शनिवार, २३ जून, २०१८

ब्रँड आणि ब्रॅंडवॅल्यू : लेखक - संदीप डांगे

लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणे ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, एकसारख्या वाटत असल्या तरी सूक्ष्म फरक आहे.

अंदाज अपना अपना ही एक कलाकृती आहे. लोकप्रिय आहे. पण तीला ब्रॅण्डवॅल्यू नाही. क्रिकेटला आहे. क्रिकेटरला आहे. क्रिकेटचा आधार घेऊन आज अक्षरशः काहीही विकले जाऊ शकते. मी आयपीएल-बीसीसीआयला असतांना मिडीया विभागातच काम केलेले असल्याने बर्‍याच गोष्टी फार जवळून, आतून माहित आहेत.

एखादा नट केवळ तो नायक आहे म्हणून चित्रपटाला गर्दी खेचू शकतो ही स्टारवॅल्यू. राजेशखन्ना, अमिताभ ह्यांनी सर्वात शुद्ध अवस्थेतली स्टारवॅल्यू प्राप्त केली होती. आज अमिताभला स्टारवॅल्यू नाही पण ब्रॅण्डवॅल्यू आहे. आता ब्रॅण्डवॅल्यू म्हणजे काय?

ब्रॅण्ड म्हणजे ओळख. हा एका जुन्या शब्दाचा अपभ्रंश आहे. मूळ शब्द brandr म्हणजे बर्न्ट. म्हणजेच 'जाळलेला'. जुन्या काळी घोड्यांची विशेष मागणी असायची. जातीवंत घोड्यांच्या पागांचे (स्टेबल्स) मालक आपल्या पागेचा घोडा भरबाजारात ग्राहकांना ओळखू यावा म्हणून तापलेल्या लोखंडी शिक्क्याने घोड्यांच्या पाठीवर कातडी जाळून मार्क करायचे. बहुतेक आताआतापर्यंत करत होते. आता अशा 'अमूक एका पागेचा-मालकाचा शिक्का असलेला घोडा' म्हणजे अस्सल जातीवंतच ही खात्री तो मार्क -ते चिन्ह- असायचा. अशा खुणांचा वापर आपल्या उत्पादनांवर करणे हे कॉमन असले तरी अस्सल, उत्तम उत्पादनांची खात्री म्हणजेच ब्रॅण्डनेम. खात्रीशीर, उत्तम उत्पादन-सेवेद्वारे ग्राहकांच्या मनात आपली एक खास जागा, हक्काचा कोपरा मिळवणे म्हणजेच ब्रॅण्डवॅल्यू.

ह्यात बरेचदा लोक गोंधळ करतात, ते असे की भरमसाठ जाहिराती केल्या- टीवीकमर्शियलचा रतीब घातला की झाला ब्रॅण्ड तयार. असे नसते. मुळात सुरवातीला तरी अव्वल दर्जा पाहिजेच पाहिजे. लोकांची भौतिक, मानसिक गरज उत्तम पद्धतीने परिपूर्ण केली की झाला ब्रॅण्ड तयार. एकदा ब्रॅण्ड तयार झाल्यावर काही केल्या ती जादू उतरत नाही. अर्थात, अपवाद असतातच.

नुसते एखाद्या कामात-सेवेत-उत्पादनात नाव कमावणे म्हणजे ब्रॅण्ड नव्हे. ब्रॅण्डचा संबंध टॅन्जीबलपेक्षा इन्टॅण्जीबल - दृष्य पेक्षा अदृष्य गोष्टींशी जास्त असतो. सर्व काही समान असले तरी अॅपलचा फोन स्वस्तातल्या चायनामेड फोनसमोर भाव खाऊन जातो. ग्राहकाच्या मनात ब्रॅण्डची एक प्रतिमा असते. बरेचदा ती तशी मुद्दाम तयार केली जाते. उदा. पीटर इंग्लंड शर्ट्स. अगदी कालपरवापर्यंत अनेकांना, काहींना आजही हे माहित नसेल की पीटर इंग्लंड शर्ट्स भारतीय कंपनीचा, शंभर टक्के भारतीय माल आहे. लोकांचा समज असाच आहे-होता की हे शर्ट्स इम्पोर्टेड आहेत. कंपनीने हे अचूक हेरून ब्रॅण्ड डेवलप केला. मूळ भावना: भारतीय लोकांना लोकल शर्ट्सपेक्षा इम्पोर्टेड कपड्यांची क्रेझ आहे, त्याने आत्मविश्वास वाढतो, आपण उच्चभ्रूंमधे गणल्या जाऊ अशी भावना येते. 'Being Human' ही कुठलीतरी एन्जीओ असावी असे समजल्या जाते, पण ती एन्जीओ खरेतर एका कपड्याच्या कंपनीने आपले कपडे खपवण्यासाठी हेतुपुरस्सर तयार केलेला दर्शनी देखावा आहे. सलमान खान त्याचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर. म्हणजे 'Being Humanचे टीशर्ट घालायचे आणि समाजकार्य करतोय असे दाखवायचे' ह्या कामाची सदर कंपनी सलमानभाईला किम्मत मोजते आहे.

