सोमवार, ४ मार्च, २०१९

बदमाश मिडीयाचा देशविघातक सापळा




'साप-मुंगुसाची लढाई दाखवतो, पुरुषाला स्त्री बनवून दाखवतो' असे म्हणून गारुडी गर्दी गोळा करतो, अर्धा तास काहीतरी इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून हळूच ताबीज विकायला लागतो, लोकही त्याच्या संमोहित करणाऱ्या गप्पांत गंडले जाऊन पाच पाच रुपयांचा ताबीज घेऊन टाकतात. एखादा गारुडी, डोंबारी खेळ दाखवण्यापूर्वी नागदेवतेसाठी किंवा त्याच्या पेटाऱ्यात असलेल्या जागृत देवासाठी दान मागतो, दान दिले नै तर तुमच्यासोबत काहीतरी वाईट होऊ शकते अशी गर्भित धमकी देतो. लोक ह्या कचाट्यात येतात. पैसे काढून देतात.. पण तो शेवटपर्यंत पुरुषाची स्त्री झालेली दाखवत नाही कि सापाची मुंगुसाशी लढाई दाखवत नाही... अचानक खेळ गुंडाळतो, नाही तर लोक कंटाळून आपल्या कामाला लागतात. न्यूज चॅनेलवाले हेच करतात. ते गुंगवून ठेवतात. किमान अर्धातास तरी, नाही तर वीस मिनिटे तरी. तेवढ्यात दोन चार कमर्शियल ब्रेक होतात, त्यात प्रेक्षकांना कपडे धुवायचे साबण, मोरी घासायचे लिक्विड पासून छे दिन में गोरापन, बालोन्को कुदरती कालापन, दाता-हातातले ९९% किटाणू मारायची औषधे, डास पळवून लावायच्या मशीन, म्युच्युअल फंड, हेल्थ इन्शुरन्स, गाड्यामाड्यापर्यंत सगळे विकले जाते. हेच चॅनेलवाल्यांचे ताबीज विकणे, दान मागणे. हाच ह्यांचा खरा धंदा. जाहिरातीसाठी प्रेक्षक गोळा करणे हा चॅनेलचा खरा धंदा. ह्याला पत्रकारिता म्हणणे म्हणजे आगीला पाणी म्हणण्यासारखे आहे. आणि हो, 'सांप और नेवले कि लडाई' ह्या न्यूज चॅनेलवर खरोखर अशाच गारुड्याच्या पद्धतीने दाखवली आहे.

२००७ मध्ये नवीन जॉब लागण्याआधी महिनाभराचा वेळ हाती होता. गावी घरी गेलो. करायला काहीच नव्हते. मग टीव्ही बघत बसलो. फक्त न्यूजचॅनेल. दिवसाला १८ तास केवळ न्यूज बघत बसलो.. सतत सात दिवस. सगळे चॅनेल फिरायचो. सातव्या दिवशी न्यूज चॅनेल पाहणे कायमचे बंद करून टाकले... ते पागल करतात, ताबा घेतात मेंदूचा. महत्त्वाची, ज्ञानात भर टाकणारी माहिती काहीच देत नाहीत. मोजून चार ओळी दिवसभर पार्श्वसंगितासोबत वाजवत असतात. ब्रेकिंग न्यूज एक ओळीची असते. तीच दिवसभर फिरवणार, कारण ह्यांच्याकडे डीटेल्स कधीच नसतात. आठवा, ठाण्यात रेल्वेवर ब्रिज कोसळलेला तेव्हा तिथे उभ्या असलेल्या आणि तिथून रिपोर्टिंग करत असलेल्या कोणत्याही चॅनेलकडे कसलेही डीटेल्स नसतांना माईकवाल्याच्या मनाला वाटेल ती माहिती ब्रेकिंग न्यूज म्हणून ठोकून देणे सुरु होते. जरी डीटेल्स असले तरी ते दाखवणार नाहीच. एखाद्या घटनेचे पाच सहा मिनिटाचे फुटेज असेल तर फक्त तीन सेकंदाचे फुटेज रिपीट मारतात. ह्या चार ओळी आणि तीन सेकंदाचे फुटेज मागे व्यावसायिक गणित आहे. माणूस चॅनेल सर्फ करतो. एका चॅनेलवर किमान तीन सेकंद घालवतो, तेव्हड्यात काही लक्ष वेधून घेणारे दिसले तर थांबतो. मग ह्यांचा गारुड्याचा खेळ सुरु होतो. 'जीन्होने अभी अभी अपने टीवीसेट खोले है, उनको ये बात बता दे कि फलाना धिकाना हुवा है... ' अशा अगदी माफक स्वरुपात सर्फ करत आलेल्या प्रेक्षकाला गपकन धरण्याचा प्रकार सुरु झाला.

