गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

मोदींना पर्याय नाही असा प्रसार करणे हा एक प्रोपगंडा आहे. विरोधी पक्ष २०१० पासूनच लकवाग्रस्त झालेले आहेत. त्यांची रिकवरी शक्यच नाही. मोदींना परास्त करायचे असेल तर मोदींपेक्षा भारी प्रोपगंडा करणे आवश्यक. सध्या जमाना मार्केटींगचाच आहे. मोदी मार्केटींग करुन जिंकले. मोदींना पर्याय नाही हे सुद्धा मार्केटींगच आहे २०१९ साठी. मोदींच्या तोलामोलाचे अनेक नेते भारतात आहेत. मोदींना कोणी 'अवतार' समजत असेल तर तो भाग वेगळा. मोदी नव्हते तेव्हा भारताचे काही बिघडले नाही, आले म्हणून लगेच (किंवा पुढच्या २० वर्षातही) फरक पडणार नाही.

देशाच्या विकासाबद्दल अवास्तव संकल्पना ठेवणारे मंदबुद्धी आहेत. २ -३ वर्षात विकास होत असतो काय असे आता उलटं विचारणारे भाजपे ४७ ला स्वतंत्र झाल्याबरोबर विकास मागत होते. इर्रीस्पेक्टीव ऑफ हू रुल्ड इन्डीया, मागच्या ७० वर्षात आपण एक एक पायरी चढत एवढा विशाल देश ज्या ठिकाणी घेऊन आलो ते अभिमानास्पद आहे. यात सर्वच पक्षांचे, जनतेचे, नेत्यांचे योगदान आहे. इथे नेहमी सिंगापूर, जापान वगैरे देशांचे दाखले दिले जातात, की अमूक वर्षात ते इतके पुढे गेले वगैरे. पण अनेक देशांमध्ये चाललेली गृहयुद्धे, गरिबी, भुखमरी, लढाया, अराजक हे कोणी बघत नाही. भारतीय नागरिकाचे असे आहे की स्वतः काही करायचे नाही, आपल्या कमतरतांसाठी दुसर्यांना दोष देत बसायचे. इतर देशांच्या विकासाचे दाखले देणार्‍यांनी स्वतःच्या गावात तरी विकास घडवून आणला का एवढे स्वतः बघावे. तुमच्या गावा-शहराएवढे देश विकसित झाले, त्याचे तुम्ही दाखले देता ना? त्यामागची कारणेही बघा. इथे मी कॉंग्रेस पक्षाला पाठीशी घालतोय असा काहींचा समज होईल. पण वास्तव तसे नाही. कॉण्ग्रेस असो वा भाजपही प्रत्येकाचे पाय मातीचे आहेत. कोणीही धुतल्या तांदळाचा नाही.

मोदींना ज्यासाठी निवडुन दिले, ती कामे होत आहेत काय? किती झाली, आता काय स्टेटस आहे, किती दूरगामी निर्णय घेतले, कोनती कामे सुरु आहेत ह्या सर्वांबद्दल तिसर्‍याच घटकाकडून प्रचार होणे आता आवश्यक आहे. काँग्रेस्+विरोधी कितीही ओरडले तरी त्यांची प्रतिमा भजपआयटीसेल्+विकलेला मिडिया यांनी अविश्वासार्ह्+मतलबी अशी करुन ठेवली आहे.

भारतात राजकिय पटलावर काय चालू आहे हेच जिथे विरोधी पक्षाला सुधरत नाहीये तिथे मोदीविरोधात कोणी उभा करावा हे कुठून सुधरेल. मोदींना परास्त करणे फक्त भाजपमधून शक्य आहे. भाजप ही जळकुट्या व असुरक्षित लोकांची संघटना असल्याने ते फार दिवस कोणाला डोक्यावर बसवून ठेवत नही. २०१९ ची निवडणूक भाजप जिंकेल, काही शंका नाही. कदाचित मोदीच पंतप्रधान असतील. भारत कसा असेल हे मात्र माहित नाही.

भाजप जिंको वा कोणीही. भारताच्या विकासाची कामे झाली पाहिजेत, विकासाच्या योजनांबद्दल बोलले पाहिजे, मोदी निवडून आल्यावर जो उत्साह दिसत होता तो आता दिसतोय काय? केवळ संघवाले, हिंदुत्ववाले उत्साही आणी माजलेले दिसत आहेत. त्यांच्या मनातला विखार दिवसेंदिवस बाहेर येत आहे. मेंढराची कातडी घसरुन लांडग्यांची दिसायला लागली आहे. तरी लोक समजणार नाहीत. कारण बहुसंख्य लोकांना असे असणे म्हणजेच रामराज्य आहे असे पटवण्यात आले आहे. मुस्लिमांचे फार लाड झाले आता हिंदुंचे राज्य आहे अशा प्रकारची भावना हिंदुंमध्ये आहे. धर्म आणि राष्ट्रवादाच्या गुंगीत खर्‍या विकासाकडे लक्ष जात नाही. जाऊ दिले जात नाही. 

रविवार, २३ एप्रिल, २०१७

गरजू-होतकरु, हुशार तरुणांसाठी





आज आपण बघितले तर ९० टक्के तरूणवर्ग झापडबंद अवस्थेत आहे. त्याला आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या संधी दिसत नाहीत, किंवा एका अजब स्वप्नवादामुळे त्या करायची इच्छा नसते. तसेच कोणी असंच करुन यशस्वी झाला की त्याचे 'फक्त यश' बघून कॉपी मारायला जातात आणि अपयश येऊन अशा वेगळ्या वाटांची बदनामी होते.

खालील सर्व संकल्पना ह्या एकतर कोणीतरी आधीच करत असलेले व्यवसाय "लार्ज फॉरमॅट वर कसे दिसतील" ह्याचे विजुलायजेशन आहे किंवा सहज करता येतील अशा आहेत ज्यात फार काही 'अन्कन्वेन्शल, आउट ऑफ बॉक्स' नाही. 'सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करिल तयाचे' ह्याप्रमाणे ह्या संकल्पना आज उपलब्ध आहेतच फक्त त्या झटून, जीव ओतून देऊन करणार्‍यांची गरज आहे. इथे मांडण्याचे कारण ही बीजं आहेत, कुणीही ह्या बीयांना उचलून घेऊन जावे त्याचे वटवृक्ष करावे. त्याचा माझ्याच महाराष्ट्रातल्या अनेक मुलांना फायदा होईल. तो फायदा व्हावा हाच एकमेव उद्देश आहे माझा. दुर्दैवाने माझे शंभर क्लोन बनू शकत नसल्याने माझ्यासारख्या विचारांच्या लोकांनी ह्यात सहभागी व्हावे, सर्वोदय करावा हीच इच्छा आहे.
 
१. मी जे शेतकर्‍यांसाठीची हेल्पलाईन सुरु करणार होतो त्याचे कामासाठी दहा जणांची टीम खेड्यापाड्यातून (लाख लाख रुपये फी भरुन बीबीए झालेल्या - परत लाख रुपये भरुन एमबीए करण्याची तयारी करणार्‍या, वडील गरिब शेतकरी असणार्‍या मुलांची) तयार केली होती. ताजी बातमी अशी की अज्ञात कारणाने प्रस्तुत टीमने अर्धवट काम सोडून दिले आहे.
 
असो. नवीन टीमसाठी जुळवाजुळव करत आहे. कोणालाही खर्‍या गरजूंची, हुशार आणि मेहनतीस तयार तरुणांची माहिती असेल तर कृपया कळवावी. कोणतीही गुंतवणूक नाही. फक्त शारिरिक व बौद्धिक मेहनतीची तयारी हवी. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपर्‍यात असले तरी चालतील.

२. सध्या महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांना अनेक गंभीर समस्या भेडसावत आहेत. त्यात एक महत्त्वाची म्हणजे कुशल-अकुशल शेतमजूरांची उपलब्धता. सुमारे २५० रुपये ते ३५० रुपये रोज एवढा मेहनताना देऊनही मुबलक व मेहनती शेतमजूर मिळत नाहीयेत. जे मिळतायत ते कामाला बारा वाजता येऊन पाच वाजता घरी जातात. मधले एक तास जेवणात घालवतात. कंत्राटी पद्धतीवर चांगले मेहनती शेतमजूर पुरवणार्‍या कंपनीची महाराष्ट्राला नितांत गरज आहे. २५ हजार खर्‍या गरजू, मेहनती, कामाचा कंटाळा न करणार्‍या शेतमजूरांची आवश्यकता आहे.

३. माझ्या एका आयटीआय झालेल्या मित्राने स्वतः दोन वर्ष संशोधन करुन एक अफलातून इलेक्ट्रिक पॉवर स्टेबिलायजर बनवला आहे. त्याची किंमत साडेसात हजार, साडेनौ हजार व चौदा हजार अशी आहे. शेतकर्‍यांना वीजेचे संतुलन करण्यासाठी, पाण्याचे पंप चालवण्यासाठी, घरातली उपकरणे चालवण्यासाठी अशा स्टेबिलायजरची गरज असते. प्रथम-वापरा-नंतर-पैसे द्या ह्या स्ट्रेटेजीवर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात सदर स्टेबिलायजर विकण्यासाठी थेट विक्री करणारे विक्रेते पाहिजेत. प्रत्येक यंत्रामागे पाचशे रुपये मानधन मिळेल. कोणतेही टारगेट नाही, जितकं काम कराल तितका फायदा मिळवा अशी योजना आहे. ह्या कामासाठी इलेक्ट्रिकचे ज्ञान असलेले खरे गरजू, मेहनती, इमानदार तरुण पाहिजेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची नाही. फक्त मेहनत करा व पैसे मिळवा.

४. शेतकर्‍यांच्या जमिनीचे मातीपरिक्षण शासकिय अधिकारी करतात, बरेचदा त्याला विलंब होतो. किंवा प्रत्येक शेतकर्‍याला ते शक्य होत नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात जाऊन शेतावर-बांधावर जाऊन मातीपरिक्षण करु शकेल अशी फिरती प्रयोगशाळा/लेबोरटरी ची संकल्पना आहे. बारावी विज्ञान झालेल्या हजारो मुलांना उत्तम संधी मिळेल. प्रत्येक मातीपरिक्षण-पाणीपरिक्षण अहवालामागे कमीशन बेसीसवर कमाई होईल. बारावी विज्ञान नापास झालेले असले तरी खरे गरजू, मेहनती, इमानदार तरुण पाहिजेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची नाही. फक्त मेहनत करा व पैसे मिळवा.

५. शेतकर्‍यांचा माल थेट ग्राहकांना विकू शकणार्‍या अनेक उत्पादक-शेतकरी-कंपन्या निर्माण झाल्या आहेत. अशा किमान एक हजार कंपन्यांची महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांकडून सर्व प्रकारची उत्पादने घेऊन, विशेष उत्पादने पिकवायला लावून त्याची विक्री राज्यात, देशात, परदेशात करण्यासाठी खर्‍या गरजू, मेहनती तरूणांची आवश्यकता आहे. संपूर्ण मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहे. काम करण्याची कळकळ असलेली मुले पाहिजेत. पैसा उत्तम मिळेल ह्याची खात्री आहे.

६. महाराष्ट्रातल्या सुमारे साडेतीनशे तालुक्यांमधे १० जणांची एक टीम अशा प्रकारे सुमारे साडेतीनशे टीम्स संपूर्ण शैक्षणिक मार्गदर्शनासाठी हव्या आहेत. टिमला कामासाठी लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, मार्गदर्शन मोफत पुरवले जाईल. टीमकडे स्वतःचा बेसिक लॅप्टॉप, मोबाईल इन्टरनेट कनेक्षन हवे. बारावी कला-समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, अशा कोणत्याही विषयात- शिकलेले होतकरु व खरे गरजू हवे आहेत. आवश्यकता असलेल्या एकूण तरुणांची संख्या: सुमारे ३५०००. हमखास व कायमस्वरुपी चांगले उत्पन्न, तसेच आपल्या देशबांधवांसाठी काहीतरी विधायक केल्याचे समाधान मिळवून देणारा उपक्रम.

७. घनकचरा व्यवस्थापन, रद्दीपेपर कलेक्शन व रिसायकलिंग साठी महाराष्ट्रातल्या सर्व ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी शंभर जणांचे एक युनिट ह्याप्रमाणे ३६०० होतकरु व खरे गरजू लोकांची गरज आहे. एकूण प्रभावित रोजगारक्षमता; १८,०००. हमखास व कायमस्वरुपी चांगले उत्पन्न, तसेच आपल्या देशबांधवांसाठी काहीतरी विधायक केल्याचे समाधान मिळवून देणारा उपक्रम.

८. महाराष्ट्रातल्या सर्व नापिक+पडिक जमीनी घेऊन त्यावर सुधारित पद्धतीने शेती करण्यासाठी असंख्य गरिब तरुण हवे आहेत. मार्गदर्शन मोफत मिळेल. चांगला नफा, कायमस्वरुपी काम, राहायला जागा मिळेल.
 
९. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांना पिकांचे नियोजन, व्यवस्थापन, विपणन ह्यासाठी चांगले मार्गदर्शन करु शकतील असे किमान दहा हजार तरुण हवे आहेत. कोणत्याही प्रकारच्या शेतीशिक्षणाची अट नाही, योग्य मार्गदर्शन व तेही मोफत केल्या जाईल. दहावी नंतर किमान पाच वर्षे (समांतरपद्धतीने कोणतेही शिक्षण घेत) शेतीचे मूलभूत ज्ञान घेणे आवश्यक. तिसर्‍या वर्षापासून कायमस्वरुपी चांगली कमाई व समाजात मान-सन्मान मिळेल. अशा दहा हजार खर्‍या गरजू, कामाची कळकळ, एखाद्या सैनिकाच्या तोडीसतोड कष्ट करण्याची तयारी, वकिल-डॉक्टरांच्या बौद्धिक पातळीवर मेहनत करण्याची तयारी हे गुण आवश्यक.
 
१०. दहावी करुन आयटीआय झालेले अनेक तरुण भारतातल्या-महाराष्ट्रातल्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने लागत आहेत. बिनकामाचे इंजिनियर्सला अहंकार मोठा, ज्ञान कमी त्यापेक्षा चांगल्या पैशात आयटीआयन्स मुलांना चांगली मागणी आहे, पाच वर्षात चांगले तरबेज होऊन, इण्जिनियरांचे पगार मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. असे कीती हजार तरुण लागतील आत्ता लगेच माहिती नाही. पण किमान पन्नासेक हजार तरी लागतील.

११. महाराष्ट्रात कमाई करता येऊ शकणार्‍या कोणत्याही क्षेत्रात (मसाला बनवणे, घरगुती मेस, किराणा-माल घरपोच, शेळीपालन, दुग्धौत्पादन, कुक्कूटपालन, मध-उत्पादन, साबण-शाम्पू-पावडर, तयार कपडे, सजावटीचे सामान बनवणे, ब्युटीपार्लर, प्लंबर, फिटर, इलेक्ट्रीशियन सहित सुमारे दोनशे प्रकारच्या घरगुती सर्विसेस, घरपोच कारवाशिंग, ऑफिस मेन्टेनन्स, अकाउंटट्स, मार्केटींग एक्झुकेटीव, हाउसकिपिंग, घरकामवाल्या) सुमारे दहा टक्के जागा मेहनत करणार्‍यांसाठी खुल्या आहेत. इथे कोणतेही आरक्षण लागू होत नाही. चांगला पगार, मेहनताना, मोबदला, जीवन सुस्थितीत व आरामात जगण्याची खात्री असलेल्या अनेक संधी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरजू-होतकरु, हुशार तरुणांसाठी वाट पाहत आहेत.

वरच्या दहा संकल्पनांपैकी माझ्या स्वतःच्या ओरिजिनल कन्सेप्ट्स ह्या एक-दोनच (शैक्षणिक मार्गदर्शन व शेती कॉलसेन्टर) आहेत. त्यात कोअर कन्सेप्चुअलायजेशन, ए टू झेड प्लानिंग, कोअर टेक्नॉलॉजी ब्रेकथ्रू ह्या माझ्या स्वतःच्या आहेत. त्या अर्थातच मी स्वतः जमेल तशा व तितक्या लवकर लॉन्च करणार आहे. त्याबद्दल ग्राउंड प्लानिंग व कोअर टिममेंबर शोधणे सुरु आहे.

 अनेक नवनविन कल्पनांचे व्यवसायात रुपांतर कसे करता येईल ह्यावर विचार करण्याचा मला छंद आहे. त्या व्यवसायांचे थेरॉटिकल स्वरुप, त्याला लागणारे भांडवल, मनुष्यबळ, सरकारी परवानग्या, मार्केट रिसर्च, ग्राहकवर्ग, स्पर्धा, भविष्यातली वाटचाल, स्वॉट अ‍ॅनालिसिस, तशीच मदत लागली तर भांडवल व मार्गदर्शन पुरवणार्‍या संस्था ह्यांच्यावर इत्थंभूत विचार व अभ्यास करुन त्याचा एक अहवाल बनवून ठेवणे ह्याचा किडा गेले अनेक वर्ष आहे. आतापर्यंत सुमारे चारशे व्यवसायांचे असे संकलन करुन ठेवले आहे. ह्याचसंबंधी काम करण्यासाठी एक बिजनेस कन्सल्टन्सी फर्मही स्थापन केली आहे, माझी इतरही व्यवधानं असल्याने त्याचे काम म्हणावे तसे सुरू झालेले नाही. अनेकांकडे पैसा असतो, काम करायची तयारी असते पण चांगली कल्पना किंवा अभ्यास नसतो किंवा नक्की काय करायचे ह्याची काहीच माहिती उपलब्ध नसते. अशावेळी मी मदत करु शकतो हे मला लक्षात आले. कारण मी प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा बिजनेस प्लानिंग, स्ट्रॅटेजीकल थिंकिंग, इत्यादी बैठे डोके चालवण्याचे काम हे चांगलं करु शकतो हे मागच्या तीन-चार वर्षाच्या अनुभवातून शिकलो.
 
आपल्या सर्वांसाठी एक बोधकथा: (माहित असेलच)
वादळामुळे समुद्रातून हजारो स्टारफिश किनार्‍यावर पडलेले असतात, एक माणूस एक एक उचलून परत समुद्रात फेक्त असतो. त्याला दुसरा बोलतो तु एकटा एवढे सारे जीव वाचवू शकणार नाहीस. तू असा काय मोठा फरक पाडणार आहेस?, त्यावर तो एक स्टारफिश उचलून परत समुद्रात फेकतो आणि म्हणतो "माहित नाही पण ह्याच्या जीवनात मोठा फरक पडला आहे."
 
मला तुम्ही सगळे किमान एक स्टारफिशच्या आयुष्यात बदल घडवणारे व्हावे असे वाटते.