मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५

लोक अ‍ॅब्स्ट्रॅक्ट कलाविष्कारांचा आनंद का घेऊ शकत नाहीत?

लोक अ‍ॅब्स्ट्रॅक्ट कलाविष्कारांचा आनंद का घेऊ शकत नाहीत? 

कवितेतून उभ्या राहणार्‍या तुटक्या-भक्कम प्रतिमांचा आपल्या मनावर जो सहज तरंग उठतो त्याला तटस्थतेने वा भावनिकतेने बघणेच आपल्या हाती असते. इथे समजा एखादे अमूर्त चित्र असते तर हाच रंग का वापरला, ती रेषा मोठी का, हा आकार असा का असले प्रश्न पडत नाहीत. त्या चित्राचा प्रभाव पडतो, अंतर्मनात कुठल्या तरी भावनेला ते मॅच होते आणि आपल्याला रसग्रहणाचा आनंद होतो. हे सगळे अजाणता घडते. त्याचा आनंद घ्यावा.

इथे काही चित्रे देतो, ती बघावी:
वासुदेव गायतोंडे
vg
vg
vg



vg
माझ्या लेखी तरी जगात गायतोंडेंना अमूर्त चित्रांमध्ये तोड नाही.



"लोक अमूर्त चित्रांना नावे ठेवतात. ज्या चित्रकारांना हुबेहुब चित्रे काढायचा कंटाळा येतो ते शॉर्टकट मारून प्रसिद्ध होण्यासाठी असली चित्रे काढतात. त्यांना त्याचा काय अर्थ आहे हे सांगता येत नाही. कुणाला घरामधे ती टांगता येत नाहीत. नुसते आपले ब्रश घेतले, रंग घेतले, बसले लहान मुलांसारखे रंग फासत की झाले चित्र. त्याला काय लागतं, अशी चित्रे तर कुणी थुंकले तरी निघतील. माय डीअर फ्रेंड्स, ते इतके सोपे नाही. वाटतंय तर करून बघा. रंग, ब्रश आणि कॅनव्हास तर लागतो. चित्रे तर काय लहान मुलांसारखी काढायचीत, तुम्हीच म्हणालात. आता करा, करून बघा. वीस पेंटींग बनवा, आपली शैली कायम ठेवा. सगळी चित्रे एकसारखी दिसली पाहिजेत पण मूलभूत फरकही पाहिजे. अंदाधुंद फटकारे मारत तुम्ही चार पेंटींग्स बनवणार, आठ बनवणार. दहा बनवणार. पण अकराव्या पेंटींगला तुम्ही डोके धरून बसाल, कारण आता 'काय काढू' तुम्हाला सुचणारच नाही. हे 'काय काढायचं' हे सुचणं म्हणजेच अ‍ॅब्स्ट्रॅक्ट.

तुम्हाला वाटतं, फिगरेटीव ड्रॉइंगचा, हुबेहुब काढण्याचा कंटाळा करणारे शॉर्टकट मारतात. असेच आहे. कारण जेवढे श्रेष्ठ अ‍ॅब्स्ट्रॅक्ट काढणारे आहेत, ते फिगरेटीवच्या पलिकडे आपली कला शोधतात. तो कंटाळा नाही तर ती नव्याची आस आहे. जे जसं उमटेल तसंच कॅन्व्हास वर उतरवायचं आहे. भले ते स्वतःलाच न समजू दे. रसिकांना समजणे तर दूरच.

अ‍ॅब्स्ट्रॅक्ट काय आहे. एक आंबा घ्या. पूर्ण पिकलेला. हे फिगरेटीव ड्रॉइंग. पूर्ण आंबा, पिवळा जर्द, हिरवा देठ. आता त्याला कापून फोडी करा. तरी तो आंबाच राहिल. आता त्याचा रस काढुन ग्लासात भरा. तरी तो आंबाच राहील. ग्लासात भरलेला रस म्हणजे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आंबा. दॄष्य पातळीवर ओळखू येणार नाही, पण तो आंबाच. त्याचा स्वाद आणि ओळख तेव्हाच तुम्हाला कळेल जेव्हा आधी कधीतरी तो आंबा तुम्ही चाखलेला असेल तरच. आफ्रिकेतलं एखादं कधीच न बघितलेल्या फळाचं रस काढून दिला तर कसं समजेल? अमूर्त चित्रकला अशीच आहे.

दोन डोंगराआडून उगवणारा सूर्य कितीजणं पाहतात. कुण्या अमूर्त चित्रकाराला त्याची भावना मांडायची असेल तर ते डोंगर चौकोनी होतील, सुर्य त्रिकोणी होईल, काळा होईल, डोंगर लाल असतील. पण तरीही तो सुर्योदय. फक्त चित्रकाराच्या मनःपटलावरचा.

एकदा तुम्ही गायतोंडेंची चार चित्रे बघितली की जगात कुठेही गेलात तरी गायतोंडेंचे चित्र कोणते हे सांगू शकाल. अमुर्त चित्रकार आपल्या चित्रांवर आपली शैली सोडून जातो. ती अप्रतिम, अलौकिक असते. एखादे चित्र दाखवताच हे हुसैन चे आहे हे त्याच्या ठसठशीत काळ्या रंगाच्या रेषांवरून व दमदार फटकार्‍यांवरून कळतं. हे खरं चित्रकाराचं संचित. आपली ओळख निर्माण करण्याचं. आजवर हजार राधाकृष्णाची चित्रं बघितली असतील पण कोणतं कोण्या चित्रकाराचं हे सांगू शकणार नाहीत. पण एकदा गायतोंडे बघितलेला, समजलेला माणूस गायतोंडे सांगण्यास चुकणार नाही.

असेच संगिताबद्दलही, अमूक एक वाद्यच इथे का वापरले, ही सतार आहे की तंबोरा अशा शास्त्रिय तांत्रिकतेत घुसण्यापेक्षा मनावर झालेला परिणाम अनुभवा. सारंगीच्या सुरांनी मन हळवं होतं, कुठला निषाद, कुठला पंचम ह्या चौकशा केल्याने नाही. रेहमानपासून शंकर-एहसान-लॉय, आरडी, शंकरजयकिशन, अजय अतुल यांच्या पर्यंत सगळ्यांच्या संगितामधे एक सिग्नेचर आहे. अगदी हिमेश रेशमियांही त्याच्या शैलीची छाप त्याच्या संगितावर सोडून जातो. ती तेव्हाच येते जेव्हा कलाकार स्वत्व ओतत असतो. कुणाची कॉपी मारली की अनु मलिक आणि प्रीतमशीवाय काही होत नाही."


प्रतिमेच्या चपखलपणावर टिका करण्याचे रसिकाचे स्वातंत्र्य
चपखलपणा हा एक विवादित भाग आहे. कारण हाच कलेचा मूळ आत्मा आहे. ते कसे? ते चित्रपट दिग्दर्शनात बरेचदा दिसते. एखादी व्यक्तिरेखा क्रूर आहे असे दाखवण्याचे प्रत्येक दिग्दर्शकाचे प्रयत्न वेगळे असू शकतात. तो प्रयत्न चपखल आहे की नाही याबद्दल खुद्द दिग्दर्शक, रसिक यांची मते आपआपल्या संस्कार मान्यतेनुसार वेगवेगळी असू शकतात. उदा. नवाजुद्दिन सिद्दिकीला मला क्रूर दाखवायचे आहे तर तो थंड चेहर्‍याने एकानंतर एक कोंबड्या कापत जात आहे असे दृश्य दाखवेल. पण रोज कोंबड्या कापणार्‍याला त्यात काही क्रौर्य आहे असे वाटणारच नाही. इथे चपखलपणाबद्दल मतभिन्नता येते. दुसरे उदा: पूर्वी नायक-नायिकांचे प्रत्यक्ष चुंबन दाखवण्याऐवजी दोन फुले एकत्र येतांना दाखवत असत. त्याकाळात तेही अमूर्त रोमांटीक असे. पण आज कुणी असा प्रयोग केला तर लोक रोमांटीक होण्याऐवजी हसतात. तीच प्रतिमा, तेच प्रतिक, तीच क्रिया काळ बदलला तर त्याचे 'चपखल असणे' सुसंगत राहत नाही. 'असे धडधड घर पेटलेले' ह्या शब्दांमधुन वाचणार्‍याच्या मनात तो ज्या घरात राहतो 'त्यासारख्या' घरांच्या जळण्याची दृश्ये उभी राहतील. दु:खद प्रसंग आठवतील. करूण रस उचंबळून येईल. पण कवीला ही प्रतिमा नकोय, त्याने स्पष्ट केले रसिकांनो मी हे निघून गेलेल्या चिमण्यांच्या जुन्या घरट्यांबद्दल बोलत होतो. तर तिथे एक भ्रमनिरास होऊ शकतो.

असे का होते?

मनाच्या संस्काराच्या गाभार्‍यात काही प्रतिमा काही गोष्टींशी घट्ट चिकटलेल्या असतात. नकळत. त्याची एक चौकट असते. त्यातच माणूस विचार करू शकतो. आजवर उपलब्ध असलेल्या प्रतिमा-भावना संकलनातून फिट बसेल अशी निवडून प्रत्येक समोर येणार्‍या वस्तूला लावली जाते, ती फिट नसेल तर एलियन समजून नाकारली जाते व तीच वस्तू एक प्रतिमा बनून मेंदूत संरक्षित केली जाते पुढच्या तशाच असणार्‍या वस्तू ओळखण्यासाठी. आंबा म्हणून कोणी लाल ज्यूस हातात देईल तर तुम्ही मानणारच नाही. कारण ते जाणीवेच्या संग्रहातल्या प्रतिमेशी जुळत नाही. ती 'चपखल' बसत नाही. मग देणारा म्हणेल अरे ह्यात मी अमुक एक रंग टाकलाय तेव्हा विशिष्ट रंगासहित आंब्याचा रस अशी नवी प्रतिमा संग्रहीत केली जाईल. पुढे कधी लाल ज्युस समोर आला तर तो आंब्याचाही असू शकतो असा विचार आपलं अंतर्मन करेल.

त्यामुळे अगदी सुस्पष्ट असल्याशिवाय कवीने स्वतः प्रतिमांच्या स्पष्टीकरणाच्या फंदात पडू नये. कारण एकदा त्याची साइड ओपन झाली की सामना सुरु होतो. कविता, कवी आणि रसिक. तो टाळलेलाच बरा.