शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०११

बाजार

अलीकडेच आपण एक जाहिरात बघितली असेल. कपड्याच्या दुकानात एक ग्राहक शिरतो. त्याला काही बोलू न देता दुकानदार धडधड आपल्या पसंतीचे कपडे त्याच्या अंगावर चढवून मोकळा. वरून सांगतो कि हेच तुम्हाला चांगले दिसेल. वर वर पाहता ती कंपनी आपल्याला सांगते आहे कि आम्ही तुमच्याशी असे वागत नाही. तुम्हाला हवा तो बुके आम्ही देऊ. पण गम्मत अशी आहे कि ते बुके पण त्याच कंपनीने तयार केले आहेत. तुम्हाला फक्त निवड स्वातंत्र्य आहे. अगदी तसेच जसे एखाद्या बोकडाला कुठल्याही खाटकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्यासारखे. आज आपण मॉलमध्ये जातो. एकाच्या ठिकाणी दहा वस्तू घेऊन येतो. कारण दहा वस्तू दिसतात आणि त्या उचलाव्यात म्हणून तिथे ठेवल्या असतात. मार्केटिंग तंत्रात तुम्ही अगदी चीज साठी सापळ्यात अडकणाऱ्या उंदरासारखे असता. म्हणजे त्या उचलण्याचे स्वातंत्र्य जरी तुमचे असले तरी त्या उचलाव्या ही तुमची इच्छा तुमची नसून मॉल ची असते.

दरवर्षीप्रमाणे Valentine Day साजरा होतो. वृत्तपत्रात भरभरून लेख येतात. ते काय करतात तर तुमच्या मनात वातावरण निर्मिती करतात. आणि तुम्ही त्या दिवसासाठी मनातून तयार होता. आजूबाजूला सगळा आसमंत तुम्हाला प्रेमाने भारलेला वाटू लागतो. मग त्यात आपण पण सामील व्हावे असे आपल्याला वाटू लागते. बरे सामील व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे? तर कुणावर तरी प्रेम प्रदर्शित करायचे. त्यासाठी महागडे गिफ्ट घ्यायचे. म्हणजेच पद्धतशीर मार्केटिंग ला बळी पडायचे. कोण सांगते तुम्हाला Valentine Day येणार आहे ते? ...आई? वडील? आजोबा? आजी? कुणीही सांगायच्या आधी मार्केट सांगते. Valentine Day आला आहे. खरेदी करा. आपले कुठले सण अश्या पद्धतीने येतात? आणि अशा पद्धतीने साजरे होतात? आपला प्रत्येक सण शास्त्रीय पद्धतीने आणि निसर्ग नियमानुसार आखलेला आणि योजलेला आहे. विशेष म्हणजे सर्वसमावेशक आहे. कुटुंबातल्या प्रत्येकाला सोबत घेऊन साजरा करण्याचा आहे. कुठे लपून छपून चोरून भिऊन साजरा करायचा एकही हिंदू सण तरी नाही. फार लांब कशाला जा आता येते आहे कि होळी. त्यात तर सबकुच्छ खुल्लम खुलला आहे. शिव्या घाला कि प्रेमाने एकमेकांना भरवा. पण तिथे मार्केट ला एक्स्पोजर नाही ना. तिथे कुठे भरमसाठ आणि महागडी खरेदी करून कुणाला इम्प्रेस करायचे आहे. मग कशाला मार्केट होळी डोक्यावर घेईल.

ज्या प्रेमाला आवाहन करून हा दिवस साजरा केला जातो ते प्रेम फक्त तरुण आणि तरुणींचे आहे. साहजिकच प्रत्येक तरुण मनात ह्या प्रेमाला खास स्थान असते. तो मनातला एक हळुवार कोपरा आहे. त्यालाच साद घातली कि माणूस काहीही करायला तयार होतो. चार पैसे खर्च करणे तर खूप कमी आहे. म्हणजे काय तर तुमच्या प्रेमाचा बाजार झाला. प्रेम अमुक पद्धतीनेच व्यक्त करायला हवे असे लाखो लेख आणि शेकडो माध्यमं कोकलून कोकलून सांगत असतात. पण कुणीही हे सांगत नाही कि बाबा प्रेम कुठल्याही क्षणी कुठल्याही रुपात कुणाबद्दल ही व्यक्त होऊ शकते. हिरकणीने कडा उतरण्याआधी प्रेम व्यक्त करायला हा दिवस योग्य आहे का हा विचार केला होता?

पाश्चात्यांची विचारसरणी अंगकारणे कठीण आहे म्हणून आपण त्यांची वेशभूषा, भाषा आणि सण उचलायचे. म्हणजे आम्ही ही त्यांच्या सारखे प्रगत आहोत हे ढोंग मिरवायला मोकळे. पण ज्या मातीत आपण वाढलो जगलो त्या संस्कृतीची, त्यातल्या महान विचारवंत आणि शास्त्रज्ञांची आपणास काहीही माहिती नाही. मग कशाच्या जोरावर आपण अप्रगत आणि तेच तेवढे प्रगत म्हणायचे. आज भारतीय तरुण वयाच्या २३-२४ पर्यंत आईबापांवर अवलंबून असतात. पाश्चात्यांचे अनुकरण करायचे तर मग त्यांच्या १४-१६ वर्षीय मुलांचे करा जे या वयातच छोटी-मोठी का होईना स्वतः कमाई करायला सुरवात करतात. ते प्रचंड श्रीमत असूनही. आपल्याकडे अल्प-श्रीमंतही फक्त गाड्या उडवयाची कामे करतात.

आमच्या ओळखीचे एक उच्च-माध्यमिक शाळेचे शिक्षक आहेत. त्यांचा रोज या संकटांशी सामना असतो. त्यांचा तर ठाम विश्वासच बसला आहे कि अमेरिकन संस्कृती आपल्या डोक्यात घुसवण्याचे हे एक मोठे षड्यंत्र आहे. समाजामध्ये सगळीकडे बघितले तर त्यांचे म्हणणे पटते. वर्गात मुले शिक्षकांना अजिबात ऐकत नाहीत. फक्त मारायचे बाकी ठेवतात. म्हणजे काय काळ आला आहे बघा. ह्याला जर कुणी प्रगती आणि विकास म्हणत असेल तर म्हणो बापडे. गुरु, शिक्षकांना पाश्चात्य देशांत अनन्य सन्मान आणि आमच्या कडे हे असे. पैश्याची गुर्मी आणि आमचे कोण काय वाकडे करेल हा अहंगंड पालकांकडून मुलांकडे व्यवस्थित वाहत आहे.

जरा आजूबाजूला नजर टाका. आपण आपल्यासारखे राहिलो नाही असेच दिसते. अति-तंग कपड्यांमधल्या लहान मोठ्या सर्वच मुली जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष्य वेधून घेतात. मी काही संस्कृती रक्षक नाही. पण या आणि अश्या मादक कपड्यांची गरज मला सांगावी. एकीने तंग तर दुसरीने व्यवस्थित कपडे घातले असतील तर कुणाकडे तुम्ही निरखून पाहाल. दोष जो बघतो त्याच्या नजरेचा नसून जे दिसते त्याचा आहे. पूर्वी भारतात अगदी सुरुवातीला पंजाबी ड्रेस सुविधाजनक म्हणून प्रचंड लोकप्रिय झाला. कारण त्यात वावरायला मुलीना बरे पडत असे. त्याचे आजचे तंग रूप बघितले तर तो वावरायला कमी आणि दाखवायला जास्त सुविधाजनक आहे असेच दिसते. मी मुद्दाम येथे भारतीय पेहरावाचे उदाहरण दिले. मुद्दा तुम्ही जीन्स घालता कि पातळ नेसता हा नसून त्यातून तुम्हाला काय अभिप्रेत आहे हा आहे. आपल्या शरीराचा आपण शोभिवंत वस्तू म्हणून उपयोग करावा हे कोण शिकवते. नीटनेटके राहणे आणि सुंदर दिसणे प्रत्येकाचा हक्क आहे. पण सुंदर दिसणे आणि विकाऊ असणे यात तितकाच फरक आहे जितका सजलेल्या नवरीत आणि सजलेल्या वेश्येत असतो. तुम्ही काय पेहराव करता आणि त्यातून काय उद्बोधित होते ह्याचा तुम्ही विचार करत नाही असा अजिबात नाही. मुलीना वाटतंच सगळ्यांनी आपल्याकडे बघावे. ही वाटण्याची इच्छा मार्केट ने तयार केली. त्या इच्छेची बाजारपेठ केली. आता रस्तोरस्ती तुम्हाला ती बाजारपेठ फिरताना दिसते आहे. सर्व अंग झाकणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या साडीचे आजचे रूप थोडा छुपाव थोडा दिखाव असे झाले आहे. असे सेक्सी दिसण्याची गरज आहे? प्रेझेंटेबल असावे च्या नावाखाली उन्मादक असावे असंच आम्हाला वाटते. नाहीतर आमच्याकडे कुणी लक्ष्य देणार नाही. भाव देणार नाही. आपल्या पूर्वजांनी फार विचार करून मनुष्याच्या बुद्धीला गुणांना महत्व असावे असे सांगितले. आज बुद्धी-गुण जाऊ देत पण दिसणे नंबर एक असले पाहिजे असा सर्व विचार आहे. कारण बुद्धी-गुण मिळवणे कठीण आहे. दिसणे बाजारात विकत मिळते. आणि तेच उत्तम मानले जाते. पूर्वी गरिबी होती म्हणून लोक एकच कापडाचा जोड वापरायचे का? नाही त्या काळात गरजाच कमी होत्या. श्रीमंत माणूसही एकच प्रकारचे कपडे आयुष्यभर घालायचा. इतक्या प्रकारच्या साड्या होत्या पण होत्या साड्याच ना? आजच्या सारखे जीन्स, मिनीज, माय्क्रोज, सलवार-चुडीदार, कुर्ता आणि त्यातही १०० प्रकार होते? लो-वेस्ट, पेन्सिल, बूट-कट असे कितीतरी होते? त्यावर घालायला प्रत्येकी वेगळी पादत्राणे, आभूषणे? कारण गरज नव्हती. गरज मार्केट ने निर्माण केली. गरज निर्माण झाली कि ती भागावावीच लागते.त्यासाठी पैसा लागतो आणि तो आपल्याकडे आहे. प्रचंड आहे.