माणसाला दोन प्रकारच्या कथा आवडतात. एक फिक्शन आणि एक रिअल. खऱ्याखुऱ्या घटनांच्या बातम्या थ्रील देतात, किक देतात. खून, बलात्कार, भ्रष्टाचार, अपघाताच्या बातम्यांनी भावना उद्दीपित होतात. कथास्वरुपात मांडलेले घटनाक्रम फार लोकप्रिय आहेत. 'सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल' इत्यादी. संपूर्ण काल्पनिक असलेल्या सीआयडीला प्रेक्षक डोक्यावर घेतात तिथेच संपूर्ण सत्य घटनेवर आधारित क्राईम पेट्रोलसुद्धा आवर्जून पाहतात. पण क्राईम पेट्रोल पाहताना हे माहित असते कि ही घटना प्रत्यक्षात घडलेली आहे. त्याचा मनावर वेगळा परिणाम होत असतो. 'इंडियाज मोस्ट वांटेड' हा पहिला कार्यक्रम असावा जो खऱ्या घटना नाटकीय पद्धतीने दाखवायचा. ह्या प्रोग्राम ला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ह्यात फार काही सृजनात्मक करण्यासारखे नव्हते. उपलब्ध पोलीस रेकॉर्ड घेऊन त्यातले प्रसंग नाट्यरूपात दाखवायचे, बस.. लोकांना ह्यात मनोरंजन मूल्य सापडते. हेच मनोरंजन मूल्य घेऊन पत्रकारितेचे लायसन्स घेऊन वृत्तवाहिन्या खऱ्या बातम्या मनोरंजक पद्धतीने दाखवतात. त्यानंतर आला रिअल टाईम घटनांच्या बातम्यांचा काळ. ब्रेकिंग न्यूज म्हणजे काय? म्हणजे जे काही आतापर्यंत सुरु होते ते बदलले आहे. आज आत्ता ताबडतोब. आपल्या बोअरिंग रटाळ जीवनात असे धक्के थ्रीलचा अनुभव देतात.  बोरवेलमध्ये फसलेला मुलगा काढणे व त्याची 'पल पल कि खबर' मिळणे जनतेला टीवीच्या पडद्यावर चिकटवून ठेवू लागले. चालू घटनेतल्या थ्रीलचा जिवंतपणे उपभोग घेता येत होता. त्या एक विशिष्ट काळात बोरवेल मध्ये मुले पडणे ह्याची साथ आली होती. ती अपोआप होती? आता मुले पडत नाहीत? त्या आधी पडत नव्हती? गणपतीला दुध पाजणे हा एक प्रकार. मी तर बहुतांश वेळा बघितले आहे कि जी ब्रेकिंग न्यूज म्हणून एक्सक्लुजीव म्हणून बातमी दिली जाते, तिला खरेच काही मूल्य नसते. अगदी पंतप्रधानसारख्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीचा खून झाला तर काही महत्त्व. म्हणजे निश्चित आणि मोठी बातमी असेल तरच. 'ब्रेकिंग न्यूज, आताच हाती आलेल्या बातमीनुसार अर्थसंकल्पात सिगरेटवर कर वाढला असण्याची शक्यता आहे असे सूत्रांकडून कळले.' ही काय ब्रेकिंग न्यूज आहे का? ह्यात काहीही बातमीमूल्य नाही. पण भन्नाट काहीतरी सांगतोय असा देखावा निर्माण करणे. कोणा बाबाला स्वप्न पडले म्हणून पुरातत्व खात्याने जमीन खोदणे आणि टीव्ही ने त्याला लाइव दाखवणे ह्यात एक षड्यंत्र होते, प्रेक्षकांची परीक्षा घेणे सुरु होते..  भूतप्रेत, गाय, एलियन, ऑक्सिजन वगैरे. हळूहळू मनोरंजन आणि प्रोपागांडा ह्यातली सीमारेषा धूसर होत आता मनोरंजनातून प्रोपगंडा पेरायला सुरुवात झाली. नुकतीच एक व्हिडीओ क्लिप वायरल झालेली बघितली (जी खरेतर बरीच जुनी आहे) ज्यात शाहरुख ने पाकिस्तानी जळीत प्रकरणात देणगी दिली असे एक मिनिटाच्या क्लिप मध्ये होते. आता बघा, ती पूर्ण क्लिप सहा मिनिटांची होती. त्यात शेवटच्या मिनिटाला शाहरुखने अशी कोणतीच मदत केली नाही असे आम्हाला शाहरुख कडून कळते आहे असे सांगतात. पण पहिले पाच मिनिटे 'देणगी दिल्याचा मेसेज वायरल झाला आहे' हा मेसेज रंगवून रंगवून सांगतात. इतका कि कंटाळा येईल तोपर्यंत. अशाच रीतीने खऱ्या  बातम्या सांगण्याच्या निमित्ताने खोट्या सांगून टाकतात. 'सुत्रो के हवाले से' म्हटले कि झाले. अंगावर काही येत नाही.  representative image अशा नावाने एखादी image टाकायची संपादकीय पद्धत आहे. त्या नावाखाली फोटोशॉप image टाकून त्या image खऱ्या असल्याचा भास करून द्यायचा.. असले अनेक धंदे सराईतपणे सुरु आहेत. त्याविरुद्ध कोणीच काही करू शकत नाही. अपवाद फक्त सूचना आणि प्रसारण मंत्रालय.

न्यूज चॅनेलचे काही प्रकार आहेत. अनेक चॅनेल केवळ व्यापारक्षेत्राशी निगडित आहेत. पण शेअरमार्केट म्हणजेच ह्यांचे व्यापारउदिम आणि उद्योग. ह्यात कायमस्वरुपी शेअरबाजाराशी संबंधित बातम्या असतात. मार्केट सुरु असतांना लाइव रिपोर्टिंग आणि विश्लेषण, मार्केट संपल्यावर दिवसभर काय काय झाले त्याचे विश्लेषण. लोकांना आर्थिक साक्षर करण्याच्या, आर्थिक प्रश्न सोडवण्याच्या, गुंतवणूक करण्याच्या नावाखाली केवळ म्युच्युअल फंडच कसे योग्य आहे हे गळी उतरवणे असते. एसआयपी हाच कसा सर्वोत्तम मार्ग आहे ह्याची मार्केटिंग करणे. ह्या चॅनेल्सची ही म्युच्युअल फंड आणि शेअरब्रोकर्स फर्म्ससाठीची छुपी जाहिरातबाजीच आहे. तसेच क्रिडाक्षेत्र म्हणजे केवळ क्रिकेटचे सामने, सुरु होण्यापूर्वी, संपल्यावर त्यावरचे दोन दोन तासाचे विश्लेषण नमक गप्पांचे कार्यक्रम, त्याचा जरा TRP घसरू लागला तर क्रिकेटशी कोणताही संबंध नसलेल्या सुंदरींना कमी कपड्यात चर्चेला बसवणे... बाकी भारतीय खेळ, हॉकी, ऑलिम्पिकवाले खेळ सगळे अदृश्य. कला आणि मनोरंजनक्षेत्र म्हणजे केवळ बॉलिवूड, पेज थ्री पार्ट्या, सिनेमा लॉन्च, इत्यादी. इथुन हळुहळु सुरु झालेलं ते मालिकांचे, रिअलिटी शोचे, कॉमेडी शोचे  तुकडे दाखवणे, मालिका सिनेमातल्या नटनट्यांच्या मुलाखती, सेटवरचे प्रसंग दाखवणे इत्यादी. भारतीय लोककला, लोकसंगीत, शास्त्रिय संगित, लोकनृत्ये, चित्रकला, शिल्पकला आणि अशा ६४ कलांच्या प्रसाराचा भार केवळ सरकारी वाहिन्यांनी वाहायचा. त्याचा ह्या कमर्शियल चॅनेलवाल्यांच्या मनोरंजनक्षेत्रात समावेश होत नाही. कारण क्रिकेट-सिनेमा-मालिकांसाठी प्रेक्षक मिळवून द्यायची सुपारी ह्यांनी घेतली आहे.

