
'साप-मुंगुसाची लढाई दाखवतो, पुरुषाला स्त्री बनवून दाखवतो' असे म्हणून गारुडी
गर्दी गोळा करतो, अर्धा तास काहीतरी इकडच्या तिकडच्या गोष्टी
सांगून हळूच ताबीज विकायला लागतो, लोकही त्याच्या संमोहित करणाऱ्या गप्पांत गंडले
जाऊन पाच पाच रुपयांचा ताबीज घेऊन टाकतात. एखादा गारुडी, डोंबारी खेळ
दाखवण्यापूर्वी नागदेवतेसाठी किंवा त्याच्या पेटाऱ्यात असलेल्या जागृत देवासाठी
दान मागतो, दान दिले नै तर तुमच्यासोबत काहीतरी वाईट होऊ शकते अशी
गर्भित धमकी देतो. लोक ह्या कचाट्यात येतात. पैसे काढून देतात.. पण तो शेवटपर्यंत पुरुषाची स्त्री झालेली दाखवत नाही कि सापाची मुंगुसाशी लढाई दाखवत नाही... अचानक खेळ
गुंडाळतो, नाही तर लोक कंटाळून आपल्या कामाला लागतात. न्यूज चॅनेलवाले
हेच करतात. ते गुंगवून ठेवतात. किमान अर्धातास तरी, नाही तर वीस मिनिटे तरी.
तेवढ्यात दोन चार कमर्शियल ब्रेक होतात, त्यात प्रेक्षकांना कपडे
धुवायचे साबण, मोरी घासायचे लिक्विड पासून छे दिन में गोरापन, बालोन्को कुदरती
कालापन, दाता-हातातले ९९% किटाणू मारायची औषधे, डास पळवून
लावायच्या मशीन, म्युच्युअल फंड,
हेल्थ इन्शुरन्स, गाड्यामाड्यापर्यंत
सगळे विकले जाते. हेच चॅनेलवाल्यांचे ताबीज विकणे, दान मागणे. हाच ह्यांचा
खरा धंदा. जाहिरातीसाठी प्रेक्षक गोळा करणे हा चॅनेलचा खरा धंदा. ह्याला
पत्रकारिता म्हणणे म्हणजे आगीला पाणी म्हणण्यासारखे आहे. आणि हो, 'सांप और नेवले कि
लडाई' ह्या न्यूज चॅनेलवर खरोखर अशाच गारुड्याच्या पद्धतीने
दाखवली आहे.
२००७ मध्ये नवीन
जॉब लागण्याआधी महिनाभराचा वेळ हाती होता. गावी घरी गेलो. करायला काहीच नव्हते. मग
टीव्ही बघत बसलो. फक्त न्यूजचॅनेल. दिवसाला १८ तास केवळ न्यूज बघत बसलो.. सतत सात
दिवस. सगळे चॅनेल फिरायचो. सातव्या दिवशी न्यूज चॅनेल पाहणे कायमचे बंद करून
टाकले... ते पागल करतात, ताबा घेतात मेंदूचा. महत्त्वाची, ज्ञानात भर
टाकणारी माहिती काहीच देत नाहीत. मोजून चार ओळी दिवसभर पार्श्वसंगितासोबत वाजवत
असतात. ब्रेकिंग न्यूज एक ओळीची असते. तीच दिवसभर फिरवणार, कारण
ह्यांच्याकडे डीटेल्स कधीच नसतात. आठवा, ठाण्यात रेल्वेवर ब्रिज
कोसळलेला तेव्हा तिथे उभ्या असलेल्या आणि तिथून रिपोर्टिंग करत असलेल्या कोणत्याही
चॅनेलकडे कसलेही डीटेल्स नसतांना माईकवाल्याच्या मनाला वाटेल ती माहिती ब्रेकिंग
न्यूज म्हणून ठोकून देणे सुरु होते. जरी डीटेल्स असले तरी ते दाखवणार नाहीच.
एखाद्या घटनेचे पाच सहा मिनिटाचे फुटेज असेल तर फक्त तीन सेकंदाचे फुटेज रिपीट
मारतात. ह्या चार ओळी आणि तीन सेकंदाचे फुटेज मागे व्यावसायिक गणित आहे. माणूस
चॅनेल सर्फ करतो. एका चॅनेलवर किमान तीन सेकंद घालवतो, तेव्हड्यात काही
लक्ष वेधून घेणारे दिसले तर थांबतो. मग ह्यांचा गारुड्याचा खेळ सुरु होतो. 'जीन्होने अभी अभी
अपने टीवीसेट खोले है, उनको ये बात बता दे कि फलाना धिकाना हुवा है...
