीये..."
हे वाक्य कानी पडताच डॉक्टर आणि टीम धावत त्या रूमकडे गेली...

टाइम कॅप्सूलमध्ये सापडलेला तो सावरत होता.
टीमला अजून त्याच्या टाइमकॅप्सूलचा टाइमस्टँप कळलेला नव्हता. कॅप्सूल फारच डॅमेज झालेली होती. नशिब बलवत्तर म्हणून जीवनरक्षक प्रणाली तेवढी सुरु राहिल्याने तो वाचला होता. पण त्या टाइमकॅप्सूलचा कसलाच आगापिच्छा कळत नव्हता. शेवटचा प्रयत्न म्हणून आता त्या टाइमकॅप्सूलमधल्या व्यक्तीच्या जबानीवरच काय ते कळणार होते.

डॉक्टरांनी त्याला विचारले, की तो कोणत्या काळातला आहे.
पण दुर्दैवाने काहीही आठवत नव्हते. त्याच्या स्मृतीवर परिणाम झालेला होता हे दिसत होते. स्वतःचे नाव ही आठवायला त्याला जमत नव्हते.

शेवटी तो नक्की कोणत्या वर्षातून आला आहे हे समजायला त्याला कॅप्सूलमध्ये टाकण्याच्या वेळी काय काय घडत होते त्याबद्दल विचारल्या जाऊ लागले.... तो नक्की कोणत्या काळातून आला हे कळल्यास त्याला जगायला कोणती विटामिन्स व औषधे लागतील हे समजणार होते. त्याशिवाय तो फार काळ जीवंत राहू शकणार नव्हता.

त्याला खरंच काहीच आठवत नव्हते.... पण अचानक त्याला काहीतरी आठवले. त्याची नजर चमकली. तशा डॉक्टर आणि टीमच्या आशा पल्लवित झाल्या. महत्त्वाचा धागा दोरा हाती लागतो असे वाटू लागले....

तो बोलला, "मी कॅप्सूलात जात होतो तेव्हा एकच गोष्ट होत असतांना आठवत आहे, कदाचित त्यावरुन माझ्या काळाचा तुम्हाला अंदाज येईल"
पंचप्राण कानात आणून आता डॉक्टर आणि टीमच काय तर त्या रुमच्या सगळ्या भिंतीही तो काय म्हणतोय ते ऐकायला आतुर झाल्या....

तो म्हणाला,
.
.
.
.
.
.
.
.
.
"तेव्हा सेटमॅक्सवर सूर्यवंशम चालू होता"
.
.
.
.
.
टीमने शांतपणे त्याला परत कॅप्सूलात कोंबला....
त्याचा काळ माहित होण्याची शेवटची आशाही धुळीस मिळाली....
सेटमॅक्सवर सूर्यवंशम गेले दिड हजार वर्ष सुरुच आहे....

कॉपीराईट्@संदीपडांगे

"काळ-काम-वेग आणि वेटलॉस"

"काळ-काम-वेग आणि वेटलॉस"

आपल्याला शाळेत असतांना काही गणिते असायची. उदाहरणार्थ, चार मजूर एक दिवसात दहा फूट भिंत बांधू शकतात तर दहा मजूर चार दिवसात किती फूट भिंत बांधू शकतील. काळ-काम-वेग ह्या संकल्पनांची सूत्रेही आपल्याला आठवत असतील. कोणतीही गोष्ट मोजमाप करुन ठरवायची एक पद्धत आपण शिकलेले असतो. दोन सारख्या वस्तूंमध्ये फरक ओळखण्यासाठी, एखाद्या वस्तूचे मूल्य दुसऱ्या तशाच वस्तूसंदर्भाने ओळखण्यासाठी अशा पद्धती वापरणे सोयीचे ठरते. उदाहरणार्थ, किसन दुधवाल्याकडून घेतलेल्या एक लिटर दूधात दोनशे ग्रॅम साय निघते, पण गोपाळकडून घेतलेल्या दुधात शंभर ग्रॅम निघते, तेव्हा कोणाकडच्या दूधात जास्त पाणी आहे हे आपल्याला कळून येते.

पण जेव्हा आपण वेटलॉसच्या संदर्भात विचार करतो तेव्हा हा 'काळ-काम-वेग' चा फॉर्मुला वापरणे अत्यंत चुकीचे आहे. बऱ्याच जाहिरातींमध्ये आपण 'क्ष' दिवसात 'य' वजन कमी झाले असे दावे वाचलेले असतात. कोणी यशस्वी कलाकार मी अमूक महिन्यांत तमूक किलो वजन कमी केले असे सांगत असतो, सांगत असते. बेटरफास्टकडे उत्सुक ग्राहक जेव्हा विचारणा करतात तेव्हाही बहुतेकवेळा पहिला प्रश्न हाच असतो की किती महिन्यांत वजन कमी होईल, किंवा पहिल्या महिन्यात किती कमी होईल. एकूण काय तर तेच शाळेतले गणित, एक किलो वजन कमी व्हायला किती वेळ लागतो? मग वीस किलो वजन कमी व्हायला किती महिने लागतील?

दर महिन्याला दोन ते चार किलो वजन कमी होणे हे वैद्यकिय दृष्ट्या योग्य आहे असे मानले जाते. बेटरफास्टमध्ये आम्ही हाच दंडक मानतो, आमच्या जाहिरातींमध्येही आम्ही हाच वेग दिलेला दिसून येईल. ह्यापेक्षा जास्त वेगाने वजन कमी होत असेल तर चरबीसोबत मसल्ससुद्धा कमी होत असावेत अशी शक्यता असते. जे पुढच्या काळात आरोग्यास घातक ठरु शकते. अर्थात दोन किलोपेक्षा कमी वेग असेल तर चुकते आहे असेही ठामपणे म्हणू शकत नाही. त्याच्यामागे अनेक कारणे आहेत. म्हणूनच वजन कमी होण्याचा वेग हा खात्रीलायक दंडक असू शकत नाही. (betterfast.in)

वेटलॉसचे गणित फिजिक्सच्या नियमांप्रमाणे चालत नाही. आपले शरीर भौतिकशास्त्रापेक्षा जीवशास्त्राच्या आणि रसायनशास्त्राच्या नियमांनुसार जास्त चालते. आपले शरीर एक जीव आहे. त्यात अनेक बायोकेमिकल प्रोसेसेस सुरु असतात. ढोबळमानाने सर्वच माणसांचे शरीर एकसारखे असते. म्हणजे हाडांची संख्या, आतल्या-बाहेरच्या अवयवांची संख्या, त्यांची ठेवण, वेगवेगळ्या ग्रंथी, रसायने, पाणी, रक्त, केस, इत्यादी. पण ग्रंथी जी संप्रेरके निर्माण करतात त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते. चयापचयाचा वेग कमी-जास्त असू शकतो, अन्न पचवण्याची आणि वापरण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते. अनुवांशिकता, वय, वजन, उंची, लिंग, कामाचा प्रकार, आजार, जीवनशैली, आवडीनिवडी हेही वेगवेगळे असतात. एवढेच काय तर दोन व्यक्तींना एकसारख्या सूचना दिल्या तरी त्याचे पालनही त्या एकसारखे करु शकत नाहीत.

ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास 'किती महिन्यात किती किलो वजन कमी?' हा प्रश्नच निकालात निघतो.

बेटरफास्टच्या काही ग्राहकांची उदाहरणे बघितल्यास लक्षात येईल. पहीले उदाहरण एक चाळीस वर्षीय पुरुषाचे. ही व्यक्ती नियमित मॅराथॉन रनर. दरवर्षीच्या हंगामात नेमाने धावण्याचा सराव करणार, स्पर्धांत भाग घेणार. बेटरफास्टचा प्रोग्राम सुरु केल्यावर तीन महिन्यात एकूण आठ किलो वजन कमी झाले. धावण्याचा वेग वाढला, स्टॅमिना वाढला, उत्साह वाढला, थकवा कमी झाला. दुसरे उदाहरण एका नोकरदार महिलेचे. सासर-माहेर दोन्हीकडच्या जबाबदार्यात, शाळेत जाणारा लहान मुलगा आणि रोजचे ऑफिस अशी सर्व कसरत सांभाळत तीने बेटरफास्टचा प्रोग्राम पूर्ण केला. तीन महिन्यात सहा किलो वजन कमी झाले. तिसरे उदाहरण एका थायरॉईड रुग्णाचे, धावपळीचा मार्केटींगचा जॉब, घरापासून दूर राहणे, बाहेरचे खाणे, विचित्र कामाचे तास, सततचा प्रवास. अशा परिस्थितीत तीन महिन्यात सहा किलो कमी झाले. चौथे उदाहरण एका साठीतल्या हत्तीरोगाने ग्रस्त असलेल्या महिलेचे. बेटरफास्टचा प्रोग्राम सुरु केल्यावर पहिल्या महिन्यात दोन किलो वजन कमी झाले. पाचवे उदाहरण कोर्टात जज असलेल्या पिसीओडी झालेल्या स्त्रीचे, तीचे पहिल्याच महिन्यात चार किलो वजन कमी झाले होते. (betterfast.in)

