मंगळवार, १२ मार्च, २०१९

दुसऱ्या महायुद्धातले जपानी सैन्याचे युद्धगुन्हे

(पूर्वसूचना: मानसिक त्रास होईल असे मानवी अत्याचारांचे दाखले प्रस्तुत लेखात आहेत. आपल्या जबाबदारीवर लेख वाचावा.)


युद्धावर आधारित चित्रपटांबद्दल एक लेख काल वाचला, त्यात एका जपानी animation चित्रपटाचे नाव वाचले कि सर्वात भयंकर युद्धपट आहे. "Grave of the Fireflies" तो चित्रपट काल बघितला. दोन दिवस आधीच जपानवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याचा माहितीपट बघितलेला. तेव्हापासून डोक्यात हिरोशिमा नागासाकीच्या सामान्य लोकांवर विनाकारण काय काय अत्याचार झाले ते घोळत होते... ग्रेव्ह्ज बद्दल माहिती घेतांना बेअरफुट जेन बद्दल कळले. त्या बॉम्ब हल्ल्यातून बचावलेल्या एक कार्टूनचित्रकाराच्या स्वत:च्या अनुभवावर आधारित बेअरफुट जेन ह्या मालिकेतला बॉम्बहल्ला असलेला भाग बघितला. त्यातले animation भयंकर अंगावर आले. अमेरिकेने युद्धखोर जपान्यांशी असलेली खुन्नस काढायला इतक्या अमानवी पातळीवर जायची काय गरज होती असे खूप वाटू लागले...

मग कुठेसे वाचलेले आठवले कि जपानी युध्वज्वराने वेडे झाले होते. हिरोशिमा नागासाकी झालं नसते तर जपान्यांनी युद्धविराम घेतलाच नसता. मग जरा जपान्यांनी नेमके असे केले तरी काय म्हणून शोध घेतला तर जो इतिहास पुढे आला तो अंगावर काटा आणणारा होता.

१९३७ ते १९४५ च्या अवघ्या सात वर्षांच्या काळात जपानी सेनेने अंदाजे ३० लाख ते एक कोटी माणसे मारल्याची माहिती मिळते. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात जग जिंकण्याचे वेड जपान्यांवर स्वार झालेले, आपला वंश हा जगावर राज्य करण्यासाठी देवानेच पाठवला आहे अशी त्यांची धारणा होती. आपण सोडून इतर लोक हे माणसेच नव्हे तर जनावरे आहेत अशी त्यांची समजूत होती. युद्ध हे जरी एकमेकांचा जीव घेण्यासाठी लढले जात असले तरी त्यालाही काहीतरी नियम आहेत. जपानी सैन्याला असे काही अंतरराष्ट्रीय युद्धनियम पाळायची त्यांना गरज आहे असे वाटले नाही. फसवणूक, खोटेपणा, आपण दिलेला शब्द सर्रास मोडणे हे जणू त्यांचे स्वभावगुण. माणसे मारायची त्यांना प्रचंड आवड होती. लढाईत आपल्यावर चाल करून आलेल्या किंवा आपण चाल करून जात असलेल्या शस्त्रधारी सैनिकांचे प्राण घेणे ही युद्धातली सर्वसाधारण परिस्थिती. परंतु जपानी सैनिक मजा म्हणून माणसे मारायची. युद्धकैद्यांकडून माहिती काढण्यासाठी एक एक अमानुष छळाचे प्रकार त्यांनी शोधले. त्यांनी अ-सैनिक/निशस्त्र/युद्धकैदी/स्त्रिया/वृद्ध/बालके कोणालाही जिवंत सोडले नाही. एका घटनेत एक सैनिक बलात्कार करण्यासाठी एका गर्भवती स्त्रीच्या मागे लागला. तिचा विरोध न आवडल्याने त्याने आपल्या बंदुकीच्या संगीनीने तिचे पोट फाडले. तीच संगीन तिच्या पोटातल्या बाळाला खुपसून बाहेर काढले, संगिनीच्या टोकावर त्या बाळाला त्याच्या मातेसमोर नाचवू लागला. दुसऱ्या घटनेत आईच्या विरोधाचा राग आल्याने भात उकळत शिजत असलेल्या मोठ्या भांड्यात बाळाला टाकून वरून झाकण लावून टाकले.

रेबीज झालेल्या चावऱ्या कुत्र्यांसारखे जपानी सैनिक बेभान होते. किंवा त्यांची ती जणू संस्कृती असावी असे वागत होते. पकडलेल्या युद्धकैद्यांपैकी धष्टपुष्ट तरुण निवडावे. मग त्यांना मारून त्यांचे तुकडे तुकडे करून खाणे हे त्यांच्यासाठी नित्याचे होते. हे कमी होते कि काय, क्रोर्याची कोणतीही सीमा जणू माहितीच नाही असे वर्तन जपानी सैनिक करत होते. जिवंत माणसाच्या शरीरावरचे अवयव त्याला जिवंत ठेवून कापून खात. एका भारतीय युद्धकैद्याच्या जबानीनुसार त्याच्या समक्ष त्याने काही सैनिकांना एका युद्धकैद्याला जिवंत असतांना एक एक अवयव कापून काढून स्वत:च्या बराकीत शिजवून खायला घेऊन जातांना लपून पाहिले.

जपानी सैन्याने चीनच्या नानजिंग ह्या शहरावर ताबा मिळवला आणि जगाच्या इतिहासात कधी घडले नसेल इतके अमानवी हत्याकांड घडवले. अवघ्या सहा आठवड्यात त्यांनी नानजिंग शहरातल्या तीन लाख लोकांना मारून टाकले अशी माहिती मिळते. चीनी लोकांना जपानी सैनिक माणूस मानतच नव्हते. आपण चीन्यांचे तारणहार असून त्यांना मारून खरेतर त्यांना मुक्तीच देत आहोत अशी त्यांची धारणा होती. कोणत्याही वयाच्या स्त्रियांवर बलात्कार करणे, माजेखातर माणसे मारणे हा नानजिंगमध्ये सर्वसामान्य जपानी सैनिकाचा दिनक्रम होता. आपल्या तलवारीने आपण किती लोकांच्या माना कापू शकतो ह्याची दोन सैनिकांची चक्क पैज लागते. आणि त्या निष्पाप लोकांचे प्राण घेतांना फोटो काढून जपानी वृत्तपत्रात त्यांचे आकडे छापून येतात.नानजिंग शहरावर जो अत्याचार जपान्यांनी केला त्या सर्व घटनांचे जसेच्या तसे सादरीकरण करणारा एक चित्रपट Black Sun: The Nanking Massacre (1995) काल रात्री बघितला. युट्युब वर आहे. तो चित्रपट बघितल्यावर सुन्न व्हायला होते. मानवाच्या हातून होणाऱ्या कृरतेचे प्रमाण ठरवायचे असेल तर जपानी सैन्याचे अत्याचार हे सर्वोच्च मानक असले पाहिजे. आपण वारंवार केवळ हिटलरबद्दल ऐकतो. पण हिटलरलाही लाजवेल असे कृत्य जपान्यांच्या नावावर आहे. हिटलर ने ज्यूंची कत्तल करण्याला त्यांच्याबद्दल असलेली घृणा, तिरस्कार होता, ज्याची ज्यूंना संपवून पूर्तता करणे हिटलरचे धोरण होते. जपान्यांना असे काही धोरण, धारणा, काहीच नव्हते. आपण जसे टोमाटो, काकडी चिरतो तसे ती रोज मजा म्हणून माणसे कापत होती. वैद्यकीय संशोधनासाठी थेट माणसे वापरली जात होती. प्रयोगांचे परिणाम अचूक मिळावे म्हणून भूल न देता शस्त्रक्रिया किंवा अन्य जीवघेणे प्रयोग केले जात असत. बर्फाळ हवेत हिमदंश होतो, त्यावर इलाज शोधण्यासाठी जपानी डॉक्टर युध्कैद्याना वापरायचे. त्यांना उघड्यावर कपडे न घालता उभे ठेवायचे, त्यांचे हात पाण्यात बुडवून ओले करायचे. अतिथंडीने गोठून हात कडक झाला कि तो तसाच झाडाची फांदी तोडल्यासारखा तोडायचे, असे करत करत खांद्यापर्यंत तोडायचे. मग पाय अशाच पद्धतीने तोडायचे. केवळ धड आणि डोके शिल्लक राहिलेला जिवंत माणूस मग असाच मरायला सोडून द्यायचे. अधिक विस्तृत वाचायचे असल्यास विकीपेज: https://en.wikipedia.org/wiki/Japanese_war_crimes

अंदमान निकोबार मध्ये अल्पकाळासाठीचा अंमल सोडता जपान्यांचा आपल्या सुदैवाने भारतावर हल्ला झाला नाही व भारत त्यांच्या अत्याचारापासून बचावले गेले. तरी अंदमान येथे भारतीय युद्धकैद्यांना जपानी पद्धतीची वागणूक मिळाली असे समजते. हा सर्व इतिहास बघता अमेरिकेने जपानवर बॉम्ब टाकले हे कृत्य योग्यच वाटते. हिरोशिमा नागासाकी झाल्यावर जपानने युद्धातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यामागेही एक कथा आहे. दोन अणुबॉम्ब पडल्यावर, आणखी असे किती बॉम्ब पडू शकतात ह्याबद्दल जपानी सैन्याने युद्धकैदी असलेल्या एका अमेरिकन सैनिकाकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. ह्यांच्या टोर्चर च्या अघोरी पद्धती माहिती असलेल्या त्या सैनिकाने गुप्त माहिती सांगायच्या नावाखाली चक्क ठोकून दिले की अमेरिकेकडे अजून शंभर अणुबॉम्ब आहेत. ते टोक्यो वर पुढचा हल्ला करणार आहेत. तेव्हा कुठे सरतेशेवटी घाबरून जपानी सैन्याने युद्धविरामाचा निर्णय घेतला. अन्यथा हे दोन बॉम्ब पडूनही जपान्यांचा अश्वमेध यज्ञ थांबलाच असता ह्याची खात्री नाही.

हिरोशिमा नागासाकी वर अणुबॉम्ब टाकून एका फटक्यात एक लाख चाळीस हजार निष्पाप मारले गेले आणि त्यासोबतच माणुसकीची हत्याही झाली, त्या सर्व निरपराध जपानी नागरिकांना दरवर्षी 6 आणि ९ ओगस्ट ला आठवणीने श्रद्धांजली वाहिली जाते. आपल्याला शाळेपासूनच ह्या हिरोशिमा नागसाकीच्या संहाराची ओळख झालेली असते. परंतु त्याला कारणीभूत असलेल्या जपान्यांच्या क्रूरतेची कधी हलकीशी जाणीव देखील होऊ दिली जात नाही. ह्यामागे सुभाषचंद्र बोस ह्यांचा जपान्यांशी असलेला संबंध कारणीभूत असावा काय? भारतीय नेत्यांपैकी आणखी कोणी जपान्यांकडे तारणहार म्हणून किंवा काट्याने काटा काढण्याचा उपाय म्हणून पाहत होते? ज्यूंवर झालेल्या अत्याचाराची आजही दर पाचव्या दिवशी उकरून काढून सतत आठवण करून दिली जात असतांना जपानी अत्याचारांना कुठे व का दडवले गेले असावे? जपानी लोकांच्या केवळ सुरम्य कष्टांच्या कथाच का ऐकू येतात?

जपान्यांनी कहर केला म्हणून अमेरिकेचा अणुहल्ला योग्य ठरतो असे माझे काहीही म्हणणे नाही. असे म्हणायचे झाले तर सुडाच्या नद्यांचे उगम शोधता शोधता मानवजातीच्या हजारो वर्षांचा इतिहास उघडून बसावे लागेल. जगातल्या कोणत्याही निरपराध, निष्पाप मनुष्याची हत्या होणे हा प्रकार अजिबात समर्थनीय नाही हे इथे नमूद करतो.

युद्धकाळात झालेल्या ह्या अमानवी अत्याचारांबद्दल जपानतर्फे वेळोवेळी अधिकृतपणे माफी मागण्यात आली आहे. जपानच्या सैन्याबद्द्ल महत्त्वाची घटनादुरुस्ती होऊन हे सैन्य केवळ बचावासाठी असेल असे ठरले. परंतु आता बरेचसे जपानी लोक असे काही अत्याचार झाले होते हे नाकारायच्या मनोवृत्तीचे होऊ लागले आहेत. आपल्या पूर्वजांनी केलेल्या अत्याचाराला नाकारणे हा एक नवीन प्रकार अनेक देशांत प्रचलित झाला आहे. ह्यातून कोणीही सुटलेले नाही. जपानमध्ये घटनादुरुस्ती होऊन बचावासाठीचे सैन्य हा उद्देश बदलून हल्ल्यासाठी सैन्याचा वापर केला जावा अशी तरतूद झाली आहे. हे समजल्यावर वाईट वाटले. जगात सर्वत्र राष्ट्रवादी आणि प्रतिगामी सरकारे येऊ घातली असतांना आपण नेमके परत शंभर वर्षापूर्वीच्या जगात तर येऊन पोचलो नाहीना अशी शंका येते.

युद्धाच्या कथा रम्य नसतात.
शौर्यगाथांच्या पात्यावरून निरपराधांचे रक्तही ठिबकत असते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा