रविवार, ७ एप्रिल, २०१९


मोदींना पर्याय काय?

हा प्रश्न नोटबंदीचे अपयश ध्यानात यायला लागले तेव्हापासून जास्तच पिंगा घालू लागला आहे. साधारण डिसेंबर-जानेवारीपर्यंत, जेव्हा लोक हालअपेष्टा भोगून कंटाळली होती आणि सगळ्या जुमल्यांचे इमले कोसळू लागले होते. तेव्हा सामान्य नागरिकाच्या मनात चलबिचल व्हायला लागली. "नियत तो देखो, वो तो साफ हैं ना" हा बचावही साधारण तोकडा पडायला लागला आणि मोदींबद्दलची लार्जर दॅन लाइफ इमेज थरथरु लागली. तेव्हा '....हो, पण मोदींना पर्याय काय?" हा चलाख प्रश्न मुसळधार पावसासारखा कोसळायला लागला. ह्यामागे फार विचार करुन तयार केलेली योजना आहे. हा एक वेल-प्लॅन्ड प्रोपगंडा आहे.

ह्याच्या थोडं मुळाशी जाऊयात. मोदींनी शपथ घेतल्यावर संपूर्ण एक वर्ष अप्रतिम धुंदीचे वातावरण होते. वर्षाचा लेखाजोखा आल्यावर एक एक बुरूज ढासळायला लागले. ह्याचे कारण होते दिलेली सर्व आश्वासने, 'ही दिलीच नाहीत, तुम्हीच चुकीचे समजलात, आम्ही असे बोललोच नाही, असे कुठे असते का, ते अगदी निवडणूकांत असं बोलायलाच लागतं' इथवर चाललेला माजोरडेपणा. त्याच सुमारास 'तुमचे मत परत मोदींनाच द्याल का?' असा प्रश्न विचारत उत्तरात 'येस नो टाइप करा' छाप प्रचार/जनमतचाचपणी सुरु होती. साधारण २०१५ च्या उत्तरार्धात असे लक्षात आले की लोक भाजपला कंटाळतायत. कारण अगडबंब अपेक्षा कबूल केल्या, तसे आता डिलिवर होऊ शकत नाहीये. २०१९ ची तयारी तर करायचीच. मोदींची जी कोणी टीम असेल, त्यांनी हा प्रश्न जन्माला घातला. लोक जेव्हा पर्याय शोधू लागतात तेव्हा जो प्रश्न कोणताही मार्केटींगवाला, अगदी साडीच्या दुकानातला सेल्समनही विचारेल तो प्रश्न विचारला जाऊ लागला. 'म्याडम, आपको इससे ज्यादा सुंदर साडी पुरे सुरत में नही मिलेगी, जाओ, ढुंढके लाओ, डब्बल पैसा दूंगा"

तसाच प्रश्न ..... "मोदींना पर्याय काय?"  

म्हणजे मोदींना पर्यायच नाही. पर्याय शोधूच नका. गरजच नाही. सामान्य नागरिक या प्रश्नाच्या पलिकडे नाही बघू शकत. गेल्या दहा वर्षात सुत्रबद्ध तर्हेने, कोट्यवधी रुपये ओतत जे चित्र उभे केले आहे, त्याला तोड देऊ शकेल असे कोणीतरी आहे का राजकारणात? नाहीच. अगदी भाजपातही नाही. खुद्द भाजपही नाही. 

विरोधी पक्ष २०१० पासूनच लकवाग्रस्त झालेले आहेत. काँग्रेस तर खुपच सुस्त झाली. आधी धोरणं ठरवणे, निर्णय घेण्यात बरीच धांदल सुरु होती, त्यात भ्रष्टाचाराच्या आरोपाचा २०११ पासून जो अंदाधुंद गोळीबार सुरु झाला, त्यात पुरती संपली. त्यांची रिकवरी शक्यच नाही. तेव्हाच मोदींचा उदय फोटोशॉप-विकासाच्या मदतीने, २००२च्या पुण्याईने आस्तेकदम सुरु होता. मोदींनी आपला ब्रॅंड स्थापित केला. ही एक प्रोफेशनल पद्धत आहे जी आजवर कोणीही वापरली नाही. 

पण प्रथम-स्थापित ब्रँडचीही एक गम्मत असते. कोलगेटला पर्याय नाही, बिसलेरीला पर्याय नाही, झेरॉक्सला पर्याय नाही, अॅक्वागार्डला पर्याय नाही. पण असे असते का? नाही. वरील सर्वांचे सक्षम किंबहुना अधिक भारी पर्याय आहेत. 

आता मोदींना परास्त करायचे असेल तर मोदींपेक्षा भारी प्रोपगंडा करणे आवश्यक. सध्या जमाना मार्केटींगचाच आहे. मोदी मार्केटींग करुन जिंकले. 'मोदींना पर्याय नाही' हे सुद्धा मार्केटींगच आहे २०१९ साठी. मोदींच्या तोलामोलाचे अनेक नेते भारतात आहेत. त्यांनी स्वतःची प्रतिमा कधी निर्माण केली नाही. प्रतिमा निर्माण करावी लागतेच. आजच्या जमान्यात आपोआप कुणीही प्रसिद्ध होत नाही. मोदींच्या वकुबाचा गेल्या साडेतीन वर्षात एव्हाना पूर्ण अंदाज आलेला आहे. असेच सरकार चालवायचे असेल तर कुणीही चालवेल. कुणीही चालवेल तर मग काय कुणीही चालेल. हां, मोदींना कोणी 'अवतार' समजत असेल तर तो भाग वेगळा. मोदी नव्हते तेव्हा भारताचे काही बिघडले नाही, आले म्हणून लगेच किंवा पुढच्या २० वर्षातही फरक पडणार नाही.

'देशाच्या विकासाचे व्हिजन जे मोदींकडे आहे ते कुणाकडेच नाही, जी धमक ते व्हिजन राबवायची आहे ती कुणाकडेच नाही', इत्यादी कंड्या पिकवल्या गेल्या आहेत. याचे कारण भारताबद्दल, स्वतःच्या देशाच्या इतिहासाबद्दल धड अभ्यास नसलेल्या तरुणांनी हा बहुतांश देश भरलेला आहे. काँग्रेसने देशाची वाट लावली ह्या बाळकडूत न्हायलेले हे तरुण कितीसा अभ्यास करतात हे सर्वांनाच चांगले माहिती आहे. यांना 'तुम्ही द्रारिद्र्यात आहात कारण काँग्रेसने तुम्हाला तसेच ठेवले, आता प्रगती फक्त मोदीच करु शकतात' असे २०१२ पासून भरवले गेले आहे.

हे सर्व लोक देशाच्या विकासाबद्दल अवास्तव संकल्पना ठेवणारे, मंदबुद्धी आहेत. २ -३ वर्षात विकास होत असतो काय असे आता उलटं विचारणारे भाजपे १९४७ ला स्वतंत्र झाल्याबरोबर विकास मागत होते. (खरेतर ते तेव्हा वेगळंच काही मागत होते, व त्याचसाठी त्यांचे प्रयत्न निरंतर चालू आहेत) तरी आजवर स्वतंत्र भारतावर कोणत्याही पक्षाच्या सरकारने राज्य केलेले असू देत, पण एक नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की मागच्या ७० वर्षात आपण एक एक पायरी चढत एवढा विशाल आणि प्रचंड विविधता असलेला देश ज्या ठिकाणी घेऊन आलो ते अभिमानास्पदच आहे. यात 'सर्वच पक्षांचे, जनतेचे, नेत्यांचे' योगदान आहे. आपल्या देशात आजकाल नेहमी सिंगापूर, जापान वगैरे देशांचे दाखले दिले जातात, की स्वतंत्र झाल्यावर अमूक वर्षात ते इतके पुढे गेले वगैरे. पण त्याचवेळी अनेक देशांमध्ये चाललेली गृहयुद्धे, गरिबी, भुखमरी, लढाया, अराजक हे कोणी बघत नाही. भारतीय नागरिकांचे असे आहे की स्वतः काही करायचे नाही, आपल्या कमतरतांसाठी दुसर्यांना दोष देत बसायचे. इतर देशांच्या झटपट विकासाचे दाखले देणार्‍यांनी स्वतःच्या गावात तरी विकास घडवून आणला का एवढे स्वतः बघावे. तुमच्या गावा-शहराच्या क्षेत्रफळाएवढे देश विकसित झाले, त्याचेच तुम्ही दाखले देता ना? त्यामागची कारणेही अभ्यासून बघा. इथे मी कॉंग्रेस पक्षाला पाठीशी घालतोय असा काहींचा समज होईल. पण वास्तव तसे नाही. काँग्रेस असो वा भाजप, प्रत्येकाचे पाय मातीचे आहेत. कोणीही धुतल्या तांदळाचा नाही. पण मुद्दा हा आहे की गेल्या ७० वर्षांत आपण सर्वच राजकिय पक्षांचे अनेक लायक, नालायक, तेजस्वी ते तेजहीन, बुद्धीमान ते बुद्धीहीन, घराणेबाज ते आगंतुक, कर्तृत्ववान ते कर्तृत्वहीन असे सर्व प्रकारचे नेते सर्व पदांवर पाहिले आहेत. आजवर हा प्रश्न निर्माण झालाच नाही की ह्याला पर्याय काय, त्याला पर्याय काय?

त्याचे कारण असे की भलेही आपला समाज व्यक्तिपूजक असला, महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचणारा असला, भोंदुंचा भक्त असला तरी तो कायम स्वतःचा विकास पाहत असतो. 'मला काय फायदा?' ह्या प्रश्नावर आपली निवड करत असतो. अशा निवडीतूनच आपण आज जगातल्या दुसर्याल क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत झेप घेऊ शकलो. कारण आपण कोणा एकाच्या भरवश्यावर राहिलोच नाही. आपल्याला गरजही नव्हती कधी. म्हणून आपण यशस्वी झालो. आपल्या सर्व आशाआकांक्षा, स्वप्ने, इच्छा जर एकाच व्यक्तीच्या पायी समर्पित केल्या तर अधोगतीशिवाय आपल्याला काहीही मिळणार नाही. 'मोदींनी केले ते योग्यच केले असेल, आता लोकच असे निघाले त्याला ते काय करणार' ही जी मानसिकता आहे ती एक देश म्हणून, समाज म्हणून घातक आहे. नेता चुकतो, तो देव नाही हे समजण्याची कुवत आपला समाज गमावतो आहे. तो चुकला तरी तो चुकला नाहीच हे बळजबरी डोळे वटारुन सांगणारी यंत्रणा आपल्या आजूबाजूला तयार होत आहे ती घातक आहे. मोदींना पर्याय काय? हा प्रश्नही प्रेमाने नाही तर डोळे वटारुन विचारलेला आहे हे लक्षात घ्या. "मला काय फायदा?" ह्या विकासवादी प्रश्नापासून आपण "मोदींना पर्याय काय?" ह्या निरर्थक प्रश्नाकडे ढकलले जात आहोत.

त्यापेक्षा पुढील प्रश्न विचारा. मोदींना ज्यासाठी निवडुन दिले, ती कामे होत आहेत काय? किती झाली, आता काय स्टेटस आहे, किती दूरगामी निर्णय घेतले, कोणती कामे सुरु आहेत? ह्या सर्व प्रश्नांबद्दल तिसर्या च घटकाकडून जागरुकतेने प्रचार होणे आता आवश्यक आहे. काँग्रेस व इतर भाजपविरोधी कितीही ओरडले तरी त्यांची प्रतिमा भजपआयटीसेल व विकलेला मिडिया यांनी अविश्वासार्ह आणि मतलबी अशी करुन ठेवली आहे. ते असतील किंवा नसतील पण भाजप फार धुतल्या तांदळाचा आहे असे तर नाही.

भारतात राजकिय पटलावर काय चालू आहे हेच जिथे विरोधी पक्षाला सुधरत नाहीये तिथे मोदीविरोधात कोणी उभा करावा हे कुठून सुधरेल? ते त्यांनी करुही नये. मोदींना परास्त करणे फक्त भाजपमधून शक्य आहे. भाजप ही जळकुट्या व असुरक्षित लोकांची संघटना असल्याने ते फार दिवस कोणाला डोक्यावर बसवून ठेवत नही. २०१९ ची निवडणूक भाजप जिंकेल का नाही याबद्दल आज साशंकता निर्माण झाली आहे. तरी काहीही लांड्यालबड्या करुन जिंकलेच तर कदाचित मोदीच पंतप्रधान असतील. हां, त्यानंतर मात्र भारत कसा असेल हे मात्र माहित नाही.


मोदी निवडून आल्यावर जो उत्साह दिसत होता तो आता दिसतोय काय? केवळ संघवाले, हिंदुत्ववाले उत्साही आणी माजलेले दिसत आहेत. त्यांच्या मनातला विखार दिवसेंदिवस बाहेर येत आहे. मेंढराची कातडी घसरुन लांडग्यांची दिसायला लागली आहे. तरी लोक समजणार नाहीत. कारण बहुसंख्य लोकांना असे असणे म्हणजेच रामराज्य आहे असे पटवण्यात आले आहे. मुस्लिमांचे फार लाड झाले आता हिंदुंचे राज्य आहे अशा प्रकारची भावना हिंदुंमध्ये आहे. धर्म आणि राष्ट्रवादाच्या गुंगीत खर्याा विकासाकडे लक्ष जात नाही. जाऊ दिले जात नाही. 

मोदींना पर्याय काय हा वरवर सोपा वाटणार प्रश्न फार गुंतातुंतीचा व गोल गोल घुमवून परत त्याच ठिकाणी आणणार्याक चकव्यासारखा आहे. त्या चकव्यालाच एक प्रश्न तुम्ही विचारा.... "पण मोदींना पर्याय का शोधायचा?" मग बघा.

एक सामान्य नागरिक म्हणून आपण आपला फोकस केवळ ह्यावर ठेवावा की भाजप जिंको वा कोणीही, भारताच्या विकासाची कामे झाली पाहिजेत, विकासाच्या योजनांबद्दल बोलले पाहिजे. 'मला काय फायदा?' या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे.

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

आयटीवाल्यांचा मत्सर.

आयटीवाल्यांना पुरवल्या जाणार्‍या सर्व सोयीसुविधा ह्या इतर लोक लग्जरी म्हणून बघतात त्यात त्यांची अज्ञानामुळे होणारी चूक आहे. कारण जीवंत माणसाला वस्तू-यंत्र म्हणून वापरलं जातंय हेच त्यांना कळत नाही. कारखान्यात एखादं बॉयलरला काही कोटी रुपये लागतात तेव्हा हिच माणसं लोखंडाच्या बंबाला काय एवढे पैसे असं म्हणत नाहीत. आयटीमधे मनुष्यबळ व त्याची बुद्धी हेच सर्वात मोठे रीसोर्स असतं, त्याला जास्तीत जास्त परफॉर्मन्स द्यायला 'योग्य ते वातावरण' असणं ही 'लग्जरी' नाही तर 'मिनिमम रीक्वायरमेंट' आहे.

ही जी 'मिनिमम रीक्वायरमेंट' आहे ती प्रत्येक ठिकाणी लागू आहे. जे लागू करत नाहीत त्यांना त्यातली गोम कळली नाही म्हणून....

आता आयटीमधेच ही सक्ती किंवा मुभा का? तर आयटी ही इंडस्ट्री आहे. म्हणजेच इंडस्ट्रीला इंडस्टीसारखे वागवणारे आले. जेव्हा गाय घराचीच असते तेव्हा ती रानोमाळ भटकते, आपले आपण काय-बाय खाते, घरी येते. घरचे जेवढं निघेल तेवढं दूध काढून समाधानी असतात. त्याविरूद्ध इन्डस्ट्रीयल मिल्कींग मधे गाय जास्तीत जास्त दूध कसे देइल यावर असंख्य संशोधक काम करतात. त्यातून वेगवेगळे सल्ले-प्रयोग देतात-करतात. गायीला कसे वागवले म्हणजे जास्त दूध मिळेल याचीच चिंता असते.

आता आयटीकडे या. इथे मनुष्य व त्यांचा मेंदू हेच रीसोर्स आहे. याची जेवढी जास्त काळजी घेतली जाईल तेवढा जास्त चांगला परफॉर्मन्स मिळेल हे साधं गणित. साधं असलं तरी अनेक प्रयोगांतून-संशोधनांतून पुढे आलंय. आपली कार्यक्षमता (म्हनजे कंपनीची) वाढवण्यासाठी काय करावे लागेल किंवा चुका का घडतात यावरच्या संशोधनातून असे लक्षात आले की बुद्धीजीवी मनुष्यास त्याचे काम चांगले करण्यासारखे वातावरण असेल तर त्याची कार्यक्षमता कैक पटीत वाढते. यात येण्याजाण्यापासून ते ऑफिसच्या वातावरणापर्यंतचे घटक ह्या कार्यक्षमतेवर चांगला-वाईट परिणाम करू शकतात हेही लक्षात आले. उदा. बसण्याची जागा शरीरास आरामदायक नसेल तर मेंदूचा काही भाग त्या अवघड परिस्थितीवर काही प्रमाणात लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे जे काम हातात आहे, ज्याचे भविष्य पूर्णपणे मेंदुवर अवलंबून आहे त्या कामास पूर्ण न्याय देण्यास मेंदू कमी पडतो. लक्ष विभाजीत होते. प्रोडक्शन कमी होते. चुका वाढतात. हे जेव्हा आयटीच्या मोठ्या कंपन्यांना लक्षात आले तेव्हापासून ते कामगारांना प्रचंड सुविधा देण्यास पुढे आले, कारण केवळ त्यावरच त्यांचे अ‍ॅन्युअल रिपोर्ट्स व स्टॉकचे रेट अवलंबून आहेत म्हणून.

कारखानदारी मधे जिथे बरेचसे काम यंत्रांद्वारेच होते तिथे मनुष्य देखरेख किंवा हाताने काम करणे यासाठी उपलब्ध असतो. एखादा कामगार यांत्रिकपद्धतीने एखादी वस्तू जसे पंखा बनवणे, रेडीयो बनवणे, सायकल बनवणे असं काम करतो तर तिथे त्याला कौशल्य लागतं, बुद्धी व मेंदूची एकाग्रतेची तेवढी प्रचंड आवश्यकता नाही जितकी आयटीमधे आहे. कारखान्यात जुळणी करत असतांना तो मनुष्य 'महिना संपत आलाय, आता कुणाकडे उधारी करायची, देणी कशी फेडायची' याच्या प्रचंड तणावात असूनही कंपनीस आवश्यक इतके प्रॉडक्शन देऊ शकतो. हीच परिस्थिती कोड लिहिणार्‍या किंवा दुरुस्त करणार्‍या संगणक अभियंत्यास घातक आहे. कारण त्याची चुकलेली एक लाइन वा डॉट त्याला ते काम परत परत करायला भाग पाडू शकतो, कंपनीचा परफॉर्मन्स घटतो आणि त्याची स्वतःची पतही. कारखानदारीत यंत्र बनवणार्‍यांचे अतोनात महत्त्व आहे, जे लाड आहेत, ते तेच यंत्र चालवणार्‍यांचे नाही.

आता कारागीरी किंवा कला, जसे सुतारकाम किंवा मिस्त्रीकाम. हे सरावाने येणारे कौशल्य आहे. यात सुरुवातीस प्रचंड मेहनत घेऊन हे कौशल्य आत्मसात केले की पुढे निरंतर कामाने ते अधिक अधिक मजबूत होत जाते. एक स्थिती अशी येते की त्या ठिकानी कारागीर अगदी गप्पा हानत, शिव्या घालत, इकडे तिकडे बघत ते काम करू शकतो. कारण नवनिर्मिती असली तरी ते सृजन नाही. आयटीत हे शक्य आहे का? कितीही मोठा कोडर असला तरी तो वरील अवस्थेत अचूक कोड लिहू शकेल किंवा दुरुस्त करू शकेल काय हे आयटीधुरिणांनी सांगावे.

पुढचा मुद्दा निव्वळ कला किंवा उपयोजित कला, इथे आयटीसदृश्य परिस्थिती आहेच. पण इथे वरील तिन्ही गोष्टींचा संगम होतो. सरावाने सहज होत जाणारे कौशल्य एकाग्र बुद्धिने वापरले जाते. इथे पण मेंदूस एकाग्रता लागतेच, पण कलेचा एक अनामिक डोळा अनावधनाने झालेल्या चुका लगेच लक्षात आणून देतो. चुकलेले रंग, आकार, शब्द तिथल्या तिथे बदलले जातात. ही प्रोसेस नकळत होत असते. ती उपजत असते. शिकवून येत नाही. शिकवून फक्त तंत्र आत्मसात होते, कला नाही. तर कलेच्या क्षेत्रात आरामदायक वातावरणाची जरूर असली तरी ती प्रॉडक्शन क्षमतेवर परिणाम करेलच असे नाही. तरीही मोठमोठ्या जाहिरात संस्था आयटीसारखे वातावरण आयटीच्या आधिपासून राखून आहेत.

मनुष्य आणि त्याची बुद्धी हेच आयटीमधे 'सबकुछ' आहे. तिथे चुकीस मुभा नाही, पर्यायी व्यवस्था नाही. अशा मनुष्यबळास सांभाळणे, त्याकडून जास्तीत जास्त उत्पादन करवून घेणे ह्यालाच प्राधान्य आहे. त्यामुळे डोक्याला ताप देतील अशा सगळ्या गोष्टी त्यांच्या मार्गातून दूर केल्या जातात. अगदी कामगारांचे व्यक्तिगत करव्यवस्थापन पासून पासपोर्ट विजापर्यंत कंपन्या मदत करतात, मुलांसाठी पाळणाघरं चालवतात, अजूनही काय काय. त्यामुळे लाड होतात असा गैरसमज आहे बाहेर.