वरील सर्व उदाहरणांत मोजमापासाठी आपण जे एकक वापरत आहोत ते आहे 'किलो'. बाकीचे कोणतेही पॅरामिटर्स आपल्याला माहिती नाहीत. आता तेवढ्या एका पॅरामिटरवर आपण जर ही सर्व उदाहरणे एकमेकांशी टॅली करायला गेलो तर निश्चितच गडबड होईल. कारण प्रत्येकाची सुरुवातीची वजने वेगवेगळी आहेत. प्रत्येकाची जीवनशैली वेगवेगळी आहे. आजारपणे आहेत. साठीतल्या आजाराने ग्रस्त स्त्रीचे महिन्याभरात दोन किलो कमी होणे हे मॅराथॉन रनरच्या दोन किलोपेक्षा कैकपटीने जास्त मोठी अचिव्हमेंट असू शकते. कोणत्याही दोन व्यक्तींच्या वजन कमी होण्याच्या वेगाची तुलना इथे अनाठायी असते. थायरॉईड-पिसीओडी असलेल्या स्त्रीचा सहा महिन्यात आठ किलो वेटलॉस हे एखाद्या १२० किलो वजनाच्या व्यक्तीच्या सहा महिन्यात तीस किलो वेटलॉसपेक्षा वेगळा आहे. एखाद्या व्यक्तीसाठी तिच्या एकूण वजनाच्या दहा टक्के कमी करु शकणे ही एक मोठी अचिव्हमेंट असू शकते. त्याची तुलना इतर कोणाच्या वीस-तीस टक्क्यांसोबत करणे अतिशय चुकीचे आहे.

म्हणूनच 'माझ्या मित्राने दोन महिन्यात वीस किलो कमी केले', 'भावजयीच्या शेजारणीच्या भाचीने एक महिन्यात दहा किलो कमी केले', 'अमक्याने सहा महिन्यात चाळीस किलो कमी केले' अशी वाक्ये वापरणे आणि त्यानुसार स्वतःच्या वजनाचे गोल्स ठरवणे योग्य नसते. आपले वजन कसे आणि किती कमी होईल ह्याचे गोल्स ठरवण्याआधी 'सर्वंकष आरोग्यसुधार' ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे असते. (betterfast.in)

वजनाचा काटा मोजता येतो म्हणून त्याबद्दलच नेहमी बोलले जाते. उत्तम आरोग्यामुळे वाढलेला उत्साह, उर्जा, पॉझिटीव्ह मूड, जगण्यामध्ये वाढलेला रस, वाढलेली इच्छाशक्ती, सकारात्मकता, कमी झालेला चिडचिडेपणा इत्यादी गोष्टींसाठी वजनकाटा नसल्यामुळे त्या मोजता येत नाहीत. ह्या गोष्टींना आरोग्याच्या दृष्टीने काही महत्त्व आहे हे आपल्याला माहितीही नसते. मुळात तशीही आपण ह्यांची अशी किंमत तरी किती करत असतो म्हणा.

बेटरफास्ट लाइफस्टाइल कन्सल्टन्सीमध्ये वजनाच्या काट्यासोबतच आम्ही ह्या सर्व गोष्टींना महत्त्व देतो. वजनाचा काटा आपल्या सर्व शरिराचे वजन दाखवत असतो. पण आपल्याला तर फक्त चरबी (फॅट) किती कमी झाले हे मोजायचे असते. शरीरातले चरबीचे प्रमाण मोजण्याच्या अनेक महागड्या टेस्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यापेक्षा आपली चरबी कमी होते आहे की नाही ह्याची खातरजमा करण्यासाठी घरच्याघरी एक सोपा उपाय असतो. आपला प्रोग्राम सुरु करण्यापूर्वी टेलर-टेपने सर्व अंगाची मोजमापे घेणे. मग दर पंधरा दिवसांनी त्यात किती बदल झाला ह्याची नोंद करत राहणे. इथे होणारा इंचेस-लॉस हा आपल्याला वजनकाट्यावरच्या किलो-लॉससोबत पडताळून पाहिल्यास वजन कमी होत आहे ना ह्याची माहिती घेता येते. हा होणारा बदल स्वतःच्याच पूर्वीच्या मोजमापांशी पडताळून पाहिला पाहिजे.

इतर कोणाच्या उदाहरणावरुन स्वतःचे मोजमाप कधीच करु नये. कारण तुम्ही एकदम युनिक आहात, तुमच्यासारखे जगात दुसरे कोणी नसते.

© BetterFAST Lifestyle Consultancy, Nashik.
(This article is property of BetterFast Lifestyle Consultancy, unauthorised use may result in legal action)

(Just a normal day in the life of any professional)

"बोल, क्या काम है?"

"एक बंदे को हटाने का है?"

" एक खोका होयगा...."

"इतना.....?"

"इतना मतलब?..... पचास पेटी तो उधर दुबै भेजना पडता, पच्चीस इद्दर पुलिस कमिश्नर को, दस बीस तो साला पॉल्टीशियन को जाता... मेरे हात में आताईच कितना...हर काम के लिये नया घोडा भी मंगाना पडता है वो अलग"

"नही.. पर एक खोका बहोत ज्यादा हो रहा है"

"देख.. तेरे को जमता तो बोल, खालीपिली टाईम पास मत कर...."

"मै क्या बोलता, वो दुबै तक जाने का मॅटर करेंगेच नहीं हम लोग तो?"

"तो फिर किसी कोपचेकापचे में गुपचूप बड्डे मनाना पडेंगा.. मजाकसे भी भाई को मालूम पडा ना तो तेरे सर में आठ, और मेरे सर में आठ कँडल लगा देगा वो"

"नै.. अपने को इतना मचमच करनेका है ही नही. आदमी गायब हो जावे बस....."

"फिरभी पुलिस का चक्कर तो आता हैच ना भाय.. किसीको ठोकेगा तो पुलिस बराब्बर समजती के किसने गेम कियेला है.. तेरेपास तो पैले पोचेगा.. फिर?"

"आप उसका थोबडा बिगाड देने का.... पुलिस उसका पैचान नही कर पायेगा... पुरा मॅगझिन उतार देने का उसके थोबडे पे..."

"मतलब.. कोपचे में ले के.. आराम से बैठके उसका थोबडे का मेक अप भी करने का? भोत मुश्किल काम होता रे वो.. तेरे को क्या सचमें बड्डे लगा क्या.... मतलब ऐसा केकपर से क्रीम उठाया और घिस दिया के कोई पैचानेइच ना बड्डे किसका है... बीस पच्चीस गोली तो पूरा शेप बिगाडने में लग जाता है... आजकल वो साला दात भी तोडना पडता है."

"उतना कर देने का भाइ.. आपके सिवा कोई भी इतना बडा गुर्देवाला अख्खा इंडियामें नही है भाई.. इसके वास्ते आपके पास आया"

"ओके, लेकीन फिरभी कोई पोलिटीशियन घुसेगाइच रे बीचमें.... इन लोगो को जिधर बास आताय उधर पैले सुंघते जाताय रे... पुरा बखेडा खडा कर देता है.. दस लाख से कम में मानेगाईच नही रे वो.."

"मै क्या बोलता भाय.. अपन इधर को ये काम करनेकाईच नही.... ट्रेकिंगपे किधरतो भी दूर गावखेडेमें ले जायेंगे... उधर दोन महिना लाश मिलेगाच नही... मै पुरा बंदोबस्त कर दूंगा.... आपको बस ठोकनेका काम रहेगा..."

"अबे लेकीन वो नया घोडा लाने का है.. उसका पाच लाख तो देगा की नही....?"

"सुनो ना... तुमको घोडा और बुलेट मैंच लाके दिया तो कैसा रहेगा?"

"वो भी तूच लाके देगा?"

"हां ... "

"ठिक है तो.. कल पांच पेटी लेकर आजा... साथमें बंदे का फोटो और पुरा डिट्टेल लेके आने का"

" अरे भाइ, अब पांच लाख किस बात का...."

"अबे, तेरा दिमाग खराब है क्या... घोडा तो मेरे कोही चलानेका ना? उसका तो पैसा देनेवाला है की नही तू...."

"उसका क्या पैसा मांगते भाई आप.. वो तो आपका रोजका काम है... खाली ट्रीगर तो दबाने का है.... उसका पांच लाख मतलब कुच्छ भी बोलते हो आप... वो तो क्या कोई भी कर सकता है.... उसमें इतना क्या है?"

(Just a normal day in the life of any professional)

समाज प्रबोधन

काही ठिकाणी वाचलं की नास्तिक, पुरोगामी मंडळींना समाजाची नस ओळखता येत नाही. त्यांना समाजमनाशी जुळवून घेता येत नाही, समरस होता येत नाही. ज्यांना समाजाचं मन ओळखून हात घालता येतो ती माणसं समाजाला जास्त जवळची वाटतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता समाजात जास्त वाढली आहे. लोक त्यांना जास्त मानतात. पुरोगामी लोक धर्माच्या विरोधात असतात त्यामुळे समाजाला आवडत नाहीत, समाज त्यांना स्विकारत नाहीत अशा स्वरुपाचे हे आर्ग्युमेंट आहे. थोडक्यात काय तर समाजात स्विकारले जायचे असेल तर पुरोगामी-समाजवादी लोकांनी समाजाचे लांगुलचालन करावं. म्हणजेच समाजमान्यतेपुढे लोटांगण घालावे, अन्यथा गप्प बसावे. "You are not welcome here anymore" असे पुरोगामी लोकांना सुनावण्याची ही एक वेगळी पद्धत आहे.

खरोखरच ज्याला थोडीफार समज असेल त्याला हे नक्की समजेल की समाज प्रबोधन हे काही सुखाने फुलांच्या गादीवर बसून गोडगोड, लोकांना आवडतील अशी भाषणं करणे नसतं. समाजप्रबोधन ही काट्याकुट्याची वाट आहे, समाजाला रसातळाला नेणार्‍या प्रस्थापित मान्यता आणि पाखंडी अधिकार्‍यांना विरोध करुन जनतेला पुढे न्यायचे असते.

समाज प्रबोधन म्हणजे मुळातच जे समाजाला पटत नाही, पण स्वीकारणं गरजेचे आहे ते कडूगोड जमेल तसे मांडणे असते. कोणताही समाज त्याचं सहज स्वागत करत नसतो...

धार्मिक प्रवचन, बुवाबाजी, भाषण, कीर्तन करणाऱ्या लोकांनी समाजाचे लांगुलचालन केलं म्हणून त्यांना समाज डोक्यावर घेऊन नाचतो आहे. समाज जिकडे वळतो तिकडच्या तोंडाला जाऊन हे उभे राहतात. कोणत्या वाक्यावर पुढ्यात बसलेले लोक जास्त मान डोलावतात, कोणत्या वाक्यावर जास्त हशा पिकतो, कोणत्या वाक्यावर सहमती मिळते ह्या तद्दन व्यावहारिक दृष्टीकोनातून ही किर्तने-प्रवचने घडत असतात. कारण त्यावरच टीआरपी असतो. टीआरपीवर समाजमान्यता आणि ओघानेच पैसाही मिळतो. या सर्व व्यवहाराचा अध्यात्माशी-धर्माशी काडीचाही संबंध नाही.

खरेखुरे अध्यात्म, खराखुरा धर्म ह्या समाजाला झेपतच नाही. हजारो वर्षे झाली. इथे शेकडो संत होऊन गेले त्यांनी आपल्या पध्दतीने समाजाला सोप्यात सोप्या मार्गाने अध्यात्म सांगून मोक्षाचा मार्ग सांगितला आहे. काहीही फरक पडला नाही. लोक त्यांना डोक्यावर घेतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाची माती करतात. कारण खरं अध्यात्म स्वीकारणे महाकर्मकठीण असते. हे सर्व संतांच्या लक्षात आले म्हणून नामसंकिर्तन हा ध्यानाचा अतिशय सोपा मार्ग वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पुढे आला.

नाम संकीर्तन साधन पै सोपे । जळतील पापे जन्मांतरीची ।

न लगे सायास जावे वनातरा । सुखी येती घरा नारायणा ॥धृ॥

ठाईच बैसोनी करा एक चित्त । आवडी अनंत आळवावा ॥१॥

रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्व काळ ॥२॥

तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनी । शहाणा तो धनी येतो तेथे ॥३॥

जगातला प्रत्येक जीव मो़क्षाच्या रोखाने मार्गक्रमण करत असतो. अध्यात्ममार्गात प्रत्येक मनुष्यप्राण्याची इयत्ता वेगवेगळी आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पायरीवर असून पुढे जाण्यासाठी मार्ग शोधत असतो. शेकडो प्रकारच्या साधना आहेत. काही कठिण आहेत, काही सोप्या आहेत. काही लोकांना देवपुजा, कर्मकांड हा मार्ग योग्य वाटतो. तर काही लोक देवपुजा, कर्मकांड, ईश्वर संकल्पना ह्यातून पुढे निघून गेलेले असतात. मोक्ष मिळवण्याआधीच्या पायर्‍यासुद्धा प्रचंड कठीण असतात. अनेक संतांनी प्रयोग करुन ईश्वर कसा प्राप्त करावा ह्याच्या पद्धती शोधून काढल्या. जेव्हा त्यांना इश्वरप्राप्ती झाली तेव्हा त्यांना कळले की ईश्वर वगैरे काहीही नसते, आपण स्वतःच ईश्वर झालो आहोत. ज्या त्या संतांच्या अनुभूती, आकलन, क्षमता आणि संस्कृतीनुसार त्यांनी त्यांनी आपण स्वतः ईश्वर झाल्याचे सांगितले आहे. खुद्द तुकाराम महाराज म्हणतात - "देव पाहावया गेलो । तेथे देवचि होवून ठेलो ॥". ज्ञानेश्वर महाराज म्हणतात "अरे अरे ज्ञाना झालासी पावन । तुझें तुज ध्यान कळों आलें ।। तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फिटला संदेह अन्यतत्वी ।।".

ह्या सर्व महाराष्ट्रीय संतांनी विठ्ठलाला दैवत मानलेले आहे. यज्ञ-याग-पूजा सारखी कर्मकांडे सोडून देऊन केवळ नामसंकिर्तनातून देवप्राप्ती-इश्वरप्राप्ती-मोक्षप्राप्ती होऊ शकते हा सोपा मार्ग, भक्तीमार्ग त्यांनी जनतेला सांगितला आहे. हे त्या काळातही क्रांतिकारकच होते. हे पुरोगामी वागणेच होते. संतांसाठी हा मार्ग काही सोपा नव्हता. कोणालाही लगेच सर्व जनतेने डोक्यावर घेतलेले नाही. परंतु हळूहळू काही लोकांना त्यांच्या सुचवलेल्या मार्गाने मानसिक शांती मिळू लागली. व्यक्तिगत आयुष्यात स्थैर्य येऊ लागले. (जे कोणत्याही ध्यानाच्या पद्धतीने साध्य होऊ शकते, नामसंकिर्तन ही सुद्धा एक ध्यानपद्धती आहे) काही लोकांचे पाहून मग अधिक लोकांनी त्याप्रमाणे वागणे सुरु केले. हळूहळू जनतेने अध्यात्माचा मार्ग सोडून, त्याचा संदेश देणार्‍या या संतांनाच पूजणे-भजणे सुरु केले. कारण बहुसंख्य लोकांना साधनेपेक्षा साधनेच्या आडंबरात जास्त रस असतो. अभ्यास करुन परिक्षा पास करण्यापेक्षा कॉपी करुन सर्टीफिकेट मिळवण्यात जसा रस असतो तसेच इथेही. मग जे व्हायचे तेच होते. खरी मानसिक शांती मिळवायचे सोडून, आम्ही कसे वारकरी-विठ्ठलभक्त आहोत ह्याचे ढोंग सुरु झाले. 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' असा जयघोष करतांना त्यांची खरी शिकवण सगळेच विसरले. आता जो काही राहिला आहे तो फक्त कर्मकांडांचा ढोंगी बनाव आहे. हे हरिनाम सप्ताह, भजने किर्तने केवळ आपण किती देवभक्त आहोत हे दाखवण्याचे कार्यक्रम आहेत. कारण देवभक्त असल्याने समाजात जास्त मान मिळतो म्हणून सारेच स्वतःला देवभक्त म्हणवून घेऊ लागले. ज्ञानोबा-तुकोबाचा खरा अनुयायी असलेला अशा गर्दीपासून दूरच राहील. कारण ह्यात विठ्ठल नाही हे त्याला अचूक कळलेले असते.