"आजच्या ठळक बातम्या, दिनभर कि खबरे कुछ इस प्रकार है" असे शांततेत न्यूज वाचता वाचता न्यूज अ‍ॅन्कर पत्रकार कधी झाले ते कळलेच नाही. पूर्वी अ‍ॅन्कर फोनलाईन वर असलेल्या संबंधित व्यक्तीकडून किंवा स्टुडीओत बोलावून त्या विशिष्ट विषयावर त्या व्यक्तीचे (तज्ञ किंवा संबंधित जसे कि पोलीस अधिकारी, पदाधिकारी, राजकीय नेता, इत्यादी) काय मत आहे हे प्रेक्षकांना ऐकवायचा. कारण अ‍ॅन्करचे काम केवळ बातम्या सादर करणे इतकेच होते. फॅशन शोमध्ये मॉडेल्स जशा फॅशन डिझाईनरच्या कलाकृती दाखवण्यासाठी कॅटवॉक करतात तसे अ‍ॅन्करचे काम असायचे. दोन पाहुण्यात परस्परविरोधी मतांवर चर्चा व्हायच्या म्हणजे अ‍ॅन्कर प्रश्न मांडून पाहुण्यांना बोलू द्यायचा. नंतर त्यांच्यात जुगलबंदी लावून रेफ्री सारखे काम अ‍ॅन्कर करू लागले. आता अ‍ॅन्कर स्वत:च एक बाजू घेऊन दुसऱ्या बाजूच्या पाहुण्याला शाब्दिक ठोसे लगावून 'मेरी गली में मैच शेर' करत असतो. हे लोकांना आवडते. अर्णवने कन्हैया आणि उमर ला स्टुडीओत बोलावून पत्रकारितेवर जो बलात्कार केला, त्यादिवशी विशिष्ठ लोकांना झालेला आसुरी आनंद मला अजून लक्षात आहे. इथून सर्व काही ज्या भयंकर पद्धतीने बदलले ते कायमचेच.

गेल्या कित्येक महिन्यांपासून रविश कुमार टीव्ही देखना छोड दिजीये असे आर्जव करत आहे. त्यामागे हा सगळा इतिहास आहे. भारतीय जनतेभोवती न्यूज चॅनेलच्या माध्यमातून एक मजबूत सापळा रचला गेला आहे. तो हळूहळू करकचून आवळण्यास सुरुवात होईल. किंबहुना झालीही आहे. मिडिया पूर्वी सूक्ष्मपणे जनतेचे मानस बदलण्याचे काम अगदी घाबरून घाबरून करत असे. कारण असे करण्यास विरोध करणारेही मीडियात होते. आता अशा विरोधास संपवणे सोपे झाले आहे. आणि भारतीय प्रेक्षक तिसऱ्या वर्गाच्या बुद्धीचा असल्याने विचारांवर नियंत्रण मिळवण्याचे काम उघडउघड व राक्षसी पद्धतीने होत आहे.

हा एक मानसशास्त्रीय सापळा आहे. मनुष्याच्या मनात नैसर्गिकरित्या काही पूर्वग्रह असतात. माणूस आपल्या मेंदूचा वापर करून तार्किकपद्धतीने निर्णय घेतो हे शंभर टक्के खरे नाही. समोर आलेली माहिती खरी कि खोटी ह्याची शहानिशा करायची बहुतांश लोकांची मानसिकताच नसते. मनुष्य त्याच्यासमोर सातत्याने येणाऱ्या एखाद्या माहितीला खरे मानू लागतो.  एकच बाजूचे विचार सातत्याने ऐकत राहिल्याने तेच खरे आहेत असे मानतो. इतर लोक काय करत आहेत ते बरोबर असेल म्हणून तेच फॉलो करू लागतो. 'Types of Biases and examples' असे गुगल सर्च करा आणि मनुष्याचे मन किती भोळे असते  ते बघा. त्या सर्वांची चर्चा ह्या लेखात अशक्य आहे. सामान्य माणसाच्या ह्या अगतिकतेचा फायदा उचलून त्याला भ्रामक जगात जगायला भाग पाडणे मीडियाद्वारे सुरु आहे. मिथक आणि सत्य ह्यातली सीमारेषा जाणवूच नये इतक्या पातळीवर हे षड्यंत्र पोचले आहे. न पचणारे सत्य पुढ्यात आल्यावर त्यावर अविश्वास दाखवणे, आवडते असत्य कवटाळून घेणे हा स्वभाव बनला आहे. ह्याच मानसिकतेच्या भरवश्यावर आपले विद्यमान पंतप्रधान दरदिवशी एक नवीन खोटे बोलून छातीठोकपणे निभावून नेतात. त्यांना ही हिम्मत त्यांच्या हातातल्या सत्तेने दिली आहे. माध्यमांच्या आजवरच्या वाटचालीने दिली आहे. आज हे बहुसंख्य जनतेच्या मनात कोणतीही आयडिया पेरू शकतात. अविचारी झुंडीने घेतलेले कित्येक निष्पाप लोकांचे प्राण हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. सामान्य माणसातला पशु जागा करण्याचे काम पूर्णत्वास येत आहे. आता त्या पशुला विरोधी मतांच्या लोकांचा नायनाट करा अशा उघड उघड सूचना दिल्या जात आहेत. 

अशा अवस्थेत लोकशाहीचा बळी जाणे अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीने स्वत:हून तंत्र ताब्यात घेण्यापेक्षा लोकांनी आपणहून त्याच्या ताब्यात देणे जास्त भयावह असते. जर्मनीचे उदाहरण ह्यासंदर्भात नेहमीच दिले जाते. माझ्या मते रवांडा देशातले जिनोसाईड + चीनमधले कल्चरल रीवोल्युशन + जर्मनीचे नाझीकरण अशा तिन्ही प्रकारचे भवितव्य एकत्रितपणे देशासमोर मांडले जात आहे. ह्यात जे भरडले जाणारे सामान्य लोक तेच असतील ज्यांनी हा प्रकार आजवर वाढू देण्यात सहभाग दिला किंवा त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या धर्माचे राज्य ह्या देशावर आले म्हणजे आपल्या परिस्थितीत बदल घडणार नाही हे सगळा विध्वंस झाल्यावर त्यांना कळेल. पण उपयोग नाही. धर्माचे ठेकेदार जेव्हा ह्यांच्यावर अत्याचार करू लागतील आणि मग दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न उभा राहील तेव्हा लोकशाही गमावल्याचा पश्चाताप कोणतेही प्रायश्चित्त घेऊन संपणार नाही.

उपाय काय? फार सोपे उपाय आहेत. प्रश्न विचारा. प्रश्न विचारण्याआधी कोणत्याही माहितीला दुसऱ्या बाजू असू शकतात त्याचा किमान विचार करा. माहिती पडताळून पहा. अगदी सोपे म्हणजे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कितपत झाली तेवढे शोधा. बेरोजगार, शेतकरी, उद्योजक, सामान्य लोक ह्यांचा खऱ्या समस्या कितपत खरोखर संपल्या, त्यावर कितपत काम झाले ते बघा. एखादी बातमी ऐकून, एखादे भाषण ऐकून आपल्या भावना तीव्र होतात का ह्याकडे लक्ष ठेवले तरी बरेच सांभाळता येते. आपला पार चढतो, तोंडातून अपशब्द निघतात का हे बघितले कि समजायचे कुठेतरी काहीतरी हुकते आहे. कोणाच्याही कोणत्याही दाव्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.  दिशाभूल करणारे सर्वे, खोट्या आकृत्या, खोटे तक्ते ह्याच्यावर हुरळून जाऊ नका. खोट्या बातम्या शेअर करू नका. तुम्ही शेअर करता म्हणजे तुम्ही त्याची खातरजमा केली आहे, तुमचा त्याच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही ते शेअर केले आहे असे तुमचा मित्र, नातेवाईक समजतो. त्याचा तुमच्यावर विश्वास असतो, त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तुमच्या हाताने खोट्या बातम्या पसरवल्या जातात. 

एवढे छोटे उपाय केलेत तरी हा भारत आपला फार उपकृत राहील. येत्या पिढ्यांना सुखाचा श्वास घेता येईल. त्यांना मुठभर बदमाश लोकांच्या सापळ्याचे शिकार होऊ न देणे हे आपल्याच हाती आहे. हां, हा माझा लेख नक्की शेअर करा. तुमच्या नावासकट करा, बिननावाचा करा. काही हरकत नाही.



शनिवार, २३ जून, २०१८

ब्रँड आणि ब्रॅंडवॅल्यू : लेखक - संदीप डांगे

लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणे ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, एकसारख्या वाटत असल्या तरी सूक्ष्म फरक आहे.

अंदाज अपना अपना ही एक कलाकृती आहे. लोकप्रिय आहे. पण तीला ब्रॅण्डवॅल्यू नाही. क्रिकेटला आहे. क्रिकेटरला आहे. क्रिकेटचा आधार घेऊन आज अक्षरशः काहीही विकले जाऊ शकते. मी आयपीएल-बीसीसीआयला असतांना मिडीया विभागातच काम केलेले असल्याने बर्‍याच गोष्टी फार जवळून, आतून माहित आहेत.

एखादा नट केवळ तो नायक आहे म्हणून चित्रपटाला गर्दी खेचू शकतो ही स्टारवॅल्यू. राजेशखन्ना, अमिताभ ह्यांनी सर्वात शुद्ध अवस्थेतली स्टारवॅल्यू प्राप्त केली होती. आज अमिताभला स्टारवॅल्यू नाही पण ब्रॅण्डवॅल्यू आहे. आता ब्रॅण्डवॅल्यू म्हणजे काय?

ब्रॅण्ड म्हणजे ओळख. हा एका जुन्या शब्दाचा अपभ्रंश आहे. मूळ शब्द brandr म्हणजे बर्न्ट. म्हणजेच 'जाळलेला'. जुन्या काळी घोड्यांची विशेष मागणी असायची. जातीवंत घोड्यांच्या पागांचे (स्टेबल्स) मालक आपल्या पागेचा घोडा भरबाजारात ग्राहकांना ओळखू यावा म्हणून तापलेल्या लोखंडी शिक्क्याने घोड्यांच्या पाठीवर कातडी जाळून मार्क करायचे. बहुतेक आताआतापर्यंत करत होते. आता अशा 'अमूक एका पागेचा-मालकाचा शिक्का असलेला घोडा' म्हणजे अस्सल जातीवंतच ही खात्री तो मार्क -ते चिन्ह- असायचा. अशा खुणांचा वापर आपल्या उत्पादनांवर करणे हे कॉमन असले तरी अस्सल, उत्तम उत्पादनांची खात्री म्हणजेच ब्रॅण्डनेम. खात्रीशीर, उत्तम उत्पादन-सेवेद्वारे ग्राहकांच्या मनात आपली एक खास जागा, हक्काचा कोपरा मिळवणे म्हणजेच ब्रॅण्डवॅल्यू.

ह्यात बरेचदा लोक गोंधळ करतात, ते असे की भरमसाठ जाहिराती केल्या- टीवीकमर्शियलचा रतीब घातला की झाला ब्रॅण्ड तयार. असे नसते. मुळात सुरवातीला तरी अव्वल दर्जा पाहिजेच पाहिजे. लोकांची भौतिक, मानसिक गरज उत्तम पद्धतीने परिपूर्ण केली की झाला ब्रॅण्ड तयार. एकदा ब्रॅण्ड तयार झाल्यावर काही केल्या ती जादू उतरत नाही. अर्थात, अपवाद असतातच.

नुसते एखाद्या कामात-सेवेत-उत्पादनात नाव कमावणे म्हणजे ब्रॅण्ड नव्हे. ब्रॅण्डचा संबंध टॅन्जीबलपेक्षा इन्टॅण्जीबल - दृष्य पेक्षा अदृष्य गोष्टींशी जास्त असतो. सर्व काही समान असले तरी अॅपलचा फोन स्वस्तातल्या चायनामेड फोनसमोर भाव खाऊन जातो. ग्राहकाच्या मनात ब्रॅण्डची एक प्रतिमा असते. बरेचदा ती तशी मुद्दाम तयार केली जाते. उदा. पीटर इंग्लंड शर्ट्स. अगदी कालपरवापर्यंत अनेकांना, काहींना आजही हे माहित नसेल की पीटर इंग्लंड शर्ट्स भारतीय कंपनीचा, शंभर टक्के भारतीय माल आहे. लोकांचा समज असाच आहे-होता की हे शर्ट्स इम्पोर्टेड आहेत. कंपनीने हे अचूक हेरून ब्रॅण्ड डेवलप केला. मूळ भावना: भारतीय लोकांना लोकल शर्ट्सपेक्षा इम्पोर्टेड कपड्यांची क्रेझ आहे, त्याने आत्मविश्वास वाढतो, आपण उच्चभ्रूंमधे गणल्या जाऊ अशी भावना येते. 'Being Human' ही कुठलीतरी एन्जीओ असावी असे समजल्या जाते, पण ती एन्जीओ खरेतर एका कपड्याच्या कंपनीने आपले कपडे खपवण्यासाठी हेतुपुरस्सर तयार केलेला दर्शनी देखावा आहे. सलमान खान त्याचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर. म्हणजे 'Being Humanचे टीशर्ट घालायचे आणि समाजकार्य करतोय असे दाखवायचे' ह्या कामाची सदर कंपनी सलमानभाईला किम्मत मोजते आहे.

तर ब्रॅण्ड म्हणजे १० टक्के दर्जाचा आणि ९० टक्के भावनेचा खेळ, सरळ सरळ. पद्मिनी व मारुती 800 नंतर भारतीयांची कौटुंबिक वाहनाची, नवसंपन्नतेच्या मुसंडीची ओळख बनली ती टाटा इन्डिका - बडी छोटी गाडी. धपाधप सेल झाला. नंतर ट्रान्स्पोर्ट, ट्रॅवल्सवाल्यांनी पिवळ्या प्लेट लावायला सुरुवात केल्यावर ह्या नवसंपन्न भारतीयांच्या मनाचा एक कोपरा हलला. "ह्यॅ, ही तर काय कोणीही - अगदी टॅक्सीवालेही घेतात". इंडिकाला जी प्रतिमा मिळाली ती गमावली, सेल कमी झाला. टाटाने इन्डिका विस्टा हे महाग आणि अधिक लग्जरीयस वर्जन आणलं. नंतर तर भारतीय बाजारात अशा लग्जरियस महाग वाहनांचा पोळा फुटला. लक्षात घेण्याची केसस्टडी अशी की जरी उत्तम दर्जा होता तरी ग्राहक कमी होत जाण्यामागे दुसरे नाजूक कारण होते. ते म्हणजे ब्रॅण्डची प्रतिमा. ही प्रतिमा न सांभाळता आल्याचा जोरदार फटका टाटांच्याच आणखी एका वाहनाला बसला, ते म्हणजे नॅनो.

प्रतिमा हीच जाहिरात जगाचा आत्मा आहे. मार्केटींगचा कणा आहे, सेल्सची प्रेयसी आहे.

तर अशा काही प्रतिमा काही कालावधीनंतर बनत जातात, काही मुद्दाम साच्यात घडवून बनवल्या जातात. अमिताभ अशीच एक प्रतिमा आहे, शाहरुखही, अमिरही, सलमानही, राखी सावंत ही, पूनम पांडेही आणि सनी लियोनही अगदी केआरके आणि शोभा डे सुद्धा. प्रत्येकाची आपआपली प्रतिमा आणि आपआपली ब्रॅण्डवॅल्यू.

जाहिरात एजन्सीला आपल्या क्लायंटच्या प्रॉडक्टला सूट होईल अशी प्रतिमा असलेला सेलेब्रिटी वापरावा लागतो. अर्थात, हे टेक्स्टबुकीय ज्ञान आहे, भारतातच ह्या अमूल्य ज्ञानाचा विचका केलेला जागोजाग आढळून येतो. महागडा, गडगंज श्रीमंती आव आणणारा रिडअॅण्डटेलर कपड्यांचा ब्रॅण्डअॅम्बेसेडर असलेला अमिताभ शेतातल्या पाण्याचा उपसा करणार्‍या पंपाचीही जाहिरात करतो. फिटनेसफ्रीक असलेली बिपाशा फॄटज्यूसची जाहिरात करणार हे संयुक्तिकच, तसेच धोनी एखाद्या एनर्जी ड्रिंकचा ब्रॅण्डअॅम्बेसेडर असणे हेही. दोघांनी मिळून बहुतेक धावण्याच्या शूजची जाहिरात केलेली, तेही योग्यच. लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या सर्वात ज्ञात व परिणामकारक पैलूशी आपल्या उत्पादन/सेवेची सांगड घालून आपल्या उत्पादन/सेवेचे मूल्य वाढवणे म्हणजे ब्रॅण्डवॅल्यू वाढवणे. लोकप्रियता हा निकष महत्त्वाचा असला तरी तो व्यक्तिमत्वाच्या कोणत्या बाबीमुळे आहे हे तपासणे महत्त्वाचे. ती बाब म्हणजे ब्रॅण्डवॅल्यू, निव्वळ लोकप्रियता म्हणजे ब्रॅण्डवॅल्यू नाही. नाईके, आदीदास ह्यांनी उत्तम उत्पादने दिलीत पण ती उत्तम खेळाडूंना जाहिरातीत झळकवून, त्यांना खेळतांना आपले उत्पादन वापरायला लावून. उत्तम खेळाडूंचे सगळेच उत्तम असते ही भावना जनसामान्यांत असते. मग तो रिबॉक असेल तर "तो उत्तमच असेल, त्याशिवाय का तो त्याने घातला आणि भन्नाट परफॉरमन्स दिला".

क्रिकेटमधे ब्रॅण्डवॅल्यू अशीच बनते. सचिन उत्तम खेळतो, अनेक विश्वविक्रम करतो, तो सर्वोत्कॄष्ट आहे, त्याची चॉईसही सर्वोत्तम असेल. मग तो जे जे उत्पादन एन्डॉर्स करतो त्याचीही वॅल्यू वाढते. किंवा ब्रॅण्डेड कंपन्या अशा सर्वोत्तमांना घेऊन 'दोन समान दर्जाचे लोकच मैत्री करु शकतात' ह्या जनसामान्यांच्या भावनेला कुरवाळतात. मग सचिन कशाचीही जाहिरात करो, तिला एक आश्वासक खात्री त्याने त्याच्या उपस्थितीने मिळवून दिलेली असते. ल्युमिनस बॅटरी हे एक उदाहरण आत्ता आठवते. जुने म्हणजे अगदी सुरुवातीचे ते, 'सनी' ह्या दुचाकीची जाहिरात.

चित्रपटक्षेत्रातल्या कलाकारांना फक्त लोकप्रियता ह्या निकषावर निवडले जाते. अगदी टेक्स्टबुकिय ज्ञान लावायचे झालेच तर ज्या ग्राहकसमुहातल्या लोकांना जो आवडतो त्या समूहासाठीच्या उत्पादनांसाठी ते ते अभिनेते, अभिनेत्री वापरल्या जातात. चैनीखैनी, डॉलर, अमूल माचो, लक्स कोझी, रुपा, खुशबूवाला व्हील, हे एकाबाजुला तर डीबीअर्स, ल ओ रियल, नेस्कॅफे, गार्नियर दुसरीकडे. डू आय नीड टू से मोअर?

तसेच क्रिकेटमधे किंवा एकूण स्पोर्टसमधे राष्ट्रीय (भारतात राष्ट्रीयला तशी फार वॅल्यू नाहीच) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे झाल्यावरच ब्रॅण्डवॅल्यू तयार होते. पण मनोरंजनक्षेत्रात फार लोकल लेवललाही सेलेब्रिटी स्टेटस मिळत असल्याने पॉप्युलॅरीटी वॅल्यू मिळते. कुठल्या भंगार पण लोकप्रिय सिरीयलमधल्या 'काहीही हं' ला सुद्धा एन्डॉर्समेंट्चे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात. प्रियंका, दिपिकाच्या एक शतांश वा एक हजारांश तरी मोबदला मिळतो. दुकानाची फित कापायला पाच पंचेवीस हजारात अशा सेलेब्रिटी येऊन जातात. तालुका-शहर पातळीवर सदर आस्थापनाचा गवगवा होतो, पैसा वसूल होतो. पण अशी वॅल्यू फर्स्टक्लास क्रिकेट खेळणार्‍याला नाही मिळत.

कोहलीला दुसरा सचिन म्हटल्या जात आहे, त्यामागे जाहिरातबाजच आहेत. सचिन आता खेळत नाही, त्याच्या रिटायरमेंटला उशिर होण्यामागेही जाहिरातदार आणि त्यांचे एन्डॉर्समेन्ट्स होत्या. आता ही सचिन नामे सोन्याची कोंबडी खुडूक झाल्यावर व त्याच्याइतकी ब्रॅण्डवॅल्यू+इमेजवाला दुसरा कोणी तयार झालेला नसल्याने कोहलीला सचिनचा उत्तराधिकारी म्हटले जाऊ लागले. उत्तराधिकारी तो फक्त ह्या एन्डॉर्समेन्टचाच. कारण जाहिराती चालणे उत्पादकांसाठी आवश्यक, आणि क्रिकेट चालणे जाहिरातींसाठी आवश्यक. क्रिकेटमधे सचिन असणे क्रिकेटसाठी आवश्यक. पण तो नाही तर कोहलीला पुढे केले जात आहे. आणि तो आहेही आजच्या तरूणांसारखा, बेधडक, बिन्दास्त. कोणे एकेकाळी थकलेल्या, मरगळलेल्या भारतीय तरूणांच्या आत्मविश्वासाला फुंकर घालायचे काम सचिन ने केले. त्यानंतर एक पिढी निघून गेली. नव्या पिढीची, नव्या क्रिकेटची प्रतिमा म्हणून कोहली गाजत आहे, गाजवला जात आहे.

क्रमशः

© Sandeep Daange

(This article is property of Mr. Sandeep Daange , unanuthorised use or publication is legal offense.)

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

मोदींना पर्याय नाही असा प्रसार करणे हा एक प्रोपगंडा आहे. विरोधी पक्ष २०१० पासूनच लकवाग्रस्त झालेले आहेत. त्यांची रिकवरी शक्यच नाही. मोदींना परास्त करायचे असेल तर मोदींपेक्षा भारी प्रोपगंडा करणे आवश्यक. सध्या जमाना मार्केटींगचाच आहे. मोदी मार्केटींग करुन जिंकले. मोदींना पर्याय नाही हे सुद्धा मार्केटींगच आहे २०१९ साठी. मोदींच्या तोलामोलाचे अनेक नेते भारतात आहेत. मोदींना कोणी 'अवतार' समजत असेल तर तो भाग वेगळा. मोदी नव्हते तेव्हा भारताचे काही बिघडले नाही, आले म्हणून लगेच (किंवा पुढच्या २० वर्षातही) फरक पडणार नाही.

देशाच्या विकासाबद्दल अवास्तव संकल्पना ठेवणारे मंदबुद्धी आहेत. २ -३ वर्षात विकास होत असतो काय असे आता उलटं विचारणारे भाजपे ४७ ला स्वतंत्र झाल्याबरोबर विकास मागत होते. इर्रीस्पेक्टीव ऑफ हू रुल्ड इन्डीया, मागच्या ७० वर्षात आपण एक एक पायरी चढत एवढा विशाल देश ज्या ठिकाणी घेऊन आलो ते अभिमानास्पद आहे. यात सर्वच पक्षांचे, जनतेचे, नेत्यांचे योगदान आहे. इथे नेहमी सिंगापूर, जापान वगैरे देशांचे दाखले दिले जातात, की अमूक वर्षात ते इतके पुढे गेले वगैरे. पण अनेक देशांमध्ये चाललेली गृहयुद्धे, गरिबी, भुखमरी, लढाया, अराजक हे कोणी बघत नाही. भारतीय नागरिकाचे असे आहे की स्वतः काही करायचे नाही, आपल्या कमतरतांसाठी दुसर्यांना दोष देत बसायचे. इतर देशांच्या विकासाचे दाखले देणार्‍यांनी स्वतःच्या गावात तरी विकास घडवून आणला का एवढे स्वतः बघावे. तुमच्या गावा-शहराएवढे देश विकसित झाले, त्याचे तुम्ही दाखले देता ना? त्यामागची कारणेही बघा. इथे मी कॉंग्रेस पक्षाला पाठीशी घालतोय असा काहींचा समज होईल. पण वास्तव तसे नाही. कॉण्ग्रेस असो वा भाजपही प्रत्येकाचे पाय मातीचे आहेत. कोणीही धुतल्या तांदळाचा नाही.

मोदींना ज्यासाठी निवडुन दिले, ती कामे होत आहेत काय? किती झाली, आता काय स्टेटस आहे, किती दूरगामी निर्णय घेतले, कोनती कामे सुरु आहेत ह्या सर्वांबद्दल तिसर्‍याच घटकाकडून प्रचार होणे आता आवश्यक आहे. काँग्रेस्+विरोधी कितीही ओरडले तरी त्यांची प्रतिमा भजपआयटीसेल्+विकलेला मिडिया यांनी अविश्वासार्ह्+मतलबी अशी करुन ठेवली आहे.

भारतात राजकिय पटलावर काय चालू आहे हेच जिथे विरोधी पक्षाला सुधरत नाहीये तिथे मोदीविरोधात कोणी उभा करावा हे कुठून सुधरेल. मोदींना परास्त करणे फक्त भाजपमधून शक्य आहे. भाजप ही जळकुट्या व असुरक्षित लोकांची संघटना असल्याने ते फार दिवस कोणाला डोक्यावर बसवून ठेवत नही. २०१९ ची निवडणूक भाजप जिंकेल, काही शंका नाही. कदाचित मोदीच पंतप्रधान असतील. भारत कसा असेल हे मात्र माहित नाही.

भाजप जिंको वा कोणीही. भारताच्या विकासाची कामे झाली पाहिजेत, विकासाच्या योजनांबद्दल बोलले पाहिजे, मोदी निवडून आल्यावर जो उत्साह दिसत होता तो आता दिसतोय काय? केवळ संघवाले, हिंदुत्ववाले उत्साही आणी माजलेले दिसत आहेत. त्यांच्या मनातला विखार दिवसेंदिवस बाहेर येत आहे. मेंढराची कातडी घसरुन लांडग्यांची दिसायला लागली आहे. तरी लोक समजणार नाहीत. कारण बहुसंख्य लोकांना असे असणे म्हणजेच रामराज्य आहे असे पटवण्यात आले आहे. मुस्लिमांचे फार लाड झाले आता हिंदुंचे राज्य आहे अशा प्रकारची भावना हिंदुंमध्ये आहे. धर्म आणि राष्ट्रवादाच्या गुंगीत खर्‍या विकासाकडे लक्ष जात नाही. जाऊ दिले जात नाही. 

रविवार, २३ एप्रिल, २०१७

गरजू-होतकरु, हुशार तरुणांसाठी





आज आपण बघितले तर ९० टक्के तरूणवर्ग झापडबंद अवस्थेत आहे. त्याला आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या संधी दिसत नाहीत, किंवा एका अजब स्वप्नवादामुळे त्या करायची इच्छा नसते. तसेच कोणी असंच करुन यशस्वी झाला की त्याचे 'फक्त यश' बघून कॉपी मारायला जातात आणि अपयश येऊन अशा वेगळ्या वाटांची बदनामी होते.

