मंगळवार, ७ जुलै, २०१५

पुराणासाठी वांगी



१. आपली चिंचोके, कवळ्या, काचेचे तुकडे, क्रिकेटरचे फटूवाले कूपन ठेवायची जागा अपोजिट पार्टीला सांगतो म्हणून रावणाने बिबिषणाला ल्हानपणीच पाण्यात बुडवून मारायचा प्रयत्न केला होता पण ऐनवेळी आई आल्याने तो वाचला आणि पुढे हा मेला. कुंबकरनाने लय बोर्नव्हीटा एकदम पेली. तर तो एकदम म्होटा झाला. एकदम लय भूक लागली, एकदम जेवला, एकदम लय झोप आली. येकदम झोपला का उटाचं नाव नाय म्हाराज्या. डायरेक दुपारच्या टायमाले भाऊ हिडो गेम खेलते बगून उटून बसला. अन मी बी खेल्तो म्हनून मांगं लागला. पन अपोजिट पार्टीनं लवकर त्याचा गेम केला.

२. कृष्णाने अयोद्धेस सर्वप्रथम राममंदीर बांधले पण बाबर ला तेचे डिजाइन न आवडल्याने त्याची मर्जी पुरी केली. मर्जीचा अपभ्रंश बॅटमॅन यांच्या मते मर्जीत > मलजीत > मज्जीत > म्हशीत > मशीद असा झाला. वल्लींकडे मशीदीच्या भिंतीवर म्हशी शरयुच्या पाण्यात डुंबत असल्याच्या शिल्पाचा फटू हाये. त्यावरून शिद्ध होते की तिकडे कसल्यातरी भिंती होत्या.

३. सीतेचं बगून उर्मिलापन लक्ष्मणाला म्हणाली, 'मी बी येते तुमच्यासंगं हनिमूनला', ह्यावर लक्ष्मण म्हणाला, 'प्रिये, तु आई-बाबांची काळजी घे अन उपवास कर. आपल्याकडं पैकं नाय सद्या.' यावर क्रूद्द हून भरत आजोंबांकडे निघून गेला. शत्रूघ्न नंतर खासदार होऊन कुणीच खास नसलेल्या राजवाड्यात खामोश-खामोश करत हिंडत होता. त्याला खानसाम्याने खामोश हे व्यंजन बनवून दिले नव्हते. बंगाली साँदेस सारखे खामोश हे एक उंगाली पदार्थ आहे जो तोंडाजवळ नेताबरोबर त्याचा स्वाद खमंग येतो.

४. भगिरथाला खूप तहान लागल्याने त्याच्या गुरुने त्याला कमंडलूतलं गंगेचं प्रीझर्व्ड वॉटर दिलं. त्याला ते भारी आवडलं. त्याने आयडियाने गंगा धरतीवर आणून स्प्रींग वॉटर कंपनी सुरू करायची असे ठरवले. त्यासाठी देवाकडं 'पीतरास मोक्षप्राप्ती व्हईना म्हनुनशान वाईच गंगा हिकळं पाटवा मंजे कसं...' असा सांगावा धाडला. त्याच्या कपटाला भुलून देवलोकीची गंगा पुरुथवीतलावर अवतीर्न झाली. त्याच्या आदीच मंत्र्याला धंद्यात परसेंटेज देऊन शंकराने तीला आपल्या बॉटलींग प्लान्ट मधे आणून हिमालयन स्प्रींग वॉटर विकायला सुरुवात केली. पन शेवटी गंगेला धरतीवर आनायची कल्पक उद्योजकता भगिरथाने दाखवल्याबद्दल गंगेचे नाव भगिरथी करून तीला सन्मानित करण्यात आले.

५. गाईचं लेकरू आपल्या पोराच्या रथाखाली मेलं म्हणून आपलं पोरगं गायीच्या रथाखाली मारलं पाहिजे असं येका न्यावप्रीय व गायीला माता माननार्‍या राजास्नी वाटलं. म्हणून त्यानं कसायाकडे चाललेल्या गाईंनी भरलेला रथ पोराच्या अंगावरून जाऊ देल्ला ना बाप्पा. मनून मंतेत की गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू आलं तर आपल्याले तक्लीप होते की नाई. तो गायीचा रथ कुठे गेला हे तो विचारायचं विसरला.

६. आपल्या बापाने फॅमिली प्लाणींग केले असते तर आपल्याला हे एवढं मोठं राज्य आपल्या भावड्यांसाठी राखून ठेवायला इतकं युद्ध करावं लागलं नसतं असं दुर्योधनाने म्हटल्याचं दुर्योधन बत्तीशी या ग्रंथात भीमाने लिहून ठेवले. त्याकाळात लोकसंक्या कंट्रोल करायला युद्ध हाच एकमेव मार्ग आहे असे युधिष्टीरानी सांगीतल्याचं संजय गांधी यांनी धृतराष्ट्राला सांगीतले. आपल्याच गावात येवडी लोकसंक्या असतांना आपल्या भावाने भायेरची पोरगी बायकू म्हनून आनलीच कशी, त्याला आपल्याकडं बाय्कू भेटली नसती काय या गहन विचारात असतांना पुष्पकविमानाचे कंट्रोल्स सुटून त्यांचा त्या अपघातात मृत्यु झाला. गविंच्या म्हणण्यानुसार त्यांचे पुष्पकविमानाचे मागचे पंख अचानक बिघाड झाल्याने इंडीकेटर तुटल्यासारखे लटकत होते. तेवढ्यात पायलटची मनस्थिती ठीक नसल्याने गतिज उर्जा कमी पडून विमान क्षितीजाला समांतर र्‍हाण्याऐवजी जमीनीच्या हिरव्या भागाकडे रोख करून वेगात जात होते. अचानक हवेतच स्फोट होवून आकाशात भगवा प्रकाश पसरला आणि विरून गेला. जमिनीवरची हिरवळ वाचली आणि फोफावली.

७. शंकराचे तिसरे नेत्र हा अक्चुअलमदी सीसीटीवी कॅमेरा असुन आपले हिडो काडून इंद्रीयनेत्र नावाच्या राक्षसाच्या धमन्यांत भरतो. त्यात आपले चांगले फोटू येत नाय म्हणून पारबतीने अग्नीकुंडात उळी मारली. तीला होमातून काळून शंकर लयी गाव हिंडला. ज्याच्या त्याच्या डोक्याले लयी ताण देव लागला. पुळे त्याला लोक 'लय ताण देव राहिला बे' असं बोलू लागले. त्याचा अक्ख्या पंचक्रोषीत नुसता ताण्डव करतो म्हणून नाव खराब झाला. तो इंद्रीयनेत्र आज भयंकर वाड्ला असून अर्द्या पब्लीकले त्यानं बंदी बनोलं हाय. तो मोहीनी अवतार घेऊन माधुरी धकधकशीत आली, पन तेजाबायला, काहीच झाला नाय.

८. कुंतीचे पाचही पुत्र आपल्याला कुरूंसारखा वारसा नाही म्हणून सारखे तळमळत असत. मग त्यांनी धृतराष्ट्राचा दगडाचा पुतळा बनवला आणि त्येची पुजा करू लागले. तो आपलाच पुर्वज आहे म्हनून सांगू लागले. हे बगून कौरव खवळले. ते म्हनले आम्ही हे राज्य बनवन्यासाठी खूप मेहनत घेतली यावर तुमचा काय हक्क. ते पांडव म्हनायले की आता लोकशाई हाय बाबू, लोक शाई लावून तुमाले घरी पाटोतेत की नायी बग. पन शेवटी विजय लढायीच्या मैदानावरच झाला पाहिजे असं ठरलं, नाहीतर ते कृष्णबाबा आपली मन की बात कुठं सांगतील? इसीलिये मित्रों, मैं केहता हुं की ते अठरा अध्याय सांगन्यासाठीचा माहौल म्हणून ते चाळीस लाख मतदार जमा केले आन मारले. ते प्रवचनानेच मेले म्हनतात. कारण त्या प्रवचनात पाशुपातास्त्र, नारायणास्त्र वैगेरे अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा उल्लेख गिरीधराने केला. ते सर्व खरेच आहे असे वाटून भीतीन गारठून मेले मंतेत लोक.

९. एका धोब्याची बायको प्रियकराबरोबर पळून गेली. मग परत आली. तर तो तीला घरात घेईना. लोक बोल्ले, 'अबे असा काऊन करतं?' तर त्याने म्हटलं 'रामानं घेतली सीतेले घरात म्हणून मी पण घेऊ काय?' तर लोक विचारते झाले 'अरे पन हा राम कोन होय? त्यानं सीतेले काऊन घरात घेतलं?' तेव्हा पासून लोक विचारतात, की 'रामाची सीता कोन?" त्याचं उत्तर देता देता २४,००० श्लोकांचं एक ग्रंत झाला पन थे रामाची सीता कोन व्हय ते काय पत्ता लागत नायीय्ये बॉ. आता तर लोकं धोब्यालेच रामाची कता सांगतेत अन म्हणते बायको गेली तर एकांदं माकळ पाय कुटं भेटते काय ते. त्या धोब्याले गाडवाचा उपेग म्हाईत, हे माकळाचं बायकोशी काय संमंद ते काय त्याच्या डोक्यात घुसंना. त्याचा अर्थ समजून घ्यायाले तो किर्तनात बसू लागला. अन मग लोक अहिल्या प्रकरणावर तावातावाने चर्चा करु लागले. ते माकळाचा प्रश्न इचाराव काय किर्तनकार महाराजले असं म्हणून तो महाराजाकडं गेला. महारज म्हणले, "डाव्या अंगठयाचा ठसा दे, नाडीभविष्य बघून सांगतो."

या नऊही पदार्थांना निट कुटून शिजवून गरम गरमच संस्कृतीच्या वाटीत वाढा आणि चघळून संपेपर्यंत चर्चेचा चमचा ढवळत राहा. तो आमचा मसाला घालू नका. चव बिघडेल. शाकाहारी लोकांनी अंडं घालून करू नये. इतरांनी घातलीत तेवढी पुरे.

आयुष्य आणि करीअर...



एखाद्या विद्याशाखेचं पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर 'आता काय करू?' हा प्रश्न जर उभा राहत असेल तर आडातच समस्या आहे असं माझं मत आहे.

दहावीचा निकाल लागेपर्यंत लोक्स निर्धास्त असतात. "पुढे काय करणार?" असं विचारल्यावर "किती मार्क्स मिळतात त्यावर ठरवू" असं उत्तर देतात. जणू आयुष्यात पहिल्यांदाच कुठलाही अभ्यास न करता थेट दहावीचीच परिक्षा दिली असते. शाळेतल्या पूर्वपरिक्षेच्या निकालावरून साधारण अंदाज तर येतो ना? फारतर ५% अगदीच १०% फरक असू शकतो. पण 'शाळेत ९८-९५ मिळवत होता हो पण बोर्डात बघा फक्त ४५ मिळाले' असं तर नसतं ना?

निकाल लागताक्षणी आधी कागदपत्रे मिळवण्याची हातघाई. कागदपत्रांच्या आधी ते 'कोणते, कसे आणि कुठे मिळतील' याच्या चौकशीपासून सुरुवात होते. अरे दहावीची आख्खी सुटी पोरं टवाळक्या करत घालवत होती ना? त्यांना धाडायचं ना माहिती काढायला. जरा दुनियादारी पण कळेल तेही एकही पैसा न घालवता. कारण नंतर 'तुमचं काम १० मिनिटांत करून देतो' असं म्हणून कागदांसकट दोन-तीन हजार रुपये घेऊन गायब होणारे जी दुनियादारी शिकवतात ती भारी पडते. हा वेंधळेपणा ८०च्या दशकात होता आणि अजूनही आहेच बरंका.
यानंतर येते विद्याशाखा निवडायची पाळी. तेथे खरी मदर ऑफ ऑल गोंधळ असते. बाब्याने आणि बाब्याच्या बाबाने जे काही ठरवलं असतं ते सत्यात उतरत नाही असं दिसायला लागतं. काही सुपुत्र जिथे मित्र तिकडे आम्ही शेपूट हलवणारे कुत्रं याच भुमिकेवर ठाम असतात. जरा बरे मार्क्स असतील तर शहरातल्या सर्वोत्तम आणि विज्ञानशाखेच्या कॉलेजमधेच जायचे असते. मग इकडे विचार, तिकडे विचार करत अक्षरशः दोन-पाच दिवसांत 'पुढची पन्नास वर्षे कोणत्या विद्याशाखेत आयुष्य घालवणार' याचा निर्णय घेतला जातो. त्यात काय गल्त हाय बाप्पा? लगीन करतांनी बापाने नाय का आयला ५ मिनिटांत पसन केल्ती? पुढच्या ५० वर्षाचा थो इचार करत बसला आसता तर आज हे दिवस दिसलं असतं का?

असो. सामाजिक दबावाखातर, मित्रांच्या आग्रहाखातर, कुठल्यातरी स्नेहींच्या यशस्वी कारकिर्दीकडे पाहून (खरेतर त्याच्या बंगला-गाडीकडे पाहून) मला याच शाखेत अकरावीसाठी प्रवेश घ्यायचाय हे निश्चित होतं. ज्यांना यथातथा मार्क्स असतात ते काहीतरी भयंकर गुन्हा केल्यासारखे आपले मार्क्स, आपली विद्याशाखा आणि आपलं कॉलेजचं नाव लपवत फिरत असतात. काही नातेवाईक आपण स्वतः काय तीर मारलेत ते पार विसरून ते पार टोचून टोचून पोराला हैराण करतात. लग्नकार्यात, समारंभात, "जाऊबाइंच्या मुलाचं काही खरं नाही बघा, अहो काय शिकतोय, शिकतोय का नाही काहीच सांगत नाही. आमच्या मुलांनी मात्र नाव काढलं हो. एक इंजिनीअरींग करतोय, दुसरा डॉक्टर झालाय बरं का." वैगेरे वैगेरे. ही टोचून जखमी झालेली पोरं चिवट आणि जिद्दी असतील तर याच लोकांना डोळे बाहेर काढायला लागतील अशी प्रगती उत्तरआयुष्यात करतात. तो भाग वेगळा. पण दहावीनंतर बारावी होईस्तोवर फारच ताण सहन करावा लागतो.

चला पुढे: दहावी पास. आता घुसा विज्ञान शाखेत, मग वाणिज्य आणि फारच काय नाय जमलं कुठे तर मजबूरी का नाम महात्मा गांधी म्हणून कलाशाखेत. काय करणार, गावात अशी तीनच कॉलेज असतात ना? याच्यापार बापाला माहितही नसतं आणि शक्तीही नसते माहित करून घ्यायची. कसंबसं, भरमसाठ शिकवण्या लावून, फिया भरून पोरं मार्कांच्या स्पर्धेत पळत असतात. अरे याला १० मार्क आहेत, हा घ्या, याला दोन मार्क्स आहेत हा ऑप्शनला टाका. परिक्षेचं तंत्र आत्मसात करताकरता आयुष्याचं तंत्र आत्मसात करायचं राहून जातं. त्यात कुठे प्रेमप्रकरणाची झुळूक आली की समोरची पुस्तकं उडून जातात. परिक्षा तोंडावर आली की झोंबीसारखे अभ्यासाला लागून बारावीची खिंड पार करायच्या कामाला लागतात.

झाली बारावी? ओके. आता परत जिथे दहावीच्या निकालाच्या वेळेस होतो तिथेच आलोय बरंका. फक्त एक अजून अ‍ॅड झालंय. विविध शाखांच्या प्रवेश परिक्षा (यानेकी सरकारचे हमखास व राजरोस पैसे खाण्याचे कुरण). ज्याचा अभ्यास बारावीसोबतच केल्या जातो. काहीतरी उचकपाचक करून या परिक्षा पास होऊन पोरं इंजिनिअरिंग, मेडीकल ला प्रवेश घेती होतात.

सुपरटेक्निकलमधे (पक्षी: इंजि. मेडी.) पहिल्यांदा कळतं की आपण नक्की काय शिकायला आलोय इथं तेव्हा धाबं दणाणतं. अभ्यासक्रम अंगावर यायला लागतो आणि मग उपरतीची भावना तयार व्हायला लागते. अरे ये मै कहां आ गया? खरंच मला हेच करायचं आहे का? हा धक्का बसेपर्यंत बाब्याने शांतपणे कधी विचारच केलेला नसतो. एवढं होऊ दे, पुढंचं पुढे बघू असं करतच, दहावी-बारावी-पदवी, वन-स्टेप-अ‍ॅट-अ-टाईम म्हणत धावत असतो. केट्या बसत बसत कसंबसं पदवीचं शिक्षण पूर्ण होतं. मूल मोठं झालेलं असतं. दुनियादारी चांगलीच समजायला लागते. मग स्वत:चे निर्णय स्वतः घ्यायचे असतात. पण वेळ निघून चालली असते. पटकन नोकरी शोधायची असते. कारण बाप हे सुपरटेक्निकलचे खर्च पुरवता पुरवता पुरता टाचा घासायला लागला असतो. आतातरी गप्पकन पोरगा नोकरीला लागेल आणि भप्पकन घरात भगिरथाची गंगा लक्ष्मीच्या रुपात उसळ्या घेत अवतरेल याची स्वप्नं रंगायला लागलेली असतात. मागचा पुढचा विचार न करता पोरगं जे समोर येईल ती नोकरी पकडून घेतं. ठेचकाळत, थांबत, धावत, रक्त ओकत 'सेटल्ड' आयुष्याचं स्वप्नं पुरं करत असतो. इथं व्यक्तिगत आवडीनिवडीला कुणीच विचारत नसतं आता. नोकरी पाहिजे हाताला तरच लग्नाच्या बाजारात उभं राहता येतं ना भावाला? कसलं हिडन टॅलेंट अन् कसलं काय. लग्न होतं, वर्षा-दोन वर्षात लेकरू येतं. बाब्याचं आयुष्य एम-सील लावून एका पाइपातून सरळच वाहणारं पाणी होऊन जातं.

थोडंफार सोडलं तर आपल्याकडे हे असंच चित्र आहे. एका लेखात सगळ्याच कारणमीमांसा शक्य नाहीत. त्यामुळे जेवढं जमलं तेवढं लिहिलं.

या लोंढ्यांमधून काही तरूण आपला बाज ओळखून लगेच त्या मार्गाला लागतात आणि यशस्वी होतात. असे करणार्‍यांची टक्केवारी १-५ टक्क्याच्या आसपास असेल. बाकीचे जे धन देतंय त्याचंच ऋण मानून आयूष्य काढतात. पण काही मुलं पुर्वीच्या पीढीपेक्षा प्रचंड हुशारी व मेहनतीने काम करतायत. त्यांची निर्णय घेण्याची, समस्यांवर उपाय शोधण्याची प्रवृत्ती अद्भूत आहे. काहीतरी खास आहे जे आधीच्या पीढ्यांकडे नव्हतं. पण अशा मुलांची संख्याही तशी कमीच आहे हे तेवढंच खरं आहे. आणि प्रत्येक आई-बापाला आपलं मूल हे त्या 'खास' मध्येच आहे अशी पक्की खात्री असते हेही तितकेच खरे बरं का.

मला कायम प्रश्न पडत आलाय तो हा की करीअर मार्गदर्शन नेमकं कोणत्या वयात व्हावं? त्याची शास्त्रीय पद्धत (मेथाडॉलॉजी) काय असावी किंवा आहे का? त्याचा उपयोग होतोय का?

कळव्यात राहत असतांना आमचे घरमालक एका इंजीनीअरींग कॉलेजमधे नोकरीस होते. त्यांनी मुलीला जबरदस्ती झेपत नसतांना त्याच कॉलेजात सीवीलला टाकले. कारण काय तर मुलगी डोळ्यासमोर राहील. त्या मुलीला नृत्याची आवड आणि खरोखर उत्तम नृत्य करता येत होते. पण वडीलांच्या दबावामुळे आणि झेपत नसलेल्या अभ्यासाने ती मुलगी कायम खंगलेली असायची. आजारी आणि कृश असायची. कधी नृत्य वैगेरे करायची तेव्हाच काय तो हसरा चेहरा आणि उत्साही वाटायची. आम्ही त्यांचे वर्षभर मागे लागून त्या मुलीची अवस्था कशामुळे झाली हे पटवून दिले. तीला परफॉर्मींग आर्टचं शिक्षण घेऊ द्या म्हणून त्यांना बरेच मार्गदर्शन केलं. तेव्हा कुठे ते आपला हेकेखोरपणा सोडायला तयार झाले. पुढे काय झालं ते कळलं नाही कारण नंतर आम्ही तिथून दुसरीकडे राहायला गेलो.

मी अशा दोन डॉक्टरांना भेटलोय ज्यांना मेडीकलला जायचेच नव्हते. एक गायनॅकोलॉजिस्ट जीचा आर्कीटेक्टसाठी जेजे मधे नंबर नाही लागला, पण मेडीकलमधे लागला म्हणून तेवढ्यासाठी आर्कीटेक्ट व्हायचं स्वप्न सोडून डॉक्टर झाली. दुसरी आयुर्वेद डॉक्टर तिला चित्रकलेची आवड होती, जेजेत शिकायचं होतं पण कोणा जवळच्या हितचिंतक महाभागाने तीला सल्ला दिला की हे फार वाईट क्षेत्र आहे, पुढे काही स्कोप नाही. म्हणून ती बापडी नाइलाजाने डॉक्टर झाली. अशांना भेटलो की बरेच प्रश्न उभे राहतात मनात. केवळ भरमसाठ पैसा कमावण्यासाठी काहीही करावं? जे मनाविरूद्ध आहे तेही? त्याची अनैसर्गिक सवय करून घ्यावी? खरंच आयुष्य जे मिळालंय ते एक शिक्षा म्हणून भोगतो का आपण? 'बस एवढं झालं की नंतर सुखच आहे' असं प्रत्येक टप्प्यावर स्वतःला समजवत राहायचं? ते 'नंतर' कायम 'आता' मधे नाही का बदलता येणार?
पहिल्यापासून आपल्या आवडीनिवडींना शास्त्रशुद्ध पद्धतीने ओळखून त्याच्याशी संबंधीत क्षेत्रात व्यवसाय नोकरी मिळवणे शक्य आहे. गरज आहे एका दूरदृष्टीची, मेहनत घेण्याची, समाजाच्या विचित्र नजरा आणि प्रश्न झुगारून द्यायची. कुठल्याही क्षेत्रात पारंगत व्हायला, व्यावसायिक कौशल्य प्राप्त करायला आणि त्यातून अर्थाजनाचा कायम स्त्रोत मिळवण्याच्या पात्रतेचे व्हायला फक्त सात वर्ष कसून मेहनत, अभ्यास लागतो. चार वर्षे शिक्षण आणि तीन वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव. हे सात वर्षे जो कुणी आयुष्याच्या कुठल्याही वळणावर आपल्या आवडीनिवडीला अनुसरून देईल त्याला मनशांती, पैसा आणि शाश्वत आनंद मिळेल असं वाटतं. जगात प्रत्येकासाठी काम आहेच. कारण निसर्गात ज्याची गरज असते तेच उत्पन्न होत असतं. फक्त जे उत्पन्न झालंय त्याला जिथे गरज आहे तिथवर पोचायला प्रचंड कष्ट लागतात. पण शिखरावर गर्दी कमी असते.

या सर्वांचा विचार आजच्या पालकांना करायलाच लागेल. कारण लोकसंख्या भरमसाठ आहे. शासन बेरोजगारांचा शिक्का नको म्हणून कॉलेजांच्या जिलेब्या पाडत आहे. त्यातून इतके पदवीधर बाहेर पडतायत की त्यांच्यात प्रचंड स्पर्धा नोकरी मिळवण्यासाठी वाढते आहे. एकीकडे कुशल मनुष्यबळ तीव्र टंचाई आणि दुसरीकडे उच्चशिक्षित, अकुशल व भ्रमित मनुष्यबळाचे लोंढे. आपलं मूल या लोंढ्यात असणार नाही याची काळजी घ्यायलाच लागेल.

शेवटी एक उदाहरण देतो. माझा एक शाळा-वर्गमित्र जो सिविल इंजिनीअर आहे (आणि ते त्याचं खरंच वेड आहे) तेव्हा रीलायन्सच्या तेलसंशोधन विभागात होता. त्याने त्याच्या ऑफीसमधल्या एकाला आमच्या सोबत तीसरा रूमपार्टनर म्हणून आणले होते. हे साहेब आसाममधले नॉर्थ-इस्ट एथनिसिटीवाले. हा त्याचा पहिलाच जॉब. पगार ८० हजार (२००७) मी म्हटलं 'बाबारे, असं तू काय शिकलायस की तुला एवढा पगार आहे?' तो म्हणाला, 'भूगर्भ-शास्त्रात एमएस्सी केलंय. आणि मला अजून मोठ्या तेल कंपन्यांकडून दीड-दोन लाखाच्या ऑफर्स येत आहेत. मला फक्त निर्णय घ्यायचाय कुठली कंपनी निवडू.' मी माझ्या वर्गमित्राला म्हणालो, "बघ निल्या, आपण इथं महाराष्ट्रासारख्या अतिप्रगत भारतीय राज्यामधे राहून असं काही शिक्षण घेता येतं आणि त्याला एवढी मागणी आहे हे आपल्यापर्यंत पोचत नाही, तर खरंच आपण पुढारलेले आहोत का?" निल्याकडे तेव्हा सिवीलची डीग्री आणि चार वर्षाचा अनुभव आणि ३० हजार रुपये पगार होता. माझ्याकडे दोन डीग्र्या आणि सहा हजार पगार होता. तो आसामी आमच्या पेक्षा २ वर्षांनी लहान होता. आणि मी नुकतीच आवडत्या क्षेत्रात करीअरला सुरुवात केली होती.

त्या क्षणी 'योग्यवेळी केलेल्या करीअरप्लानींग आणि गायडन्सचा आयुष्यात मोलाचा वाटा आहे' हे जे कोरल्या गेलं ते कायमचंच.

पुजा-कर्म-ग्रहशांती



समाजात राहून समाजापेक्षा वेगळंही दिसायचं, श्रेष्ठही दिसायचं आणि त्यांच्यातलंच एक आहोत हे ही दाखवायला धडपडायचं. सर्वच कर्मकांडांमागे हीच अगम्य भावना असते माणसाची. त्यातूनच वेगवेगळे पूजाविधी, देव जन्म घेतात. 'मी इतरांपेक्षा जास्त श्रद्धावान आणि भक्त आहे' ही भावना ही एकाच देवाच्या देवळात जमलेल्या भक्तांच्या वेगवेगळ्या आविर्भाव, हालचाली, घोषणा यांतून जाणवते. सृष्टीवर आपले नियंत्रण चालत नाही म्हणजे नियंत्रण ठेवणारा कुणीतरी असलाच पाहिजे, त्याला आपण खुश ठेवलं पाहिजे ह्या विचित्र अहंकारातून 'देव' संकल्पनेचा जन्म झाला. सृष्टीवर नियंत्रण करणारा कुणीतरी आहे आणि त्याची भक्ती-खुशामत केल्यावर त्याच्यावरही आपण नियंत्रण करू शकू अशी महान कल्पना मानवी मेंदूने प्रसवली. मग आपल्या नियंत्रणात असलेल्यांनी जसे आपल्यापुढे झुकावे ही सुप्त इच्छा असते तद्वतच त्या अज्ञात देवापुढे आपण झुकलो नाही तर बरे दिसणार नाही असे वाटायला लागले. त्यातून नुसते झुकून काय फायदा, ते तर सगळेच करतात. आपल्या मनातले भाव अजून स्पष्टपणे दिसावेत (इतरांना) म्हणून फूल, पान अर्पण करणे. तेही सगळे करायला लागल्यावर अजून पुढचं, अजून श्रेष्ठ करत करत अशा पद्धती आपल्या आपणच शोधून काढून त्याला शास्त्र असे नाव दिले. मग अमूक एक गट असाच करतो, त्या गटाशी जुळवून घ्यायला, सामाजिक सुरक्षा मिळवायला त्याच्या पूजाविधी आपण तशाच्या तशा करायच्या. यातून चालीरिती-परंपरा आल्या. नवससायास सूरू झाले. संप्रदाय निर्माण झाले. लोक खर्‍या श्रद्धेने पालन करू लागले. आपलाच धर्म/संप्रदाय/भक्तीमार्ग/पुजाविधी श्रेष्ठ म्हणून इतरांची शारिरीक/मानसिक/बौद्धिक कत्तल करू लागले.

याच्याविरूद्ध आचरण करणारेही आपले संप्रदाय बनवून बसलेच. अघोरी-तामसी-वाममार्गी. पण मूळ इच्छा कुणालाच कधीच दाबून टाकता आली नाही.

पण हे सगळेच मूळ इप्सित साध्य करायला फोल पडते म्हणून अपयशाला वेगवेगळी कारणे दिली गेली. नेहमीच. अशा अपयशाला कंटाळून 'देव नाहीच म्हणणारे' वेगळे पडले. पण 'देव नाही' म्हणजे 'आपण नियंत्रण करू शकू अशी शक्ती आपल्या आवाक्याबाहेर आहे' याबद्दलची निराशा मोठी होती. मूळ स्वभाव आणि इच्छा 'सृष्टीचे नियंत्रण आपल्या मनासारखे झाले पाहिजे' हीच. ते होत नाही म्हणजे कुठेतरी आपल्यावर कुणाची तरी सत्ता आहे याची सूक्ष्म जाणीव व त्यातून येणारी दहशत राहतेच.

या चक्रातून नास्तिक आस्तिक कुणालाही बाहेर पडणे शक्य नाही. कारण नास्तिक देव नाही म्हणतो तेव्हा ती शक्ती माझ्या नियंत्रणात येऊ शकत नाही याचीच कबूली देत असतो. हे कसे? कुणाही नास्तिकाला किंवा प्रयत्नवाद्याला विचारा. एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही याचा उद्वेग आस्तिकापेक्षा नास्तिकाला जास्त असतो. कारण तेच "सृष्टीचे नियंत्रण मला हवे, मला इतरांपेक्षा श्रेष्ठ व्हायचे आहे."

पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात ते उगीच नाही. ब्रहमांडाचा सगळ्यात लहान भाग असलेला अणु. त्याच्या रचनेत असलेले इलेक्ट्रॉन्स बाहेर पडायची सतत अविरत धडपड करत असतात. त्याच वेळेस गाभ्याला चिकटून पण राहायचे असते त्यांना. नाही तर ही व्यवस्थाच कोलमडून पडेल, अस्तित्व नष्ट होईल. आपली अशी ओळख राहणार नाही. माणसांचही तेच चाललेलं असते, समाजात राहायचे पण आणि फटकून पण राहायचे. असे दाखवायचे की मला कुणाचीच गरज नाही पण समाज सोडायची कुणाचीच तयारी नाही. अगदी मी मी म्हणणारे सन्यासीसुद्धा.

जे या सगळ्यातून बाहेर पडत जातात त्यांना ब्रह्म गवसते. तेव्हा कळते उगाच आपण सृष्टीतून स्वत:ला वेगळे काढत होतो. आपण तर सृष्टीचाच एक अविभाज्य भाग आहोत. समुद्रातल्या पाण्याच्या थेंबासारखे. किनार्‍यावरच्या वाळूच्या कणासारखे, झाडावरच्या पानासारखे. वार्‍याच्या झुळूकीसारखे. मग आपले खरे स्वरूप उमजते. नाना विद्या, कला, शक्ती, सिद्धी आपल्याच ठायी असल्याचा साक्षात्कार होतो. पण त्याचा काहीच उपयोग नसतो. अस्तित्व अद्वैत झालेले असते. मिळणे न मिळणे यापलिकडे मन गेलेले असतं. श्रेष्ठ-कनिष्ठ या संकल्पना गळून पडतात. नियंत्रणात आपण असतोच, नियंत्रकही आपणच असतो. कार्यकारणभाव उमजतो. अमर्याद शक्तीचा साक्षात्कार होतो. आणि तेव्हाच त्याचा काहीच उपयोग नाही हेही समजते. इलेक्ट्रॉन-प्रोटॉन-न्युट्रॉन सगळे एक होतात. त्यांचे एकूण अस्तित्व लक्षात येते. जीवन कळते. खरे ध्येय साध्य होते. मग सागराच्या लाटेवर स्वच्छंदपणे स्वार झालेले आपण एक थेंब असतो. तिथे उद्याची आशा नसते. कालची किल्मिषं नसतात. सजग, निरंतर, अनादी, अनंत वर्तमान हेच चिरंतन सत्य असतं.

हे सर्व लिहिण्याचे कारण: ज्योतिषात जर कर्मफलसिद्धांत मानतात तर पुजा-कर्म-ग्रहशांती हे थोतांड आहे असेच समजले पाहिजे. कर्मफलसिद्धांत आणि शांतीपूजा परस्परविरोधी संकल्पना आहेत. भरती येते ती चंद्रामुळे. चंद्राची कितीही शांती केली तरी भरती- ओहोटी टळणार नाही. कुंडली-ज्योतिष-मांडलेले ग्रह आत्म्याच्या प्रवासातले मैलाचे दगड आहेत. त्यांना शेंदूर फासल्याने प्रवास संपत नाही. वळणं येणार, चढ-उतार येणार ते आपण केलेल्या कर्माने. त्या वळणाचे, चढ-उताराचे ते दिशादर्शक-धोकादर्शक फलक आहेत. खड्डा चुकणार नाहीच. त्यातून किती वेगाने जायचे ह्याची कल्पना फलक बघून येऊ शकते. ते फलक योग्य वेळी दिसणेही पूर्वकर्मांवर आधारित आहे. कारण फलकाचा अर्थ सांगण्याचा बहाणा करणारे वाईच च्यापान्याला धा रुपं घेऊन तुम्हाला वाटेला लावतात. त्यामुळे चांगला मार्गदर्शक शोधणेही तुमच्या-आमच्या हातात नसतं. सृष्टीच्या कार्यकारणभावात असते तेव्हा नकळत मार्गदर्शक अवतरतो, कुठल्याही वेशात. काही ध्यानी-मनी नसतांना पण अगदी योग्य वेळी. सांगण्याचा मुद्दा एवढाच की दहा ठिकाणी पत्रिका घेऊन धावणे योग्य नाही. नशिबात असेल तर बिनमांगे योग्य सल्ला मिळून जातो. नसेल तर जंगजंग पछाडून शष्प फरक पडत नाही. कित्येकदा योग्य सल्ला मिळूनही खड्डे चुकत नाहीतच. अनेकांना अनुभव असेल.

पण आपला उद्देश प्रवास करणे कुठे आहे? आपला उद्देश लवकरात लवकर प्रवास संपवणे आहे. कर्म हे गाडीतले इंधन आहे. ते प्रवास करूनच संपवायचे आहे. पण प्रत्येक पेट्रोलपंपवर इंधन भरत राहिलो तर कसं व्हायचं? प्रवास संपवायचा असेल तर निष्कर्म व्हा. बॅलन्स कमी करत जा. कर्मकांडांची गरज मनातल्या सुप्त भावनांना खाद्य देण्यापुरती आहे. त्याचा आयुष्यातली सुखं-दुखं कमी-जास्त होण्याशी काही संबंध नाही. खरंतर त्यातून कर्माचा बोजा अजून वाढतो. पण कर्मकांड अतिशय सोपे, भयानक कठीण ते 'निष्कर्म होणे'. मग जे सोपे तेच आचरल्या जाते. गाडी फुल्ल टँक होत जाते.

पण पुढे प्रवासाचा कंटाळा यायला लागतो. येइलच ना? कुठेच पोचायचं नाही पण गाडीत एसी आहे, मस्त गाणी चालू आहेत म्हणून किती प्रवास करणार? सुख-दुखाचा कंटाळा येऊ लागतो. चूक उमजू लागते. मन प्रवास संपवायचा निर्धार करतं. आत्मा योग्य मार्गावर लागतो. पण त्याला तीव्र निर्धार लागतो. तो ह्या कंटाळ्यातूनच निर्माण होतो. जितका जास्त प्रवास तितका जास्त कंटाळा, तितका जास्त या प्रवासातून सुटण्याचा निर्धार.
जेव्हा प्रवास संपतो तेव्हा लक्षात येतं. अरे आपण तर इथे एकाच जागी उभे होतो केव्हापासून. हे सगळे भ्रम होत होते तर. काहीसे या व्हिडीयोत दाखवलेल्या लोकांसारखे आपण प्रत्यक्ष आयुष्य जगत आहोत. भ्रमाने सत्य विसरायला होतं. इथे या विडीयोत हे फारच तात्पुरतं आहे. प्रत्यक्ष आपला आत्मा करोडो जन्मांमधून परत परत असंच भासमान आयुष्य जगत आलाय.


शेवटी एक कुठेतरी आंजावर वाचलेली कर्मसिद्धांतावरची कथा सांगतो:

महाभारत युद्धानंतर शंभर पुत्रांच्या निधनाने व्याकूळ झालेला धॄतराष्ट्र कृष्णाला म्हणतो, 'हे द्वारकाधीशा, तुला तर चल, अचल, भूत, भविष्य या सगळ्यांचे ज्ञान आहे. आपला एक मुलगा बापाच्या हयातीत मरण पावला तर त्या बापाचे दु:ख हिमालयाच्या वजनापेक्षा जास्त असते. इथे तर माझे शंभरच्या शंभर पुत्र एका झटक्यात गेले रे? माझ्या दु:खाची तुला काही जरी कल्पना असेल तर मला सांग. मला सांग मी असे कोणते पाप केले की ज्यामुळे मला इतका भयंकर प्रसंग भोगावा लागतोय."

श्रीकृष्ण म्हणाला, "तुम्हाला ठावूक नसेलच पण या जन्माआधीपासूनच्या पन्नासाव्या जन्मात तुम्ही पारधी होता. व्यवसायानिमित्त पशु-पक्ष्यांची शिकार करणे तुमचा धर्म होता. पण एका मोहाच्या क्षणी तुम्ही एका पक्षाची शंभर पिल्ले मारली. तेव्हा तो त्यांचा बाप तिथेच वर फांदीवर बसून ते सगळं पाहत होता. एक पक्षी असल्याने तुमच्यासारख्या विशालदेही मनुष्यासमोर तो कुठलाच प्रतिकार करू शकत नव्हता. सर्व दु:ख मनात ठेवून त्याने आपल्या डोळ्यासमोर आपले शंभर पुत्र मरतांना पाहिले. त्याची हाय तुम्हाला लागली. ते दु:ख तुमच्या अकाउंटला लागले. ते आज फेडल्या गेले."

धृतराष्ट्र संभ्रमात पडले, "ते सर्व ठीक आहे. पण मग तेवढ्यासाठी एवढे पन्नास जन्म का वाट बघावी लागली? कर्मफल लगेच का मिळालं नाही?"

श्रीकृष्णाने मंदस्मित करत उत्तर दिले, "महाराजाधिराज, शंभर पुत्र व्हावे, योग्य वेळ येइस्तोवर त्यांचा योग्य सांभाळ व्हावा इतके पुण्य कमवायला तुम्हाला हे पन्नास जन्म लागले. एका झटक्यात ते इतक्या सहज तुमच्या डोळ्यासमोर मरावे यासाठी हे राज्य तुम्हाला मिळाले. इतके सगळे पुण्य कमवायला पन्नास जन्म फार कमी आहेत पण तुमच्या कर्माच्या तीव्रतेने ते साध्य केले."

असो.
सगळ्यांच्या गाडीतलं इंधन लवकर संपो आणि प्रवासाचा सगळ्यांना मनस्वी कंटाळा येवो अशी मनीषा व्यक्त करतो आणि थांबतो.

फक्त इंग्रजीने भागेल..? भविष्यवेध २०३०.



इंग्रजीचे जागतिक महत्त्व कुणीही नाकारू शकत नाही. शालेय शिक्षणात इंग्रजी अजिबातच नसावी असं कुणीही म्हटलेलं नाहीये. उलट अव्वल दर्जाची इंग्रजी भाषा बोलायला लिहायला शिकवणारे अव्वल दर्जाचे शिक्षक प्रत्येक शाळेत असलेच पाहिजेत असं माझं मत आहे. मुद्दा जर फक्त इंग्रजीवरच्या प्रभुत्वाचा आहे तर ते प्रभुत्व मिळवण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातल्या सगळ्याच विषयांवर इंग्रजीची सक्तीची गरज नाही. आज मेट्रोशहरे सोडली तर निम-शहरी व ग्रामीण भागात इंग्रजीची दहशतवजा भीती आहे. मुले आपल्याला इंग्रजी जमणारच नाही कारण ती हुशार, श्रीमंत लोकांची भाषा आहे म्हणून दडपून जातात. त्यांना शिकवणारे शिक्षकही यथातथा याच अवस्थेतून शिकलेले. अशा परिस्थितीत लेवल-प्लेईंग फिल्ड होत नाही याला माझा आक्षेप आहे. माझ्या मते सहजतेने शिकवली तर जगातली कुठलीच भाषा अवघड नाही. जगात इंग्रजी संपर्कभाषा असेल. पण भारतात हुशारी, श्रीमंती, सुशिक्षीतपणाचे, उच्चभ्रूपणाचे मानक म्हणून इंग्रजीकडे पाहिले जाते. मधुराताईंनी दिलेल्या जर्मन कंपनीच्या उदाहरणात आपल्या इंग्रजी येत नाही हे जर्मनांना कमीपणाचे निश्चितच वाटत नसेल. जे इथे कित्येक भारतीयांना कायम वाटत असते आणि इंग्रजी येणारे त्याची त्यांना जाणीव करून देत असतात. जर्मनांसाठी ते व्यवसायवृद्धीसाठी लागणार्‍या दहा वस्तूंपैकी एक असेल, तर भारतीयांना ते नसेल तर आपल्यात काहीच क्षमता नाही इतकं भयंकर वाटायला लावणारं असतं. इंग्रजीकडे पाहण्याचा हा जगाचा आणि भारतीयांचा मूलभूत फरक मी अनुभवलाय. देशोदेशी प्रत्यक्ष वावरणार्‍यांनी सुद्धा अनुभवला असेल.

एक जुना विनोद ही परिस्थिती कशी विशद करतो बघा: संता आपल्या भावाकडे लंडनमधे काही दिवस राहून परत येतो. बंता त्याला विचारतो, क्या खास है बे उधर? तर संता म्हणतो, अबे पूछ मत, उधर तो छोटासा बच्चा भी फर्राटेसे अंग्रेजी बोलता है.

हे इंग्रजीचं वेड आलं तरी कुठून..?
माझ्या निरिक्षणात आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणूनच त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल असा भाबडा विश्वास बाळगणारे पालक आहेत, आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणून आपण पुढारलेले, उच्च्भ्रू आहोत असे मिरवणारे पालक आहेत. इंग्रजी शाळेत जाणार्‍या मुलांना व पालकांना तो मान/स्टेट्स्/प्रतिष्ठा हवी आहे. मातृभाषेचा आग्रह धरणार्‍यांवर बाण्याचे बिनबुडाचे आरोप करणारे इंग्रजी-वेड्या पालकांच्या वेगळ्याच प्रकारच्या बाण्याचा अवलंब करणार्‍या मानसिकतेकडे अगदी सोयिस्कर दुर्लक्ष करत आहेत.
आजचे पालक शिक्षणाच्या (परम-आवश्यक अशा) दर्जापेक्षा फक्त (तुलनेने कमी महत्त्वाच्या) भाषा माध्यमावरच जोर देतायत. हे माझे निरिक्षण आहे. ते असं करण्यामागे मागच्या १५-२० वर्षात घडलेले आर्थिक-सामाजिक बदल आहेतच. इंग्रजी बोलणार्‍यांना चांगल्या संधी मिळतात हे त्यांनी बघितले म्हणून त्यांचा असा ग्रह झाला आहे की इंग्रजीतून शिक्षण घेतल्याने चांगल्या आर्थिक संधी मिळतात. प्रत्यक्षात त्या काळातल्या मोजक्याच असलेल्या इंग्रजी शाळांचा दर्जा इतर सरकारी व मराठी शाळांच्या मानाने फार चांगला होता. शक्यतो ह्या शाळा मिशनरीज संचालित व भरपूर फीया घेणार्‍या होत्या. त्यात शिकणारे श्रीमंत, उच्चपदस्थ यांची मुले होती. या वर्गात सुबत्तेमुळे आलेला एक आत्मविश्वास जन्मत:च असतो. वरच्या वर्तुळात असलेल्याने उत्तम संधींची जास्त माहितीही असते. त्यायोगे कुठले शिक्षण घ्यावे याचीही तयारी चांगली असते. त्यातून चांगले शिक्षक, चांगल्या शैक्षणिक दर्जाचा होणारा संस्कार. हे सर्व दिमतीस असलेली मुले यशस्वी होतांना पाहून सामान्य पालकांच्या महत्त्वाकांक्षेला मात्र एकच कारण दिसले ते हे की 'इंग्रजी शाळेत शिकले की यश मिळते'. कारण फक्त 'इंग्रजी माध्यमच' त्यांच्या आवाक्यात होते. याला थोडी फुंकर घालून इंग्रजी शाळावाल्यांनी आपले मार्केटींग केले. त्याला आजचे पालक आंधळेपणाने भुलतायत.
याचं छोटेखानी उदाहरण मी अकरावी सायन्सला असतांना बघितलंय. माझ्या वर्गात महाराष्ट्रातून प्रथम आलेला मुलगा होता. अकोला जिल्ह्यातले सगळे मेरिटचे विद्यार्थी याच कॉलेजला असतात. माझ्या वर्गातली निम्मी जनता मेरीटवाली होती. ह्या मेरिटवाल्यांमधे बहुसंख्य मुलं कॉन्व्हेंटवाली होती. हे सगळं सांगण्याचं कारण वर्गात अ‍ॅवरेज मुलं अजिबात नव्हती. पण एक फरक होता. कॉन्वेंटवाल्या मुलांचा आत्मविश्वास, स्वत:ला प्रेझेंट करण्याची, छाप पाडण्याची हातोटी विलक्षण होती. सेमी-इंग्लीश, साध्या शाळेतून आलेली मुले त्यांच्या पुढ्यात दडपून जायची. आणि याचे कारण या मुलांना दुर्दैवाने त्यांचे फाडफाड इंग्लीश वाटत असे.
आज ५ ते १० वयोगटातली मुले जेव्हा शिकल्यावर बाहेर पडतील तेव्हा आपल्यासारखीच योग्यता असलेली लाखो मुले बघतील. तेव्हा जी स्थिती १०-१५ वर्षाआधी लाखो मराठी मुलांची होती तीच या इंग्रजी शिकलेल्या मुलांची असेल. कारण हजारोंकडे जेव्हा एकसारखं स्किल असतं तेव्हा त्या स्किलला तेवढं आर्थिक महत्त्व राहत नाही. लक्षात घ्या हा सगळा काथ्याकूट मी आता पद्व्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलांबाबत घातलेला नाहिये. त्यांच्याबद्दल आता काही बोलून उपयोगच नाही. खरा प्रश्न येणार्‍या पिढीचा आहे. ती फाड फाड इंग्रजी बोलू शकणारी पण इतर काही स्किल्स नसलेली मुले मॉलच्या फरशाच पुसतील. रिक्षा चालवतील, धुणीभांडी करतील. तेव्हा हा भ्रमाचा भोपळा फुटेल.

हेच होत आलंय. पन्नास-साठ वर्षांपुर्वी बी ए पास माणसाला हमखास नोकरी लागत असे. त्यानंतर इंजिनीअर-डॉक्टर्सचे प्रस्थ वाढले. त्यानंतर नुसत्या बी ए/बी एससी/बी कॉमचे पीक आले. पदवीचे अवमुल्यन झाले. आज इंजिनीअर-डॉक्टर्सचे अवमुल्यन झाले आहे. आज इतके इंजिनीअर झालेत की काही विशेष स्किल्स असल्याशिवाय तुमच्या नुसत्या इंजिनीअरींगला कुत्रं विचारत नाही. आज नुसतं एमबीबीएस करून पुर्वीच्या एमबीबीएस डॉक्टरांसारखे वैभव कमावता येत नाही. आयटीची सुद्धा वेगळी परिस्थिती आहे असं नाही. बी.एससी वैगेरे करून चपराशाची नोकरी करणारे मागच्या पिढीत बरेच पाहिलेत. सॅचुरेशन, गर्दी होण्याआधी जे हजर असतात तेच यशस्वी होतात. दुर्दैवाने सामान्य लोकांच्या डोक्यात हे कधीच शिरणार नाही. ते नेहमी दुसरे काय करून यशस्वी झाले त्याची कॉपी करण्याचा सोपा पण अयशस्वी मार्ग पत्करतात.

आजचे श्रीमंत, उच्चपदस्थ उद्या परत तेच चक्र पुन्हा फिरवतील. वरच्या जागांवर त्यांचीच मुले परत असतील. परत सामान्य लोक उच्चवर्गाने काय केले हे बघून आपल्या जे जमते तेवढ्याचे फॅड घेऊन धावत राहतील.

काही लोकांनी म्हटलंय की ठीक आहे ना, फॅड असले म्हणून काय झाले. पैसा व सन्मान मिळतोय ना? पण खरंच किती लोकांना हा फायदा मिळतोय? आज भारतात सुशिक्षित तरुणांपैकी फक्त ३४% तरुण नोकरी करण्यायोग्य आहेत. नोकरी देणार्‍या कंपन्यांना या नोकरीयोग्य नसलेल्या मुलांवर प्रशिक्षणाचा प्रचंड खर्च करावा लागतो ज्याचा या मुलांच्या किमान ३ वर्षाच्या पगाराच्या आकड्यावर परिणाम होतो.
कंपन्यांना आज किंवा उद्याही लागणार असलेले काही स्किल्स असे आहेत.
१. विशिष्ट उद्योगक्षेत्रात लागणारे मूलभूत व्यावसायिक कौशल्य
२. तंत्रज्ञानाचे अद्ययावत ज्ञान.
३. संवाद कौशल्य
४. निवडलेल्या क्षेत्रासाठी उपजत कल
आजची शिक्षणपद्धती फक्त नोकरदार तयार करणारी आहे. सांगितलेले काम सांगितलेल्या पद्धतीत करायचे. त्यात काही अडचण आल्यास मार्ग शोधण्यासाठी डोके चालवणार्‍यास प्रमोशन, भत्ते, बक्षीसं मिळतात. या शिक्षणाने व प्रवृत्तीने घातलेला दुसरा घोळ म्हणजे पारंपरिक रोजगार, व्यवसाय यात काही फायदा नाही असा चुकीचा केलेला प्रचार. कारण या व्यवसाय्/क्षेत्रांबद्दल प्रेम वाटावं असं या पद्धतीत काहीच नाही. किंवा हे शिकून पारंपारिक व्यवसायात पडायची मुलांना लाज वाटते. इतकं शिकून का गल्ल्यावर बसाचं का? किंवा इतकं शिकलो ते का नांगर हाकलायला का? असे वाक्य कानी पडू लागली. म्हणजेच दुकानदारी करणे, शेती करणे हे नोकरी करण्यापेक्षा हलक्या दर्जाची कामे आहेत हे बिंबवण्याचे भयंकर पाप या व्यवस्थेने केले. ज्यांना हे घोकंपट्टी शिक्षण जमतं ते फार हुशार आणि इतर लोक ढं असं काहीसं समिकरण मांडल्या गेलं. याचं कारण इंग्रज साहेब. तो आपला कायम कचेरीत बसून हुकूम चालवणार. त्याला कुणी कधी नांगर धरलेला पाहिला नाही का गल्ल्यावर बसलेला पाहिला नाही. मग त्यालाच आपला रोल मॉडेल बनवायला सामान्य लोकांनी सुरुवात केली. ती आजतागायत सुरू आहे.

माझा विरोध आहे तो आपल्या समाजाबद्दल, राहणीमानाबद्दल, उद्योगधंद्यांबद्दल अलिप्तता निर्माण केल्यामुळे झालेल्या नुकसानाला आहे. आज आपण मुलांना मिळणार्‍या पॅकेजच्या बातम्या पहिल्या पानावर पाहतो. त्या मुलाला वर्षभर कष्ट करून जेवढे लाख मिळतील तेवढे लाख त्याच्यापेक्षा एक चतुर्थांश काम करून मिळवणारे हजारो शेतकरी आज महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या बातम्या येत नाहीत. येतात त्या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या. कारण बातम्या देणारेही याच व्यवस्थेतून शिकलेत. यशस्वी शेतकर्‍यांच्या बातम्या तुम्हाला फक्त अ‍ॅग्रोवन मध्येच दिसतील.

माझ्या ओळखीत एक गृहस्थ आहेत. गुलाबाच्या फुलांची शेती करतात, वर्षाचे ३५६ दिवस. रोजचे उत्पन्न एक लाख रुपये. निव्वळ. आणि असे बरेच आहेत.

येणार्‍या काळात असेच वेगवेगळे व्यवसाय करणार्‍यांचीच चलती असेल. त्याची चाहूल आजच लागते आहे. आजचे श्रीमंत, उच्चपदस्थ त्यासाठी मुलांना तयार करतायत. आणि आजचा सामान्य पालक ओसरुन जाणार्‍या लाटेसाठी मुलांना तयार करतोय.

आजपासून १५ वर्षांनी आपल्या मुलांसाठी काय वाढून ठेवलेलं असेल? त्याला तेव्हा तोंड देण्याची तयारी करण्याचा वेळ व यशस्वी होण्याची मानसिकता त्याच्याकडे असेल काय? जसं आज काही लोक इंग्रजीशी कसे झगडावे लागले, त्यात कसा वेळ गेला असं सांगतायत, तेव्हा असं वेळ घालवणारं काही असेल काय? किंवा भविष्यातल्या कोणत्याही परिस्थितीत मुलांना तोंड देता यावे म्हणून काही विशेष तयारी आजपासूनच करता येईल काय याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. की फक्त इंग्रजी आलं की झालं म्हणून ते यशस्वी होतील काय? याचा सगळा विचार आताच करणे आवश्यक आहे.

त्यामुळे इंग्रजी माध्यमाऐवजी शालेय शिक्षणाच्या दर्जाला महत्त्व दिले तर बरे होईल. त्यातून ते मातृभाषेत असेल तर जास्तीत जास्त मुले मुख्य प्रवाहात येऊन कसल्याही न्यूनगंडाशिवाय स्वत:च्या, देशाच्या प्रगतीत हातभार लावतील.