ज्ञानोबा-तुकोबा खरे पुरोगामी होते. समाज जे करतो आहे त्यावर कठोर प्रहार करणारे तुकाराम महाराज कधी समाजाच्या लांगुलचालनाच्या नादी लागले नाहीत. कि त्यांनी कधी फिकीर केली की मी समाजाच्या विरोधात बोललो तर लोक काय म्हणतील. लोकांनी महाराज म्हणावे, लोकांनी मान द्यावा म्हणून ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' लिहिली नव्हती. संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई ह्यांनी समाजाने आम्हाला चांगले म्हणावे म्हणून कोणत्याही पद्धतीने समाजमनाचा अंदाज घेऊन, त्यांचे मनोरंजन करण्यासाठी आपले साहित्य प्रसवले नाही.

हे सर्व संत लोकमान्यता, लोकप्रियता, लोकाभिमुखता ह्या सर्वांच्या पलिकडे गेलेले होते. लोकांच्या मार्गाने जाण्यापेक्षा लोकांना आपल्या मार्गावर आणण्यास भाग पाडणारे हे सर्व महात्मे होते. माझे अभंग आवडतील का म्हणून कोणी अभंग लिहित नव्हते. ती अंतरीची जाण होती, तो दिव्य अनुभव होता, स्वतःला झालेली परमात्म्याची प्राप्ती कोण्या शब्दातून कसं सांगू अशी बालसुलभ भावना होती. मला झाली तशी इतरांनाही होऊ देत असा मैत्रभाव होता. पसायदानाचा अर्थ हाच तर आहे. "दुरितांचे तिमिर जावो |विश्व स्वधर्मसूर्ये पाहो | जो जे वांछील तो ते लाहो |प्राणिजात |" ह्या ओवीत ज्ञानेश्वर जो स्वधर्म सांगत आहेत तो काही हिंदु-जैन-बौद्ध-इस्लाम धर्म नव्हे. प्रत्येक जीवाचा स्वतःचा धर्म आहे. त्याचे भान त्याला येऊ देत अशी ही प्रार्थना आहे. भागवतधर्म म्हणजे ह्या सर्व आचारविचारांत, भक्तीमार्गात-नामसंकिर्तनात विश्वास ठेवणारे लोक होत. पण आता अभंगाच्या अर्थाची अनुभूती न घेता टाळ-मृदूंग कुटत संध्याकाळ साजरी करणार्‍यांनी ह्या धर्माला हायजॅक केले आहे.

नामसंकिर्तन ही समाधीवस्था मिळवण्याचा मार्ग आहे. नामसंकिर्तनाकडे लोकांनी वळावे, त्यासाठीची पूर्वतयारी कशी करावी ह्यासाठी किर्तन असते. संतांनी काय सांगितले त्याचे सोप्या भाषेत निरुपण करण्याचे काम किर्तनकाराचे असते. त्यासाठी अभ्यास आणि पाठांतरापेक्षा अनुभूती फार महत्त्वाची असते. ही अनुभूती कोणताही ट्रेनिंग कोर्स करुन येत नाही. अनूभूती असेल तर पाठांतर आणि अभ्यासाची गरज पडत नाही. ते आपसूकच अंतरीतून सहज येते. लोकांचे मनोरंजन किंवा समाजाचे प्रबोधन करण्यासाठी किर्तन नसते. त्यासाठी तमाशा आहे, गणगवळण आहे, बतावणी आहे. त्यातून उत्तम मनोरंजन आणि जनजागृती होऊ शकते. देशाच्या राजकारणात काय चालू आहे, ते योग्य आहे की अयोग्य आहे, ३७० चांगले झाले, हिंदुराष्ट्र व्हायला पाहिजे, हिंदूंनी जागृत व्हायला पाहिजे अशा स्वरुपाच्या राजकिय प्रचाराची किर्तन ही जागा नव्हे. भागवतधर्म 'वसुधैव कुटूंबकम्' ह्या संकल्पनेला मानणारे आहे. वर्ल्ड-सिटीझन, जगाचा नागरिक ही संकल्पना भागवतधर्म मानतो. त्याला हे हिंदु-मुस्लिम, भारत-पाकिस्तान, जातपात असल्या गोष्टींमध्ये पडायची गरज नाही.

लोकांना आपल्या भागात हरिनाम सप्ताह करुन अवडंबर करायची भारी खोड असते. त्यामुळे किर्तनकारांची डिमांड वाढली. आता डिमांड म्हटली की जशी मागणी तसा पुरवठा होऊ लागला. अनूभुतीसंपन्न निरुपण करणारे किर्तनकार नाहीतच अशातला भाग नाही. पण ते प्रसिद्ध नाहीत ह्यातच काय ते ओळखा. ज्या प्रकारची किर्तने लोकप्रिय होत आहेत त्यावरुन हेच लक्षात येते की खरा भागवतधर्म लोप पावत चालला आहे. इथे फक्त इंदुरिकरच एकटे दोषी नाहीत. अनेक नवे-जुने कलाकार आहेत. त्यांना प्रोत्साहन देणारा सर्व समाज आहे. ह्या सर्व लोकांनी काहीतरी वेगळेच क्लबटाईप सुरु केले आहे. तोंडी लावण्यापुरते देवाचे नाव घेतले, अभंग-ओव्या पुटपुटल्या की झाले. हे किर्तनकार नव्हेत, कलाकार आहेत. लहान मुले जशी घरातली भाजी-पोळी खायचा कंटाळा करतात पण कुरकुरे चटाचट खातात तसे लोकांना या कुरकुरे किर्तनांचे व्यसन लागले आहे. त्यालाच हे पूर्णब्रह्म समजत आहेत हे आणखी वाईट.

मागच्या काही दिवसांत इंदुरीकरांच्या वक्तव्यांवरुन झालेल्या गदारोळात मला एक गोष्ट खटकली. ती म्हणजे इंदुरीकरांनी काय वक्तव्ये केली ती केलीत, पण त्या वक्तव्यांचा अर्थ काय होतो हे समजून-उमजूनही बहुसंख्य लोक त्या वक्तव्यांची पाठराखण करत होते. हे पाठराखण करणारे लोक भागवतधर्माला खड्ड्यात घालत आहेत असे माझे मत आहे. ह्यांना खरेच भक्तीमार्ग, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि संतसाहित्य ह्याचे कसलेही ज्ञान नाही हे कळून येत आहे. अन्यथा इंदुरीकरांना खूप आधीच विरोध झाला असता.

पुरोगामींना जसे हिंदूद्वेषी म्हणून आधीच रंगवण्यात आलेले आहे, त्याच स्वरुपात इंदुरीकरांवर पुरोगामी लोक टिका करत आहेत म्हणून आताही झालेले दिसून आले. पुरोगामी-नास्तिकांना हिंदूंचे काहीच आवडत नाहीत म्हणून ते असले वाद उकरुन काढतात आणि आमच्या श्रद्धास्थानांची बदनामी करतात असे विचार इंदुरीकर-भक्तांकडून आले आहेत. हे आश्चर्यकारक नसले तरी खेदजनक नक्कीच आहे. पुरोगामी सांप्रत समाजाला गोड वाटणार्‍या विषापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणारे असतात. त्यांनी समाजाला आवडेल तसे करणे शक्यच नसते. हे संतांच्या पुरोगामी आचरणांतून सहज कळून येते.

भागवतधर्माला ग्लानी आली आहे. लवकरच हे मळभ दूर हटून विश्वाला स्वधर्माचा सूर्य पाहण्याची संधी लाभो असा मैत्रभाव व्यक्त करतो.

तरुण उद्योजकांनी लग्नासाठी स्थळे पाहतांना

थोडा वेगळा आणि महत्त्वाचा विषय आहे. वादाचा आणि मतभेदाचाही असू शकतो.

काल माझ्या एका जवळच्या मित्राशी गप्पा मारतांना नेहमीप्रमाणे मुलाबाळांचा, घरसंसाराचा विषय निघाला. मित्र उद्योजक आहे, अजून खूप मोठा झाला नसला तर खूप धडपड्या आणि चांगला कलाकार आहे. स्वतःचा व्यवसाय असावा ह्याबद्दल त्याचे पूर्वीपासूनच ठाम मत होते. अगदी कलाक्षेत्रात असली तरी नोकरी करणारच नाही हे पक्के होते. कलेच्या क्षेत्रात वैयक्तिक फ्रीलान्स व्यवसाय हा काही खात्रीचा आणि नियमित आर्थिक स्रोत असणारा प्रकार नसतो. त्यामुळे आर्थिक बाबतीत परिस्थिती दोलायमान राहणार आहे हेही ठावूक होते. 'सेटल्ड' अशी परिस्थिती शक्यतो घरातून पहिल्याच असलेल्या उद्योजकांच्या बाबतीत पस्तीशी-चाळीशीपर्यंत येत नाही. पण योग्य वेळी लग्न करणे तर आवश्यक असते. कुटूंबाचा दबाव असतो. त्यामुळे लग्नासाठी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम जेव्हा सुरु झाला तेव्हा ह्याने काही गोष्टी स्पष्ट केल्या. त्यातली एक महत्त्वाची होती ती म्हणजे मुलगी अशा घरातून नको जिथे परंपरागत नोकरीचे वातावरण आहे. मुलीचे आई-वडील, काका, मामा वगैरे गोतावळा सरकारी किंवा खाजगी कोणत्याही प्रकारच्या नोकरीत आहे असे वातावरण असले तर त्यांची विचारसरणी वेगळी पडते. उद्योजकीय वातावरणात त्यांना जुळवून घेणे अतिशय कठिण जाऊ शकते. मला त्याचे हे विचार खूपच वेगळे आणि महत्त्वाचे वाटले. बाकी कोणत्याही गोष्टीत मतभेद, मतभिन्नता असली तरी आर्थिक बाबतीत दाम्पत्यांचे खटके उडत असतील तर ती फार विचित्र परिस्थिती होते.

नोकरी असणार्‍या घरात महिन्याच्या ठराविक तारखेला अमूक एक रक्कम येणार म्हणजे येणारच अशी शंभर टक्के खात्री असते. नोकरदाराचे आणि त्याच्या कुटूंबातल्या सर्वच सदस्यांचे सर्व आयुष्य त्या एका तारखेभोवती, त्या एका आकड्याभोवती गुंफलेले असते. लहानपणापासून ह्या सेटींगमध्ये आयुष्य गेले असते. महत्त्वाचे म्हणजे कळायला लागायच्या आधीपासूनच त्या वातावरणात वाढलेले असल्याने नकळत मानसिकता तशी बांधली गेलेली असते. अर्थात हा काही नैसर्गिक नियम नाही, अपवाद असतात. पण बहुतांश परिस्थिती अशी असते. आयुष्याची पंचवीस वर्षे अशा गारंटीड इन्कम असलेल्या सेट-अप मध्ये घालवल्यावर अचानक प्रचंड वेगळ्याच वातावरणात फेकल्या गेल्याने मुलीला त्या वातावरणाशी जुळवून घेणे जमेलच असे नसते. महिन्याला अमूक इतके पैसे येतीलच अशी कोणतीही खात्री नसते. कधी आणि किती पैसे येतील ह्याची खात्री नसते. आले तर खूप येतात किंवा बरेच दिवस एक रुपयाही शिल्लक नसतो अशी परिस्थिती असते. खर्चाचे नियोजन करणे, कोणता खर्च कधी करायचा, करायचा की नाही ह्याचे विचार करावे लागतात. अनेकदा पैसे येतील म्हणून केलेले नियोजन ऐनवेळी रद्द करावे लागते. ह्या सर्व गोष्टी मानसिक पातळीवर हाताळणे फार फार कठीण असते.

तरुण उद्योजकाच्या आयुष्यातला हा सुरुवातीचा काळ असतो. बर्‍याच गोष्टी स्थिरस्थावर झालेल्या नसतात. आर्थिक फसवणूक, अंदाज चुकणे, अपयश हा पहिल्या काही वर्षातला अटळ भाग असतोच असतो. हीच नेमकी वर्षे लग्नाच्या सुरुवातीची असतात, ज्या काळातल्या इच्छा, आकांक्षा, काही वेगळ्या स्वप्नवत पातळीवर असतात. तेव्हा ती स्वप्ने पूर्ण होत नसतील तर साहजिक संबंधांत वितुष्ट येऊ शकते. दुसर्‍याने आपल्याला समजून घ्यावे हे नेहमीच आपण गृहित धरु शकत नाही. अमक्या-तमक्याच्या बायकोने कसा आधार दिला, सांभाळून घेतले वगैरे किस्से आपल्या स्वतःच्या काही उपयोगाचे नसतात. आपल्याला आपला स्वतःचा संसार एका वेगळ्या व्यक्तीबरोबर करायचा असतो. तिला तिच्या स्वतःच्या इच्छा-स्वप्ने असतात. ती आपल्याला सांभाळून घेईल असे गृहित धरणे अयोग्य असते. हा सर्व भावभावनांचा पसारा प्रत्येक व्यक्तीला सदासर्वकाळ हाताळता येणे आणि शांत राहून सहन करणे शक्य होईलच असे नसते. अशावेळी उद्योजक दुहेरी संकटात सापडू शकतो. उद्योगातला ताण-तणाव आणि कुटूंबातला ताण-तणाव दोन्ही पातळीवर दोन लढाया लढणे मानसिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक असते. प्रचंड प्रेम आहे म्हणून कोणी सहन केलं जरी तरी हा सहन करण्याचाही मानसिक ताण त्या व्यक्तीवर येतो व कालांतराने तो इतर बाबतीत डोकावू लागतो. शारीरिक आजारपणे, मानसिक आजार उद्भवू शकतात.

उद्योगव्यवसायांची परंपरा असलेल्या घरांमधून, जसे की गुजराती, मारवाडी, सिंधी, जैन इत्यादी हे प्रश्न सहसा आढळत नाहीत. कारण त्यांचे लहानपणापासून त्यादृष्टीनेच संगोपन, संस्कार झालेले असतात. त्यामुळे दुकान, धंदा सांभाळायला ह्या घरांमधून अधिकाधिक स्त्रिया पुढाकार घेऊन योगदान देत असतात, आर्थिक व्यवहार सांभाळत असतात हे दिसून येते. मराठी घरांमधून हे अजून तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. अगदी पारंपरिक दुकाने-व्यवसाय असलेल्या मराठी घरांमधूनही स्त्रिया उद्योग सांभाळतांना फारशा मला दिसलेल्या नाहीत. (माझे निरिक्षण चुकीचे असू शकते. माझ्याकडे आकडेवारी नाही.)

तर मुद्दा असा आहे की लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आपले लग्न केवळ आपल्यासाठी नसते तर ज्याच्या/जिच्यासोबत लग्न करतोय त्या व्यक्तीसाठीही महत्त्वाचे असते. त्यामुळे उद्योजकाने लग्नासंबंधी विचार करतांना ह्या सर्व पार्श्वभूमीचा जरा खोलात विचार करावा. आपल्या होणार्‍या पत्नीला आपण जे धगधगते आयुष्य अंगिकारले आहे त्याची स्पष्ट कल्पना द्यावी. तुमच्या मनात बिझनेसच करायचा आहे असे विचार असतील तर ते आधीच स्पष्ट करावे. जरी तुम्ही सुरुवातीचा काही काळ नोकरी करत असाल आणि काही काळाने स्वतःचा व्यवसाय सुरु करणार असाल तरीही ते स्पष्ट केले पाहिजे. काही लोक लग्न होण्यापुरते कुठेतरी नोकरी धरतात आणि एकदा लग्न झाले की मग खरे दात दाखवतात तसे अजिबात करु नये. एका व्यक्तीच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचा आपल्याला कोणताही हक्क नसतो. 'नंतर होईलच सगळे नीट', 'काही झाले तरी ती कुठे जाणार, तीला अ‍ॅडजस्ट करावे लागेलच' अशा भ्रमात राहू नये. लव असो की अरेंज, शेवटी लग्न हा करार आहे. दोघांचा समान अधिकार आहे. सर्व अटी-शर्ती सुरुवातीलाच स्पष्ट करणे आवश्यक आहे. कोणालाही फसवून लग्न करणे अंतिमतः कोणाच्याही फायद्याचे ठरत नाही.

लग्नासाठी स्थळे पाहतांना तरुण उद्योजकांनी ह्या पैलूचाही विचार करावा हे आपल्याला योग्य वाटते का ? कमेंटमध्ये नक्की चर्चा करूयात.

ये क्या हो रहा है दुर्योधन? - भाग १

औद्योगिक क्रांतीने बौद्धिक कर्तबगारीला शारीरिक कर्तबगारीपेक्षा अधिक वाव मिळण्याचे युग आणले. बौद्धिक कर्तबगारीची पिढीजात परंपरा असणारे अनुकूल परिस्थिती मिळाल्याने प्रचंड वेगाने पुढे गेले. पिढ्यानिपिढ्या शारीरिक कर्तबगारीत गेलेल्यांना मात्र ह्या अचानक उद्भवलेल्या नव्या परिस्थितीचा नक्की कसा सामना करावा ते कधीच कळले नाही. उत्सवांमध्ये वाढत चाललेला उन्माद हा अनेक अंगाने जटील प्रश्न बनत चालला आहे तो ह्याचमुळे. आपण इथवर अचानक कुठून कसे काय आलो ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा एक प्रयत्न.

संपूर्ण जगात भारतातली संस्कृती सर्वात जुन्या सिव्हिलायझेशनपैकी एक आहे. सभ्यता, सिव्हिलायझेशन, संस्कृती हा विचित्र गुंतागुंतीची रचना आहे. किमान पाच हजार वर्षांपूर्वीही भारतात गाव, नगर अशी प्रगत व्यवस्था होती. वनजीवनावर आधारित आदिवासी सभ्यता आणि कृषीआधारित नागरसंस्कृतीत मोठा फरक असतो. शक्यतो आदिवासी लोक आपल्या दैनंदिन जीवनातली सगळी कामे स्वतःची स्वतःच करतात. तर नागरसंस्कृतीत वेगवेगळ्या कौशल्याची विशिष्ट माणसे एकमेकांना मदत करत जीवन जगत असतात.

आदिवासी लोक अजूनही हंटर-गॅदरर म्हणजे शिकार करणे आणि फळे-कंदमुळे गोळा करणे ह्या आदिम (प्रिमिटीव्ह) अवस्थेत आहेत. ह्या कामासाठी त्यांना इतर कोणाची मदत लागत नाही. शिकारीसाठी लागणारी साधने स्वतःच तयार करतात, त्याचे नियोजन स्वतःच करतात, प्रत्यक्ष शिकारही स्वतःच करतात, त्याची वाटणीही स्वतःच करतात. आदिवासी एक मोठे कुटूंब असल्यासारखे असते ज्यात सर्वजण एकत्र काम करतात.

कृषकसमाजाच्या गरजा अवाढव्य असतात. मोठमोठ्या जमीनींवर शेती करुन गरजेपेक्षा मोठ्या प्रमाणात धान्य पिकवणे. ते मोठ्या काळासाठी साठवून ठेवणे ही कृषक समाजाची ठळक ओळख. बी पेरण्यापासून धान्यसाठा करेपर्यंतच्या सर्व प्रक्रियेत अनेक भाग असतात. त्यासाठी वेगवेगळी कौशल्ये लागतात. ती सर्व कौशल्ये एकाच व्यक्तीकडे असणे शक्य नसते. शेती ही सामुहिक कौशल्यांचा आविष्कार आहे तर शिकार ही वैयक्तिक कौशल्याचा. शेतीसंबंधीत सर्व प्रक्रिया, कौशल्ये आणि उत्पादन ह्यांचे संरक्षण करणे हा एक मोठा आणि महत्त्वाचा भाग ठरला. जसजशी शेतीआधारीत वस्ती वाढत गेली, तशा शेतीउत्पादनाच्या गरजा वाढत गेल्या. जशा गरजा वाढत गेल्या तशी कामे वाढली. मग काही माणसे शेतीसाठी लागणारी काही विशिष्ट कामेच करु लागली. त्यातून त्यांचे त्याबाबतीतले कौशल्य विकसित होऊ लागले. मग हळूहळू त्यांना त्यांच्या कामानुसार नावे मिळाली. अशा तर्‍हेने मुख्य उत्पादन, त्याच्याशी संबंधित सेवा, संरक्षण, व्यवस्थापन असे चार भाग पडले. ह्या चार भागांचे आणखी बारीक-सारिक कामांच्या प्रमाणे शेकडो भाग झाले. अशा शेकडो लोकांनी मिळून नागरसंस्कृती विकसित झाली. मग नागरसंस्कृतीच्या विशेष गरजा निर्माण झाल्या आणि त्या पुरवणार्‍या विशेष कौशल्य असणार्‍या माणसांचे गट तयार झाले. आता हे ढोबळ चित्र आहे कामावर आधारित गटव्यवस्थेचे. ह्या गटव्यवस्थेत फार सुरुवातीला उच्चनिच अशी वर्गवारी नसावी. गटव्यवस्थेतल्या प्रत्येकाचे काम महत्त्वाचे होते. सर्व लोक एकमेकांवर अवलंबून असल्याने सर्वांना समान दर्जा असावा.

ही सर्व कामे सुमारे दहा हजार वर्षांपर्यंत मुख्यत्वेकरुन शारीरिक श्रमावर आधारित होती. बुद्धीकौशल्य जेवढ्यास तेवढे असेच आवश्यक होते. प्रत्येक गटाला आपल्या कामाचे महत्त्व लक्षात आल्याने आपल्या मुलांसाठी वारसा म्हणून ही कामे, कौशल्ये आणि अधिकार हस्तांतरित करण्याची सवय लागली. आपल्या कामाची कौशल्ये इतर कोणी शिकू नये, आपल्या अधिकारावर पर्यायाने उपजिविकेच्या साधनांवर इतर कोणी आक्रमण करु नये म्हणून कुटूंबाबाहेर हे ज्ञान कुणाला दिले जात नसे. आजही अनेक परंपरागत व्यवसायांत असे आढळून येते. त्यामुळे कुटूंबातूनच कौशल्ये हस्तांतरित होत राहीली व त्यातून जन्माला आल्या त्या जाती. जातीच्या लोकांशी जास्त माया असण्याचे महत्त्वाचे कारण अधिकार आणि कौशल्ये असावीत. त्यातून अस्मिता निर्माण झाल्या असाव्यात. हजारो वर्षांच्या काळात हजारो पिढ्यांमधून ही कौशल्ये पुढच्या पिढीला जबरदस्तीने शिकवली गेली. नविन वाटा धुंडाळायच्या नाहीत कारण ती कौशल्ये एक तर कोणी शिकवत नाही. (एकलव्याची कथा इथे प्रातिनिधिक आहे.) स्वतःची स्वतः शिकायची म्हटले तर ती शिकून पारंगत होण्यास वीसेक वर्षे जाऊ शकतात, तोपर्यंत पोटापाण्याचे काय ही महत्त्वाची अडचण होती. बहुतेक व्यवहार बार्टर सिस्टीम म्हणजे वस्तुविनिमयावर आधारित व जातीआधारित असल्याने तशी ही सर्व नागरसंस्कृती हार्ड टू ब्रेक अशी कठिण झालेली होती.

क्रमशः

"द रेड बोल्ड नंबर"

प्रकाश आपल्या आलिशान केबिनमध्ये डोक्याला दोन्ही हात लावून बसला होता. त्याच्यासमोर काही पेपर्स अस्ताव्यस्त पडलेले होते. नुकत्याच झालेल्या टोटल हेल्थ चेक-अप प्रोग्रामचे टेस्ट रिझल्ट्स आले होते. त्यातल्या अगम्य आकड्यांकडे बघून प्रकाश आधी तर साशंक झाला. मग बोल्ड केलेल्या काही आकड्यांना बघून जरा घाबरला. लगेच त्याने इंटरनेटवर त्या आकड्यांचे अर्थ लावण्यासाठी सर्चवर सर्च सुरु केले. येणारे रिझल्ट वाचून त्याला गार एसीमध्ये घाम फुटू लागला. तेवढ्यात टेबलावरचा फोन खणखणला. सेक्रेटरी विचारत होती, पुढची मीटींग आहे पंधरा मिनिटांत. म्हणाला "कॅन्सल कर. पोस्टपोन कर. आजच्या सर्व मिटींग कॅन्सल कर. आणि मला परत फोन करु नकोस." सेक्रेटरीला आश्चर्य वाटले. असे तर कधीच झाले नव्हते.

सर्च रिझल्ट्समध्ये आलेल्या वेगवेगळ्या आर्टिकल्स, रीसर्च पेपर्स, इमेजेसमधून गुंतागुंतीची आणि परस्परविरोधी माहिती त्याला मिळत होती. त्याने तो पुरता गोंधळून गेला होता. त्याच्या टेस्टमधल्या त्या बोल्ड असलेल्या नंबरने प्रकाशचे धाबे दणाणले होते. त्या आकड्यावरुन कोणता रोग आहे, काय लक्षणे आहेत, लास्ट स्टेज काय असते, आपण कोणत्या स्टेजला आहोत, आपल्यात गेल्या काही दिवसांत कोणती लक्षणे जाणवली होती ह्या सगळ्याचा विचार करता करता त्याचे डोके गरगरु लागले. थोड्याच महिन्यांत आपला कारभार आटोपणार आहे हे सत्य हातापायांच्या टोकांकडून, रक्तवाहिन्यांमधून जोरात वाहत, डोक्यात टाचणीसारखे भस्सकन घुसत होते.

वय उणेपुरे पंचेचाळीस वर्षे. 'इथवर, ह्या पोझिशनला पोचायला काय काय कष्ट घेतले. तेव्हा कुठे आज ह्या मल्टीनॅशनल कंपनीचा एशीयन रिजनचा सीईओ म्हणून ह्या केबिनमध्ये बसलो आहे'. हताश मनाने प्रकाश आपल्या खुर्चीतुन उठला. आपला चष्मा काढून त्याने हळूच टेबलावर टेकवला. केबीनच्या दुसर्या कोपर्यातल्या कपाटाकडे गेला. त्यातून व्हिस्की काढली. एक मोठा ग्लास ओतून घेत तो बाहेरच्या रणरणत्या उन्हात, चमचमणार्या काचांच्या, शेकडो हायराइज टॉवर्सकडे पाहू लागला. चाळीसाव्या मजल्यावरुन उडी मारल्यास खालच्या पार्किंगमधल्या मोकळ्या ग्रॅनाईटवर आपटू की एखाद्या मर्सिडीज, ऑडी, बीमरच्या स्कायरुफवर आदळू - असा पुसट विचार त्याच्या मनात डोकावला. कदाचित तिथवर पोचण्याआधीच प्राण जाऊ शकेल. असा दिलासायुक्त विचार आल्याने त्याला थोडेसे हायसे वाटले. उंचावरुन उडी मारल्यावर नक्की कसे मरण येते ह्याबद्दल एखादा गुगल सर्च मारावा असेही त्याला वाटले. पण हातातली व्हिस्की ह्या क्षणी मोठा आधार देत आहे असे त्याला जाणवले. तो तसाच थांबला.

लांब आकाशात, दर पाच मिनिटाला एक विमान उत्तर दिशेकडून पुर्वेकडे झेपावत होते. त्या प्रत्येक पाच मिनिटाच्या ब्रेकमध्ये त्याला त्याच्या बालपणापासून ते आताच्या घटनेपर्यंतचा एक एक टप्पा आठवत होता. अजिबात सोपे नव्हते प्रकाशसाठी इथवर पोचणे. आणि आता इथून पुढे मात्र ह्या सार्या अचिव्हमेंटला काय अर्थ राहणार होता? व्हिस्कीच्या हरेक ग्लासागणिक हा प्रश्न त्याचा गळा चिरत चिरत अधिकाधिक मोठा होत होता.

टेक-ऑफ घेणार्या विमानांचे आता फ्क्त दिवेच दिसू लागले होते. संध्याकाळ उलटूनही बराच वेळ झाला होता. सेक्रेटरीने बराच वेळ वाट पाहून शेवटी आत प्रवेश केलाच. तेव्हा सरांचा असा अवतार पाहून आल्यापावली परत जावे की कसे ह्या संभ्रमात तिथेच घुटमळत उभी राहीली. सदैव चाणाक्ष, चपळ आणि धारदार दिसणार्या प्रकाशसरांच्या चेहर्यावर, लाकडावरच्या सुंदर कलाकुसरीला कोणीतरी रंधा मारुन सपाट करुन टाकावे अशी अवकळा दिसत होती. तीन-चार वेळा आवाज दिल्यानंतर प्रकाशला ती केबीनमध्ये उपस्थित आहे ह्याची जाणीव झाली. तिच्यामागेच भिंतीवर लावलेला आपल्या दोन गोंडस मुलांचा फोटो दिसला. काळजात धस्स झाले. इतकावेळ आपण केवळ स्वतःचाच विचार करत होतो हे जाणवून त्याला फार वाईट वाटले. कालच, चाळीसाव्या मजल्यावरच्या काचा कितीही धडका मारल्या तरी फुटत नाहीत अशी फुशारकी प्रकाश आपल्या आईकडे मारत होता. आई उगाच मूर्खासारखी काळजी करते असे त्याला वाटत होते. आता असे का होत नाही ह्याबद्दल त्याला मनस्वी संताप आला. ग्लास जरा आपटूनच टेबलावर ठेवल्यावर, त्याने रुचाला घरी जायला सांगितले. जाण्यापूर्वी शोफरला कार तयार ठेवायला सांग अशी सूचना केली.

रुचाने उद्याच्या महत्त्वाच्या मिटींगची आठवण करुन दिली. कंपनीच्या एशीयन रिजनसाठी उद्याची मिटींग 'करो या मरो' ह्या लेव्हलवर होती. एक महत्त्वाचा मल्टीबिल्यन गवर्नमेंट प्रोजेक्ट उद्या फायनलाइज होणार होता. प्रकाशच्या डिसीजनमेकींग अॅबिलीटीवरच उद्या त्या मिटींगचे आउटकम अवलंबून होते. ज्या कामासाठी कंपनीने त्याला बढती दिली होती, तेच काम उद्या तो पार पाडणार होता. कंपनी ग्लोबल हेडची पोझिशन बळकावण्याच्या स्पर्धेत मीपण उभा आहे असे सर्वांना पटवून देण्याची ही एक चांगली संधी होती.

घरी जातांना आज जरा जास्तच ट्रॅफिक आहे असे वाटत होते. नेमके आज सिग्नल लवकर ग्रीन होत नसावेत असे प्रकाशला वाटू लागले. तीनवेळा सिग्नल मिळूनही त्याच्या कारने चौक पार केला नव्हता. शेवटी झेब्राक्रॉसींगच्या अलिकडेच कार असतांना परत रेड सिग्नल लागला. प्रकाशने भस्सकन लागलेल्या त्या लाल सिग्नलकडे बघितले आणि त्याची नजर सिग्नल काउंटरकडे गेली. तो लालभडक रंगातला परिचित आकडा दिसताच प्रकाशच्या डोक्यातले विचार जे व्हिस्कीच्या प्रभावाने जरा थांबले होते, ते सिग्नल सुटल्यावर अचानक सुटलेल्या गाड्यांसारखे सुसाट सुटले. उजवीकडच्या गाड्यांना सिग्नल मिळाला. सुसाट वेगाने जाणारे त्यांचे लाल-पिवळे लाइट्स नजरेसमोर असंख्य रेषा तयार करत जाऊ लागले. आपल्या आयुष्यातले दिवसही असेच भराभर संपून जाणार आहेत असे त्याला वाटले. प्रकाशने चटकन तिकडून नजर वळवली आणि साईड कंपार्टमेंटचे बटन दाबले. दोन ग्लास आणि व्हिस्कीची बॉटल बाहेर आले. घरी जाईपर्यंत प्रकाशच्या डोक्यातले सर्व विचारांचे दिवे हळूहळू विझले होते.

-----------------

दुसर्या दिवशी सकाळी प्रकाश ऑफिसात पोचला. मिटींगरुममध्ये सगळे जमायला लागले होते. आजच्या मिटींगचे सगळे स्टेकहोल्डर हजर झाले आणि मिटींग नियोजित वेळेला सुरु झाली. आळीपाळीने प्रत्येकजण बोलू लागला. प्रकाश सर्वांचे म्हणणे लक्ष देऊन ऐकत होता. प्रोजेक्ट कसा आहे, किती मोठा आहे, किती महत्त्वाचा आहे ह्याबद्दल बोलणी सुरु झाली. मोठ्या पडद्यावर प्रेझेंटेशन सुरु होते. गवर्नमेंटला आपली ऑफर द्यायची आहे, त्यासाठी संबंधित केंद्रीय मंत्र्याला काही फंड द्यावा लागणार आहे. हा फंड एकूण प्रोजेक्ट कॉस्टच्या किती परसेंटेजमध्ये असावा ह्याची मंत्र्यामार्फत सूचना आलेली होती. मंत्र्याचा एक प्रतिनिधी आज मिटींगमध्ये त्याचसाठी हजर होता. हा फंड म्हणजे कमिशन, ही कंपनी मंजूर करते की नाही ह्याच प्रश्नाचे उत्तर त्याला हवे होते, अन्यथा दुसर्या कंपन्या तर टपलेल्याच होत्या. खरे तर आजची सर्व मिटींग केवळ त्या एका कारणासाठी होती. बाकीचा तर नुसता कॉर्पोरेट फाफटपसारा आणि हायफाय डामाडौल. प्रकाशला आज त्या आकड्याचाच निर्णय घ्यायचा होता. 'नेक्स्ट स्लाइड', 'नेक्स्ट स्लाइड' करत जेव्हा स्क्रीनवर ह्या फंडशी संबंधित स्लाइड झळकली. त्यात किती फंड द्यावा लागेल त्याचा आकडा होता. लाल रंगात बोल्ड केलेला. तो आकडा बघताच प्रकाशच्या डोक्यात अचानक सणक गेली. ह्याच आकड्याने कालपासून त्याला अक्षरशः छळले होते. त्याच्या मेडीकल रिपोर्टमध्ये हाच आकडा लालभडक रंगात बोल्ड केलेला होता. त्याच्या जीवावर उठलेला हाच तो आकडा होता. मेंदूच्या प्रत्येक वळीतल्या प्रत्येक दरीतून एकच इको ऐकू येऊ लागला. "ह्या सार्या अचिव्हमेंटला काय अर्थ आहे?" , "ह्या सार्या अचिव्हमेंटला काय अर्थ आहे?" , "ह्या सार्या अचिव्हमेंटला काय अर्थ आहे?".

भान सुटते की काय अशा अवस्थेत प्रकाश अचानक बरळू लागला. "ह्याला काय अर्थ आहे?", "ह्याला काय अर्थ आहे?". सहकारी चमकून प्रकाशकडे बघू लागले. कोणीतरी वयस्कर सिनियर ऑफिसरने त्याला विचारले, "प्रकाश, काय झाले? मागच्या आठवड्यातच आपण ह्या आकड्यावर शिक्कामोर्तब केले आहे, हे साहेब आज फक्त आपले कन्फर्मेशन घ्यायला आले आहेत. बाकी सगळे तर तसे फिक्सच आहे ना?". आपण नक्की कशाबद्दल बोलतोय हे प्रकाशला कळतच नव्हते. तो भ्रमिष्ट झाला होता. "काहीही फिक्स नाही, हा आकडा मला मान्य नाही, सगळे संपवून टाकेल हा आकडा, मला मान्य नाही, हे अजिबात मान्य नाही, काय अर्थ आहे ह्याला? काय अर्थ आहे ह्याला?"

अचानक झालेल्या ह्या प्रकाराने सगळे गांगरुन गेले. प्रत्यक्ष बॉसच कन्फ्युज आहे आणि ऐनवेळी नाकारतो आहे म्हटल्यावर कोणालाही ही परिस्थिती नक्की कशी हाताळावी हे समजत नव्हते. मंत्र्याचा माणूस तर थोडा वेळ शांत बसला. नंतर तो मीटींगरुममधून शांतपणे बाहेर पडला. त्याने मंत्र्याला फोन लावला. "साहेब, ते नाही म्हणत आहेत बहुतेक." "ओके" तिकडून आवाज आला.

---------------------------

समोर बसलेल्या व्यक्तीने दिलेला एक कागद मंत्रीमहोदय बघत होते. त्यातला लाल अक्षरात बोल्ड केलेला आकडा बघून त्यांच्या रुंद, रुक्ष चेहर्यावर एक हलकीशी रेष हलली. "ठिक आहे, करुयात मग" असे म्हणून त्यांनी पीए कडे बघितले. ही मिटींग संपल्याची खूण होती.

----------------------------
प्रकाशच्या ऑफिसातल्या एचआर डिपार्टमेंटमध्ये, कंप्युटरशी खुडबुड करत, बसलेल्या दिपिकाचा फोन वाजला. तिने मेसेज चेक केला. 'उद्या संध्याकाळी ब्ल्यु रिट्रीटमध्ये, रुम नंबर ५०४".

----------------------------

रुम नंबर ५०४ च्या बेडवर दिपिका बसलेली होती. मध्यरात्र उलटलेली होती आणि नोटा मोजायचं मशीन सुर्रर्र... सुर्रर्र आवाज करत होतं. सिंगलमाल्टच्या दोन बॉटल संपल्या होत्या. नोटांची शेवटची बॅच संपल्यावर दिपिकाने त्या सूटकेसमध्ये भरायला सुरुवात केली.

----------------------------

दुसर्या दिवशी सकाळी अकरा वाजता क्रिनोसंस मेडलॅबच्या टेक्निकल हेडच्या फोनवर त्याच्या बायकोचा कॉल आला. "ते लोक आताच येऊन गेलेत... कॅश मोजली, पूर्ण आहे. म्हणजे तू कॅरीबियन टूरचे म्हणत होता ते खरेच आहे तर..... लव्ह यु सो मच. आज लवकर घरी ये. मी पण सरप्राइज देणार आहे"

---------------------------

पंधरा दिवस आधी.

मॅफ्कोर कंपनीच्या रिजनल हेड ऑफिसमध्ये, म्हणजे प्रकाशच्या ऑफिसमध्ये. कंपनी पॉलिसीनुसार दरवर्षी हेल्थ चेक-अप प्रोग्राम आयोजित केला जातो. हायलेव्हल हेड्ससाठी स्पेशल प्लॅटीनम पॅकेजअंतर्गत कंप्लीट हेल्थ चेकअप होता. सीईओ लेव्हलच्या सर्वांना तर ह्या टेस्ट्स करणे बंधनकारक होते. कंपनी आपल्या महत्त्वाच्या शिलेदारांच्या आरोग्याबद्दल सजग असते. त्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य सदैव उत्तम दर्जाचे असावे, कंपनीसाठी काम करतांना निदान त्यांच्या आरोग्यसमस्यांमुळे काही अडचण येऊ नये असा उद्देश होता. ह्या लेव्हलवर असलेले ऑफिसर्स येत्या काळात काही घातक आजारांना बळी पडतील का ह्याची चाचपणी करायची असाही एक उद्देश असतो. जेणेकरुन कंपनीला भविष्याच्या दृष्टीने योग्य निर्णय घेऊन हायलेव्हल हेड्सच्या आरोग्याचा कंपनीच्या टर्नओव्हर आणि रेप्युटेशनवर प्रभाव पडू नये असे नियोजन करता येते.

प्रकाशचे ब्लड सँपल घेतले गेले. युरिन सँपल घेतले गेले. इसीजी, बीपी, स्ट्रेसटेस्ट सर्व पार पडल्या. तास-दोन तास सर्व प्रकारे तपासल्यावर क्रिनोसंस मेडलॅबच्या टेक्निशियन्सनी प्रकाशला "इट'स ओव्हर" म्हणून जायला सांगितले.

प्रकाश बाहेर जाताच ब्लड सँपलवर मार्क करणार्या टेक्निशियनने लालभडक जाड मार्करपेन उचलला आणि प्रकाशच्या ब्लडसँपलवर एक आकडा लिहिला.

प्रकाशचे करीअर संपवणारा आकडा.

प्रकाशला संपवणारा आकडा.

"द रेड बोल्ड नंबर"

:-X-:-X-:-X-:-X-: :-X-:-X-:-X-:-X-:

कथा काल्पनिक असली तरी वास्तवाशी थोडी मिळतीजुळती आहे. आजकाल कंप्लिट हेल्थ चेकअप पॅकेजेस चे पेव फुटले आहे. महागडे आणि अतिमहागडे पॅकेजेस तयार करुन त्यात चित्रविचित्र टेस्ट्स केल्या जातात. त्यांचे रिपोर्ट्स बघून एरवी हेल्दी असणारे लोक विनाकारण साशंक होतात. अनोळखी टेस्ट्समधल्या नंबर्सचा आपल्या आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो हे कळण्याची प्रत्येकाची समज नसते. ते डॉक्टर्सकडे जातात, परत सगळ्या टेस्ट्स करतात. कॉर्पोरेट हॉस्पिटल्सच्या सापळ्यात अडकतात. कोणत्याही रोगाची कसली लक्षणे नसतांना असे क्लायंट हॉस्पिटल्ससाठी आयते सावज तयार होऊन जाते. घाबरवून त्यांच्यावर उगाचच उपचार केले जातात, किंवा शस्त्रक्रिया केल्या जातात.

अशा टेस्ट्स रिपोर्ट्समुळे ठणठणीत बरे असणार्या व्यक्ती नखशिखांत हादरुन जातात. आपल्याला काहीही झालेले नाही हे मान्य करायला त्यांना खूप वेळ लागतो. हे सर्व अचानक काय उद्भवले आणि आपले आता काय होईल ह्याचा मानसिक ताण व्यक्तीवर येतो.

हेल्थ चेक-अप्स वाईट असतात असे नव्हे. पण कोणत्या वयात, कोणत्या परिस्थितीत, कोणकोणत्या टेस्ट्स करणे खरेच आवश्यक आहे ह्याचा विचार व्हायला हवा आहे. तसेच काही शंका असल्यास दोन तीन खात्रीलायक डॉक्टरांकडून नीट तपासणी करून घ्यावी. फक्त टेस्ट रिझल्टवर अवलंबून राहू नये. तुमचा किंवा तुमच्या प्रियजनांपैकी कोणाचा प्रकाश होऊ देऊ नका.

काळजी घ्या, निरोगी राहा.