' अशा अगदी माफक स्वरुपात सर्फ करत आलेल्या प्रेक्षकाला गपकन
धरण्याचा प्रकार सुरु झाला.
माणसाला दोन
प्रकारच्या कथा आवडतात. एक फिक्शन आणि एक रिअल. खऱ्याखुऱ्या घटनांच्या बातम्या
थ्रील देतात, किक देतात. खून,
बलात्कार, भ्रष्टाचार, अपघाताच्या
बातम्यांनी भावना उद्दीपित होतात. कथास्वरुपात मांडलेले घटनाक्रम फार लोकप्रिय
आहेत. 'सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल' इत्यादी. संपूर्ण काल्पनिक
असलेल्या सीआयडीला प्रेक्षक डोक्यावर घेतात तिथेच संपूर्ण सत्य घटनेवर आधारित
क्राईम पेट्रोलसुद्धा आवर्जून पाहतात. पण क्राईम पेट्रोल पाहताना हे माहित असते कि
ही घटना प्रत्यक्षात घडलेली आहे. त्याचा मनावर वेगळा परिणाम होत असतो. 'इंडियाज मोस्ट
वांटेड' हा पहिला कार्यक्रम असावा जो खऱ्या घटना नाटकीय पद्धतीने
दाखवायचा. ह्या प्रोग्राम ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ह्यात फार काही सृजनात्मक
करण्यासारखे नव्हते. उपलब्ध पोलीस रेकॉर्ड घेऊन त्यातले प्रसंग नाट्यरूपात
दाखवायचे, बस.. लोकांना ह्यात मनोरंजन मूल्य सापडते. हेच मनोरंजन
मूल्य घेऊन पत्रकारितेचे लायसन्स घेऊन वृत्तवाहिन्या खऱ्या बातम्या मनोरंजक
पद्धतीने दाखवतात. त्यानंतर आला रिअल टाईम घटनांच्या बातम्यांचा काळ. ब्रेकिंग
न्यूज म्हणजे काय? म्हणजे जे काही आतापर्यंत सुरु होते ते बदलले
आहे. आज आत्ता ताबडतोब. आपल्या बोअरिंग रटाळ जीवनात असे धक्के थ्रीलचा अनुभव
देतात. बोरवेलमध्ये फसलेला मुलगा काढणे व
त्याची 'पल पल कि खबर' मिळणे जनतेला टीवीच्या पडद्यावर चिकटवून ठेवू
लागले. चालू घटनेतल्या थ्रीलचा जिवंतपणे उपभोग घेता येत होता. त्या एक विशिष्ट
काळात बोरवेल मध्ये मुले पडणे ह्याची साथ आली होती. ती अपोआप होती? आता मुले पडत
नाहीत? त्या आधी पडत नव्हती? गणपतीला दुध पाजणे हा एक
प्रकार. मी तर बहुतांश वेळा बघितले आहे कि जी ब्रेकिंग न्यूज म्हणून एक्सक्लुजीव
म्हणून बातमी दिली जाते, तिला खरेच काही मूल्य नसते. अगदी
पंतप्रधानसारख्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीचा खून झाला तर काही महत्त्व.
म्हणजे निश्चित आणि मोठी बातमी असेल तरच. 'ब्रेकिंग न्यूज, आताच हाती
आलेल्या बातमीनुसार अर्थसंकल्पात सिगरेटवर कर वाढला असण्याची शक्यता आहे असे
सूत्रांकडून कळले.' ही काय ब्रेकिंग न्यूज आहे का? ह्यात काहीही
बातमीमूल्य नाही. पण भन्नाट काहीतरी सांगतोय असा देखावा निर्माण करणे. कोणा बाबाला
स्वप्न पडले म्हणून पुरातत्व खात्याने जमीन खोदणे आणि टीव्ही ने त्याला लाइव
दाखवणे ह्यात एक षड्यंत्र होते, प्रेक्षकांची परीक्षा घेणे सुरु होते.. भूतप्रेत, गाय, एलियन, ऑक्सिजन वगैरे.
हळूहळू मनोरंजन आणि प्रोपागांडा ह्यातली सीमारेषा धूसर होत आता मनोरंजनातून
प्रोपगंडा पेरायला सुरुवात झाली. नुकतीच एक व्हिडीओ क्लिप वायरल झालेली बघितली (जी
खरेतर बरीच जुनी आहे) ज्यात शाहरुख ने पाकिस्तानी जळीत प्रकरणात देणगी दिली असे एक
मिनिटाच्या क्लिप मध्ये होते. आता बघा,
ती पूर्ण क्लिप सहा
मिनिटांची होती. त्यात शेवटच्या मिनिटाला शाहरुखने अशी कोणतीच मदत केली नाही असे
आम्हाला शाहरुख कडून कळते आहे असे सांगतात. पण पहिले पाच मिनिटे 'देणगी दिल्याचा
मेसेज वायरल झाला आहे' हा मेसेज रंगवून रंगवून सांगतात. इतका कि
कंटाळा येईल तोपर्यंत. अशाच रीतीने खऱ्या
बातम्या सांगण्याच्या निमित्ताने खोट्या सांगून टाकतात. 'सुत्रो के हवाले
से' म्हटले कि झाले. अंगावर काही येत नाही. representative
image अशा नावाने एखादी image टाकायची संपादकीय पद्धत आहे. त्या नावाखाली फोटोशॉप image टाकून त्या image खऱ्या असल्याचा भास करून द्यायचा.. असले अनेक
धंदे सराईतपणे सुरु आहेत. त्याविरुद्ध कोणीच काही करू शकत नाही. अपवाद फक्त सूचना
आणि प्रसारण मंत्रालय.
न्यूज चॅनेलचे
काही प्रकार आहेत. अनेक चॅनेल केवळ व्यापारक्षेत्राशी निगडित आहेत. पण शेअरमार्केट
म्हणजेच ह्यांचे व्यापारउदिम आणि उद्योग. ह्यात कायमस्वरुपी शेअरबाजाराशी संबंधित
बातम्या असतात. मार्केट सुरु असतांना लाइव रिपोर्टिंग आणि विश्लेषण, मार्केट
संपल्यावर दिवसभर काय काय झाले त्याचे विश्लेषण. लोकांना आर्थिक साक्षर करण्याच्या, आर्थिक प्रश्न
सोडवण्याच्या, गुंतवणूक करण्याच्या नावाखाली केवळ म्युच्युअल फंडच कसे
योग्य आहे हे गळी उतरवणे असते. एसआयपी हाच कसा सर्वोत्तम मार्ग आहे ह्याची
मार्केटिंग करणे. ह्या चॅनेल्सची ही म्युच्युअल फंड आणि शेअरब्रोकर्स फर्म्ससाठीची
छुपी जाहिरातबाजीच आहे. तसेच क्रिडाक्षेत्र म्हणजे केवळ क्रिकेटचे सामने, सुरु
होण्यापूर्वी, संपल्यावर त्यावरचे दोन दोन तासाचे विश्लेषण नमक गप्पांचे
कार्यक्रम, त्याचा जरा TRP घसरू लागला तर क्रिकेटशी कोणताही संबंध
नसलेल्या सुंदरींना कमी कपड्यात चर्चेला बसवणे... बाकी भारतीय खेळ, हॉकी, ऑलिम्पिकवाले खेळ
सगळे अदृश्य. कला आणि मनोरंजनक्षेत्र म्हणजे केवळ बॉलिवूड, पेज थ्री
पार्ट्या, सिनेमा लॉन्च, इत्यादी. इथुन हळुहळु सुरु झालेलं ते मालिकांचे, रिअलिटी शोचे, कॉमेडी शोचे तुकडे दाखवणे, मालिका सिनेमातल्या नटनट्यांच्या
मुलाखती, सेटवरचे प्रसंग दाखवणे इत्यादी. भारतीय लोककला, लोकसंगीत, शास्त्रिय संगित, लोकनृत्ये, चित्रकला, शिल्पकला आणि अशा
६४ कलांच्या प्रसाराचा भार केवळ सरकारी वाहिन्यांनी वाहायचा. त्याचा ह्या कमर्शियल
चॅनेलवाल्यांच्या मनोरंजनक्षेत्रात समावेश होत नाही. कारण
क्रिकेट-सिनेमा-मालिकांसाठी प्रेक्षक मिळवून द्यायची सुपारी ह्यांनी घेतली आहे.
"आजच्या ठळक
बातम्या, दिनभर कि खबरे कुछ इस प्रकार है" असे शांततेत न्यूज
वाचता वाचता न्यूज अॅन्कर पत्रकार कधी झाले ते कळलेच नाही. पूर्वी अॅन्कर
फोनलाईन वर असलेल्या संबंधित व्यक्तीकडून किंवा स्टुडीओत बोलावून त्या विशिष्ट
विषयावर त्या व्यक्तीचे (तज्ञ किंवा संबंधित जसे कि पोलीस अधिकारी, पदाधिकारी, राजकीय नेता, इत्यादी) काय मत
आहे हे प्रेक्षकांना ऐकवायचा. कारण अॅन्करचे काम केवळ बातम्या सादर करणे इतकेच
होते. फॅशन शोमध्ये मॉडेल्स जशा फॅशन डिझाईनरच्या कलाकृती दाखवण्यासाठी कॅटवॉक
करतात तसे अॅन्करचे काम असायचे. दोन पाहुण्यात परस्परविरोधी मतांवर चर्चा
व्हायच्या म्हणजे अॅन्कर प्रश्न मांडून पाहुण्यांना बोलू द्यायचा. नंतर
त्यांच्यात जुगलबंदी लावून रेफ्री सारखे काम अॅन्कर करू लागले. आता अॅन्कर
स्वत:च एक बाजू घेऊन दुसऱ्या बाजूच्या पाहुण्याला शाब्दिक ठोसे लगावून 'मेरी गली में मैच
शेर' करत असतो. हे लोकांना आवडते. अर्णवने कन्हैया आणि उमर ला
स्टुडीओत बोलावून पत्रकारितेवर जो बलात्कार केला, त्यादिवशी विशिष्ठ
लोकांना झालेला आसुरी आनंद मला अजून लक्षात आहे. इथून सर्व काही ज्या भयंकर
पद्धतीने बदलले ते कायमचेच.
गेल्या कित्येक
महिन्यांपासून रविश कुमार टीव्ही देखना छोड दिजीये असे आर्जव करत आहे. त्यामागे हा
सगळा इतिहास आहे. भारतीय जनतेभोवती न्यूज चॅनेलच्या माध्यमातून एक मजबूत सापळा
रचला गेला आहे. तो हळूहळू करकचून आवळण्यास सुरुवात होईल. किंबहुना झालीही आहे.
मिडिया पूर्वी सूक्ष्मपणे जनतेचे मानस बदलण्याचे काम अगदी घाबरून घाबरून करत असे.
कारण असे करण्यास विरोध करणारेही मीडियात होते. आता अशा विरोधास संपवणे सोपे झाले
आहे. आणि भारतीय प्रेक्षक तिसऱ्या वर्गाच्या बुद्धीचा असल्याने विचारांवर नियंत्रण
मिळवण्याचे काम उघडउघड व राक्षसी पद्धतीने होत आहे.
हा एक
मानसशास्त्रीय सापळा आहे. मनुष्याच्या मनात नैसर्गिकरित्या काही पूर्वग्रह असतात.
माणूस आपल्या मेंदूचा वापर करून तार्किकपद्धतीने निर्णय घेतो हे शंभर टक्के खरे
नाही. समोर आलेली माहिती खरी कि खोटी ह्याची शहानिशा करायची बहुतांश लोकांची
मानसिकताच नसते. मनुष्य त्याच्यासमोर सातत्याने येणाऱ्या एखाद्या माहितीला खरे
मानू लागतो. एकच बाजूचे विचार सातत्याने
ऐकत राहिल्याने तेच खरे आहेत असे मानतो. इतर लोक काय करत आहेत ते बरोबर असेल
म्हणून तेच फॉलो करू लागतो. 'Types of
Biases and examples' असे गुगल सर्च
करा आणि मनुष्याचे मन किती भोळे असते ते
बघा. त्या सर्वांची चर्चा ह्या लेखात अशक्य आहे. सामान्य माणसाच्या ह्या अगतिकतेचा
फायदा उचलून त्याला भ्रामक जगात जगायला भाग पाडणे मीडियाद्वारे सुरु आहे. मिथक आणि
सत्य ह्यातली सीमारेषा जाणवूच नये इतक्या पातळीवर हे षड्यंत्र पोचले आहे. न पचणारे
सत्य पुढ्यात आल्यावर त्यावर अविश्वास दाखवणे, आवडते असत्य कवटाळून घेणे
हा स्वभाव बनला आहे. ह्याच मानसिकतेच्या भरवश्यावर आपले विद्यमान पंतप्रधान
दरदिवशी एक नवीन खोटे बोलून छातीठोकपणे निभावून नेतात. त्यांना ही हिम्मत
त्यांच्या हातातल्या सत्तेने दिली आहे. माध्यमांच्या आजवरच्या वाटचालीने दिली आहे.
आज हे बहुसंख्य जनतेच्या मनात कोणतीही आयडिया पेरू शकतात. अविचारी झुंडीने घेतलेले
कित्येक निष्पाप लोकांचे प्राण हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. सामान्य माणसातला पशु
जागा करण्याचे काम पूर्णत्वास येत आहे. आता त्या पशुला विरोधी मतांच्या लोकांचा
नायनाट करा अशा उघड उघड सूचना दिल्या जात आहेत.
अशा अवस्थेत
लोकशाहीचा बळी जाणे अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीने स्वत:हून तंत्र
ताब्यात घेण्यापेक्षा लोकांनी आपणहून त्याच्या ताब्यात देणे जास्त भयावह असते.
जर्मनीचे उदाहरण ह्यासंदर्भात नेहमीच दिले जाते. माझ्या मते रवांडा देशातले
जिनोसाईड + चीनमधले कल्चरल रीवोल्युशन + जर्मनीचे नाझीकरण अशा तिन्ही प्रकारचे
भवितव्य एकत्रितपणे देशासमोर मांडले जात आहे. ह्यात जे भरडले जाणारे सामान्य लोक
तेच असतील ज्यांनी हा प्रकार आजवर वाढू देण्यात सहभाग दिला किंवा त्याकडे दुर्लक्ष
केले. आपल्या धर्माचे राज्य ह्या देशावर आले म्हणजे आपल्या परिस्थितीत बदल घडणार
नाही हे सगळा विध्वंस झाल्यावर त्यांना कळेल. पण उपयोग नाही. धर्माचे ठेकेदार
जेव्हा ह्यांच्यावर अत्याचार करू लागतील आणि मग दाद मागायची तरी कोणाकडे असा
प्रश्न उभा राहील तेव्हा लोकशाही गमावल्याचा पश्चाताप कोणतेही प्रायश्चित्त घेऊन
संपणार नाही.
उपाय काय? फार सोपे उपाय
आहेत. प्रश्न विचारा. प्रश्न विचारण्याआधी कोणत्याही माहितीला दुसऱ्या बाजू असू
शकतात त्याचा किमान विचार करा. माहिती पडताळून पहा. अगदी सोपे म्हणजे दिलेल्या
आश्वासनांची पूर्तता कितपत झाली तेवढे शोधा. बेरोजगार, शेतकरी, उद्योजक, सामान्य लोक
ह्यांचा खऱ्या समस्या कितपत खरोखर संपल्या, त्यावर कितपत काम झाले ते
बघा. एखादी बातमी ऐकून, एखादे भाषण ऐकून आपल्या भावना तीव्र होतात का
ह्याकडे लक्ष ठेवले तरी बरेच सांभाळता येते. आपला पार चढतो, तोंडातून अपशब्द
निघतात का हे बघितले कि समजायचे कुठेतरी काहीतरी हुकते आहे. कोणाच्याही कोणत्याही
दाव्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
दिशाभूल करणारे सर्वे, खोट्या आकृत्या, खोटे तक्ते ह्याच्यावर
हुरळून जाऊ नका. खोट्या बातम्या शेअर करू नका. तुम्ही शेअर करता म्हणजे तुम्ही
त्याची खातरजमा केली आहे, तुमचा त्याच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही ते
शेअर केले आहे असे तुमचा मित्र, नातेवाईक समजतो. त्याचा तुमच्यावर विश्वास असतो, त्या विश्वासाचा
गैरफायदा घेऊन तुमच्या हाताने खोट्या बातम्या पसरवल्या जातात.
एवढे छोटे उपाय
केलेत तरी हा भारत आपला फार उपकृत राहील. येत्या पिढ्यांना सुखाचा श्वास घेता
येईल. त्यांना मुठभर बदमाश लोकांच्या सापळ्याचे शिकार होऊ न देणे हे आपल्याच हाती
आहे. हां, हा माझा लेख नक्की शेअर करा. तुमच्या नावासकट करा, बिननावाचा करा.
काही हरकत नाही.