शुक्रवार, २८ मे, २०२१

 

येत्या वीस वर्षांसाठी काही भाकिते

1. येत्या वीस वर्षांत सरकारी नोकरीला काही अर्थ राहणार नाही, महत्त्वाची मलिदा खाऊ पदे सोडली तर सगळंच्या सगळं औटसोर्स होणार आहे, अगदी लष्करात सुद्धा होत आहे. म्हणजे सरकारचे खाजगीकरण वाऱ्याच्या वेगाने सुरु आहे.

2. आजच्या सर्व पारंपरिक शिक्षणसंस्था, इर्रीलिव्हेण्ट होणार आहेत. कारण कामाचे स्वरूप इंडस्ट्रीनुसार बदलत आहे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये स्पेशलायज ज्ञानाची कौशल्याची गरज भासत आहे. उद्योगांना स्वतः चे कर्मचारी स्वतःच्या स्पेशल गरजेनुसार स्वतः प्रशिक्षित करून घ्यावे लागतील.

3. नव्या प्रकारच्या शिक्षणसंस्थांचा उदय निश्चित आहे, ज्यात शिक्षण प्रचंड महाग असेल, कोणालाही कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. ह्या संस्था पूर्ण नफ्यासाठीच चालविल्या जातील.

4. शहरीकरण, खेडी सोडून शहरात येण्याचे प्रमाण भयंकर वेगाने वाढणार आहे. सर्व टायर टू आणि टायर थ्री शहरांना मोठ्या लोकसंख्येसाठी तयारीत राहावे लागणारच आहे. शहरात राहणे त्यामुळे गावपेक्षा सुखाचे असेल असे नाही, शहरात चौपट मेहनत व एकपट मेहनताना मिळेल, कारण कामगारांची प्रचंड उपलब्धता. ह्यातून व्हाइट ब्लु कोणतीही कॉलर सुटणार नाही.

5. व्यवसाय उद्योग क्षेत्रात नव्याने शिरणाऱ्या लोकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागेल. नेहमीचेच व्यवसाय उद्योग असतील तर प्रस्थापितांकडून स्पर्धा, अडवणूक होणार, त्याला तोंड देऊन व्यवसाय उभा करणे कठीण असेल. प्रचलित पद्धतींपेक्षा अगदी नव्या पद्धतीने किंवा नवीनच प्रकारचा व्यवसाय करणाऱ्याला यश मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही प्रकार दुर्मिळ असतात.