इंडस्ट्रीयल मिल्किंगमधल्या गायींना वेळच्या वेळी कसदार खाणं, वैद्यकिय देखभाल, चळांना त्रास न होता दूध काढणार्‍या मशिन, राहण्याची अत्याधुनिक व्यवस्था, अल्टीमेट स्वच्छता हे सगळं मिळतं म्हणून रानोमाळ भटकणार्‍या गायीने तिच्याकडे असूयेने पाहणे कितपत बरोबर...?

कारखान्यांच्या काळात जगलेल्यांना यंत्र ही मोठी, त्यांना चालवणारी माणसं लहान अशी वर्गवारी माहित. आज माणसं मोठी यंत्र लहान हा बदललेला विचार त्यांना लवकर पचनी पडत नाही. त्यांच्या दृष्टीने कम्प्युटर आणि बॉयलर मधे फरक नाही तसेच सुपरवायजर व टीम लीडर मधेही फरक नाही. तो फरक फक्त आयटीत काम करणारेच जाणू शकतात. यंत्रासारखे, न कुरकुरता, सदैव उत्तम काम देणार्‍या आयटीवाल्यांनीच जग जगण्यास सुखकर केलंय हे एटीममधे जाऊन चटकन नोटा हातात घेणार्‍याला कळत नाही तसेच गिर्हाइक उभे ठेवून मोबाइलवर बिन्कामाच्या गप्पा हाकणार्‍या भाजीवाल्यालाही कळत नाही. त्यांच्या सो-़कॉल्ड लग्जरी मुळे आज आपण खर्‍याखुर्‍या लग्जरीत जगतोय हे त्यांना कळत नाही. पण आयटीवाल्यांचा पगार फक्त दिसतो, तो ओरबाडून घेण्याच्या नीच प्रवृत्तीला शब्द नाहीत माझ्याकडे.

काही प्रमाणात याला आयटीतली लोकंही जबाबदार आहेत. संपत्तीच्या अभावात बालपण काढलेली मुलं पैसा बघून चेकाळली, पैशाच्या जोरावर काहीही विकत घेता येतं हेही कळलं. बालपणीचं अभावाचं जीणं झुगारून वाट्टेल तसा पैसा खर्च करायला लागली. सेझ झाल्यावर नवी मुंबईत भाड्यांच्या किमती वाढल्या कारण हीच मुलं "तुमको कितना मंगताय उतना लगाव, हम्को कंपनी पैसा देगी" असा बादशाही आव आणत होती. हे डोळ्यानी पाहिलंय. त्यांच्यामुळे मला घरमालकाने सरळ तीस टक्के घरभाडं वाढवून मागितलं. म्हणजे 'ती' देऊ शकतात, तुम्हाला जमत असेल तर राहा नाहीतर निघा. आयटीवाल्यांचे असे स्वभाव बघून इतरही लोकांनी आपले भाव चढवले. तशीही आयटीतली जास्तीत जास्त मुलं छोट्या शहरातून आलेली, "मुंबै-पुण्यात सगळं महागच असतं"चा पुर्वग्रह घेऊन. त्यांना इथे मोलभाव करायला जमतही नव्हतं, तशी गरजही नव्हती. तिकडे गावात बाप जितका महिन्याला कमावत असेल तितकं तर ही मुलं मेसवाल्याला देत होती. त्यामुळे पैशाचं अप्रूप संपलं. रुपया-रुपया जपून खर्च करावा ही बापाची शिकवण गरीबीच्या पोटी आली आहे असं त्यांना वाटायला लागलं. त्यातून बेफिकीरी वाढली आणि महागाई तर अशा प्रसंगाची वाटच बघत असते. घ्यायला सोडायला येणार्‍या गाड्या आहेत म्हणजे हे पैसा छापणारे मोठे साहेब आहेत अशी मानसिकता ८०-९०च्या दशकात होती. तीच अजून कायम आहे. पण ह्या गाड्यांमधून नेल्या जाणारे फक्त हमालीचं काम करत आहेत, त्यांच्या पगारातूनच ह्या लग्जरीजचे पैसे वळते करून घेतले जात आहेत, कंपनी कुठलेही उपकार वा चोचले करत नाहीये - असं चुकूनही सामान्य लोकांना कळत नाही. ते आपले फक्त लुटायला बघतात.

सोमवार, १ एप्रिल, २०१९

तरीही रडतात साले...
जगभरातल्या शेतकरी आंदोलनांचा आढावा


वरील फोटोत दूध वाहून देणारे दूध उत्पादक असले तरी भारतीय नाहीत. परंतु त्यांच्या समस्या भारतीय शेतकऱ्यांसारख्याच आहेत. आणि हो,  इटलीसारख्या प्रगत देशातले आहेत.

सर्व जगात शेतमालास मिळणार्‍या कमी किंमतींमुळे शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता आहे. ह्यात अगदी प्रगत देशांतले आधुनिकतेचे प्रणेते असलेले शेतकरीही सुट्लेले नाहीत. त्यांची आंदोलने पाहून तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातली आणि देशपातळीवर विविध ठिकाणी होणार्‍या आंदोलनांत काहीच फरक नाही हेही दिसून येईल. इतकेच नव्हे तर फ्रांस आणि अमेरिकेतही शेतकर्‍यांच्या वाढत चाललेल्या आत्महत्यांबद्दल वाचून धक्का बसेल. असाच धक्का इथल्याही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबद्दल बसावा अशी रोज मरणार्‍या भारतीय शेतकर्‍यांचीही अपेक्षा असते.

भारतात शेतकरी म्हटला की अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया बघायला मिळतात. वर्तमानपत्रे आणि टिव्ही चॅनेल्सवरुन होणारे शेतकर्‍यांविषयीचे रिपोर्टींग गेले कित्येक वर्षे साधारणपणे पाहिले तर शेतकरी किती समस्याग्रस्त आहे, हवालदिल झालाय अशी सातत्याने इमेज पुढे येत राहिली आहे. त्यासोबतच शेतकरी म्हटला की कर्जमाफी हाच शब्द त्याला चिकटून शहरी मध्यमवर्गीयांच्या मनात उभा राहतो. जणू शेतकरी हा केवळ आपण भरतोय त्या इंकम टॅक्समधून मिळणार्‍या कर्जमाफीवर जगतो आणि तेवढ्यासाठी शहरात येऊन कष्टाची कामे करण्यापेक्षा खेड्यापाड्यांतून आळशीपणा करत सुस्त आराम करत पडलेला असतो अशी त्यांची धारणा करुन देण्यात आली आहे. गेल्या तीस वर्षात लाखो शेतकर्‍यांच्या झालेल्या आत्महत्याही आता शहरी मध्यमवर्गीय असो की राजकारणी असो, कोणाच्याही मनावर कोणताच परिणाम करत नाहीत. रोज सूर्य उगवतो मावळतो त्याप्रमाणे शेतकरी आत्महत्या करतो इतकी निगरगट्ट आणि कोडगी मनःस्थिती झाल्यासारखी दिसत आहे.

ह्या परिस्थितीबद्दल शेतकर्‍यांवरच दोषारोप करणारे बहुसंख्य शहरी मध्यमवर्गीय दिसतील.  त्यापैकी काही दोषारोप असे: आपल्याकडच्या शेतकर्‍यांनी जुनाट पद्धती सोडून आधुनिक पद्धती वापरल्या पाहिजेत, शेतमालाचे स्वतः मार्केटींग आणि विक्री केली पाहिजे, शेतकर्‍यांनी कर्जमाफी घेऊ नये, कर्जच घेऊ नये, शेतकरी लग्नकार्यात उधळपट्टी करतो, जास्त मुले पैदा करतो म्हणून शेतीची वाटणी होते. इजरायली शेतकर्‍यांकडे बघा. तोटा होतो तर शेती करतातच कशाला, शेतकरी खोटे बोलतात, कर्जमाफी आणि सरकारी अनुदानांसाठी नुकसानीचा बनाव रचतात असे म्हणणार्‍यांना बांधावर दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा द्यावी असे फार वाटते.

ह्या विचारसरणीबद्दल शहरी मध्यमवर्गीयांना दोष देऊनही उपयोग नाही. कारण त्यांना समस्येची फार छोटी आणि एकांगी बाजू दाखवली गेली आहे. सबसिडी, कर्जमाफी, सरकारकडून खरेदीची हमी, आधारभूत किंमती, आंदोलने आणि आत्महत्या असे शब्दच त्यांच्या कानावर पडत आले आहेत. त्यातून त्यांनी अशीच इमेज शेतीक्षेत्राबद्दल बनवली असल्यास त्यांचा तरी काय दोष? आपल्या ताटात येणारे अन्न आपल्याला परवडणारे आहे ह्याच्यामागे शेतकर्‍यांचा त्याग आणि किंमती परवडण्याजोग्या ठेवण्यामागे असणारा सरकारी हस्तक्षेप ह्या लोकांना कधीच दाखवला जात नाही. एका कोथिंबीर जुडीची किंमत प्रत्यक्षात शंभर दिडशे रुपये असू शकते व ती आपल्याला सरकारी हस्तक्षेपांमुळे, कायद्यांमुळे (जे कायदे शहरी मध्यमवर्गीयांना खुश ठेवण्यासाठी केले गेले आहेत) दहा रुपये एवढ्या कमी किंमतीत मिळते आहे, ती कधी पंधरा झाली तर तुम्हाला त्रास होतो पण ज्या शेतकर्‍याला ती पन्नास पैसे एक रुपयाला विकायला लागते त्याच्यामागे केवळ दलाल-अडते कारण नाहीत हे समजून घ्या.

वरील सगळे भारुड वाचकांनाही आता सवयीचे झाले असेल. पण लेख लिहिण्याचे कारण वेगळेच आहे. आपल्या आजूबाजूच्या, आपल्या राज्यातल्या, देशातल्या शेतकर्‍यांना आळशीपणा, कामचुकारपणा, फुकटेपणाचा रोग असल्यानेच त्यांच्या सर्व समस्या आहेत व त्यासाठी ते कायम सरकारकडे हात पसरत असतात, त्यांना स्वतःला काही करायला नको, आधुनिकतेची कास धरायला नको असते असा जो शहरी मध्यमवर्गीयांचा गैरसमज झालेला आहे त्याला जरा खिंडार पाडूया. तसेच जेव्हा शेतकरी आंदोलने करतात तेव्हा कोण्या विशिष्ट पक्षाचे सरकार आहे त्याविरोधात राजकिय कट-कारस्थान म्हणूनच आंदोलने करतात हा गोंडस गैरसमज दूर व्हावा. शेतकर्‍यांच्या समस्यांना राजकिय परिप्रेक्ष्यात आणून त्यावर टिका करणे हा त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या कष्टाचा, त्यांच्या त्यागाचा अक्षम्य अपमान आहे.

एकूणच सर्व प्रगत-प्रगतीशील देशांमध्ये शेतीची अवस्था बिकट आहे. आता इंग्लंड-अमेरिका-फ्रांससारख्या देशांतही भारतासारखे दलाल-अडतेच कारणीभूत असतील असे तर म्हणू शकणार नाही. खरे कारण आहे सरकारी शेती धोरण. जगभराच्या सर्व सरकारांना एकच वर्ग प्रिय असतो, तो म्हणजे थेट भरभक्कम मोठ्या रकमांमध्ये कर भरणारा शहरी मध्यमवर्ग. ह्या वर्गाचीच क्रयशक्ती सर्वात जास्त असते. रोजच्या जीवनावश्यक वस्तू अतिशय स्वस्त असाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. अशा वस्तूंची किंमत जरा जरी वाढली कि ते  नाराज होतात. त्यांना नाराज करुन अराजक माजू शकते हे सरकारांना माहित आहे. त्यांच्यासाठी अन्नधान्यांच्या किंमती कमी राहाव्या म्हणून शेतकर्‍यांना व्यवस्थित लुबाडले जाते. त्याला गरिब ठेवले जाते, त्यांनी संघटीत होऊ नये, अन्नपुरवठ्यावर मालकी सांगू नये, किंमतींवर नियंत्रण मिळवू नये म्हणून वेगवेगळे कायदे- क्लृप्त्या केल्या जातात. भाव वाढून जरा कुठे शेतकर्‍याला थोडे पैसे मिळू लागले की आयात-निर्यात धोरणात वारंवार बदल केला जातो. भाव पाडून शेतकर्‍यांचा माल घेऊन व्यापार्‍यांना कमी किंमतीत मिळेल अशी व्यवस्था केली जाते, तेच व्यापारी मग वाढीव किंमतीत जनतेला विकायला मोकळे होतात. अन्नधान्यांवर प्रक्रिया करुन अव्वाच्या सव्वा किंमतीत विकणार्‍या उद्योगक्षेत्राला मात्र सुरक्षा दिली जाते. अशा उद्योगक्षेत्रात शेतकरी घुसू नये म्हणून नाकाबंदी केली जाते. एकूण काय तर जगभरच शेतकर्‍यांना नागवण्याचे उद्योग सारख्याच प्रमाणात राबवले जातात असे म्हणू शकतो.

बातमीसोबत दिलेले व्हिडिओ जास्त लांबीचे नाहीत तेव्हा प्रत्येक बातमी जरुर बघावी अशी आवर्जून विनंती करतो. ह्या सर्व बातम्या पाहिल्यावर सर्व जगातलेच शेतकरी रडत आहेत हे समजून येईल, त्यांची 'साले' अशी अवहेलना करणारे राजकारणी किती हरामखोर आहेत हेही समजून येईल.

१) इटली देशातले दूध उत्पादक दूधाच्या घसरणार्‍या किंमतींमुळे आंदोलन करत हायवेवर दूध ओतून देतांना.

https://www.youtube.com/watch?v=fcP2bBYt6ng

२) बेल्जियम शेतकर्‍यांचेही दूध फेको आंदोलन.
Belgian farmers on Wednesday dumped three (m) million litres (790-thousand gallons) of fresh milk onto fields in the south of the country as part of a protest against low milk prices which they claim are pushing them toward financial ruin.

https://www.youtube.com/watch?v=PsrCIucYX2Q

३)  युरोपियन शेतकर्‍यांचे नऊ वर्षांपूर्वी झालेले दूध फेको आंदोलन किंमतीच्या मुद्द्यावरुनच 
Dairy farmer protests continued on Friday with producers dumping hundreds of thousands of litres of milk into fields to draw attention to their desperation over falling prices

https://www.youtube.com/watch?v=il9mPHyiZXQ

४) जर्मनीतल्या दूधउत्पादक शेतकर्‍यांचे आंदोलन
Hundreds of dairy farmers gathered outside the Bavarian State Chancellery in central Munich, Monday, to protest against plummeting milk prices.

https://www.youtube.com/watch?v=tXvDSjbBEX8

५) वेनेझुएलाच्या शेतकर्‍यांनी दूध देणार्‍या शंभर गायी कापून आंदोलन केले.
https://www.youtube.com/watch?v=x2mj-UtzJC0

६) युरोपियन युनियनच्या शेतीविषयक धोरणांविरोधात ब्रुसेल्स बेल्जियम इथे शेतकर्‍यांनी अंडी फेकून आंदोलन केले.
https://www.youtube.com/watch?v=Ht58ecpXflQ

७) इंग्लंडमध्ये सरकारच्या शेतीविषयक धोरणांविरोधात लंडनमध्ये गायी आणि मेंढरे फिरवून आंदोलन करण्यात आले.
https://www.youtube.com/watch?v=gD3WbZ0K8aE

८) फ्रांसमध्ये शेतमालाच्या किंमतींविषयी आंदोलनासाठी शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आणि रस्त्यावर शेण ओतले.
ह्यातल्या एका शेतकर्‍याचे विधान पुरेसे बोलके आहे "we are asking for set prices so that we can make a living..."
https://www.youtube.com/watch?v=tDomvYKDCP0

French farmers have dumped manure and blocked roads near the German border in a growing row over low prices for their produce and cheap imports.
https://www.youtube.com/watch?v=La6__4Acbgg

९) ग्रीसमध्ये वाढलेल्या करांविरोधात शेतकरी हिंसक आंदोलनाचा आसरा घेतांना..
https://www.youtube.com/watch?v=GiRgcShi84o

१०) अमेरिकेत कंपन्यांच्या वाढत्या आक्रमणाविरोधात कौटुंबिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी वाशिंग्टनमध्ये आंदोलन करतांना. मुख्य समस्या उत्पादनखर्चापेक्षा  उत्पन्न कमी.
A loaf of bread that costs about 94 cents, the farmer's share of that was 3-point-five cents. And it costs the wheat farmer about six-and-a-half cents to produce the wheat that's in the loaf of bread. Now is it any wonder that corn farmers and wheat farmers are going broke? SUPER CAPTION: Helen Waller, Montana Farmer

https://www.youtube.com/watch?v=Z0KSoREqgjA

११) कोलंबियात शेतकर्‍यांची हिंसक आंदोलने...
"They forgot about the farmers. The president told them he's only committed to the coffee growers. He has no commitment to other farmers, to potato growers, or dairy farmers. They are massacring farmers out there in the fields, in Toca, in Siachoque, everywhere. They've thwarted everything so it is up to us to unite," said one protester.

https://www.youtube.com/watch?v=3w2Xok3MbGA

१२) फ्रेंच शेतकर्‍यांमध्येही आपल्या शेतकर्‍यांसारखीच आत्महत्यांची लाट.. :-(
In France, a farmer commits suicide every other day. The reasons for this epidemic are wide-ranging, but farmers say they recognise a few key causes. All too often, their despair stems from financial insecurity, debts and constant pressure to work harder to make a living.

https://www.youtube.com/watch?v=Qn-XpK9kHyo

१३) फ्रेंचांच्या सोबत अमेरिकेतही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ....
https://www.youtube.com/watch?v=5W-361bRF5k

१४) साउथ कोरीआ चे शेतकरी अमेरिका-कोरिआच्या दरम्यान होणार्‍या मुक्तव्यापाराच्या विरोधात..
"Free Trade Agreement with US will definitely damage farmers. It is evident that there will be damages. If government does not make countermeasure plans about this, South Korea will throw away 3.5 (m) million farmers. So for the farmers, today's rally is their own expression to struggle to protect their right to live in their own ways."

https://www.youtube.com/watch?v=3IpCx6nZlM4

१५) पेरु देशात शेतकर्‍यांची हिंसक आंदोलने. मुख्य मागणी सरकारने त्यांचा शेतमाल विकत घ्यावा
At least two farmers have died in widespread protests in Peru, as farmers lobby the government to purchase their crops

https://www.youtube.com/watch?v=VzI-TF2dwGw

१६) व्हेनेझुएलाच्या शेतकर्‍यांची आयात मालाविरोधात आंदोलने. आयातीमुळे घरच्या शेतकर्‍यांच्या मालाची किंमत घसरते.
Hundreds of farmers dumped maize around Venezuela's capital Caracas on Monday in protest at increased crop imports from abroad. The influx of cheaper foreign crops into Venezuela's market has produced an estimated 120-thousand ton mountain of unused home grown maize. Talks with the government have stalled over the past seven days as more and more farmers arrive to take part in the protest. Thousands go hungry every day in Latin America but Venezuela faces a surplus of its staple crop - maize. An estimated 120-thousand tons sit unused in silos around the country as buyers take advantage of cheaper foreign imports. The arrival of rival supplies has sent the market price for maize - previously fixed at 147 bolivares (35 U-S cents) a kilo - into decline and farmers are furious.

https://www.youtube.com/watch?v=pO5uc8GRSdA

१७) फिलिपाईन्समध्ये शेतकर्‍यांची हिंसक आंदोलने. मुख्य मुद्दा: भयंकर दुष्काळाच्या काळात सरकारचे शेतकर्‍यांकडे झालेले दुर्लक्ष.
Three people are dead, and several are injured in clashes between police and farmers in southern Philippines. The demonstrators were angry about the lack of government help during one of the country's worst droughts in years.

https://www.youtube.com/watch?v=g44WLhmhFxs

१८) आयलंडची राजधानी डबलीन येथे मांसासाठी गुरे पाळणार्‍या शेतकर्‍यांचे आंदोलन;
मुख्य मागणी: आयलंडमधल्या गुरांची इतर देशांमध्ये निर्यात सुरु करणे.

https://www.youtube.com/watch?v=Hv_p_LmAKPg

१९) अर्जेंटीना: शेती परवडत नसल्याने हताश झालेल्या छोट्या शेतकर्‍यांचे शेतमाल फुकट वाटा आंदोलन. अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांकडून फुकटात माल घेतांना बेशरम लोक दिसतील ह्या व्हिडिओत...

https://www.youtube.com/watch?v=buiwCdpNbkE

२०) चीनः सरकारी अधिकार्‍यांकडून शेतकर्‍यांच्या जमीनी विनामोबदला विनापुनर्वसन हिसकावल्या जात आहेत.
https://www.youtube.com/watch?v=rBO8UL-INXA

२१) फिलिपाइन्समध्ये हजारो शेतकर्‍यांची चीनी दुतावासासमोर निदर्शने. मुख्य मुद्दा: फिलिपाइन्सचे सरकार इथली जमीन आणि समुद्र चिनी कंपन्यांसाठी खुला करत आहे. ह्यामुळे हजारो शेतकरी आणि मासेमारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार आहे.
"Under this RP-China agreement entered into by the government almost 20 million hectares (200 thousand square kilometres) of our land and 41 marine-life parks in our seas will be opened to Chinese capitalists. Our fear is that instead of the food produced from our land belonging to Filipinos, under this RP-China deal our land will be planted primarily with crops for China," said Pablo Rosales, the protest leader.

https://www.youtube.com/watch?v=kTMyAizjHeQ