ह्यात पुरुष कुठेही नाहीत असे समजू नये. मुळात पुरुषच ह्या मार्केट चा अंतिम उपभोगी आहे. तोच ह्या स्त्रियांना बघणार. जी आवडली तिच्या साठी महागडी गिफ्ट्स घेणार. तिला फिरायला स्वतःच्या गाडीने महागड्या हॉटेलात नेणार, तिला इम्प्रेस करायला छान छान कपडे स्वतः घालणार आणि वरून इतर गोष्टी आहेतच. किती प्रकारचे मार्केट आहेत. ह्यात अतिश्रीमंतच असतात असे समजू नये. महागाई ही सापेक्ष असते. दोन वेळ खायची पंचाईत असलेला प्रेमवीर आपल्या तसल्याच प्रेयसीला चौपाटीवर नेऊन भेल खाऊ घालत असेल तरी त्याच्या आणि तिच्यासाठी ती चैन महागडीच आहे. पण प्रेम दाखवायचे असेल तर हे केलेच पाहिजे असे मार्केटने पसरवले आहे.

प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे कुणालाही ना सांगत आयुष्यभर झुरत राहणे असल्या बाष्कळ आउटडेटेड कल्पनांचा मी अजिबात पुरस्कार करत नाही. तो जमाना बित गया. पण प्रेम म्हणजे सागरकिनारी दगडामागे जाऊन, भर बागेत एकमेकांच्या मांडीवर झोपून, रस्त्याच्या बाजूला वयोवृद्धांना नजर खाली घालायला लावील असे चाळे करणे नक्कीच नाही. नजरेला नजर भिडून हृदयाच्या वाढणाऱ्या ठोक्याना प्रेम म्हणणे पार जुने झाले आहे. आजकाल मुले तीही आठवी नववीतली थेट फ्रेंडशिप 'मागतात' आणि तिच्यापेक्षा 'जास्त' मिळण्याची अपेक्षा असेल तर थेट 'लवशिप' मागतात. लवशिप कबूल झाली कि तिसऱ्या दिवशी चुंबनाची मागणी होते आणि आढेवेढे घेत ती मान्य होते. पुढच्या महिनाभरात प्रेमाचे पुढचे सर्व सोपान चढत प्रेम फार 'पुढे' जाते. फार धक्कादायक असले तरी हे सत्य आहे, हे तुमच्या आमच्या घरात आमच्या नकळत घडत आहे. ह्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता दिसत नसेल तर तुझे माझ्यावर प्रेमच नाही म्हणून ब्रेक-अप ला तयार. ब्रेक-अप होणे आवश्यक कारण दुसरीकडे कुठेतरी लवशिपचा गळ टाकलेला असू शकतो. अन्यथा एकच वेळेस १० प्रकरणे समर्थपणे हाताळणारे हेच १६ वर्षीय तरुण तरुणी मी स्वतः बघितले आहेत. हा काळाचा महिमा नसून घराघरात गरजणाऱ्या टीव्हीचा महिमा आहे. लहानपणापासून मुलांना एकच भावना प्रकर्षाने दिसत असते ती म्हणजे दोन भिन्नलिंगी व्यक्तीमधले प्रेम. ते कशासाठी असते हे पण सोदाहरण दिसत असते. त्याची चव चाखावी अशीच अपेक्षा त्या हळुवार वयात होते. टीव्हीवरचे मार्केट फक्त सेक्स विकत असते. कारण मनुष्य मनाला कुठल्याक्षणी तेच आवडते. म्हणून कुठल्याही मालिकेत, सिनेमात, गाण्यात ह्याचाच मनमुराद वावर असतो. थेट सेक्स नसला तरी प्रेमकहाणीचा मसाला असतोच असतो. ती दाखवण्याची पद्धत हळुवार नसून आक्रमकच असते. त्यामुळे प्रेम हे असेच असते हेच मुलांना दिसते. जे दिसते त्याचेच अनुकरण होते. मार्केटने हळुवारपण कधीच सोडून दिलं आहे. सुसंस्कार वैगेरे करणे हा त्याचा धंदा नाही.