तर ब्रॅण्ड म्हणजे १० टक्के दर्जाचा आणि ९० टक्के भावनेचा खेळ, सरळ सरळ. पद्मिनी व मारुती 800 नंतर भारतीयांची कौटुंबिक वाहनाची, नवसंपन्नतेच्या मुसंडीची ओळख बनली ती टाटा इन्डिका - बडी छोटी गाडी. धपाधप सेल झाला. नंतर ट्रान्स्पोर्ट, ट्रॅवल्सवाल्यांनी पिवळ्या प्लेट लावायला सुरुवात केल्यावर ह्या नवसंपन्न भारतीयांच्या मनाचा एक कोपरा हलला. "ह्यॅ, ही तर काय कोणीही - अगदी टॅक्सीवालेही घेतात". इंडिकाला जी प्रतिमा मिळाली ती गमावली, सेल कमी झाला. टाटाने इन्डिका विस्टा हे महाग आणि अधिक लग्जरीयस वर्जन आणलं. नंतर तर भारतीय बाजारात अशा लग्जरियस महाग वाहनांचा पोळा फुटला. लक्षात घेण्याची केसस्टडी अशी की जरी उत्तम दर्जा होता तरी ग्राहक कमी होत जाण्यामागे दुसरे नाजूक कारण होते. ते म्हणजे ब्रॅण्डची प्रतिमा. ही प्रतिमा न सांभाळता आल्याचा जोरदार फटका टाटांच्याच आणखी एका वाहनाला बसला, ते म्हणजे नॅनो.

प्रतिमा हीच जाहिरात जगाचा आत्मा आहे. मार्केटींगचा कणा आहे, सेल्सची प्रेयसी आहे.

तर अशा काही प्रतिमा काही कालावधीनंतर बनत जातात, काही मुद्दाम साच्यात घडवून बनवल्या जातात. अमिताभ अशीच एक प्रतिमा आहे, शाहरुखही, अमिरही, सलमानही, राखी सावंत ही, पूनम पांडेही आणि सनी लियोनही अगदी केआरके आणि शोभा डे सुद्धा. प्रत्येकाची आपआपली प्रतिमा आणि आपआपली ब्रॅण्डवॅल्यू.

जाहिरात एजन्सीला आपल्या क्लायंटच्या प्रॉडक्टला सूट होईल अशी प्रतिमा असलेला सेलेब्रिटी वापरावा लागतो. अर्थात, हे टेक्स्टबुकीय ज्ञान आहे, भारतातच ह्या अमूल्य ज्ञानाचा विचका केलेला जागोजाग आढळून येतो. महागडा, गडगंज श्रीमंती आव आणणारा रिडअॅण्डटेलर कपड्यांचा ब्रॅण्डअॅम्बेसेडर असलेला अमिताभ शेतातल्या पाण्याचा उपसा करणार्‍या पंपाचीही जाहिरात करतो. फिटनेसफ्रीक असलेली बिपाशा फॄटज्यूसची जाहिरात करणार हे संयुक्तिकच, तसेच धोनी एखाद्या एनर्जी ड्रिंकचा ब्रॅण्डअॅम्बेसेडर असणे हेही. दोघांनी मिळून बहुतेक धावण्याच्या शूजची जाहिरात केलेली, तेही योग्यच. लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या सर्वात ज्ञात व परिणामकारक पैलूशी आपल्या उत्पादन/सेवेची सांगड घालून आपल्या उत्पादन/सेवेचे मूल्य वाढवणे म्हणजे ब्रॅण्डवॅल्यू वाढवणे. लोकप्रियता हा निकष महत्त्वाचा असला तरी तो व्यक्तिमत्वाच्या कोणत्या बाबीमुळे आहे हे तपासणे महत्त्वाचे. ती बाब म्हणजे ब्रॅण्डवॅल्यू, निव्वळ लोकप्रियता म्हणजे ब्रॅण्डवॅल्यू नाही. नाईके, आदीदास ह्यांनी उत्तम उत्पादने दिलीत पण ती उत्तम खेळाडूंना जाहिरातीत झळकवून, त्यांना खेळतांना आपले उत्पादन वापरायला लावून. उत्तम खेळाडूंचे सगळेच उत्तम असते ही भावना जनसामान्यांत असते. मग तो रिबॉक असेल तर "तो उत्तमच असेल, त्याशिवाय का तो त्याने घातला आणि भन्नाट परफॉरमन्स दिला".

क्रिकेटमधे ब्रॅण्डवॅल्यू अशीच बनते. सचिन उत्तम खेळतो, अनेक विश्वविक्रम करतो, तो सर्वोत्कॄष्ट आहे, त्याची चॉईसही सर्वोत्तम असेल. मग तो जे जे उत्पादन एन्डॉर्स करतो त्याचीही वॅल्यू वाढते. किंवा ब्रॅण्डेड कंपन्या अशा सर्वोत्तमांना घेऊन 'दोन समान दर्जाचे लोकच मैत्री करु शकतात' ह्या जनसामान्यांच्या भावनेला कुरवाळतात. मग सचिन कशाचीही जाहिरात करो, तिला एक आश्वासक खात्री त्याने त्याच्या उपस्थितीने मिळवून दिलेली असते. ल्युमिनस बॅटरी हे एक उदाहरण आत्ता आठवते. जुने म्हणजे अगदी सुरुवातीचे ते, 'सनी' ह्या दुचाकीची जाहिरात.

चित्रपटक्षेत्रातल्या कलाकारांना फक्त लोकप्रियता ह्या निकषावर निवडले जाते. अगदी टेक्स्टबुकिय ज्ञान लावायचे झालेच तर ज्या ग्राहकसमुहातल्या लोकांना जो आवडतो त्या समूहासाठीच्या उत्पादनांसाठी ते ते अभिनेते, अभिनेत्री वापरल्या जातात. चैनीखैनी, डॉलर, अमूल माचो, लक्स कोझी, रुपा, खुशबूवाला व्हील, हे एकाबाजुला तर डीबीअर्स, ल ओ रियल, नेस्कॅफे, गार्नियर दुसरीकडे. डू आय नीड टू से मोअर?

तसेच क्रिकेटमधे किंवा एकूण स्पोर्टसमधे राष्ट्रीय (भारतात राष्ट्रीयला तशी फार वॅल्यू नाहीच) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे झाल्यावरच ब्रॅण्डवॅल्यू तयार होते. पण मनोरंजनक्षेत्रात फार लोकल लेवललाही सेलेब्रिटी स्टेटस मिळत असल्याने पॉप्युलॅरीटी वॅल्यू मिळते. कुठल्या भंगार पण लोकप्रिय सिरीयलमधल्या 'काहीही हं' ला सुद्धा एन्डॉर्समेंट्चे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात. प्रियंका, दिपिकाच्या एक शतांश वा एक हजारांश तरी मोबदला मिळतो. दुकानाची फित कापायला पाच पंचेवीस हजारात अशा सेलेब्रिटी येऊन जातात. तालुका-शहर पातळीवर सदर आस्थापनाचा गवगवा होतो, पैसा वसूल होतो. पण अशी वॅल्यू फर्स्टक्लास क्रिकेट खेळणार्‍याला नाही मिळत.

कोहलीला दुसरा सचिन म्हटल्या जात आहे, त्यामागे जाहिरातबाजच आहेत. सचिन आता खेळत नाही, त्याच्या रिटायरमेंटला उशिर होण्यामागेही जाहिरातदार आणि त्यांचे एन्डॉर्समेन्ट्स होत्या. आता ही सचिन नामे सोन्याची कोंबडी खुडूक झाल्यावर व त्याच्याइतकी ब्रॅण्डवॅल्यू+इमेजवाला दुसरा कोणी तयार झालेला नसल्याने कोहलीला सचिनचा उत्तराधिकारी म्हटले जाऊ लागले. उत्तराधिकारी तो फक्त ह्या एन्डॉर्समेन्टचाच. कारण जाहिराती चालणे उत्पादकांसाठी आवश्यक, आणि क्रिकेट चालणे जाहिरातींसाठी आवश्यक. क्रिकेटमधे सचिन असणे क्रिकेटसाठी आवश्यक. पण तो नाही तर कोहलीला पुढे केले जात आहे. आणि तो आहेही आजच्या तरूणांसारखा, बेधडक, बिन्दास्त. कोणे एकेकाळी थकलेल्या, मरगळलेल्या भारतीय तरूणांच्या आत्मविश्वासाला फुंकर घालायचे काम सचिन ने केले. त्यानंतर एक पिढी निघून गेली. नव्या पिढीची, नव्या क्रिकेटची प्रतिमा म्हणून कोहली गाजत आहे, गाजवला जात आहे.

क्रमशः

© Sandeep Daange

(This article is property of Mr. Sandeep Daange , unanuthorised use or publication is legal offense.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा