शुक्रवार, २८ मे, २०२१

 

येत्या वीस वर्षांसाठी काही भाकिते

1. येत्या वीस वर्षांत सरकारी नोकरीला काही अर्थ राहणार नाही, महत्त्वाची मलिदा खाऊ पदे सोडली तर सगळंच्या सगळं औटसोर्स होणार आहे, अगदी लष्करात सुद्धा होत आहे. म्हणजे सरकारचे खाजगीकरण वाऱ्याच्या वेगाने सुरु आहे.

2. आजच्या सर्व पारंपरिक शिक्षणसंस्था, इर्रीलिव्हेण्ट होणार आहेत. कारण कामाचे स्वरूप इंडस्ट्रीनुसार बदलत आहे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये स्पेशलायज ज्ञानाची कौशल्याची गरज भासत आहे. उद्योगांना स्वतः चे कर्मचारी स्वतःच्या स्पेशल गरजेनुसार स्वतः प्रशिक्षित करून घ्यावे लागतील.

3. नव्या प्रकारच्या शिक्षणसंस्थांचा उदय निश्चित आहे, ज्यात शिक्षण प्रचंड महाग असेल, कोणालाही कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. ह्या संस्था पूर्ण नफ्यासाठीच चालविल्या जातील.

4. शहरीकरण, खेडी सोडून शहरात येण्याचे प्रमाण भयंकर वेगाने वाढणार आहे. सर्व टायर टू आणि टायर थ्री शहरांना मोठ्या लोकसंख्येसाठी तयारीत राहावे लागणारच आहे. शहरात राहणे त्यामुळे गावपेक्षा सुखाचे असेल असे नाही, शहरात चौपट मेहनत व एकपट मेहनताना मिळेल, कारण कामगारांची प्रचंड उपलब्धता. ह्यातून व्हाइट ब्लु कोणतीही कॉलर सुटणार नाही.

5. व्यवसाय उद्योग क्षेत्रात नव्याने शिरणाऱ्या लोकांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागेल. नेहमीचेच व्यवसाय उद्योग असतील तर प्रस्थापितांकडून स्पर्धा, अडवणूक होणार, त्याला तोंड देऊन व्यवसाय उभा करणे कठीण असेल. प्रचलित पद्धतींपेक्षा अगदी नव्या पद्धतीने किंवा नवीनच प्रकारचा व्यवसाय करणाऱ्याला यश मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही प्रकार दुर्मिळ असतात.

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

सेंट बर्नाडची गोष्ट.

आल्प्स बर्फाच्छादित पर्वतांमध्ये, समुद्रसपाटीपासून सुमारे आठ हजार फूट उंचीवर इटलीला स्विझ्झरलंडशी जोडणारा एक घाटरस्ता आहे. ह्याचा वापर तसे म्हटले तर ताम्रयुगापासून सुरु आहे असे म्हणतात. ह्या घाटरस्त्यावर वाटसरुंची ये-जा हजारो वर्षे चालू आहे असे समजा. तुफान थंडी आणि हिमवर्षावातही इथली वाहतूक काही बंद होत नसायची. प्रवास करण्याची प्रचंड गरज असणारे वाटसरु इथल्या जीवघेण्या हवामानात अडकून पडायचे. त्यांचे हाल पाहून सेंट बर्नाड ह्यांनी अकराव्या शतकात इथे धर्मशाळा सुरु केली. बर्फात अडकलेल्या, वाट चुकलेल्या, उपाशी-थकलेल्या वाटसरुंना ही धर्मशाळा म्हणजे जगण्याची अनमोल आशाच.

साधारण पंधराव्या शतकाच्या सुमारास ह्या मदतकार्याचा भाग उचलायला इथल्या धर्मसेवकांच्या जोडीला कुत्रे पाळण्यात येऊ लागले. त्यांना ह्या कामासाठी खास तयार करण्यात आले. बर्फातून वास घेत माणसे हुडकणे, त्यांना आपल्या शरिराची उब देऊन शुद्धीवर आणणे, खेचत घेऊन धर्मशाळेत आणणे, धर्मसेवकांना कुठे माणसे सापडली तिकडे घेऊन जाणे अशी कामे ही कुत्री करु लागली. पुढे ह्या कुत्र्यांना कोणतेही रितसर ट्रेनिंग द्यायाची गरज उरली नाही. इतर मोठ्या कुत्र्यांकडून शिकत बचावकार्याचे काम नविन कुत्री करु लागली. बचावकार्याच्या बाबतीत ही कुत्री अगदी प्रो-अ‍ॅक्टीव, म्हणजे 'जा रे, शोध रे, पळ रे, आण रे' वगैरे सांगायची काही गरज नाही. अंधार पडू लागला की निघायचे आपले जमीनीला, अर्थात बर्फाला नाक लावून हुंगत हुंगत..सोबत गळ्यात एक छोटासा बॅरल, ज्यामधून वाटसरुंना ऊब मिळावी म्हणून ब्रँडी उपलब्ध असते. कुठे माणसाचा वास आला की काढ त्याला बर्फाच्या ढिगार्‍याखालून बाहेर, असे सगळे...

ह्यात 'बॅरी' नावाचा कुत्रा फारच प्रसिद्ध झाला. ह्याने एकट्याने शंभरच्या वर वाटसरुंचे प्राण वाचवल्याच्या शूर कहाण्या आल्पसच्या दर्‍याखोर्‍यांतून थंड वार्‍यांवर फिरत असतात.

सेंट बर्नाड धर्मशाळेवरुनच ह्या कुत्र्यांना नाव दिले गेले सेंट बर्नाड. तेच ते गोंडस गोजिरे दिसणारे धिप्पाड उंच कुत्रे.

सेंट बर्नाड जातीच्या कुत्र्यांची ही कुळकथा....



भारतात ह्यांची किंमत तीस ते चाळीस हजार रुपयांच्या आसपास आहे. विकत घेणारे पैसे देऊन सेंट बर्नाड घेऊ शकतात. पण त्याच्यासाठी लागणारे आल्प्सच्या बर्फाच्छादित पर्वतराजींमधले वातावरण विकत घेऊ शकत नाही. मग आपल्या हौसेपोटी ह्या दिलदार जीवावर मनमर्जी अत्याचार होतात.

शून्याच्या कितीतरी खाली राहण्यासाठीच जन्म झालेल्या ह्या धिप्पाड कुत्र्यांची भारतात काय अवस्था होत असेल ह्याचा विचार ह्या कुत्र्यांचे मालक करत नाहीत. भारताच्या वातावरणात सेंट बर्नाड पूर्ण आयुष्य जगू शकत नाहीत. त्यांना विविध आजार होतात, उत्तरोत्तर ते खंगत जातात. त्यांचा मेंटेनन्स खूप नाजूक आहे, किती मालक सुरुवातीचा उत्साह टिकवून ठेवू शकतात हा प्रश्नच आहे.

चार पैसे कमवल्याची प्रसिद्धी करण्यासाठी आणि भुक्कड हायसोसायटी स्टेटससाठी माणूस त्याच कुत्र्याचा जीव धोक्यात घालतो, ज्या कुत्र्यांनी माणसाचा जीव वाचावा म्हणून आपले प्राण पणाला लावले.....

 


मूर्तिमंत स्वातंत्र्य

 

आपण 'लिबरेशन' म्हणजे 'मुक्ती' कशाला म्हणतो हे बर्‍याचदा आपल्या दृष्टीकोनावरच अवलंबून असते. अनेकदा तर इतर लोक काय म्हणतात, काय लिहितात, कशावर चर्चा होतात ह्यावर मुक्तीचा अर्थ आपण ठरवतो.

स्त्रीमुक्ती म्हटले तर बहुतांशवेळा आपल्यासमोर लैंगिक भेदभाव, जाचक प्रथापरंपरा आणि सामाजिक बंधने येतात. थोडा वेगळा विचार करायचा तर स्त्रीमुक्तीच्या संदर्भाने गर्भनिरोधक गोळ्या, गर्भपाताची सुरक्षित साधने, मासिक पाळीसाठी वापरायचे पॅड्स, टॅम्पुन्स, कप्स, इत्यादी वस्तूंनी खूप मोठी क्रांती केलेली आहे. 'कायम मुलांनी वेढलेली गर्भवती स्त्री' ह्या अवस्थेतून सुटका करुन खर्‍या मुक्तीचे आयुष्य प्रत्यक्ष मिळवून देणार्‍या वरील वस्तू स्त्रियांसाठी खूप महत्त्वाच्या ठरल्या. समाजसुधारकांच्या चळवळींसोबतच, ह्या वस्तूंनी स्त्रीला खरेखुरे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी परिस्थिती उपलब्ध करुन दिली. पण ह्याकडे आपले फारसे लक्ष नसते.

भारतात आणखी एका वस्तूने स्त्रीला मदत केली आहे. ती म्हणजे स्कूटी. पूर्वीपासून गिअरवाल्या मोटरबाईकला एक पुरुषी प्रतिमा चिकटली गेली होती. त्याचे कारण म्हणजे राजदूत, बुलेट, यझदी, जावा सारख्या हेवीवेट बाइक्स चालवणे तांत्रिक कौशल्य आणि ताकदीचे, मुख्य म्हणजे फार कटकटीचे काम असे. त्यामुळे अत्यंत इच्छा असून, चालवता येत असून आपल्याला जमेल का, लोक काय म्हणतील, बरं दिसते का ते इत्यादी प्रश्नांमुळे स्त्रिया घराबाहेर स्वतंत्रपणे फिरत नसत. अगदी बजाजच्या स्कूटर असल्या तरी त्या नोकरीदार पुरुषांसाठीच असतात असा समज. म्हणजे बाहेर कुठे जायचे तर घरातल्या पुरुषांवर अवलंबुन राहावे लागे. किंवा बसेस, शेअररिक्षां इत्यादी सार्वजनिक प्रवाससाधनांमधून अनोळखी पुरुषांचे सहेतुक घाणेरडे स्पर्श सहन करत जावे लागे. बहुतांश शहरात तर ह्या सुविधा केवळ मुख्यरस्त्यांपुरत्याच मर्यादित असतात. अशा सर्व परिस्थितींमुळे स्त्री घरात कोंडली गेलेली होती. भले ती कितीही मॉडर्न विचारांची असू द्या, घरात कितीही मोकळे वातावरण असू द्या, तिला नोकरी असू द्या. पण प्रवास मात्र सतत दुसर्‍या कोणावर तरी अवलंबून असलेला. ९०च्या दशकापर्यंत आपण बाईक किंवा स्कूटरवर नवरा-बायको किंवा सगळे बच्चाकंपनी, लटांबर घेऊन निघालेले दांपत्य पाहत आलो आहोत. एकटीदुकटी स्त्री कोण्या बाईकवर स्कूटरवर जातांना दिसणे हीच एक न्यूज असायची. स्वतःच्या मनाने पाहिजे तेव्हा, पाहिजे तिकडे, पाहिजे तितका प्रवास करायचा हे भारतीय स्त्रियांसाठी दिवास्वप्नच होते.

ह्या शतकानुशतकाच्या घट्ट परावलंबीत्वाला मुळासकट गदागदा हलवून उखडण्याचे काम केले स्कुटी नावाच्या एका क्षुद्र भासणार्‍या एका छोट्याशा स्कूटरेटने. अस्सल भारतीय कंपनी असलेल्या टीव्हीएसने १९९४ साली पहिल्यांदा स्कूटी लाँच केली. त्याआधी बजाजची सनी नावाची छोटी मोपेड होती, लुनाही होती. पण त्यांना स्त्रीयांमध्ये तेवढा उठाव नव्हता. नोकरीवर जाणार्‍या स्त्रियाच फारतर लुना वापरत असत. लुना-सनी ह्यांची फार क्षमताही नव्हती. पण स्कूटीने मात्र मोठे मार्केट खुले केले. लुना-सनीपेक्षा जास्त क्षमता, सामान ठेवायची जागा, चालवण्यातला सोपेपणा, सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिसण्यातला वेगळेपणा ह्या सर्व गुणांमुळे महिलावर्गात स्कूटी अतिशय लोकप्रिय झाली. लाँच केल्यानंतरच्या दोन वर्षांतच टीव्हीएसकंपनीला हे लक्षात आले आणि त्यांनी मग स्कूटीला खास महिलावर्गासाठीच प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. त्यामुळे खास महिलांसाठीच्या स्कूटर्सचे एक पर्व सुरु झाले. नंतर अ‍ॅक्टीवाने मोठा धमाका केला. महिलांच्या गाड्या ही एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

या गाड्यांनी शहरी, नीमशहरी, तालुकास्तरातल्या करोडो भारतीय स्त्रियांचे जीवन आमुलाग्र बदलले. अधिकाधिक मुली स्वतःच्या स्वतः ट्युशन्सला जाऊ लागल्या, कॉलेजात जाऊ लागल्या, ऑफिसात नोकर्‍या करु लागल्या. छोटेमोठे उद्योग करु लागल्या. दूरच्या बाजारात खरेदी करायला, एकमेकांना भेटायला, सणासमारंभाला, अशा अनेक कारणांसाठी त्या घराबाहेर पडू लागल्या. आता त्यांना लोक काय म्हणतील ह्याची पर्वा नव्हती.

खरे स्वातंत्र्य, खरी मुक्ती तीच जी प्रत्यक्ष अनुभवता येते. जिच्यामुळे आयुष्यात स्पष्टपणे बदल दिसून येतो. स्कूटरेट्स आणि मोपेड्स ने महिलावर्गाला मोबिलायझेशनची सुविधा दिली ती ह्या खर्‍या मुक्तीच्या अनेको उदाहरणांतली एक आहे.

मला तरी स्त्रियांच्या हातात असलेल्या स्कूटरेट्सच्या रुपात मूर्तिमंत स्वातंत्र्य दिसून येते. समाज बदलेल न बदलेल, पण सध्यातरी समाजमनाच्या छाताडावरुन ह्या करोडो भगिनी आपल्या गाड्या घेऊन 'स्त्रियांनी घराबाहेर पडू नये' अशा धारणांना तुडवत जात आहेत असे समाधानकारक चित्र आहे.

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

डिस्काउंट प्राइसटॅग : अँकरिंग बायस चा संसार

 

राहुल आपल्या बाबांबरोबर धावण्याचे शूज विकत घ्यायला बाजारात गेला. बडया शोरूममध्ये जाऊनच खरेदी करायची असा हट्ट धरून बसला. तेव्हा वडिलांना दुसरा पर्याय उरला नाही, त्याच्या हट्टाखातर दोघे एका बड्या ब्रँडच्या फॅक्टरीआउट्लेटमध्ये शिरले. तिथे गेल्यावर एक एक शूज ची चाचपणी सुरु झाली. तिथल्या किमती बघून आधीच बाबाच्या कपाळावर रेषा उमटू लागल्या होत्या. राहुलला मात्र एक शूज चांगला पायाला बसला आणि त्याला तो आवडला देखील. त्याच्या कोणत्याच मित्राकडे तसे शूज नव्हते. किंमत मात्र जरा तगडी होती. दहा हजार रुपये! बाबांनी मान्य करण्याचा विषयच नाही हे राहूलला देखील माहित होते. तो थोडा हिरमुसला झाला होताच. त्याचा उतरलेला चेहरा पाहून जवळच असलेला सेल्समन पुढे आला आणि म्हणाला की "ह्या शूजवर स्पेशल डिस्काउंट सुरु आहे ६० टक्के! म्हणजे हे शूज आपल्याला फक्त चार हजारात मिळतील." ते ऐकून राहूल प्रचंड आनंदला. बाबांना म्हणाला, "बाबा, बघा आपले पूर्ण सहा हजार रुपये वाचत आहेत. आपण हेच शूज घेऊयात." सहा हजाराची घसघशीत सेव्हिंग होऊन आपल्या दहा हजाराचे शूज फक्त चार हजारात मिळत आहेत ह्या विचारांनी राहूलला फारच आनंद झाला होता. त्याच्या दृष्टीने तो दहा हजाराचे शूज घालू शकणार होता, आणि तेही फक्त चार हजार रुपये देऊन! अजून काय पाहिजे.

परंतु राहूलच्या बाबांच्या मनात वेगळीच गणिते सुरु होती. त्यांनी त्यांच्या तारुण्यात, म्हणजे ते राहुलएवढे होते तेव्हा, कधीही पाचशे ते सहाशे रुपयांच्या पेक्षा जास्त पैसे अशा रनिंग शूजवर खर्च केले नव्हते. आता हे चार हजार रुपयांचे शूज म्हणजे त्यांना प्रचंड महाग वाटत होते. कुठे पाचशे आणि कुठे चार हजार! चार हजाराचे कुठे शूज असतात का? शूज साठी इतके पैसे कसे खर्च करायचे - राहुलच्या बाबांच्या डोक्यात हे विचार सुरु होते.

दोन व्यक्तींवर एकाच घटनेचे हे दोन परिणाम कशाचे चिन्ह आहे? तर हे आहे अ‍ॅन्करिंग बायसचे उदाहरण.

अ‍ॅन्करिंग बायस म्हणजे सर्वात आधी ऐकलेला आकडा किंवा घटना ही आधारभूत मानणे व पुढचे व्यवहार त्यावर आधारित ठेवणे. इथे वरच्या प्रकरणात राहूलने दहा हजार ही शूजची किंमत अँकरिंग किंमत मानली. तर त्याच्या वडिलांसाठी पाचशे रुपये ही शूजची किंमत अँकरिंग किंमत होती. दोघेही आपआपल्या अँकरिंग किंमतीनुसार निर्णय घेत होते. त्या शूजची खरी किंमत त्या दोन्हीपैकी कोणतीही नव्हती. ती चारच हजार रुपये होती. परंतु राहुलला आपण सहा हजार वाचवतोय असे वाटत होते तर बाबांना आपण साडेतीन हजार जास्त देतोय असे वाटत होते.

प्राइस निगोशिएशन करतांना केव्हाही जो पहिली किंमत सांगतो त्याचेच पूर्ण संवादावर नियंत्रण राहते. कारण पहिली किंमत हीच आधारभूत किंमत ठरते. समजा तुम्ही एखादी जुनी गाडी विकत घ्यायला गेलात आणि त्या गाडीच्या तत्सम मॉडेलचा सेकंड मार्केटमध्ये नक्की काय भाव आहे हे माहित नसेल (म्हणजेच कोणतीही अँकरिंग प्राइस तुमच्याकडे नसेल) तर गाडीमालक जी काही किंमत सांगेन त्यानुसार घासाघिस होते. जर गाडीमालक हुशार असेल आणि त्याने आधीच ठरवले असेल की मला ही कार चार लाखालाच विकायची आहे तर घासाघिस होणार हे आधीच समजून घेऊन तो गाडीची किंमत सहा लाख सांगतो. आता कितीही पट्टीचा घासाघिसवाला असेल तरी तो चार लाखाच्या खाली आपली बोली लावू शकत नाही. भले पाच सांगेल. पण त्याला कधीही कळणार नाही की गाडीमालकाला ही गाडी चारला विकली तरी चालणार आहे. परंतु तिथेच तुम्ही तीन लाखाचा फिक्स बजेट घेऊन गेलात किंवा तशाच प्रकारच्या गाड्यांना मार्केटम्ध्ये काय किंमत मिळते हे तुम्ही आधीच चौकशी करुन गेलात तर तुमच्याकडे तुमची स्वतःची एक अँकरिंग प्राइस राहते जी घासाघीस करतांना उपयोगी पडते. 

बाजारात खरेदी करतांना अमूक टक्के डिस्काउंट तमूक वस्तू फ्री, चार साबणाच्या किंमतीत पाच साबण अशा ऑफर्स जेव्हा आपण बघतो तेव्हा विक्रेत्याचा हाच अँकरिंग प्राइसचा माइंडगेम सुरु असतो. १०० रुपयांची वस्तू ८० ला ७० ला मिळत असेल तर ग्राहकाला ते वीस तीस रुपये वाचल्यासारखे वाटतात आणि १०० रुपयांची वस्तू आपल्याला ७० मध्ये मिळाली ह्याचा आनंद होतो. परंतु मुळात ती वस्तू विक्रेत्याला ७० लाच विकायची अस्ते, त्याची खरी विक्रीकिंमत सत्तरच असते. आता ग्राहकांना ही चालूगिरी समजत नाही का असे तुम्हाला वाटेल. ते कसे काय फसतात असे ही तुम्हाला वाटेल. आपण स्वतःच कितीवेळा असे गंडलो गेलोय हेही आठवले असेल. परंतु ह्याच फसल्या गेल्यासारखे काही नाही. आपला मेंदूच आपल्याला अशा गोष्टी करायला भाग पाडतो. ग्राहकांनाच हे सगळे आवडते. हे नसेल तर ग्राहकांना खरेदी करण्यात काही मजा येत नाही. ते स्वतःहून फसायला तयार होतात! नाही पटत?

एक प्रत्यक्ष उदाहरणच देतो. जेसीपेनी JC Penney हा अमेरिकेतला प्रख्यात आणि प्रचंड मोठा डिपार्टमेंट स्टोअरचा ब्रँड आहे, आता आहे म्हणण्यापेक्षा होता असे म्हणावे लागणार आहे. कारण उत्साहाच्या भरात बेसिक्स विसरल्यामुळे त्यांच्या सीइओने कंपनीची कायमस्वरुपी वाट लावून ठेवली.

झाले असे की, जेसीपेनी नेहमीप्रमाणे प्रचंड डिस्काउंट, वेगवेगळ्या ऑफर्स, सणासुदीच्या डील्स ह्याद्वारे ग्राहकांना आकर्षित करत होते. सर्व सुशेगात चालले होते. तशात सीइओ रॉन जॉन्सनला असे वाटले की आपण हे ग्राहकांना उल्लू बनवतोय हे काही योग्य नाही. अ‍ॅपलसारख्या बड्या ब्रँड्सच्या कुठे ऑफर्स आणि डिस्काउंट असतात, चला आपण पण तसेच करुया. एकच फिक्स प्राईस आणि कोणतेही कुपन, डिस्काउंट ऑफर वगैरे काही नाही. जे काही आहे ते प्रामाणिक आणि पारदर्शी. त्याला वाटले की ह्या प्रामाणिकपणाला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळेल. 

परंतु झाले उलटेच. जेसीपेनीचे नेहमीचे ग्राहक ह्या नव्या पारदर्शी आणि प्रामाणिक किंमतींना भुलले नाहीत तर चक्क टाळू लागले. अचानक स्टोअर्सचा सेल घटला आणि कित्येक स्टोअर्स बंद करावे लागले. हे का होते आहे व त्यावर उपाय काय हे शोधेपर्यंत कंपनी पार बुडाला लागली. तोवर अ‍ॅमेझॉन आणि इतर ऑनलाईन कंपन्यांनी वारेमाप डिस्काउंट देऊन ग्राहक आपल्याकडे वळवणे सुरु केलेही होते. ह्याचा दुहेरी फटका बसून जेसीपेनी जी खचली ती कित्येक क्लृप्त्या वापरुन जाहिरातबाजी करुनही आपल्या पूर्वीच्या वैभवास काही पोचू शकलेली नाही.

हे असे का झाले? तर जेव्हा ऑफर किंवा डिस्काउंट प्राइसटॅग वर ग्राहक बघतो तेव्हा त्याला विक्रेत्याची विकण्याची गरज आहे असे वाटते, म्हणजे विक्रेता याचकाच्या भूमिकेत दिसतो. त्याला परवडत नसूनही तो कमी किंमतीला द्यायला आपल्यासाठी तयार झाला हे पाहून मनाला बरे वाटते. तसेच अमूक वस्तू मुळात इतक्या किंमतीची असूनही आपल्या अमूक इतक्या टक्क्यांनी स्वस्त मिळते आहे म्हणजे आपण किती हुशार आहोत, नशिबवान आहोत, चाणाक्ष आणि चतुर आहोत असा भास मनाला होतो. आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन एक चांगली डिल जिंकली आहे असे ग्राहकाला वाटत असते. % ह्या चिन्हाच्या आड ग्राहकाच्या मनात इतके सारे काही घडत असते. ग्राहकाला सातत्याने आपणच जिंकले पाहिजे असे वाटत असते. खरेदी-घासाघीस ह्या सर्वात एक प्रकारची नशा असते, ती ग्राहकाला मिळू दिली तर विक्रेत्याचाच अंतिम फायदा असतो. हे विक्रेत्यांनी ओळखलेले असते. म्हणून कित्येक वर्षे झाली तरी आणि मूळ किंमत काय आहे हे माहित असले तरी अजूनही डिस्काउंट आणि ऑफर्स ह्या शब्दाला ग्राहक भुलतात.

त्तर मानवी मनाला वेगळ्याच प्रकारे विचार करायला लावुन वस्तू विकत घ्यायला भाग पाडणारा असा सगळा अँकरिंग बायस चा संसार आहे. ह्या बायसपासुन ग्राहक म्हणून सुरक्षित राहायचे असेल तर काही गोष्टी कराव्यात. सर्वात प्रथम, भरपूर चौकशी करणे, माहिती काढणे आणि वेगवेगळ्या ठिकाणी किंमती आणि दर्जा शोधणे. त्यासोबतच आपण आपला बजेट आणि खरेदीची यादी बाजारात जाण्याआधी घरीच संपूर्ण विचारांती तयार करुन ठेवणे व त्याबरहुकूमच खरेदी करणे. समोरासमोर घासाघिस चालू असतांना विक्रेत्याचा डोळ्यात डोळे घालून त्याची खरी 'इच्छित' किंमत काय असावी ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणे. अर्थात हे सरावाचे काम आहे व विक्रेतेही काही कच्च्या गुरुचे चेले नसल्याने जरा सुरुवातीला अवघड जाऊ शकते. अशा तर्‍हेने चांगल्या डिल्स खरोखर पदरात पडू शकतात व अनावश्यक ठिकाणी केवळ डिस्कांऊट आहे म्हणून खरेदी करुन पैसा उगाच घालवला जात नाही. अनेकदा तर केवळ ५०% सूट आहे म्हणून आपण काही वस्तू विकत घेऊन येतो आणि आयुष्यात कधीच त्याचा वापर करत नाही. जरा सजग राहिले तर अशा निर्णयांपासून आपण स्वतःला दूर ठेवून पैसा वाचवू शकतो.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि हो आपल्या मित्रपरिवारात हे पेज नक्की शेअर करा.

Copyright@
Sandeep Dange,
Brand and Marketing Consultant.
Whatsapp: 7447844478

(This article is property of Mr. Sandeep Dange, Nashik. Copying and Distributing this article without author's name is serious legal offense and punishable under Indian Copyright Act)

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

राइटब्रेन-लेफ्टब्रेन

 

काही प्रथितयश आणि आपल्या कामात सर्वोत्तम असलेले डॉक्टर्स आणि इंजिनियर्स चित्रकला, नाट्यकला, गायन-अभिनय-नृत्य-लेखन इत्यादी कलांमध्येही कसे काय निपुण असतात हा मला बर्‍याच वर्षांपासून पडलेला प्रश्न होता. त्याला कारण म्हणजे एक तर हे की विज्ञान-गणित ह्या क्षेत्रांमध्ये काम करणारे प्रचंड हुशार वगैरे असतात आणि कला क्षेत्रातले तेवढे काही हुशार नसतात, अभ्यासात ढ असतात असा समज सर्वसाधारणपणे गेल्या कैक वर्षांपासून जनसामान्यांत पसरलेला आहे. त्यानंतर मागच्या काही वर्षांत पुढे आले की माणसाचा उजवा मेंदू हा सृजनात्मक आणि कलेशी संबंधित कामांमध्ये चांगला असतो आणि डावा मेंदू हा विश्लेषणात्मक, गणिती कामांत उत्तम असतो. त्यामुळे जी माणसे कलाकार असतात त्यांचा उजवा मेंदू जास्त प्रभावशाली असतो आणि गणितज्ञ-अभियंता-वैद्यक यांचा डावा मेंदू प्रभावशाली असतो. त्यामुळे व्यक्तीवर डाव्या किंवा उजव्या मेंदूचे प्रभुत्व असते व त्यानुसार त्यांची विचारशैली, आकलन आणि इतर क्षमता विकसित झालेल्या असतात. कलाकार व्यक्ती ही अभियंत्यापेक्षा वेगळ्या मेंदूची असते आणि गणितज्ञ हा कलेच्या बाबतीत ढ असतो असे काहीसे अति करणारे समज समाजात आहेत. ह्यानुसार शाळांमधून, शैक्षणिक संस्थांमधून आणि समुपदेशकांमधूनही ह्याच समजाच्या आधारावर विद्यार्थ्यांचे आकलन व मार्गदर्शन केले जात आहे.

पण गेल्या काही वर्षांत माझ्या वाचनात काही तुटक तुटक संदर्भ येऊ लागले. तेव्हा समजू लागले की कला आणि गणित हे साधारण एकाच स्वरुपाचे शास्त्र आहे. गणितज्ञाचा मेंदू ज्या प्रकारे एखाद्या समस्येचे आकलन करुन गणित सोडवतो त्याच प्रकारे कलाकाराचा मेंदू एखादी कलाकृती साकार करत असतो. गणित हा एक कलेतलाच भाग आहे हेही समोर येऊ लागले. अनेक गणितज्ञांनी कलेच्या प्रांतात काम केले आहे ही माहितीसुद्धा मिळाली. त्यापैकी लिओनार्दो दा विंची हा गणितज्ञ, शास्त्रज्ञ, संशोधक आणि कलाकार असामी एक गाजलेले नाव आहे. अनेक शास्त्रज्ञ, अभियंते आणि डॉक्टर्स कलेच्या प्रांतात नुसती मुशाफिरी करत नाहीत तर नाव गाजवून आहेत हेही आपल्याला माहिती आहे.

अशावेळी मला प्रश्न पडला होताच की हे मेंदूचं डावे-उजवेपण प्रकार काही योग्य वाटत नाहीये. आता हा लेख लिहिण्याला कारण असे की परवाच एक लेक्चर ऐकत असतांना कळले की डावा मेंदू विरुद्ध उजवा मेंदू आणि कला विरुद्ध सांख्यिकी-विश्लेषण अशी विभागणी करणारा समज एका विस्तृत संशोधनाच्या आधारे मोडीत काढण्यात आला आहे. मग मात्र माझ्या अंदाजाला ठाम पुष्टी मिळाली. जेअर्ड निल्सन आणि त्यांच्या चमूने ७ वर्षे ते २९ वर्षे वयोगटातल्या सुमारे एक हजार व्यक्तिंच्या मेंदूंच्या वेगवेगळ्या भागांवर प्रयोग करुन हा निष्कर्ष काढला की लेफ्ट-ब्रेन-डॉमिनंट किंवा राइट-ब्रेन-डॉमिनंट असे काहीही नसते. आपला मेंदू तसा बराच गुंतागुंतीवाला मामला आहे.

डावा मेंदू हा समस्यानिवारण, भाषा आणि संवादाच्या दृष्टीने काम करतो तर उजवा मेंदू दृश्यात्मक बाबतीत काम करतो. ह्या दोहोंच्या मध्ये एक संदेशवहनाच्या पुलाचे काम करणारी एक मज्जातंतूंची वाहिनी असते जिच्या आधारे दोन्ही मेंदूंच्या संयुक्त विद्यमाने आपले रोजचे काम चालू राहत असते. ह्यासंदर्भात नोबेल विजेते रॉजर स्पॅरी यांनी १९५० मध्ये एक वेगळाच प्रयोग केला होता. अपस्मार म्हणजे फेफर्‍यांच्या रुग्णांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करुन त्यांच्या दोन्ही मेंदूंना जोडणारी मज्जातंतूंची वाहिनी काढून टाकली जात असे. ह्याने त्या रुग्णांना आपले जीवन सामान्यपणे जगण्यास मदत होत असे. अशा रुग्णांच्या दोन्ही मेंदूंमध्ये कोणताही संपर्क नसला तरी त्यांना फारसा काही त्रास होत नसे.
 
 
 
ह्या अवस्थेचा उपयोग करावा असा ठरवून रॉजर स्पॅरी यांनी केवळ उजव्या मेंदूलाच किंवा डाव्या मेंदूलाच वेगवेगळी सूचना जाईल अशा पद्धती शोधून काढल्या. त्यानंतर त्याचा वापर करुन काही प्रयोग करण्यात आले. ह्यात रुग्णाला दोन वेगवेगळी चित्रे दाखवण्यात येत असत आणि त्या चित्राशी संबंधित उजव्या हाताला व डाव्या हाताला ठेवलेल्या प्रत्येकी चार चार कार्डमधून एक कार्ड निवडायला लागत असे.  दोन्ही मेंदू सर्व कार्ड्स बघू शकत असत. केलेल्या निवडीवर एखादा प्रश्न विचारुन त्यावर आलेल्या उत्तरानुसार निष्कर्ष काढण्यात येत असत. एका रुग्णाला डाव्या बाजूने बर्फवृष्टीचे चित्र दाखवले तर उजव्या बाजूने कोंबडीच्या पायाचे चित्र दाखवले. त्यानुसार उजव्या मेंदूने (जो शरिराचा डावा भाग नियंत्रित करतो) बर्फ हटवण्याचे फावडे निवडले तर डाव्या मेंदूने कोंबडीचे चित्र निवडले. त्यानंतर त्याला विचारण्यात आले की अशी निवड का केली तर तो म्हणाला की फावड्याने तो कोंबड्यांचे खुराडे साफ करणार आहे. आता ही भाषा वापरुन उत्तर देण्याची क्षमता डाव्या मेंदूकडेच असल्याने उजव्या मेंदूने ते फावडे का उचलले असावे ह्याचा डाव्या मेंदूला काही पत्ताच नव्हता. त्यामुळे डाव्या मेंदूला जे कोंबडीचे चित्र दिसत होते त्यानुसार त्याने उत्तर दिले कोंबडीचे खुराडे फावड्याने साफ करणार आहे. हे जरा समजायला किचकट वाटत असले तर कमेंटमध्ये दिलेल्या लिंक्स बघाव्यात.

ह्यावरुन असे लक्षात येते की आपण जे काही करतो, बोलतो त्यात दोन्ही मेंदूच्या क्षमतांचा वापर केला जात असतो. ह्यासंदर्भात ओशोंच्या 'अध्यात्म उपनिषदा'वर असलेल्या एका प्रवचनात वेगळाच उलगडा होतो. ओशो सांगतात की कोणत्याही वस्तूविषयासंदर्भात जगभरात सामान्यपणे सत्य आणि असत्य दोन बाजू असतात असे समजले जाते. पण आपले थोर भारतीय तत्त्वज्ञ इतके हुशार आहेत की त्यांनी एक तिसरी बाजू शोधून काढली ती म्हणजे 'मिथ्या'. मिथ्या म्हणजे जी पूर्णपणे असत्यही नाही आणि पूर्णपणे सत्यही नाही. ह्या दोहोंच्या अध्येमध्ये कुठेतरी आहे. ह्याचे उदाहरण देतांना त्यांनी सांगितले की समजा तुम्ही अंधार्‍या बोळीतून जात आहात आणि अचानक तुम्हाला एक भला मोठा साप रस्त्यात पसरलेला दिसतो. तुम्ही घाबरुन बाहेर धूम ठोकता. इतर लोक तुम्हाला विचारतात काय झाले? तेव्हा ते तुमच्या सांगण्यावरुन सापाला मारायला म्हणून लाठ्याकाठ्या, कंदिल घेऊन येतात. येऊन बघतात तो काय, तो काही सापबिप नाही, एक निर्जिव दोरखंड पडलेला आहे. लोक तुम्हाला वेड्यात काढतात. 'काय दोर बघून घाबरला?'. आता तुम्ही साप पाहिला हे तुमच्यासाठी सत्य असते, पण लोकांसाठी मात्र दोरखंड सत्य असतो. तुमचा साप त्यांच्यासाठी असत्य असतो पण दोरखंड तुमच्यासाठी असत्य असतो. आता हे झाले कसे काय? ह्याच डोळ्यांनी तर तुम्ही साप बघून धूम ठोकली होतीत. मग तो साप कसा काय खोटा असेल? तुमच्या डोळ्यांना साप दिसला होताच, तो खोटा नव्हता. भले तिथे दोरखंड असेल पण तुम्ही मात्र साप बघितला. तुमचा अनुभव खोटा नाही. तो साप 'मिथ्या' आहे. भास आहे. आता रॉजर स्पॅरी यांच्या प्रयोगातल्या निष्कर्षानुसार ओशो निर्देशित करत असलेला 'भास' कुठून उत्पन्न झाला ह्याचा आपण अंदाज लावू शकतो.

ओशोंनी सांगितलेले उदाहरण आणि दुभंगित-मेंदू रुग्णांचा अनुभव बघता आपण अशा निष्कर्षावर येऊ शकतो की मेंदूच्या दोन्ही भागांची काम करण्याची वेगवेगळी क्षमता ही आपल्या विचारप्रणाली आणि आकलनावर प्रभाव टाकत असते. त्यामुळेच जे दिसते ते का दिसते व जे वाटते ते का वाटते ह्याचे शंभर टक्के स्पष्टीकरण देणे शक्य होत नसते.

सरतेशेवटी जिथून हा लेख सुरु केला तिथेच येतो. पाब्लो पिकासोने म्हटल्याप्रमाणे प्रत्येक लहान मुलात एक कलाकार दडलेला असतो, पण मोठा होईपर्यंत तो टिकवून ठेवणे बहुतेकांना शक्य होत नाही. मलाही असेच वाटते की प्रत्येक व्यक्तीत एक कलाकार असतोच असतो. त्याला मुक्तपणे व्यक्त होऊ देणे जास्त महत्त्वाचे असते. शिक्षण संस्था, समुपदेशक आणि पालक यांनी मुलांच्या शिक्षण किंवा करिअरचा विचार करतांना राइटब्रेन-लेफ्टब्रेन असे सुलभीकरण करु नये किंवा कला आणि विज्ञान ह्या क्षेत्रांत सरसकट भेदभाव करु नये. दोन्ही क्षेत्रांत काम मिळवतांना बुद्धीचा-श्रमांचा कस लागत असतोच. दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांच्या बुद्धीत किंवा हुशारीत उजवे-डावे काही नसते.

लेख थोडा विस्कळीत वाटत असल्यास क्षमस्व, 
 
(Related links below)

- Sandeep Daange


https://archive.org/details/OADTM001ADHYATMUPNISHAD01HgKvalitet/OADTM008ADHYATM+UPNISHAD+-+08.amr


https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371%2Fjournal.pone.0071275&fbclid=IwAR1U3JmP_EbWBqTevrnqb4xUTvYt_AeS9cW78ZV68gwsITXTp7m0MV0FmXE

https://physics.weber.edu/carroll/honors/split_brain.htm?fbclid=IwAR3XQSsqcvys8RlSBtVD6fH-qPNQm3w2YaPpog0wbvBv7YHM8tvvRXPGKqc

https://www.creativitypost.com/article/no_youre_not_left_brained_or_right_brained?fbclid=IwAR0yQqvMGHySr5fKx7qEK_-LKI_BcIU6YTnjjCdubowvhQ8SFM2L-FHU9F0

https://www.psychologytoday.com/us/blog/brain-myths/201206/why-the-left-brain-right-brain-myth-will-probably-never-die?fbclid=IwAR2xQENozVWUaSA2R0R1NUlm8mtSZd8ntuCZDWSF72ml9LKrVYrBf32SSVg

http://thebrain.mcgill.ca/flash/capsules/experience_bleu06.html?fbclid=IwAR3xvVN1EILfycD1ns13muFWHOgCMlHCRn6gQuS1w0Fta6pkHpUAkoUZFK8

नवीन उद्योगाची कल्पना

सध्या एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या यशस्वी लोकांबद्दल माहिती गोळा करत आहे. प्रोजेक्ट यशस्वी महाराष्ट्रीयन माणसांबद्दल आहे. तर विषय तो नाही.

विषय असा आहे की यशस्वी उद्योजकांच्या कथा गेल्या काही काळापासून सातत्याने येत आहेत, योरस्टोरी, केनफोलियोज, आन्त्रप्रनरडॉटकॉम सारख्या वेबसाइट्स नव्याजुन्या उद्योजकांच्या कथा मांडत आहेत. अनेक सेमिनार्स होत आहेत त्यात उद्योजक होऊ इच्छिणार्‍या तरुणांना मार्गदर्शन केले जात आहे. (मी असा एकही सेमिनार प्रत्यक्ष बघितलेला नसल्याने अशा सेमिनार्समध्ये नेमके काय मार्गदर्शन होते हे माहित नाही) या सर्व माहितीच्या प्रदानात एक गोष्ट जाणवली, कदाचित सेमिनार्समध्येही तेच होत असावे. ती अशी की नवउद्योजकांना (ज्यांची कंपनी, फर्म अजून उभी राहायची आहे) यशस्वी लोकांच्या कथा केवळ सांगितल्या जातात. ते कसे कचर्‍यात होते आज कसे राजमहालात आहेत, कशी छोटी कामे करायचे, आज कसे हजारो कोटीचा व्यवसाय करत आहेत. ऑनलाइन कंपन्यांनी कसे एक वर्षात, दोन वर्षात अमुक इतक्या कोटींचे वॅल्युएशन मिळवले इत्यादी, इत्यादी.

हे जर मार्गदर्शन असेल तर या लोकांच्या मार्गदर्शनाच्या व्याख्येत गडबड आहे असे मला वाटते. आजवर जे यशस्वी झालेत, झुकरबर्ग, गेट्स, जॉब्स, मित्तल, जॅक मा, म्हणजे आज टॉप १०० श्रीमंत माणसे ज्यातली खरंच रॅग्स टु रिचेस झाली आहेत अशा उद्योजकांनी खरेच या प्रकारे मार्गदर्शन घेतले असेल काय? या लोकांनी कोणाच्या कथांमधून स्फूर्ती घेतली असेल? असे प्रश्न मला पडतात. अशा सेमिनार्समधून किती लोक यशस्वी उद्योजक झालेत? नेमका काय फरक पडलाय ही सेमिनार अटेन्ड करणार्‍यांमध्ये?

यशस्वींच्या कथा सांगणारे केवळ कल्पनेवर सर्व फोकस करतात, ती आयडिया कशी भारी आहे, कशी लोकांचे प्रश्न सोडवते, वगैरे वगैरे. हे वरवरचे आहे. खरेतर जर ह्या कथा इतकंच सांगणार असतील तर त्या फक्त त्यांच्या बिझनेसची पेड जाहिरात आहेत असे समजावे. अशा जाहिरातींचे दोन मुख्य उद्दिष्टं असतात, एक तर टेकसॅव्ही यंगर जनरेशनपर्यंत सहज पोचता येते, दुसरा अर्थातच इन्वेस्टर्सच्या नजरेत येण्याचे चान्सेस वाढतात. असे असेल तर या कथांना मनोरंजनाशिवाय काहीही किंमत नाही. उदाहरणार्थ, ओला किंवा उबेर यांच्या कंपनीवॅल्युएशनबद्दल दर तिसर्‍या दिवशी आकडेवारी आपण बघतो, कशी एकही कॅब मालकीची नसतांना जगातली सर्वात मोठी पब्लिक ट्रान्सपोर्ट कंपनी उभी राहीली याबद्दल कौतुक ऐकतो. नव उद्योजकाला यातून काय मार्गदर्शन, इन्स्पिरेशन मिळतं? दिवास्वप्नांचे शेखचिल्लीपण मिळू शकतं फारतर...

अशा कथांनी खरे तर हे सांगितले पाहिजे की आयडिया ते एक्झीक्युशन ते सक्सेस यापर्यंतचा प्रवास, त्यातले धोके, अडचणी, त्यावर कशी मात केल्या गेली, कॅशफ्लोचा प्रश्न कसा सोडवला, सॉफ्टवेअर्स कशी तयार केलीत, नोकरी करायला माणसे कशी मिळवली, त्यांच्यासाठी पगार कुठून जमवला, आपली कल्पना ग्राहकांना, वेन्डर्सना कशी पीच केली, कोणत्या क्यू पॉइन्ट्स वर वेन्डर्स किंवा स्टेकहोल्डर्स सहभागी व्हायला तयार झाले, फायनान्शियल्स कसे सांभाळले, जाहिराती कशा केल्या, इन्वेस्टर्सला कसे भेटलात, काय डिस्कशन्स झालीत, होतात. एक ना अनेक, असंख्य प्रश्न असतात एक उद्योग उभारायचा म्हटला तर. दिसायला (खरेतर दाखवायला) एक कंप्युटर आणि इन्टरनेट कनेक्शन एवढ्याच भांडवलावर कंपन्या उभ्या राहतात असे दिसते. पण हे खरे आहे का? ओयो हॉटेल्स इतक्या शहरांमध्ये प्रत्येक हॉटेल पर्यंत कसं पोचले असेल?

हे प्रश्न पडायचे कारण असे की मी बघतोय अनेक तरुण कल्पना शोधण्यात वेळ घालवत आहेत, पैसे घालवत आहेत. यशस्वी लोकांपासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एक्झिक्युशन ची वेळ आली की स्वप्नांच्या ठिकर्‍या उडतात. तिथे कोणतेही मार्गदर्शन उपलब्ध नसते. ज्याचे त्यालाच निभावून न्यायला लागते. उद्योगाच जग म्हणजे जंगलचा कायदा असतो. तिथे स्वप्नाळू लोकांचे काहीच काम नाही. मी पैसे टाकणार, किंवा आयडिया काढणार आणि उद्योग आपोआप उभा राहील असे समजणारे खूप नग रोज भेटतात. बायस तोडावे लागतात, आउट ऑफ बॉक्स विचार करावा लागतोच.

नवीन उद्योगाची कल्पना, तिचे महत्त्व फारतर १ टक्का असावे. ९९ टक्के महत्त्व हे यशस्वी अंमलबजावणीचेच असते. कारण दिवसाला माझ्या डोक्यात शंभर युनिक कल्पना येत असतात. पण त्यातली एक कल्पना जरी राबवायची म्हटली तर शंभर महिने लागू शकतील ती प्रत्यक्षात यायला. किंवा इतके महिने खपून ती येईलच असेही नाही.

डिलिव्हरी

काही लोक असे जबरदस्त असतात ना कि बस!

तीन महिन्या आधी आम्ही शिफ्ट केले आणि आल्या आल्या तीन दिवसात सिलिंडर संपला, डिस्त्रीबुटर बदलला नव्हता त्यामुळे पत्ता बदल करायला आधीच्या ठिकाणी जायला लागलं, तिथून धावपळ करून डॉक्युमेंट घेतलं, ते डिस्ट्रीबुटर अगदी बोगस, थंड.

आत्ताच्या डिस्ट्री कडे सकाळी 9 ला बोलवलं तर 9ला हजर राहिलो कागद करताना विचारलं सिलिंडर कधी मिळेल, तर म्हणे आज संध्याकाळ पर्यन्त सिस्टीम तुमचा अड्डरेस अपडेट करेल मग रात्री तुम्ही फोनवरून बुकिंग करा, दुसऱ्या दिवशी येईल... दुसरा दिवस नेमका रविवार, सुट्टीचा, आता पंचाईत, आमच्याकडे दुसरं सिलिंडर नाही, दोन तीन दिवस कसे काढणार, त्यांना अडचण सांगितली... पण ते ऑफीसातले कर्मचारी हतबल दिसत होते, आधीच्या अनुभवारून तर मी गृहीत धरलं होते की हेही असेच असणार, मग मी बाहेर पडलो, रिक्षा मागवली, पाऊस तुफान होता त्या दिवशी, मी रिक्षेत बसत असताना तिथल्या डिलिव्हरी वाल्याने हाक मारून बोलवले, ते लोक म्हणाले की आम्ही करतो व्यवस्था, दुसऱ्याचा सिलिंडर तुम्हाला ऍडजस्ट करून देतो, त्याला सोमवारी देऊ त्याच्याकडे दोन आहेत, तुम्ही फक्त आज संध्याकाळी 7 नन्तर बुकिंग नक्की करा, म्हणजे रिसीट जनरेट होईल... आम्ही अडचणीत येणार नाही... मला तर गदगदून आले एकदम...

आनंदात घरी पोचलो, बायकोला काही सांगितलं नाही, माझ्या मागेच दहाव्या मिनिटाला सिलिंडर हजर झाले, (आपलं भयताड सुपरम्यान आहे की काय असं तिला वाटलं असावं 😊)

तोच डिलिव्हरी पर्सन होता, म्हणाला हा एरिया माझ्याकडेच आहे, काळजी करू नका, आज हा एकच राहिला होता सिलिंडर, पण तो अगदी जुना जीर्ण झालेला आहे, काही वास बिस आला, लिकेज ची अडचण झाली तर मला या पर्सनल नंबर वर कॉल करा, कधीही अगदी रात्री केला तरी चालेल,

एक रुपयासुद्धा त्याने बक्षीस मागितली नाही, मीही त्याच्या चांगुलपणाचा अपमान केला नाही.

परवा ते सिलिंडर सम्पले, रात्री 11 वाजता बुक केलं, दुसऱ्याच सकाळी अगदी नवं कोरे करकरीत सिलिंडर घेऊन तो मनुष्य आला आणि म्हणाला की मागे तुम्हाला जुनेपुराने दिलं, म्हणून या वेळेस निवडून नवं कोरं घेऊन आलो....

फील्स कैच्या कै 😊😊