परराष्ट्रनीतीमध्ये 'कोणताही देश' जे अधिकृतरित्या मांडतो ते सर्वथा खरेच असते असे नाही. नक्की काय खरे काय खोटे हे ३०-४० वर्षांनी कोणी आतल्या माणसाने काही लिहिले किंवा गुप्त कागदपत्रे खुली केली तरच माहित होते. त्यातही कागदपत्रे उपलब्ध झाली म्हणजे सत्य बाहेर आले असेही होत नाही. त्याचे विश्लेषण करावे लागते. विश्लेषण करतांना पूर्वग्रह टाळता येतीलच असे नसते. आतला माणूस असला म्हणजे तो जे बोलतो ते केवळ त्याच्याकडे असलेली माहिती असते. त्याचे अनुभव असतात. तो खरेच बोलतो असेही नसते, प्रसंग, नावे बदलली असू शकतात, त्याचाही स्वत:चा काही तात्कालिक अजेंडा असू शकतो. एखाद्या माणसाचे किंवा एका समुदायाचे अनुभव म्हणजे सत्याची खात्री नसते. कोणत्या कारवाईने काय साध्य करायचे होते व ते साध्य झाले की बिघडले हे केवळ ती कारवाई प्लान करणार्या व्यक्तीलाच माहित असते. अगदी एक्झिक्युट करणार्या टॉपच्या अधिकार्यालाही त्या कारवाईच्या मागचे हिडन अजेंडे माहित असतीलच असे नसते. गुप्तहेरांनादेखील आपल्याला एखाद्या कामगिरीवर पाठवले आहे ते कशासाठी ह्याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नसते. 'त्याच्या गरजेपुरती माहिती' असे गुप्तयोजनेत सामील असलेल्या प्रत्येकासाठीचे ब्रिद असते.
माध्यमात दिली जाणारी माहिती हीसुद्धा योजनेचा भाग असतो. माध्यमात माहिती देणे हाही कुठलातरी परिणाम घडवून आणण्याची योजना असते. माहिती दिली म्हणजे ती खरीच असते असे नाही, खोटीच असते असेही नाही. काय सांगितल्याने काय परिणाम होईल तीच, तेवढीच माहिती दिली जाते. दिल्या जाणार्या माहितीमागे 'जनतेला किंवा जगाला खरे काय ते सांगावे' हा उद्देश कधीच नसतो तर 'काय सांगितल्याने कोण कसा विचार करेन व काय कृती करेन' ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असतो. सत्य शोधायचे असल्यास उपलब्ध माहितीच्या शेकडो बिंदूंना जोडत जोडत चित्र तयार करायचे असते. लहान मुलांच्या पुस्तकात जशी बिंदूंची चित्रे असतात तसे. ते चित्र पूर्ण केले तरी केवळ आभासी वाघ तयार होतो. बिंदू जोडून सत्याचे आकलन झाल्यासारखे वाटत असले तरी सत्य कधीच पूर्णपणे हातात येत नसते. हवे ते बिंदू जोडून, नको त्या बिंदूंकडे दुर्लक्ष करून वाघाच्याऐवजी माकडाचे चित्रही तयार करणे शक्य असते.
एखादी घटना का घडली, कशी घडली त्या मागे नक्की कोण आहे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची सर्वसाधारण प्रोसेस रिवर्स इंजिनिअरिंग सारखी किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशनसारखी आहे. ती पार 'नेहरु कारणीभूत आहेत' पासून 'मोहम्मद गझनीच्या पहिल्या स्वारी'पर्यंत जाऊ शकते. खरोखर एखाद्या घटनेची पाळेमुळे शोधून काढायची तर त्या घटनेनंतर काय परिणाम झाले, कोणाला फायदा झाला, कोणाचे नुकसान झाले ह्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढणे महत्त्वाचे असते.हे फॉरवर्ड इंटीग्रेशन. शास्त्रशुद्ध इतिहासामध्ये अभ्यासाची ही पद्धत आहे. घटनेची कारणे व परिणाम दोन्हींचा परस्परावलंबी अभ्यास करावा लागतो. त्यातून एक सूत्र दिसू लागते. ते खरे असते. अर्थात ज्याला फायदा झाला तोच घटनेचा सूत्रधार असे मानणे म्हणजे एखाद्या मनुष्याचे प्रकृतीवर, भविष्यावर, होणाऱ्या परिणामांवर सर्वथैव नियंत्रण आहे हे कबूल करण्यासारखे होईल. योजना यशस्वी होतात त्याहून जास्त त्या फसतात हे लक्षात घेतले पाहिजे. फसणाऱ्या योजनांच्या परिणामांचाही वापर आपल्या फायद्यासाठी वसूल करून घेणे शक्य असते. अशा परिस्थितीत सत्य काय आहे त्यावर विश्वास ठेवणे अशक्य होऊन बसते.
जन्म आणि मृत्यू सोडल्यास 'संपूर्ण निखालस सत्य' अशी काही गोष्ट जगात अस्तित्वात नाही.
~संदीप डांगे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा