शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

Availability heuristic'

आपण रोज तसे निर्धास्त झोपत असतो. दरवाजाची कडी नीट लागली आहे इतकी खात्री पुरेशी असते. पण ज्या दिवशी आपल्याला कळते की काल रात्री आपल्या कॉम्प्लेक्समध्ये चोरी झाली, त्या रात्री आपण थोडे साशंक होऊन कडी लावतो. पण नीट झोपतो. दुसर्‍या दिवशी आपल्याला कळते की आपल्याच बिल्डींगमध्ये चोरी झाली. तेव्हा त्या रात्री आपण जरा सगळ्याच खिडक्या, दरवाजे आणि इतर ओपनिंग्स चेक करुन झोपतो. झोप साशंकच असते थोडीशी... असेच आठ दिवस जातात. मग साशंकपणा कमी होतो. झोप नीट लागू लागते. खिडक्या दरवाजे तपासणे कमी होते. अचानक दुसर्‍या दिवशी कळते की आपल्या वरच्याच फ्लॅटमध्ये दरोडा पडला, त्या कुटूंबापैकी दोघांचा चोरांनी खून केला आणि आणखी दोन घरांचे दरवाजे उचकटण्याचा प्रयत्न झाला. पण त्यात तुमचा फ्लॅट नव्हता. तुम्हाला त्या रात्री कोणताही त्रास झाला नव्हता. तुम्हाला तर कळलेही नव्हते. तुम्ही शांत झोपेत होता....

त्या दिवशी मात्र तुम्हाला शांत झोप येतच नाही. कॉम्प्लेक्समध्ये खूप पोलिस बंदोबस्ताला आलेले असतात. सोसायटीचे लोकही गस्त घालू लागतात. लोक आळीपाळीने जागरण करुन वॉच ठेवू लागतात. पण तुम्ही रात्रभर जागे असता. एक सेकंद झोप नसते. दर तासाला उठून दरवाजा खिडक्या नीट लागल्या आहेत ना ह्याची तपासणी करता... अशी अवस्था आणखी दोन दिवस राहते. त्यानंतर हळूहळू पोलिस जातात. लोकांचे पहारे कमी होतात. नॉर्मल लाइफ परत येते. तुम्ही रोज दरवाजाची कडी नीट लावणेही विसरुन डाराडूर झोपू लागता....

जगात रोज हजारोंनी घरफोड्या होता, चोर्‍या होतात, खून होतात. पण तुम्ही रोज रात्री झोप हरवून घाबरुन बसलेले नसता.

मानसशास्त्रात ह्या वैचारिक अवस्थेला 'Availability heuristic' असे नाव आहे. जाहिरातदार, न्यूजमिडिया आणि राजकिय नेते ह्या मनोवस्थेचा फायदा खूप चांगल्या प्रकारे वेळोवेळी घेत आले आहेत.

मराठी दिनाच्या शुभेच्छा!

मराठी भाषेच्या आग्रहाचे दोन वेगवेगळे पैलू आहेत. ते समजून न घेतल्याने नेहमीच गोंधळ होत आला आहे. आजच्या दिवशी जरा त्याबद्दल गोंधळ दूर करुन घ्या.

पहिला गट हा भाषिक अस्मितेचा पुरस्कार करणारा आहे. लोक भाषिक अस्मिता का कुरवाळतात ह्याचे कारण समजून घ्या. जगातल्या कोणत्याही भाषेवर त्या भाषिक व्यक्तीचे प्रेम असते. त्याचे कारण तो लहानपणापासून ज्या भाषिक समुहात राहत आलेला आहे ते त्याचे वर्तुळ असते. त्याला ते वातावरण ओळखीचे असते. भाषा ही एका मोठ्या गटाच्या स्वतंत्र अस्तित्वाची एक ओळख आहे. त्या गटातली भाषा एकमेकांशी जोडलेले असण्याची खूण आहे. आपल्या भाषेची माणसे अवतीभवती असतांना एक वेगळ्याच प्रकारची सुरक्षा, आत्मियता जाणवू लागते. तेच परक्या भाषेच्या वातावरणात जरा अवघडलेपण असुरक्षितता जाणवते. हा मनुष्याचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्याचा मेंदू नेहमी सुरक्षित आणि ओळखीच्या वातावरणाच्या शोधात असतो. भाषा त्याला असे एक वातावरण उपलब्ध करुन देते. त्यामुळेच ज्या गोष्टीने सुरक्षित वाटते, तीच्याबद्दल आत्मियता वाटणार. जिच्यामुळे ओळख मिळाली तिच्याविषयी अस्मिता दाटून येणार. त्याबद्दल भावनिक होणे अगदी नैसर्गिक आहे. भाषिक अस्मिता बाळगणार्‍यांबद्दल किव व्यक्त केली किंवा त्यांना तुच्छ लेखले म्हणजे आपण प्रगत विचारांचे आहोत अशी बहुतेकांची मनोवॄत्ती असते. त्यांना खरेतर ही सगळी नैसर्गिक गरज वगैरे भानगड माहित असेलच असे नसते किंवा त्यांचे नैसर्गिक परिघ फार वेगळे असू शकतात. त्यामुळे 'अस्मिता बाळगणारे मूर्ख आहेत' किंवा 'अस्मिता बाळगणार्‍यांना मूर्ख म्हणणारे अतिशहाणे आहेत' अशी टिका-टिप्पणी खरेतर बिनबुडाची आहे.

दुसरा गट हा परिसरभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा पुरस्कार करणारा आहे. लक्षात घ्या, ह्यातला प्रत्येक शब्द फार महत्त्वाचा आहे. परिसरभाषा म्हणजे जन्म आणि सुरुवातीची वर्षे एखादे मूल ज्या भवतालात काढते आहे तिथल्या परिसरातल्या लोकांची प्रमुख भाषा. ह्यात घरात आई त्या मुलाशी ज्या भाषेत बोलते ती, बाहेरचे काका-मामा-शेजारी ज्या भाषेत बोलतात ती, दुकानदार-विक्रेते ज्या भाषेत बोलतात ती अशा सर्व भाषा येतात. ह्या सर्वांची मिळून सर्वसाधारणपणे एक परिसरभाषा होते. (काही लोक ह्याच्या विरोधात मुद्दा मांडतात की आई मराठी, बाबा पंजाबी आणि कुटूंब बंगालात स्थायिक असेल तर काय? अशा परिस्थिती मोठ्या लोकसंख्येच्या बाबतीत तुरळक असतात. तरीही ह्या कुटूंबाने बंगाली शिकणे गरजेचेच आहे.) ह्या ओळखीच्या परिसरभाषेत मुलांचे प्राथमिक शिक्षण व्हावे अशी मागणी आहे. प्राथमिक शिक्षण म्हणजे खेळवाडी-बालवाडी-पहिली-दुसरी-तिसरी-चौथी इथपर्यंतचे शिक्षण.(इंग्रजीतून : प्लेस्कूल-केजी-फस्ट-सेकंड-थर्ड-फोर्थ). ह्या पहिल्या काही वर्षांत त्यांचे शिक्षण त्यांच्या परिसरभाषेच्या माध्यमातून झाले तर त्यांचे आकलनात लवकर येते असा युनेस्कोचा रिपोर्ट आहे. अगदी सुरुवातीच्या वर्षांमधल्या शिक्षणात ज्या संकल्पना असतात, जसे की लांबी, रुंदी, अंतर, वस्तू ओळखणे, मोजणे, वर्गीकरण करणे, खेळ खेळणे, एकमेकांशी समन्वय साधून काही कृती करणे, परिसरात आढळणार्‍या आणि अनुभवाला येणार्‍या गोष्टी समजून घेणे, त्याबद्दल प्रश्न विचारणे, बोलणे हे सगळे येते. केजी-वन मध्ये रोज दहा पाने भरुन इंग्रजी एबीसीडी घोटत बसणे ह्याला शिक्षण म्हणत नाहीत. मुलांचे आपल्या भवतालाबाबतच्या जाणिवा विकसित करणे, त्यांना विचार करायला शिकवणे हा पहिला टप्पा आहे. त्यासोबतच इंग्रजी ही भाषा म्हणून शिकवायला सुरुवात करावी अशी भूमिका आहे. सर्व अभ्यासक्रम पूर्ण इंग्रजीतून असल्याने मुलांना अनोळखी भाषेत असुरक्षित वाटते. त्यात अभ्यासक्रमही ढोरमेहनत करायला लावणारा असेल तर एकूणच ममत्व वाटावे असे त्या शाळेत काही नसते. इथेच मुलांचा रस शिक्षणातून संपतो आणि शाळा सोडण्याचे प्रमाण पुढे वाढते.

भारतीय लोकांचे एक मूलभूत वैशिष्ट्य आहे. आपण मुळातच भाषावैविध्याने समॄद्ध देशात राहतो. आपल्याला किमान दोन भाषा बोलता येतात. प्रयत्न केल्यास तीन किंवा चार भाषा बोलता येतात. नविन भाषा शिकण्याची आपली कुवत नाही अशातला भाग नाहीच. पण ज्या प्रकारे इंग्रजीची सक्ती केली जाते ती आक्षेपार्ह आहे. चांगले इंग्रजी शिकायला दोन ते चार वर्षे वेळ खूप आहे. ती तमिळ, तेलगु, बंगाली, उडिया, पर्शियन, अरेबिक, उर्दु सारखीच शिकवा ना. गोरा रंग जसा विनाकारण डोक्यावर घेऊन ठेवला आहे तशी इंग्रजी घेण्याची गरजच काय? जगात नविन संधी मिळवायला इंग्रजी गरजेचे आहे हे मान्य पण त्यासाठी जन्मापासून मुलांना इंग्रज बनवणे गरजेचे नाही. भाषा आहे, तिला भाषेसारखीच वागवाल तर भारतीय मुले जास्त मोठ्या प्रमाणात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवतील.

मी आजवर जेव्हा जेव्हा इंग्रजीसमर्थकांसोबत चर्चा केली आहे. तेव्हा त्यांनी वरील दोन्ही गटांचे मुद्दे सरमिसळ केले आहेत. दुसर्‍या गटाच्या मांडणीकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. 'तुमचा बाणा तुम्हाला नोकरी देणार नाही' अशी खिल्ली उडवली आहे. अशा लोकांचे सर्व लक्ष नोकरी कुठे आणि किती पगाराची मिळेल ह्यावरच केंद्रीत असते. अगदी 'आयआयटीला जाणार म्हणजे तमुक कोटीचे पॅकेज पक्के' इतकेच ह्यांचे विचारविश्व असते. नविन संशोधने, नव्या संकल्पना, नवे शोध आपण लावू शकतो. नवे व्यवसाय आपल्याच मातीत आपण निर्माण करु शकतो. किर्लोस्कर पंप्स कुठे नाही पोचलेत ते बघा. आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले तर त्यांना त्यांच्या क्षमता नीट वापरता येतील. आपल्याकडेही वैज्ञानिक, संशोधक तयार होतील. पण वैज्ञानिक, संशोधक व्हायचे असेल तर इंग्रजीच शिकावे लागेल, अमेरिकेलाच जायला लागेल, आणि ते काही तुमच्या मागच्या सात पिढ्यांत कोणी केलेले नाही त्यामुळे तुमची लायकीच नाही असे दडपण लहानपणापासून मुलांवर टाकले गेले तर आमची बहुतांश मुले करपून जातात. मग बिनकामाचे कोर्सेस करुन पोटापाण्यासाठी नोकर्‍या शोधत भटकत राहतात. त्यांच्यावर आरोप होत राहतात ती ते कष्ट करत नाहीत, त्यांना अकलाच नाहीत, त्यांना मेहनत करायची इच्छाच नाही.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. वाघिणीची भीती घालून दूध प्राशन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न होत असेल तर तो हाणून पाडायला हवाच.

मराठी दिनाच्या शुभेच्छा!

मुतखडा | किडनीस्टोन

किडनीस्टोनचा आणि हार्डवाटर म्हणजे क्षारयुक्त पाण्याचा फारसा संबंध नाही. क्षारयुक्त पाण्याने मुतखडा होतो ही वाटरफिल्टर कंपन्यांनी मार्केटींगसाठी सोडलेली अफवा आहे. मुतखड्यात क्षार असतात आणि पाण्यातही क्षार असतात म्हणून मुतखडा हा क्षारयुक्त पाण्यानेच होतो असा सहसंबंध (को-रिलेशन) जोडून दिला आहे. जे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य नव्हे. अर्थात खूप क्षारयुक्त पाणी असेल तर मूतखडा होऊही शकतो पण तेवढे खारट पाणी सातत्याने पित राहणे शक्यही नाही. साधारण ५००-६०० टीडीएस (पाण्यात विरघळलेले क्षार) असलेले पाणी धोकादायक नसते. काही लोक ह्या अफवेला बळी पडून घरात आरो सिस्टीम लावून अगदी २० ते ३० टीडीएसचे पाणी प्यायला लागतात. एवढे कमी क्षार असलेले पाणी पिणे मात्र जास्त धोकादायक ठरु शकते. टीडीएसची सामान्य मात्रा १५० ते ६०० च्या दरम्यान चांगली असते.

मुतखडा तयार होतो मुख्यतः कॅल्शियम ऑक्सलेट आणि युरिक अ‍ॅसिड या दोघांपासून. ८० टक्के केसेसमध्ये कॅल्शियम ऑक्सलेटचा खडा असल्याचे आढळून येते. आणखी दोन प्रकार आहेत. पण ते दुर्मिळ आहेत.

हा खडा कसा तयार होतो? आपल्याला अन्नपदार्थांमधून कॅल्शियम मिळते. त्यासोबत अन्नपदार्थांतून ऑक्सलेट नावाचे एक संयुगही मिळते. कॅल्शियम आणि ऑक्सलेट पचनक्रियेदरम्यान एकमेकांना चिकटतात. पण जे ऑक्सलेट मोकळे राहतात त्यांचा शरीराला काही उपयोग नसल्याने ते रक्तातून वाहत किडनीत जातात आणि तिथून मुत्रातून शरीराबाहेर फेकले जातात.

ज्यावेळी मुत्रामध्ये पाणी कमी असते व मोकळ्या ऑक्सलेटची संख्या जास्त असते तेव्हा ते किडनीत जाऊन कॅल्शियमला चिकटतात, त्यांचे छोटे छोटे खडे एकत्र येऊन मोठे होऊ लागतात. आकार मोठा झाल्याने किडनीबाहेर पडू शकत नाहीत. मग कालांतराने किडनीच्या कामात अडथळे निर्माण करु लागतात. त्यामुळे लघवीला कमी होणे, सतत लघवीला जावेसे वाटत राहणे, ताप, लघवीतून रक्त पडणे अशी लक्षणे दिसू लागतात. अनेकदा तर अशी कोणतीही त्रासदायक लक्षणे न दिसता ओटीपोटात अचानक प्रचंड कळा येऊ लागतात. तेव्हा निदान केल्यावर मुतखडा असल्याचे निष्पन्न होते. हा मोठा झालेला खडा अचानक मुत्रमार्गात आल्याने प्रचंड वेदना सुरु होतात.

ऑक्सलेट जास्त असणारे खाद्यपदार्थ कोणते? पोटॅटो चिप्स, शेंगदाणे, चॉकलेट, पालक, बीट. ह्याचा अर्थ असा नव्हे की हे सगळे पदार्थ एकदम टाळायला हवेत. पालक, शेंगदाणे, बीट वगळता इतर पदार्थ जसे की चिप्स आणि चॉकलेट खाण्याचे प्रमाण जास्त असू शकते. ते टाळले पाहिजे.

मुतखडा होऊ नये म्हणून कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थ नियमित खाणे आणि पाणी रोज भरपूर पिणे हे दोन उत्तम उपाय आहेत. कॅल्शियम जास्त घेतल्याने ऑक्सलेटशी त्यांची भेट पचनसंस्थेतच होऊन जाते. पाणी भरपूर प्यायल्याने लघवी घट्ट होत नाही,किडनीवर ताण येत नाही व सर्व विषारी द्रव्ये किडनीबाहेर टाकली जातात.

टीपः मला २०१६मध्ये किडनीस्टोनचा त्रास झालेला. अचानक ओटीपोटात कळा येऊ लागल्या आणि मी उभ्या-उभ्या कोसळलो होतो. त्याआधी काही वर्षे मला पावलांवर सूज येत होती. मी बसून काम करतो म्हणून ती सूज येतेय असे समजून दुर्लक्ष केले होते. माझे पाणी पिणे खूप कमी असायचे. पायावर येणारी सूज खडा निघून गेल्यावर परत कधीच आली नाही. अगदी सोळा तास सलग बसूनसुद्धा. त्यामुळे तुमच्यापैकी कोणाला अशी सूज वगैरे येत असेल तर टाळाटाळ न करता तपासणी करुन घ्या. किडनीस्टोनच्या वेदना भयंकर असतात. त्या भोगण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी.

ड्रॉपशिपिंगचा चिनी सापळा..

इंटरनेटवर सध्या ड्रॉपशिपिंग हा एक प्रकार फार ट्रेंडिंग आहे. ड्रॉपशिपिंग म्हणजे एखाद्या प्रॉडक्टला आपल्या वेबसाईटवर डिस्प्ले करणे, जमेल तितक्या प्रकारे, जमेल तितक्या चॅनेलमधून त्याची जाहिरात करणे, आणि जेव्हा एखादा ग्राहक ती विकत घेतो तेव्हा ती थेट त्या प्रॉडक्टच्या उत्पादकाकडून ग्राहकाला कुरिअर केली जाते. त्यावर विक्रेत्याला काही टक्के कमिशन मिळते. ह्यात जो ड्रॉपशिपिंग करतोय त्याला स्वतः:कडे वस्तू साठवण आणि कुरिअर वगैरेचा काही त्रास नसतो. एकप्रकारचे हे इंटरनेटवरचे दुकान आहे जिथे होलसेलकडून माल ऑर्डर करून ग्राहकाला पोचवला जातो. एकूणच बिनपैशाचा चांगली कमाई देणारा धंदा म्हणून ह्याची लोकप्रियता वाढत चालली आहे. बरेच लोक लाखो रुपये महिन्याला कमवत आहेत अशा कहाण्या इंटरनेटवर पसरल्या आहेत.

दिसायला हा प्रकार सोपा सुटसुटीत आणि आकर्षक वाटत असला तरी तितका नाही. त्याच्या तांत्रिक घोळात जाण्यापेक्षा मी काही वेगळ्या गोष्टींकडे बघतो.

सगळे ड्रॉपशिपर्स आणि भलामणकर्ते चिनी मालाची विक्री करावी असे सूचित करतात. अलीएक्स्प्रेस ह्या चिनी वेबसाईटवरून थेट तुमच्या वेबसाईटवर ती प्रॉडक्ट्स कनेक्ट होतात. म्हणजे चिनी कंपन्यांचे सामान विकण्यासाठी ड्रॉपशिपरचा वापर केला जात आहे. त्यांना भरमसाठ कमिशन देऊन सक्सेसस्टोरी बनवल्या जात आहेत. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी ह्या प्रकारात उतरावे आणि इंटरनेटवरचे मार्केट चिनी वस्तुंनी भरून टाकावे. ह्यात काही नवीन जगावेगळे घडते आहे असे काहीही नाही. पण ड्रॉपशिपरचे मरण होणार आहे. कोणीही कोणतीही वस्तू विकू शकत असल्याने विक्रेत्यांची स्पर्धा वाढणार, स्पर्धेला तोंड द्यायला ते किमतीचे युद्ध खेळणार त्यांचे कमिशन कमीकमी होत जाणार, पण सर्व वस्तूंचा उत्पादक चीन आहे, विक्रेत्यांचे काहीही झाले तरी फायदा मात्र त्यालाच होणार. ग्राहकाने वस्तू विकत घेतल्यानंतर विक्रेत्याचा पुढील घडामोडींवर कोणताही ताबा राहत नाही. प्रॉडक्ट ग्राहकाला पोचले कि नाही, ते जसे सांगितले तसेच आहे कि नाही, काही समस्या आल्या, किंवा ग्राहकाने रिटर्न केले तर ड्रॉपशिपरला ग्राहक जबाबदार धरतो, अलीएक्स्प्रेसला नाही.ड्रॉपशिपर चिनीमाल विकत असल्याने स्वतःचा ब्रँड विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे सस्टेनेबिलिटी म्हणजे धंद्यातले सातत्य आणि वाढ याची खात्री नसते.

ज्यांना ह्या प्रकारच्या कामात रस असेल, त्यांनी जरूर उतरावे. परंतु हि एक मल्टीलेव्हलमार्केटिंग स्कीम आहे हे लक्षात असु द्यावे. म्हणजे सुरुवातीला येणाऱ्या उमेदवारांना भरमसाठ फायदा होतो, तो पाहून आणखी उमेदवार येतात, त्यांना मात्र तितका फायदा होत नाही. एखाद्या कंपनीने एकाच शहरात अनेकांना पेट्रोलपंपची डीलरशिप दिली तर कंपनीचा फायदा होतो, डीलर मात्र स्पर्धेमुळे तोट्यात राहतात. म्हणून फिजिकल जगात विशिष्ट क्षेत्रानुसार डीलरशिप दिली जाते. मात्र डिजिटल जगात असे काहीही नाही.

मात्र यावर उपाय आहे. लोकलाईज ड्रॉपशिपिंग हा एक उत्तम पर्याय आहे. इंटरनेटवरून कमाई करण्याची इच्छा असलेल्या इथे मात्र चांगले भविष्य आहे. इथे प्रॉडक्ट, सप्लायचेन आणि कस्टमरकेअर सर्व आपल्या हातात असल्याने पुरेसे नियंत्रण राहते. त्याचसोबत आपण आपल्या देशी उत्पादकांचे प्रॉडक्ट्स आपल्याच देशबांधवांना विकले तर आपल्याच देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेला फायदा होईल ना?

आजच्या डिजिटल जगात अमर्याद संधी प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. मात्र जो त्यावर अंमल करतो तोच यशस्वी होतो.

शाळा म्हणजे रोबोट कारखाना नव्हे.

भारतीय समाज विज्ञानवादी नसल्याचे खापर शालेय व्यवस्थेवर फोडले जाते. आणि त्याचे पाप कॉंग्रेसच्या माथी मारले जाते. पूर्वी मलाही हे पटायचे. भारतीय लोकांमध्ये काहीही अवगुण दिसले कि शिक्षणव्यवस्थेवर द्यायची जबाबदारी ढकलून कि झाले.... पण...

शाळा म्हणजे हवा तो रोबोट बाहेर काढणारा कारखाना नव्हे. भारतातल्या प्रत्येक समस्येसाठी शाळेला जबाबदार ठरवणे चूक आहे. हजारो वर्षांचा इतिहास करोडो लोकांच्या जाणीवानेणीवातून, पाच पंचवीस वर्षांत डिलीट मारल्यासारखा पुसला जाऊन हवे तसे नागरिक निर्माण झाले पाहिजेत हि अपेक्षा अत्यंत चुकीच्या गृहितकावर आधारित आहे. मुलांनी विज्ञानवादी होण्यासाठी शाळांची गरज नसते, विज्ञानवादी समाजाची गरज असते. विज्ञानवादी समाज शाळांमधून तयार होत नाही तर विज्ञानवादी समाजाला आणखी पुढे जायला शाळा फक्त मदत करतात. विज्ञानवादी असणे हे शाळेतून शिकायचे गुण नाहीत. तसेही जगातल्या कोणत्याही शैक्षणिक शाळेत मूल्ये शिकवली जात नसतात, पोटापाण्याला लागण्यापुरते शिक्षण मिळते. पण जे आयुष्यावर खरोखर परिणाम करतात, ज्याने मानस घडतो, ते संस्कार आणि विचार मुलांना घरातून, समाजातून, भोवतालातून प्राप्त होतात. भारतीय भोवताल धर्मकर्म, जातपात, कर्मकांड ह्यात अडकून पडलेला असताना त्याला एका झटक्यात बाहेर काढून युरोप अमेरिकेच्या तोडीस तोड बनवावे हि अपेक्षा गैर आहे.

इच्छुकांनी Epigenetics ही जीवशास्त्राची नवी शाखा अभ्यासावी. पुढे कधीतरी लिहिणार आहेच ह्यावर. भारतीय समाजाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे संशोधन आहे.

काही विस्कळीत विचार

तुमचा पगार कमी असल्याने तुम्ही घर, गाडी, फ्रीज, टीव्ही आणि वाशिंगमशिनसुद्धा मासिक हफ्त्यावर घेता. तुमचा पगार कमी असल्याने आजारपणाच्या खर्चासाठी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेता. तुमचा पगार कमी असल्याने तुम्ही जास्त बचत करु शकत नाही म्हणून तुम्ही अचानक गचकल्यास कुटूंबाची फरफट नको म्हणून लाइफ इंशुरन्स घेता. तुमचा पगार कमी असल्याने तुम्ही बर्‍याच हौसामौजा पुर्‍या करु शकत नाही. तुमचा पगार कमी असण्याचे कारण तुम्ही अधिक चांगले शिक्षण घेऊ शकला नाहीत असे तुम्हाला वाटत असते. म्हणून तुम्ही तुमचा पगार मुलांच्या अधिक चांगल्या शिक्षणासाठी खर्च करता.

--------------

व्यवसायवृद्धी-संचलनासाठी घेतले जाणारे कर्ज आणि वैयक्तिक जीवनातल्या भौतिक सुखसुविधा पुरवण्यासाठी घेतली जाणारे कर्जे ह्यात मूलभूत फरक असतो. तुमच्या कर्जाच्या पैशाचा उपयोग जर अधिक पैसे कमावण्यासाठी होत नसेल तर त्या कर्जावरचे व्याज ही तुमच्या श्रमांची चोरी आहे.

कदाचित कोणाला पटणार नाही पण व्यवसाय-कर्जे सोडता इतर सर्व कर्जे ही गरिबांचे शोषण असतात. उदाहरणार्थ, राहण्यासाठी घर घ्यायला कर्ज घेण्यास भाग पाडण्यासारखी परिस्थिती निर्माण केली जाते, त्यातून कर्जदाराचे आयुष्यभर शोषण करण्याची आधुनिक व्यवस्था जन्माला येते. कर्ज घेणारा कर्ज देणार्‍याचा गुलाम होऊन जातो. आभासी आनंदात जगतो पण आयुष्यभर कर्जदात्याला श्रीमंत करण्यासाठी श्रम करतो.

-------------------

तुमचा पगार कमी आहे ह्यात तुम्हाला तुमचीच स्वतःचीच चूक वाटत असते. तुमच्या पगार कमी असण्यात तुमचे शिक्षण, तुमची बुद्धीमत्ता, तुमची मेहनत, तुमचे सामाजिक स्थान ह्याचा काहीतरी फार मोठा रोल आहे असे तुम्हाला वाटत असते.

तुमचा पगार किती असावा हे तुम्ही स्वतः ठरवू शकता का? तुमचा पगार नक्की कोण ठरवते? तुमच्या कामाची लायकी आणि किंमत कोण ठरवते?

--------------------

ऑटोमोबाईल फॅक्टरीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान टाळणारी एखादी कल्पना शोधणार्‍या प्रामाणिक हुशार कामगाराची एक प्रोत्साहन प्रमाणपत्र देऊन बोळवण केल्या जाते, मात्र त्याच कल्पनेमुळे कंपनीचा नफा वाढतो आणि कंपनीच्या शेअर्समध्ये लाखो रुपये गुंतवणार्‍या शेअर होल्डरास कोट्यावधीचा परतावा प्राप्त होतो. ह्या सगळ्या घटनाक्रमात काही चुकीचे घडते आहे असे कोणाला वाटत नाही.

मिलो आणि हरितक्रांतीची गोष्ट

तन्मयशी, म्हणजे माझ्या मुलाशी, मी अनेक विषयांवर चर्चा करताना, अनेक गोष्टी सांगत असतो. त्यातली मिलो आणि हरितक्रांती ही गोष्ट मी अनेकवेळा जाणूनबुजून सांगत असतो. मी मिलोची लाल भाकरी कधी खाल्ली नाही, माझ्या वडीलधार्‍यांकडूनच ऐकले. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर सातत्याने ऐकले. नंतर बर्‍याच वर्षांनी हरितक्रांती आणि त्याचा इतिहास अभ्यासला तेव्हा त्यांचे हे नेहमी-नेहमी सांगणे किती महत्त्वाचे होते ते जाणवले. तेच मी माझ्याही मुलांना सांगत राहणे आवश्यक आहे असे मला वाटते.

मी तन्मयला सांगतो, लहानपणी धान्य दळायला काढल्यावर काही चुकार दाणे इकडे-तिकडे पडले तरी आई एकूण-एक दाणा वेचून उचलून घ्यायची. मलाही तसेच करायला लावत असे. एकसुद्धा दाणा जमीनीवर सोडून देता कामा नये अशी मला सक्त ताकिद असायची. मग नंतर कधीतरी 'मिलोची लाल भाकरी खायला लागली' असे वडिलांकडून ऐकले जायचे. तेव्हा मिलो म्हणजे काय, का खायला लागली हे समजत नसले तरी त्यांच्या आविर्भावावरुन असे वाटायचे की हा काहीतरी वाईट अनुभव असावा, जो नाईलाजाने त्यांच्या वाट्याला आला.

मग मिलो म्हणजे काय ते त्याला सांगतो. अमेरिकेने कसे निकृष्ट दर्जाचे धान्य भारतीयांना भिखारी समजून उपकार दाखवल्यासारखे पाठवले होते हे सांगतो. जनावरेही खाणार नाहीत अशा धान्यावर आपल्या खंडप्राय देशातल्या जनतेला अवलंबून राहावे लागत होते. त्या काळात खिशात पैसे असले तरी दुकानात हवे ते आणि हवे तितके धान्य मिळेल अशी परिस्थिती नव्हती. ह्या अपमानास्पद अवस्थेतून बाहेर पडण्याचा आपण भारतीयांनी ठाम निश्चय केला. राज्यकर्त्यांपासून, शास्त्रज्ञांपासून ते शेतकरी आणि ह्यात गुंतलेल्या प्रत्येक भारतीयापर्यंत, सर्वांनी कंबर कसून भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवायचा निर्धार केला. मग सुरु झाली हरितक्रांती. हजारो-लाखो लोकांचे श्रम सार्थक झाले आणि आपण स्वयंपूर्ण झालो. भारतीय म्हणून अभिमान बाळगावा अशा अनेक गोष्टी आहेत, त्यात हरितक्रांती आणि दुग्धक्रांतीतून स्वयंपूर्ण झालेला भारत ही खूप प्रेरणादायी घटना आहे.

आज अन्नधान्याचा तुटवडा नाही, पण म्हणून आपण धान्य भरतांना, काढतांना जमीनीवर सांडणारे चुकार दाणे असेच सोडून द्यायला नको. एकूण एक दाणा उचलून घेतला पाहिजे. आपल्या ताटातला एकूण एक घास खाल्ला पाहिजे. उष्टे टाकायला लागेल इतके घेऊच नये, घेतले तर उष्टे टाकू नये. आपल्या ताटात असणार्‍या प्रत्येक घासाच्या मागे हजारो माणसांची मेहनत असते. शेतकर्‍यापासून ते बाजारातल्या हमालापर्यंत, अशा अनेक अनोळखी लोकांच्या अपरंपार कष्टामुळेच आपण आज सुखाने चार घास खाऊ शकतो.

जमीनीवर सांडलेला प्रत्येक दाणा उचलून घेणे आणि ताटात उष्टे न टाकणे ही आपण त्या सर्व ज्ञात-अज्ञात उपकारकर्त्या लोकांबद्दल व्यक्त करत असलेली कृतज्ञता समजली पाहिजे. बाकी काही करू शकत नसलो, तर निदान जाणीव तरी ठेवू शकतोच.