खालील सर्व संकल्पना ह्या एकतर कोणीतरी आधीच करत असलेले व्यवसाय "लार्ज फॉरमॅट वर कसे दिसतील" ह्याचे विजुलायजेशन आहे किंवा सहज करता येतील अशा आहेत ज्यात फार काही 'अन्कन्वेन्शल, आउट ऑफ बॉक्स' नाही. 'सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करिल तयाचे' ह्याप्रमाणे ह्या संकल्पना आज उपलब्ध आहेतच फक्त त्या झटून, जीव ओतून देऊन करणार्‍यांची गरज आहे. इथे मांडण्याचे कारण ही बीजं आहेत, कुणीही ह्या बीयांना उचलून घेऊन जावे त्याचे वटवृक्ष करावे. त्याचा माझ्याच महाराष्ट्रातल्या अनेक मुलांना फायदा होईल. तो फायदा व्हावा हाच एकमेव उद्देश आहे माझा. दुर्दैवाने माझे शंभर क्लोन बनू शकत नसल्याने माझ्यासारख्या विचारांच्या लोकांनी ह्यात सहभागी व्हावे, सर्वोदय करावा हीच इच्छा आहे.
 
१. मी जे शेतकर्‍यांसाठीची हेल्पलाईन सुरु करणार होतो त्याचे कामासाठी दहा जणांची टीम खेड्यापाड्यातून (लाख लाख रुपये फी भरुन बीबीए झालेल्या - परत लाख रुपये भरुन एमबीए करण्याची तयारी करणार्‍या, वडील गरिब शेतकरी असणार्‍या मुलांची) तयार केली होती. ताजी बातमी अशी की अज्ञात कारणाने प्रस्तुत टीमने अर्धवट काम सोडून दिले आहे.
 
असो. नवीन टीमसाठी जुळवाजुळव करत आहे. कोणालाही खर्‍या गरजूंची, हुशार आणि मेहनतीस तयार तरुणांची माहिती असेल तर कृपया कळवावी. कोणतीही गुंतवणूक नाही. फक्त शारिरिक व बौद्धिक मेहनतीची तयारी हवी. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपर्‍यात असले तरी चालतील.

२. सध्या महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांना अनेक गंभीर समस्या भेडसावत आहेत. त्यात एक महत्त्वाची म्हणजे कुशल-अकुशल शेतमजूरांची उपलब्धता. सुमारे २५० रुपये ते ३५० रुपये रोज एवढा मेहनताना देऊनही मुबलक व मेहनती शेतमजूर मिळत नाहीयेत. जे मिळतायत ते कामाला बारा वाजता येऊन पाच वाजता घरी जातात. मधले एक तास जेवणात घालवतात. कंत्राटी पद्धतीवर चांगले मेहनती शेतमजूर पुरवणार्‍या कंपनीची महाराष्ट्राला नितांत गरज आहे. २५ हजार खर्‍या गरजू, मेहनती, कामाचा कंटाळा न करणार्‍या शेतमजूरांची आवश्यकता आहे.

३. माझ्या एका आयटीआय झालेल्या मित्राने स्वतः दोन वर्ष संशोधन करुन एक अफलातून इलेक्ट्रिक पॉवर स्टेबिलायजर बनवला आहे. त्याची किंमत साडेसात हजार, साडेनौ हजार व चौदा हजार अशी आहे. शेतकर्‍यांना वीजेचे संतुलन करण्यासाठी, पाण्याचे पंप चालवण्यासाठी, घरातली उपकरणे चालवण्यासाठी अशा स्टेबिलायजरची गरज असते. प्रथम-वापरा-नंतर-पैसे द्या ह्या स्ट्रेटेजीवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात सदर स्टेबिलायजर विकण्यासाठी थेट विक्री करणारे विक्रेते पाहिजेत. प्रत्येक यंत्रामागे पाचशे रुपये मानधन मिळेल. कोणतेही टारगेट नाही, जितकं काम कराल तितका फायदा मिळवा अशी योजना आहे. ह्या कामासाठी इलेक्ट्रिकचे ज्ञान असलेले खरे गरजू, मेहनती, इमानदार तरुण पाहिजेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची नाही. फक्त मेहनत करा व पैसे मिळवा.

४. शेतकर्‍यांच्या जमिनीचे मातीपरिक्षण शासकिय अधिकारी करतात, बरेचदा त्याला विलंब होतो. किंवा प्रत्येक शेतकर्‍याला ते शक्य होत नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जाऊन शेतावर-बांधावर जाऊन मातीपरिक्षण करु शकेल अशी फिरती प्रयोगशाळा/लेबोरटरी ची संकल्पना आहे. बारावी विज्ञान झालेल्या हजारो मुलांना उत्तम संधी मिळेल. प्रत्येक मातीपरिक्षण-पाणीपरिक्षण अहवालामागे कमीशन बेसीसवर कमाई होईल. बारावी विज्ञान नापास झालेले असले तरी खरे गरजू, मेहनती, इमानदार तरुण पाहिजेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची नाही. फक्त मेहनत करा व पैसे मिळवा.

५. शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांना विकू शकणार्‍या अनेक उत्पादक-शेतकरी-कंपन्या निर्माण झाल्या आहेत. अशा किमान एक हजार कंपन्यांची महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांकडून सर्व प्रकारची उत्पादने घेऊन, विशेष उत्पादने पिकवायला लावून त्याची विक्री राज्यात, देशात, परदेशात करण्यासाठी खर्‍या गरजू, मेहनती तरूणांची आवश्यकता आहे. संपूर्ण मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहे. काम करण्याची कळकळ असलेली मुले पाहिजेत. पैसा उत्तम मिळेल ह्याची खात्री आहे.

६. महाराष्ट्रातल्या सुमारे साडेतीनशे तालुक्यांमधे १० जणांची एक टीम अशा प्रकारे सुमारे साडेतीनशे टीम्स संपूर्ण शैक्षणिक मार्गदर्शनासाठी हव्या आहेत. टिमला कामासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, मार्गदर्शन मोफत पुरवले जाईल. टीमकडे स्वतःचा बेसिक लॅप्टॉप, मोबाईल इन्टरनेट कनेक्षन हवे. बारावी कला-समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, अशा कोणत्याही विषयात- शिकलेले होतकरु व खरे गरजू हवे आहेत. आवश्यकता असलेल्या एकूण तरुणांची संख्या: सुमारे ३५०००. हमखास व कायमस्वरुपी चांगले उत्पन्न, तसेच आपल्या देशबांधवांसाठी काहीतरी विधायक केल्याचे समाधान मिळवून देणारा उपक्रम.

७. घनकचरा व्यवस्थापन, रद्दीपेपर कलेक्शन व रिसायकलिंग साठी महाराष्ट्रातल्या सर्व ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी शंभर जणांचे एक युनिट ह्याप्रमाणे ३६०० होतकरु व खरे गरजू लोकांची गरज आहे. एकूण प्रभावित रोजगारक्षमता; १८,०००. हमखास व कायमस्वरुपी चांगले उत्पन्न, तसेच आपल्या देशबांधवांसाठी काहीतरी विधायक केल्याचे समाधान मिळवून देणारा उपक्रम.

८. महाराष्ट्रातल्या सर्व नापिक+पडिक जमीनी घेऊन त्यावर सुधारित पद्धतीने शेती करण्यासाठी असंख्य गरिब तरुण हवे आहेत. मार्गदर्शन मोफत मिळेल. चांगला नफा, कायमस्वरुपी काम, राहायला जागा मिळेल.
 
९. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांना पिकांचे नियोजन, व्यवस्थापन, विपणन ह्यासाठी चांगले मार्गदर्शन करु शकतील असे किमान दहा हजार तरुण हवे आहेत. कोणत्याही प्रकारच्या शेतीशिक्षणाची अट नाही, योग्य मार्गदर्शन व तेही मोफत केल्या जाईल. दहावी नंतर किमान पाच वर्षे (समांतरपद्धतीने कोणतेही शिक्षण घेत) शेतीचे मूलभूत ज्ञान घेणे आवश्यक. तिसर्‍या वर्षापासून कायमस्वरुपी चांगली कमाई व समाजात मान-सन्मान मिळेल. अशा दहा हजार खर्‍या गरजू, कामाची कळकळ, एखाद्या सैनिकाच्या तोडीसतोड कष्ट करण्याची तयारी, वकिल-डॉक्टरांच्या बौद्धिक पातळीवर मेहनत करण्याची तयारी हे गुण आवश्यक.
 
१०. दहावी करुन आयटीआय झालेले अनेक तरुण भारतातल्या-महाराष्ट्रातल्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने लागत आहेत. बिनकामाचे इंजिनियर्सला अहंकार मोठा, ज्ञान कमी त्यापेक्षा चांगल्या पैशात आयटीआयन्स मुलांना चांगली मागणी आहे, पाच वर्षात चांगले तरबेज होऊन, इण्जिनियरांचे पगार मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. असे कीती हजार तरुण लागतील आत्ता लगेच माहिती नाही. पण किमान पन्नासेक हजार तरी लागतील.

११. महाराष्ट्रात कमाई करता येऊ शकणार्‍या कोणत्याही क्षेत्रात (मसाला बनवणे, घरगुती मेस, किराणा-माल घरपोच, शेळीपालन, दुग्धौत्पादन, कुक्कूटपालन, मध-उत्पादन, साबण-शाम्पू-पावडर, तयार कपडे, सजावटीचे सामान बनवणे, ब्युटीपार्लर, प्लंबर, फिटर, इलेक्ट्रीशियन सहित सुमारे दोनशे प्रकारच्या घरगुती सर्विसेस, घरपोच कारवाशिंग, ऑफिस मेन्टेनन्स, अकाउंटट्स, मार्केटींग एक्झुकेटीव, हाउसकिपिंग, घरकामवाल्या) सुमारे दहा टक्के जागा मेहनत करणार्‍यांसाठी खुल्या आहेत. इथे कोणतेही आरक्षण लागू होत नाही. चांगला पगार, मेहनताना, मोबदला, जीवन सुस्थितीत व आरामात जगण्याची खात्री असलेल्या अनेक संधी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरजू-होतकरु, हुशार तरुणांसाठी वाट पाहत आहेत.

वरच्या दहा संकल्पनांपैकी माझ्या स्वतःच्या ओरिजिनल कन्सेप्ट्स ह्या एक-दोनच (शैक्षणिक मार्गदर्शन व शेती कॉलसेन्टर) आहेत. त्यात कोअर कन्सेप्चुअलायजेशन, ए टू झेड प्लानिंग, कोअर टेक्नॉलॉजी ब्रेकथ्रू ह्या माझ्या स्वतःच्या आहेत. त्या अर्थातच मी स्वतः जमेल तशा व तितक्या लवकर लॉन्च करणार आहे. त्याबद्दल ग्राउंड प्लानिंग व कोअर टिममेंबर शोधणे सुरु आहे.

 अनेक नवनविन कल्पनांचे व्यवसायात रुपांतर कसे करता येईल ह्यावर विचार करण्याचा मला छंद आहे. त्या व्यवसायांचे थेरॉटिकल स्वरुप, त्याला लागणारे भांडवल, मनुष्यबळ, सरकारी परवानग्या, मार्केट रिसर्च, ग्राहकवर्ग, स्पर्धा, भविष्यातली वाटचाल, स्वॉट अ‍ॅनालिसिस, तशीच मदत लागली तर भांडवल व मार्गदर्शन पुरवणार्‍या संस्था ह्यांच्यावर इत्थंभूत विचार व अभ्यास करुन त्याचा एक अहवाल बनवून ठेवणे ह्याचा किडा गेले अनेक वर्ष आहे. आतापर्यंत सुमारे चारशे व्यवसायांचे असे संकलन करुन ठेवले आहे. ह्याचसंबंधी काम करण्यासाठी एक बिजनेस कन्सल्टन्सी फर्मही स्थापन केली आहे, माझी इतरही व्यवधानं असल्याने त्याचे काम म्हणावे तसे सुरू झालेले नाही. अनेकांकडे पैसा असतो, काम करायची तयारी असते पण चांगली कल्पना किंवा अभ्यास नसतो किंवा नक्की काय करायचे ह्याची काहीच माहिती उपलब्ध नसते. अशावेळी मी मदत करु शकतो हे मला लक्षात आले. कारण मी प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा बिजनेस प्लानिंग, स्ट्रॅटेजीकल थिंकिंग, इत्यादी बैठे डोके चालवण्याचे काम हे चांगलं करु शकतो हे मागच्या तीन-चार वर्षाच्या अनुभवातून शिकलो.
 
आपल्या सर्वांसाठी एक बोधकथा: (माहित असेलच)
वादळामुळे समुद्रातून हजारो स्टारफिश किनार्‍यावर पडलेले असतात, एक माणूस एक एक उचलून परत समुद्रात फेक्त असतो. त्याला दुसरा बोलतो तु एकटा एवढे सारे जीव वाचवू शकणार नाहीस. तू असा काय मोठा फरक पाडणार आहेस?, त्यावर तो एक स्टारफिश उचलून परत समुद्रात फेकतो आणि म्हणतो "माहित नाही पण ह्याच्या जीवनात मोठा फरक पडला आहे."
 
मला तुम्ही सगळे किमान एक स्टारफिशच्या आयुष्यात बदल घडवणारे व्हावे असे वाटते.