ह्या सगळ्या अघोरी बदलांचे Valentine Day प्रातिनिधिक उदाहरण आहे. बरे तो एक विदेशी सण म्हणून आपण विरोध करतो तर नवरात्रीत जागो-जागी कुत्र्याच्या छत्र्या सारख्या उगवणाऱ्या गरब्याचे काय. गरब्याच्या नावाखाली, सण साजरा करण्याच्या नावाखाली जे उद्योग गर्भपाताच्या रुपात दिसून येतात ते काही लपून राहिले नाही. आज आम्हाला सर्व ताबडतोब हवे आहे. वाट बघण्याची झुरण्याची आमची तयारी नाही. त्यातही काही गोडी असते हे आम्हाला मान्य नाही. थेट उपभोग हाच काय तो आनंद. आनंदाची सगळी व्याख्याच या मार्केटने बदलवली आहे. व्यक्तीकेन्द्री समाज हे त्याचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे. मला आनंद मिळत असेल तर मी अमुक करणार हा तो दृष्टीकोण. आज शाळकरी आणि महाविद्यालयीन विध्यार्थ्यांच्या अंतर्गत भांडणांची ८० टक्के कारणे ही तथाकथित प्रेमप्रकरणाशी संबंधित असतात. अमुक एक मुलगी मला आवडते पण मला जो आवडत नाही त्याच्याशी बोलते म्हणून त्या ना आवडत्याला दमदाटी प्रसंगी मारहाण, माझ्या बहिणीवर कुणी लाईन का मारतो म्हणून त्याला मारहाण, माझ्या प्रेयसीला दुसऱ्या कुणी प्रपोज केले म्हणून त्याला मारहाण, माझे प्रेम प्रकरण जमत नाही परंतु त्याचे जमले म्हणून त्याला मारहाण अशी किती उदाहरणे सांगावीत.

'आज कालच्या तरुण बिघडलेत' असा कंठशोष आदिमकाळा पासून सुरु आहे. प्रत्येक पिढी नंतर येणाऱ्या पिढीला दोष देते. त्याची काय कारणे आहेत ती असू देत. पण खरच आजच्या सारखी मुजोरी, भडकपणा, बेमुवर्तपणा, बेफिकिरी कुठल्या काळात होती? स्वातंत्र्यलढ्यात जीव ओतून देणारी तरुण पिढीच होती, त्यांना बिघडलेत म्हणणारे तेंव्हापण होते. पण त्या तरुणांचे ध्येय उदात्त होते. गेल्या ५ हजार वर्षाच्या भारतीय इतिहासाचा मागोवा घेतल्यास असे दिसेल आपला राजा, राज्य आणि देश ह्याचाच विचार करणारी त्या विचारांपायी प्राण बलिदान करणारी तरुण पिढी कधी नव्हे इतकी आज बदलली आहे. देशाच्या छाताडावर धंधा कधी नव्हे तो स्वार झाला आहे. आणि आपण सर्व त्याच्या सापळ्यात त्याच्या इच्छेने स्वतःच्या पायाने जात आहोत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा