मोदींना पर्याय काय?
हा प्रश्न नोटबंदीचे अपयश ध्यानात यायला लागले तेव्हापासून जास्तच पिंगा घालू लागला आहे. साधारण डिसेंबर-जानेवारीपर्यंत, जेव्हा लोक हालअपेष्टा भोगून कंटाळली होती आणि सगळ्या जुमल्यांचे इमले कोसळू लागले होते. तेव्हा सामान्य नागरिकाच्या मनात चलबिचल व्हायला लागली. "नियत तो देखो, वो तो साफ हैं ना" हा बचावही साधारण तोकडा पडायला लागला आणि मोदींबद्दलची लार्जर दॅन लाइफ इमेज थरथरु लागली. तेव्हा '....हो, पण मोदींना पर्याय काय?" हा चलाख प्रश्न मुसळधार पावसासारखा कोसळायला लागला. ह्यामागे फार विचार करुन तयार केलेली योजना आहे. हा एक वेल-प्लॅन्ड प्रोपगंडा आहे.
ह्याच्या थोडं मुळाशी जाऊयात. मोदींनी शपथ घेतल्यावर संपूर्ण एक वर्ष अप्रतिम धुंदीचे वातावरण होते. वर्षाचा लेखाजोखा आल्यावर एक एक बुरूज ढासळायला लागले. ह्याचे कारण होते दिलेली सर्व आश्वासने, 'ही दिलीच नाहीत, तुम्हीच चुकीचे समजलात, आम्ही असे बोललोच नाही, असे कुठे असते का, ते अगदी निवडणूकांत असं बोलायलाच लागतं' इथवर चाललेला माजोरडेपणा. त्याच सुमारास 'तुमचे मत परत मोदींनाच द्याल का?' असा प्रश्न विचारत उत्तरात 'येस नो टाइप करा' छाप प्रचार/जनमतचाचपणी सुरु होती. साधारण २०१५ च्या उत्तरार्धात असे लक्षात आले की लोक भाजपला कंटाळतायत. कारण अगडबंब अपेक्षा कबूल केल्या, तसे आता डिलिवर होऊ शकत नाहीये. २०१९ ची तयारी तर करायचीच. मोदींची जी कोणी टीम असेल, त्यांनी हा प्रश्न जन्माला घातला. लोक जेव्हा पर्याय शोधू लागतात तेव्हा जो प्रश्न कोणताही मार्केटींगवाला, अगदी साडीच्या दुकानातला सेल्समनही विचारेल तो प्रश्न विचारला जाऊ लागला. 'म्याडम, आपको इससे ज्यादा सुंदर साडी पुरे सुरत में नही मिलेगी, जाओ, ढुंढके लाओ, डब्बल पैसा दूंगा"
तसाच प्रश्न ..... "मोदींना पर्याय काय?"
म्हणजे मोदींना पर्यायच नाही. पर्याय शोधूच नका. गरजच नाही. सामान्य नागरिक या प्रश्नाच्या पलिकडे नाही बघू शकत. गेल्या दहा वर्षात सुत्रबद्ध तर्हेने, कोट्यवधी रुपये ओतत जे चित्र उभे केले आहे, त्याला तोड देऊ शकेल असे कोणीतरी आहे का राजकारणात? नाहीच. अगदी भाजपातही नाही. खुद्द भाजपही नाही.
विरोधी पक्ष २०१० पासूनच लकवाग्रस्त झालेले आहेत. काँग्रेस तर खुपच सुस्त झाली. आधी धोरणं ठरवणे, निर्णय घेण्यात बरीच धांदल सुरु होती, त्यात भ्रष्टाचाराच्या आरोपाचा २०११ पासून जो अंदाधुंद गोळीबार सुरु झाला, त्यात पुरती संपली. त्यांची रिकवरी शक्यच नाही. तेव्हाच मोदींचा उदय फोटोशॉप-विकासाच्या मदतीने, २००२च्या पुण्याईने आस्तेकदम सुरु होता. मोदींनी आपला ब्रॅंड स्थापित केला. ही एक प्रोफेशनल पद्धत आहे जी आजवर कोणीही वापरली नाही.
पण प्रथम-स्थापित ब्रँडचीही एक गम्मत असते. कोलगेटला पर्याय नाही, बिसलेरीला पर्याय नाही, झेरॉक्सला पर्याय नाही, अॅक्वागार्डला पर्याय नाही. पण असे असते का? नाही. वरील सर्वांचे सक्षम किंबहुना अधिक भारी पर्याय आहेत.
