शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१९

हॉस्टेल: एक लढा

जरी मी अकोल्यासारख्या शहरातून मुंबईत आलो असलो तरी मुंबईच्यासमोर अकोला म्हणजे सुमो रेसलरसमोर नुकतंच रांगायला लागलेलं पोर! मुंबैचा एक दबाव येतोच इथे येणार्‍या बाहेरगावच्या मुलांना - अपवाद पुण्याची मुले. आम्ही अकोला अमरावतीतून बारा जण आलो होतो. एकाच वर्गात होतो. होस्टेल अजुन मिळायचे होते. दोन-दोन, एक-एक जण असा आपआपल्या आमदाराच्या आमदारनिवासाच्या खोलीत वास्तव्य करुन होता. सुमारे दिड महिना लागला होस्टेलचा प्रवेश मिळायला. जेजेचं होस्टेल म्हणजे देशोदेशीच्या (म्हणजे आपल्याच देशाच्या कानाकोपर्‍यातल्या) कल्लाकार मंडळींसोबत खाना-पिना-रहना-सोना-पढना-सबकुछ!!

होस्टेलला प्रवेश मिळाला, चाळीस मुले प्रथम वर्षाला होती. जास्तीत जास्त महाराष्ट्रतलीच, एक दोघं पार दिल्ली-कश्मिर-बंगाल तर साउथमधलीही. ही चाळीस मुले चाळीसबायचाळीसच्या डायनिंगहॉलमधे पंधरा दिवस राहत होती. कारण रुम अलॉट होत नव्हत्या. 'सरकारी काम सहा महिने थांब' हे ब्रिदवाक्य पावलापावलावर ऐकायला मिळे. चाळीस मुले मिळून सहा टॉयलेट बाथरुम. सगळ्यांच्या कॉलेजची वेळ एकच! ते पंधरा दिवस, तेही पावसाळ्याचे पंधरा दिवस, तेही मुंबईतल्या पावसाळ्याचे पंधरा दिवस!! चौथ्या दिवशी भयंकर कुजलेल्या, कुबट वासाने तो हॉल भरुन गेला.. असे पुढचे दहा दिवस काढले. काय करणार? गावातून आलेली गरिब मुले नक्की काय करणार? मी तरी काय करणार? काहीच केले नाही, करु शकलो नाही, माहित नव्हते काय करायचे. एकच माहित होते. गप्प बसा आणि पुढे चला. आयुष्यभर हेच शिकवलेले व्यवस्थेने.

मग यथावकाश रुम्स मिळाल्या, कॉट्स मिळाले. राहण्याची सोय उत्तम झाली. तीन मुलांना मिळून एक रुम, ती मात्र ऐसपैस. ज्याने कोणी डिझाईन केलंय त्याने कलाकारांच्या गरजा ओळखून सगळं फर्निचर उत्तम डिजाईन केलंय. योग्य उंचीचे पलंग, लाकडी खुर्ची आणि आटोपशीर टेबल. काही डोकेबाज इंटेरीयर डिझायनर विद्यार्थ्यांनी त्यांच्या रुम्स नीट प्लान करुन उपलब्ध जागेचा मस्त वापर केलेला. त्या सिनियर्सचे बघून मग आम्हीही तसेच फॉलो केले.

समस्या खूप होत्या हॉस्टेलमधे. बेसिक सुविधांची बोंबाबोंब होती. म्हणजे प्यायला पाणी होते पण फिल्टर नव्हते. वरच्या टाक्यातून थेट ग्लासात घ्या आणि देवावर हवाला ठेऊन प्या! संडास-बाथरुम नीट धुतले जात नव्हते. आठ दिवसाने सफाई व्हायची. पाण्याचे पाईप फुटलेले, गंज गेलेले. आवार मोठे होते, खेळायची मैदाने आखलेली होती. पण वापर व निगा नसल्याने सगळी बकाल वस्ती होती, झाडे कशीही वाढलेली! नवनियुक्त माळी सकाळी आठला यायचा. अर्धातास टंगळमंगळ करुन साडेआठ नऊला झोपुन घ्यायचा ते थेट दुपारी दोन ला उठायचा, जेवायचा, इकडे तिकडे फिरायचा आणि परत दोन तास वॉचमन्शी गप्पा मारुन घरी जायचा. वॉचमन दोन होते. एक खुप जुना होता, वीस वर्षे जुना. एक चारपाच वर्षे जुना. जुना वॉचमन आपण त्याला वागळे म्हणूया. वागळे म्हणजे हॉस्टेलचा अनिभिषिक्त सम्राट. त्याचा आवाजच दरारा भरलेला होता. एकदम सनी देओल आणि अमरिश पुरी एकत्र! बिशाद कोणा पोराची त्याला वाकडं जायची. प्रस्थापित अगदी चपराशी असला तरी नवीन रंगरुट घाबरुनच राहतो. नाड्या प्रस्थापिताच्या हातात आहेत असं भासवलं की झालं. वागळे ह्यात तरबेज होता. हा वॉचमन पोरांना होटलमधून चहा, नाश्ता घेउन यायला लावायचा. बाकी माणूस पाहूनच वागायचा हेही खरे!!

अशीच दोन वर्षे काढली. मी जरा जरा निर्ढावल्यासारखा झालो. तिसर्‍या वर्षी जरा शिंगं फुटायला लागली. त्या शिंगाचे प्रताप दिसत होतेच. कै नै. होस्टेलला कम्पुटर वापरायची, आणायची बंदी होती. लाईटबिलावर नियंत्रण होते म्हणून. सरकारी आदेश होता. मागच्या वर्षाच्या बिलापेक्षा ह्यावर्षीचं बिल वीस टक्क्यांनी कमी आलं पाहिजे. त्यामुळे ट्युब्स, फ्यान सोडले तर कुठलेही उपकरण वापरायची बंदी होती. काही लोक चोरुन हिटर वापरायचेच. मला गरम पाण्याची नव्हे तर क्म्प्युटरची गरज होती. कारण क्म्प्युटर काळाची गरज होती. पण हे सरकारी टेबलाला समजणे शक्य नसते. माझ्या एका मित्राचा अमरावतीला घरी कम्प्युटर होता. त्याला तो आणायला सांगितला. आणि कोणालाही न समजता तो भला थोरला डेस्कटोप-सीआरटी मोणिटर वाला कॉम्प थेट रुममधे आणला आणि खुबीने स्टडीटेबलच्या खाली दडवला. त्यावर रात्री आम्हा पाच-सहा जणांच्या कोरल-फोटोशॉपच्या प्रॅक्टीसेस चालत. (खरंच! पोर्न बघायला वेळ नव्हता, संगणक जेवढा वेळ मिळेल तेवढा शिकण्यात घालवणे जास्त महत्त्वाचे होते.

आमच्यातली चार-पाच मुले ह्या जाचक नियमांमुळे हॉस्टेल सोडून गेली. आम्हाला शक्य नव्हते. एका कम्प्युटरवर तेही चोरुन फार दिवस चालणे शक्य नव्हते, तरी आम्ही तिसरे वर्षे कसेबसे काढले. आणि चौथ्या वर्षी आमची ब्याच सिनियर झाली. आणि मी होस्टेलचा लीडर!!!

मी रेक्टरनियुक्त व सर्वसंमतीने लिडर झालो असलो तरी सर्वांचीच मनापासून तशी तयारी नव्हती. खासकरुन ज्युनियर्सची. ते काही वेगळे विषय. एकदा तर थर्ड यिअर आणि फोर्थ यिअरची चांगलीच हाणामारी ही झाली. कडक वितुष्ट आले. 

पुढे आम्ही प्रयत्न करुन चार संगणकांसाठी संचालनालयाकडून परवानगी मिळवली. ती मिळवता मिळवता किती हातापाया पडावे लागले, नाही नाही ते बाबु लोकांकडून ऐकून घ्यावे लागले. पण परवानगी मिळवलीच. लपवलेला संगणक सन्मानाने कंप्युटर रुममध्ये विराजमान झाला. तीन सिनियर्सचे आणि एक ज्युनिअरचा असे चार संगणक. लॅपटोप अजून बरेच महाग होते, दिड लाखाच्या रेंजमधे होते. चार संगणकांवर परत चाळीस मुले (दोन्ही-तीन्ही वर्षांची) अभ्यास करु लागली. साहजिकच वेळ कमी पडे. कारण लाईट्स रात्री दहाला बंद करावे असा आदेश वागळेमामा काटेकोर पाळत. रुम बंद करुन चावी त्यांच्याकडे असे. ही व्यवस्था चीड आणणारीच होती. पण कोणीही बोलत नव्हते. काहीही अर्थ नव्हता.

मला काहीतरी करणे गरजेचे होते. ह्या सर्वाला ठिणगी पडली ते ज्युनियर मुलांना सबमिशन करायचे होते तेव्हा. अर्धवट कामे चालु असतांना अचानक वागळेने कम्प्युटररुमची विज खंडीत केली. भयंकर तमाशा झाला. मी पुढे होऊन मुलांसाठी वागळेशी भांडलो, त्याच्या अख्ख्या आयुष्यात त्याला कोणी ज्या भाषेत बोलले नसेल तसे बोललो. त्याला म्हटलं वॉचमन आहेस, औकात मधे राहा. इथे मुले तुला मामा, मामा करतात तर लै स्वत:ला हुकुमशाह समजू नकोस. पण तो ढिम्म. नियमावर बोट ठेवे. मी मुलांना म्हटलं, हा नियमावर बोट ठेवतो ना तर तुम्हीही उद्यापासून नियमावर बोट ठेवून कामे सुरु करा. 

झालं, दुसर्‍या दिवसापासून धूळ खात पडलेली तक्रारवही -जीच्यात रहिवासी विद्यार्थ्यांना येणार्‍या समस्यांबद्दल तक्रार करायची असते- ती बाहेर पडली. कुणालाच अशी काही वही असते ह्याची खबरबात नव्हती. मी मुलांना म्हटले, तुम्हाला इथे राहण्यासाठी कित्येक अटींचे पालन करावे लागते पण नियम कधीच वन-वे ट्रॅफिक नसतात हे लक्षात ठेवा. धडाधड रोज मुले निरनिराळ्या तक्रारी लिहून वहीची पानेच्या पाने भरायला लागली. रेक्टरला ह्या तक्रारींची कायदेशीररित्या जबाबदारी घेऊन निराकरण करावे लागे. 

सर्वात आधी सफाई कामगार सरळ आले. रोज सगळी सफाई व्हायला लागली. मी जातीने लक्ष द्यायला लागलो. अनेक वर्ष नीट घासले नाही तर एक चिकट काळपट थर टाइल्सला चढतो. वरवर पाणी टाकून पावडरने घासून तो जात नाही. सफाई कामगारांना त्यांच्या वेळेतच ते काम पूर्ण करायला लावून सगळी बाथरुम्स चमकवली.

एक दिवस खूप पाऊस झाला आणि काही ज्युनियर्सनी तक्रार केली की त्यांच्या खोल्यांमधे खूप पाणी साचले आहे, झोपायला जागा नाही म्हणुन इतरांच्या खोल्यांमधे जात आहेत. मी जरा पाहणी केली तर बर्‍याच ठिकाणी गळती होती, हॉस्टेलची शेवटची डागडुजी कधी केली होती देवजाणे!

मी शेवटी एक मीटींग घेतली. साठ मुलांची. तोवर संगणक आणि वागळे प्रकरणामुळे माझ्याबद्दलचे गैरसमज दूर होऊन मी फक्त विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार करतो हे समजल्याने मुलांमधे चांगलीच एकजूट झाली होती. आणि तिथे मी 'एक सुंदर भाषण' केले. हॉस्टेलमधे भेडसावत असलेल्या समस्या आणि त्यावरचे उपाय यावर मी भाष्य केले. विद्यार्थ्यांनी एकजूटीने केले तर नक्की बदल घडेल असा विश्वास दिला. मी एक सात पानी अर्ज लिहला होता, त्यात हॉस्टेलच्या सर्व समस्यांचा उल्लेख व त्यावर शासनाने काय उपाययोजना करणे आवश्यक आहे ह्याबद्दलही लिहले. तसेच ह्या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाची तयारी असल्याचे सूचित केले. ह्याच्या चार प्रती बनवून संचलनालय, शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री व मिडिया कडे पाठवण्याची तयारी केली. साठ मुलांनी त्यावर सह्या केल्या.

इतकं सोप्पं होतं? नाही ना!

लढा छोटा असो वा मोठा, काही गणितं, प्रमेये निर्विवाद अबाधित असतात. मसलपावर, ब्रेनपावर, योग्य वेळी योग्य चाली खेळण्याची समज आणि अचूक निर्णयक्षमता लागतेच लागते! पण बंधो एवढ्याने भागत नाय. समोरचाही ही सगळी जंत्री घेउनच मैदानात उतरलेला असतो. तेव्हा काय?

फिल्मी वाटतंय!. खरंच आहे. आहेच हे फिल्मी. पण फिल्म आणि प्रत्यक्ष जीवनात एक म्होट्टा फरक आहे. कथाकार एक ध्येय ठरवून लिहितो, एक तत्त्वज्ञान जिंकावं अशा हेतूने मांडणी करतो. प्रत्यक्ष जीवनात असे एकांगी बुद्धीबळ नसते. दोन प्रतिस्पर्धी असतात आणि दुसरा काय विचार करतो हे पहिल्याला कळत नसते.

आलं लक्षात! दुसरा काय करु शकतो हे पहिल्याला माहित नसते तेव्हाच बाजी पलटू शकते. मला व्यवस्था काय करु शकते हे माहिती होतं, पण व्यवस्थेला मी काय करु शकतो हे माहित नव्हतं!!

असो!

तर प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होण्याआधी छोट्यामोठ्या चकमकी घडत होत्या. रितसर अर्ज तयार करण्यासाठी मी एका कडून डिजिटल कॅमेरा घेउन हॉस्टेलचे फोटो काढले. फुटक्या पायपांचे, भेगा गेलेल्या भिंतींचे, दुरवस्थेत असलेल्या अनेक सुविधांचे असे अनेक फोटो काढुन घेतले. नंतर मी फोटो काढलेत हे रेक्टर सरांकडे माहिती झाले. त्यांनी मला बोलावले आणि मला विचारले, "किती फोटो काढलेत तू? आणि काय करणार आहेस त्याचं?", मी गप्प होतो. त्यांनी पुढे एक पुडकं काढलं, बाडच ते. म्हणाले, "हे बघ मागच्या दहा वर्षात मी हे इतके फोटो काढून दरवर्षी मन्त्र्यालयाला फेरे घालतोय. कुणीही तिथे ढिम्म हललेलं नाही. काहीही होऊ शकत नाही..." माझ्या समोर जे फोटो होते त्यामधे भयावह परिस्थिती होती, पाणी तुंबलेले, भिंतीच्या ढलप्या पडलेल्या, अजून बरंच काही. हा जो माणूस माझ्यासमोर उभा होता, हा काही साधासुधा माणूस नव्हे. पन्नाशीचा, भरदार शरिरयष्टी, पांढरी दाढी, पांढरे केस. चेहरा व व्यक्तिमत्व असे की कोणी ग्रीक गॉड असावा. एवढेच नव्हे तर मनुष्य प्रचंड हुशार, चलाख, धूर्त. कामात तरबेज आणि व्यवस्थापनात एक नंबर. विलपावर सांगायची तर एका अपघातात स्वारी तीन बरगड्या, एक पाय, खांदा फ्रॅक्चर करुन घेऊनही चवथ्या दिवशी स्वत:च्या पायावर उभं राहून नेहमीच्याच भेदक आवाजात विद्यार्थ्यांना दम भरायला तयार. ही वॉज लवेबल टेरर!

हा असा माणूस जर हताश होऊ शकतो तर आपण काय करणार? ते म्हणाले, "अरे, इथे मी काही करू शकलो नाही, तू काय करणार?" मी म्हटले, "सर, तुम्ही जे करू शकत नाही ते मी नक्कीच करु शकतो, तुम्हाला मर्यादा आहेत, मला नाहीत." सरकारी नोकराला मर्यादा असणारच. व्यवस्थेला हेसुद्धा माहीत असते.

पण पुढे जे युद्ध सुरू झाले त्यात आपले कोण, परके कोण हेच कळेना झाले. आम्ही रितसर अर्ज करुन प्रत्येक रुममधे जाऊन एका एका विद्यार्थ्याला समजावून सांगू लागलो. सही करायला तयार करु लागलो. फोर्थ यिअर कमर्शियलच्या सह्या झाल्या. थर्ड यीअर कमर्शियलच्याही झाल्या. पण फाईन आर्टवाले काही सह्या करायला तयार होईनात. इथे एक सुक्ष्म राजकारण होते. रेक्टरसाहेब फाईन आर्टवाले. फाईन आर्टवाल्यांचे कम्प्युटरशी संबंध नसल्याने उपरोक्त राड्याशी काही घेणेदेणे नव्हते. तसेच साहेब त्यांना कॉलेजमधे परस्पर त्यांच्या डिपार्टमेंटला बोलवून प्रेमसंवाद साधत असल्याने ही पोरे आमच्याकडे वळत नव्हती.

अजून एक प्रकार होत होता. ज्या मुलांनी सह्या केल्या त्या मुलांपैकी कमकुवत, भित्र्या मुलांना एक एकटे गाठून दमबाजी सुरू झाली. दरारायुक्त आवाजात प्रश्न केले गेल्यावर गरिब बिचारी पोरे घाबरून जायची. "तुला एकट्याला काय त्रास आहे का? नाही ना, मग कशाला सही करतोस. त्या पोरांना कायदा सुव्यवस्था बिघडवल्याबद्दल व हॉस्टेलचे वातावरण दूषित केल्याबद्दल काढून टाकणार आहेत, तुलाही जायचे का?" अशी दमबाजी झाल्यावर तयार पोरंही लटपटू लागली.

तिसरा प्रकार, लालूच दाखवणे. साहेबांचे फार्महाऊस होते, मस्त जॅकुझी, दारू वैगेरे पार्ट्या मर्जीतल्या पोरांना घेऊन होत असत. काही मुले (फाईनचीच) - जे आमचे मित्र, रुममेट्सही होते - तिकडे जायची कधीमधी. ह्या हॉस्टेल सुधारणा चळवळीचा प्रारंभ झाल्यावर सुरुवातीला मलाही सूचक निरोप मिळाले. मी बधलो नाही तर थेट ऑफर्स आल्या. म्हणजे तिकडे नेऊन मजा वैगरे करुन झाली की एक नैतिक दडपण येईल आणि मी गप्प बसेन. व्यवस्थेचा हा पवित्राही आधीच माहिती होता. त्यामुळे ते फसले.

अशा पद्धतीने साम, दाम, दंड, भेद, सर्व चाणक्यनिती चहूबाजूंनी दांडपट्टा फिरवित होती. तरी आम्ही पोरांनी हार मानायची नाहीच असेच ठरवलेले. एकट्या गाठल्या जाणार्‍या पोरांच्या मागे मी (किंवा माझा कोणी तरी सहकारी) उभा राहून त्याच्या ऐवजी प्रतिवाद करायला लागलो. अतिशय हुशार माणसासोबतचे वाद-प्रतिवाद म्हणजे अगदी जहाल हाणामारी असते. आयुष्यात मी पहिल्यांदाच असलं काही बघत होतो. तरी तोडीस तोड पुरून उरायचो. ज्याच्यावर प्रश्नांचा भडिमार झाला त्याला शांतपणे मागे घेऊन तोफगोळ्यांना टोलवायचो.

प्रश्न कसे, तर असे:
"तुम्हाला एवढ्या सुविधा द्यायच्या तर पैसा नको, कुठून आणायचा पैसा?"
"सर, आम्ही टॅक्स भरतो ना?"
"तू.. तू टॅक्स भरतो?"
"नाही, म्हणजे आमचे पालक भरतात ना..."
"किती टॅक्स भरतात रे तुझे वडिल...?"
"......" (मी गप्प, आमच्या विस-बाविस बकर्‍यांमधून एखादा-दोन बोकड विकून मला मुंबईला महिन्यावारी दोन-तीन हजार रुपये पाठवणारे बाबा आठवले, कधी कधी तर तेही येत नसत.)
"सर, सरकारने याची तजवीज करावी, बजेटमधे याची तरतूद असतेच. त्याचा मी किंवा माझा बाप काय टॅक्स भरतो याच्याशी काय संबंध? मी इथे राहतो, सरकारी नियमांनुसार मला ज्या सुविधा इथे मिळायला हव्यात त्या मिळत नाहीत, त्या उपलब्ध करुन द्यायची जबाबदारी सरकारचीच. ती त्यांनी कशी पार पाडावी किंवा त्यांना त्यात काय अडचणी येतात त्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही."

हे जुगलबंदी बघत मग आणखी पबलिक गोळा व्हायचं. हा कलगीतुरा फुकटचीच जनजागृती करायला लागला. तसं मग हे गोरिला वॉर बंद झालं. पण त्याने परिणाम व्हायचा तो झालाच. घाबरीघुबरी पोरं बळकट झाली. त्यांना आपले अधिकार आणि हक्क कळायला लागले. एकटेपणात सुख नाही हेही समजलं. नंतर आम्हाला जास्त कोणाला समजवत बसायची गरज पडली नाही.

शेवटी साहेबांनी एक मीटींग बोलावली. त्यात आमचे काय म्हणणे आहे ते नीट ऐकून घेतले. त्यावर आपले म्हणणे मांडले. आमच्या मागण्यांमधले लूपहोल्स दाखवले. पण इथेही भीती व दहशत दाखवण्याचा प्रकार झालाच. पण पोरं आता एवढी पेटली होती की कुणाच्या बाचं ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. खुद्द मीही ह्या उर्जेकडे बघून स्तंभित झालो. आगीचा लोळ आणि पाण्याचा लोट आवरता आवरत नाही. जे काम करायला आपल्याला अशी एकता, उत्साह, जोम लागतो त्याला रेगुलेट केलं नाही तर होत्याचं नव्हतं होण्यास वेळ लागत नाही. पुढची कामे जमिनीवर राहून करायची असे मनोमन ठरवले.

आणखी एक. हे फार महत्त्वाचे. म्होरक्या असल्याने बर्‍याच गोष्टी समजायच्या. तेव्हा कळले की नवाकोरा टेबलटेनिसचा टेबल कारकूनाच्या रुममधे नुसताच फोल्ड करुन ठेवलाय. त्याची चौकशी केली तर कळले की हॉस्टेलमधे सर्वच मैदानी, बैठे खेळ उपलब्ध आहेत. पण ते विद्यार्थ्यांना दिले जात नाहीत. बॅडमिंटन च्या रॅकेट्स, फुले, जाळी, फुटबॉल, व्हॉलीबॉल असं सर्वच उपलब्ध आहे. मग दिले वा सांगितले का नाही? तर कारण असे की मुले नीट वापरत नाहीत, मेन्टेनन्स ठेवत नाहीत. रॅकेट्स तोडतात, फुले हरवतात, बॉल फुटतात. कारण ही पोरे निव्वळ गावठी, गावंढळ आहेत, त्यांना अशा उच्चभ्रू सुविधांची समज नाही व त्यांची लायकीही नाही. हे समजल्यावर पुढे काय झाले असेल याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. असो. मुलांना सर्व साधने मिळायला लागली. जबाबदार पोरांना जबाबदारी देऊन सर्व खेळ-साधनांचा नीट वापर होऊ लागला. पण हे सत्य होतेच. फुकटचे मिळाले की त्याची आपण भारतीय लोक पत्रास ठेवत नाहीच. (ही फक्त इथे गावठी पोरांचीच नव्हे तर मल्टीनॅशनलमधे काम करणार्‍या कॉर्पोरेट्सचीही तीच हालत आहे. माझ्या एका कंपनीने युरोपमधे दिल्या जाणार्‍या सर्व सुविधा इथे देऊन तोंड पोळून घेतले होते.)

अर्जाच्या प्रती तयार झाल्या. सगळ्यांच्या सह्याही झाल्या. पुढे त्या रेक्टरसाहेबांकडे रितसर दाखल झाले. व त्यांनी करावयाची कारवाई कायदेशीररित्या त्यांना बंधनकारक झाली.

इथून पुढे एक पाचवा प्रकार सुरु झाला. फाईनचे आमचे मित्र-खोलीमित्र मला म्हणायला लागले, "तू हे जे करतोय ना संदिप, हे फार वाईट करत आहेस. सरांना ह्याचा खुप त्रास होत आहे. तुला कल्पना नाही पण आम्ही रोज बघतो. तो माणूस खूप चांगला आहे आणि त्याला तू उगाच त्रास देतो आहेस" रेक्टरच्या मुलाकडूनही काहीबाही ऐकायला यायचं. मी हे उद्योग आरंभल्यापासून सरांचा बीपी वाढला होता. त्यांना रात्र रात्र नीट झोप येत नव्हती. ते कसल्या तरी भयंकर स्ट्रेसखाली आले होते. हे ऐकून मीही जरा प्रेशरमधे आलो. आपल्यामुळे कोणा इसमास इतका त्रास व्हावा हे वाईट आहे.

पण कोणीतरी आपले काम नीट केलेले नाही म्हणून इथे साठ मुलांना त्रास रोज होतोय आणि मी जर हाती घेतलेले काम नीट पूर्ण केले नाही तर तो कायमस्वरुपी होत राहिल ह्याची जाण कोणत्याही टोचणीशिवाय मोठी होती.
अर्जाचा पाठपुरावा बहुतेक संचलनालय लेव्हलवरच झाला. पुढे जायची गरज पडली नाही. रोज कोणी कोणी अधिकारी होस्टेलला यायला लागले. आले की प्रथम मला सांगावा धाडला जायचा. "डांगे कोण आहे त्याला बोलवा आधी..." आधी एक दोनदा मी जरा दबकूनच भेटायला गेलो. पण जसं त्या अधिकार्‍याचं बोलणं सुरू व्हायचं तसं कळायचं, साहेब काकुळतीला आलेत. मला समजवण्याच्या सुरात आपल्या अडचणी सांगत आहेत. एमएससीबी चे इंजिनियर अधिकार्‍यांनी संगणकरुमसाठी सर्व हॉस्टेलची वायरिंग बदलावी लागेल असे सांगितले. ते खुप खर्चिक आणि वेळखाऊ काम आहे असे ते म्हणत होते. मी म्हटले, मला फक्त इथे सर्व रुममधे कम्प्युटर चालतील एवढी व्यवस्था करुन द्या. बाकी खर्चाचं, वेळेचं तुम्ही तुमच्या पद्धतीने म्यानेज करा. आम्ही अजून थांबू शकत नाही. त्यावर त्यांनी तात्पुरती संगणक-कक्षाची वायरिंग बदलून दिली व आमचे काम वेळेच्या बंधनाशिवाय करायची मुभा मिळाली.

नंतर कधीतरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले. ते तर हिशोबाचा, बॅकलॉगचा, राजकिय अडचणींचा पाढा वाचायला लागले. म्हणे निधी फार कमी उपलब्ध होतो, मग तो तातडीच्या कामांकडे वळवला जातो, मग तुमचं काम राहुन जातंय दरवर्षी. मी म्हटलं, बघा ब्वा. आम्ही आमचं काम केलं तर तुम्हाला ती सर्व तातडीची कामे सोडून सर्व निधी इकडेच वळवावा लागेल. वरुन तुम्हालाच बॅकलॉगच्या चौकशीला सामोरे जावे लागेल ते वेगळे.

असे आणखी दोन-तीन अधिकारी येऊन गेले.

मग अचानक कधीतरी महिनाभरात, हॉस्टेलच्या आवारात मोठ मोठे ट्रक्स आले. रेती, विटा, सिमेंट आले. लोखंडी सळया आणि बांबू आले. मजूर आले. पाईप बदलणारे आले. मोजमाप सुरु झाले. जादूची कांडी फिरल्यासारखी जिर्णोद्धाराची कामे सुरू झाली. फिल्मी वाटत असलं तरी हेच सत्य आहे. हे घडलं आणि प्रत्यक्ष घडलं. मला श्रेय घ्यायचं नव्हतंच तरी मला श्रेय मिळू नये म्हणून व्यवस्थेने 'कावळा बसण्यास आणि फांदी मोडण्यास एकच वेळ झाली, हॉस्टेल रिनोवेट होणारच होते, त्या डांगेला वाटतंय त्याच्यामुळे झालंय' असा पित्तू मुलांमधे सोडून दिला. पण जिसने देखा उसनेही देखा. आमचा लढा आम्हीच बघितलेला. कॉलेजमधेही सगळीकडे याची चर्चा झाली होती. 'दबादबासाही सही' पण काही दिवस माझं नाव गाजत होतं. फाईन-कमर्शियल दोन्हीकडच्या पोरांनी भरभरुन साथ दिल्याने हे साध्य झालं होतं.

टाइल्स बदलल्या, पाण्याचे फिल्टर आले. बाथरुम्सचे पाईप बदलले, रंगरंगोटी झाली. पण हे सर्व बघायला आणि भोगायला मी तिथे नव्हतो. माझे वर्ष संपले होते आणि मी हॉस्टेल सोडले होते. नंतरच्या दोन तीन वर्षापर्यंत माझं नाव हॉस्टेल विसरलं नव्हतं. माझ्यासारखं वागण्याचा प्रयत्न करणार्‍या मुलांना 'काय रे, फार डांगे बनतोस काय..?' असा दम देऊन थेट बाहेर काढलं जात होतं. अशी दोन-तीन मुले मला शोधत आली होती. त्यांच्या राहण्याची व्यवस्था मग मी बाहेर केली. आता तर बहुतेक वागळे सोडून माझं नाव तिथे कुणाला आठवत नसेल. ;)

हॉस्टेल सोडल्यावर मी महिनाभर रेक्टरसरांच्या वाशीतल्या फ्लॅटवर राहत होतो. त्यांनी भाडं घेतलं नाही. तो महिनाभर मी एका आलिशान लग्झरियस फ्लॅटमधे आयुष्यात पहिल्यांदाच राहिलो. तो माणूस उत्तमच आहे. त्यांच्यासोबत राहून मला बरंच शिकायला मिळालं, नंतरही आमचे चांगलेच संबंध राहिले. त्यांचा माझ्या आयुष्याच्या एका मोठ्या कालखंडावर प्रभाव आहे, आयुष्यभर राहिलंच.

फक्त एक मला कधीच कळले नाही, कधी परत भेट झाली तर विचारेन.

"सर, तुम्ही आमच्या बाजूने होतात की विरुद्ध?"