आता मोदींना परास्त करायचे असेल तर मोदींपेक्षा भारी प्रोपगंडा करणे आवश्यक. सध्या जमाना मार्केटींगचाच आहे. मोदी मार्केटींग करुन जिंकले. 'मोदींना पर्याय नाही' हे सुद्धा मार्केटींगच आहे २०१९ साठी. मोदींच्या तोलामोलाचे अनेक नेते भारतात आहेत. त्यांनी स्वतःची प्रतिमा कधी निर्माण केली नाही. प्रतिमा निर्माण करावी लागतेच. आजच्या जमान्यात आपोआप कुणीही प्रसिद्ध होत नाही. मोदींच्या वकुबाचा गेल्या साडेतीन वर्षात एव्हाना पूर्ण अंदाज आलेला आहे. असेच सरकार चालवायचे असेल तर कुणीही चालवेल. कुणीही चालवेल तर मग काय कुणीही चालेल. हां, मोदींना कोणी 'अवतार' समजत असेल तर तो भाग वेगळा. मोदी नव्हते तेव्हा भारताचे काही बिघडले नाही, आले म्हणून लगेच किंवा पुढच्या २० वर्षातही फरक पडणार नाही.
'देशाच्या विकासाचे व्हिजन जे मोदींकडे आहे ते कुणाकडेच नाही, जी धमक ते व्हिजन राबवायची आहे ती कुणाकडेच नाही', इत्यादी कंड्या पिकवल्या गेल्या आहेत. याचे कारण भारताबद्दल, स्वतःच्या देशाच्या इतिहासाबद्दल धड अभ्यास नसलेल्या तरुणांनी हा बहुतांश देश भरलेला आहे. काँग्रेसने देशाची वाट लावली ह्या बाळकडूत न्हायलेले हे तरुण कितीसा अभ्यास करतात हे सर्वांनाच चांगले माहिती आहे. यांना 'तुम्ही द्रारिद्र्यात आहात कारण काँग्रेसने तुम्हाला तसेच ठेवले, आता प्रगती फक्त मोदीच करु शकतात' असे २०१२ पासून भरवले गेले आहे.
हे सर्व लोक देशाच्या विकासाबद्दल अवास्तव संकल्पना ठेवणारे, मंदबुद्धी आहेत. २ -३ वर्षात विकास होत असतो काय असे आता उलटं विचारणारे भाजपे १९४७ ला स्वतंत्र झाल्याबरोबर विकास मागत होते. (खरेतर ते तेव्हा वेगळंच काही मागत होते, व त्याचसाठी त्यांचे प्रयत्न निरंतर चालू आहेत) तरी आजवर स्वतंत्र भारतावर कोणत्याही पक्षाच्या सरकारने राज्य केलेले असू देत, पण एक नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की मागच्या ७० वर्षात आपण एक एक पायरी चढत एवढा विशाल आणि प्रचंड विविधता असलेला देश ज्या ठिकाणी घेऊन आलो ते अभिमानास्पदच आहे. यात 'सर्वच पक्षांचे, जनतेचे, नेत्यांचे' योगदान आहे. आपल्या देशात आजकाल नेहमी सिंगापूर, जापान वगैरे देशांचे दाखले दिले जातात, की स्वतंत्र झाल्यावर अमूक वर्षात ते इतके पुढे गेले वगैरे. पण त्याचवेळी अनेक देशांमध्ये चाललेली गृहयुद्धे, गरिबी, भुखमरी, लढाया, अराजक हे कोणी बघत नाही. भारतीय नागरिकांचे असे आहे की स्वतः काही करायचे नाही, आपल्या कमतरतांसाठी दुसर्यांना दोष देत बसायचे. इतर देशांच्या झटपट विकासाचे दाखले देणार्यांनी स्वतःच्या गावात तरी विकास घडवून आणला का एवढे स्वतः बघावे. तुमच्या गावा-शहराच्या क्षेत्रफळाएवढे देश विकसित झाले, त्याचेच तुम्ही दाखले देता ना? त्यामागची कारणेही अभ्यासून बघा. इथे मी कॉंग्रेस पक्षाला पाठीशी घालतोय असा काहींचा समज होईल. पण वास्तव तसे नाही. काँग्रेस असो वा भाजप, प्रत्येकाचे पाय मातीचे आहेत. कोणीही धुतल्या तांदळाचा नाही. पण मुद्दा हा आहे की गेल्या ७० वर्षांत आपण सर्वच राजकिय पक्षांचे अनेक लायक, नालायक, तेजस्वी ते तेजहीन, बुद्धीमान ते बुद्धीहीन, घराणेबाज ते आगंतुक, कर्तृत्ववान ते कर्तृत्वहीन असे सर्व प्रकारचे नेते सर्व पदांवर पाहिले आहेत. आजवर हा प्रश्न निर्माण झालाच नाही की ह्याला पर्याय काय, त्याला पर्याय काय?
त्याचे कारण असे की भलेही आपला समाज व्यक्तिपूजक असला, महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचणारा असला, भोंदुंचा भक्त असला तरी तो कायम स्वतःचा विकास पाहत असतो. 'मला काय फायदा?' ह्या प्रश्नावर आपली निवड करत असतो. अशा निवडीतूनच आपण आज जगातल्या दुसर्याल क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत झेप घेऊ शकलो. कारण आपण कोणा एकाच्या भरवश्यावर राहिलोच नाही. आपल्याला गरजही नव्हती कधी. म्हणून आपण यशस्वी झालो. आपल्या सर्व आशाआकांक्षा, स्वप्ने, इच्छा जर एकाच व्यक्तीच्या पायी समर्पित केल्या तर अधोगतीशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही. 'मोदींनी केले ते योग्यच केले असेल, आता लोकच असे निघाले त्याला ते काय करणार' ही जी मानसिकता आहे ती एक देश म्हणून, समाज म्हणून घातक आहे. नेता चुकतो, तो देव नाही हे समजण्याची कुवत आपला समाज गमावतो आहे. तो चुकला तरी तो चुकला नाहीच हे बळजबरी डोळे वटारुन सांगणारी यंत्रणा आपल्या आजूबाजूला तयार होत आहे ती घातक आहे. मोदींना पर्याय काय? हा प्रश्नही प्रेमाने नाही तर डोळे वटारुन विचारलेला आहे हे लक्षात घ्या. "मला काय फायदा?" ह्या विकासवादी प्रश्नापासून आपण "मोदींना पर्याय काय?" ह्या निरर्थक प्रश्नाकडे ढकलले जात आहोत.
त्यापेक्षा पुढील प्रश्न विचारा. मोदींना ज्यासाठी निवडुन दिले, ती कामे होत आहेत काय? किती झाली, आता काय स्टेटस आहे, किती दूरगामी निर्णय घेतले, कोणती कामे सुरु आहेत? ह्या सर्व प्रश्नांबद्दल तिसर्या च घटकाकडून जागरुकतेने प्रचार होणे आता आवश्यक आहे. काँग्रेस व इतर भाजपविरोधी कितीही ओरडले तरी त्यांची प्रतिमा भजपआयटीसेल व विकलेला मिडिया यांनी अविश्वासार्ह आणि मतलबी अशी करुन ठेवली आहे. ते असतील किंवा नसतील पण भाजप फार धुतल्या तांदळाचा आहे असे तर नाही.
भारतात राजकिय पटलावर काय चालू आहे हेच जिथे विरोधी पक्षाला सुधरत नाहीये तिथे मोदीविरोधात कोणी उभा करावा हे कुठून सुधरेल? ते त्यांनी करुही नये. मोदींना परास्त करणे फक्त भाजपमधून शक्य आहे. भाजप ही जळकुट्या व असुरक्षित लोकांची संघटना असल्याने ते फार दिवस कोणाला डोक्यावर बसवून ठेवत नही. २०१९ ची निवडणूक भाजप जिंकेल का नाही याबद्दल आज साशंकता निर्माण झाली आहे. तरी काहीही लांड्यालबड्या करुन जिंकलेच तर कदाचित मोदीच पंतप्रधान असतील. हां, त्यानंतर मात्र भारत कसा असेल हे मात्र माहित नाही.
मोदी निवडून आल्यावर जो उत्साह दिसत होता तो आता दिसतोय काय? केवळ संघवाले, हिंदुत्ववाले उत्साही आणी माजलेले दिसत आहेत. त्यांच्या मनातला विखार दिवसेंदिवस बाहेर येत आहे. मेंढराची कातडी घसरुन लांडग्यांची दिसायला लागली आहे. तरी लोक समजणार नाहीत. कारण बहुसंख्य लोकांना असे असणे म्हणजेच रामराज्य आहे असे पटवण्यात आले आहे. मुस्लिमांचे फार लाड झाले आता हिंदुंचे राज्य आहे अशा प्रकारची भावना हिंदुंमध्ये आहे. धर्म आणि राष्ट्रवादाच्या गुंगीत खर्याा विकासाकडे लक्ष जात नाही. जाऊ दिले जात नाही.
मोदींना पर्याय काय हा वरवर सोपा वाटणार प्रश्न फार गुंतातुंतीचा व गोल गोल घुमवून परत त्याच ठिकाणी आणणार्याक चकव्यासारखा आहे. त्या चकव्यालाच एक प्रश्न तुम्ही विचारा.... "पण मोदींना पर्याय का शोधायचा?" मग बघा.
एक सामान्य नागरिक म्हणून आपण आपला फोकस केवळ ह्यावर ठेवावा की भाजप जिंको वा कोणीही, भारताच्या विकासाची कामे झाली पाहिजेत, विकासाच्या योजनांबद्दल बोलले पाहिजे. 'मला काय फायदा?' या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा